' “लतादीदींचा पाठिंबा नसता तर स्पर्धेतून केव्हाच दूर फेकलो गेलो असतो.” – बप्पी लहिरी – InMarathi

“लतादीदींचा पाठिंबा नसता तर स्पर्धेतून केव्हाच दूर फेकलो गेलो असतो.” – बप्पी लहिरी

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम शेअरचॅट

व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल 

===

बप्पी लहिरींच्या निधनाची बातमी इतक्यातच समोर आली आहे. भरपूर सोनं घालणाऱ्या बप्पीदांनी आपल्या उडत्या चालीच्या गाण्यांनी बराच काळ प्रेक्षकांना रिझवलं. ‘तम्मा तम्मा लोगे’, ‘बम्बईसे आया मेरा दोस्त’, ‘याद आ रहा है’ अशी अनेक जुनी गाणी आजही लोक गुणगुणतात.

बप्पीदांच्या संगीताचा आणि गायकीचा एक मोठा चाहता वर्ग आहे. लग्नाच्या हळदीसमारंभात बोलावलेल्या ऑर्केस्ट्रात तुम्ही कदाचित बप्पीदांच्या स्टाईलची नक्कल करणारं कुणीतरी पाहिलं असेल. पण त्या कुणालाही बप्पीदांची सर येऊ शकत नाही.

आमचं युट्यूब चॅनल आणि त्यावरचे व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला फॉलो करा :

‘डिस्को किंग’ अशी ओळख असलेले बप्पीदा प्रत्यक्ष आयुष्यात धार्मिक वृत्तीचे आणि गणपतीचे भक्त होते. त्यांच्या आयुष्यात त्यांचा अनेक थोरामोठ्यांशी जवळून परिचय आला.

 

bappi lahiri IM

 

गानसम्राज्ञी लता मंगेशकर आपल्यातून जाऊन अजून दोन आठवडेही पूर्ण झालेले नाहीत. लतादीदींच्या निधनानंतर शोकाकूल झालेले बप्पीदा “माझी दुसरी आई गेली.”असं म्हणाले होते.

पूर्वी एका मुलाखतीत बप्पीदांनी लतादीदींविषयी कृतज्ञता व्यक्त केली होती. “लतादीदींचा पाठिंबा नसता तर मी स्पर्धेतून केव्हाच दूर फेकलो गेलो असतो.” असं ते म्हणाले होते. नेमक्या कुठल्या अनुभवावरून बप्पीदा असं म्हणाले असतील? जाणून घेऊ.

२०१२ साली ‘इ टाइम्स’ ला दिलेल्या एका मुलाखतीत बप्पीदा म्हणाले होते, “आम्ही कलकत्त्याच्या एडन गार्डन परिसरात राहायचो. मी ४ वर्षांचा असताना एकदा लतादीदी आमच्या घरी आल्या होत्या आणि त्यांनी मला आशीर्वाद दिला होता. माझ्याकडे त्यांच्यासोबतचा एक फोटो आजही आहे ज्यात मी त्यांच्या मांडीवर बसलो होतो. माझे वडील अपरेश लहिरी हे कलकत्त्यातले एक प्रसिद्ध संगीतकार होते. लतादीदींनी त्यांच्यासाठी अनेक बंगाली गाणी गायली.

 

bappi lahiri 3 IM

 

तेव्हापासूनच लतादीदींनी मला कायम पाठिंबा दिला. ‘दादू’ या बंगाली चित्रपटातल्या माझ्या पहिल्यावहिल्या संगीतासाठी त्यांनी आवाज दिला होता. जर लतादीदी माझ्यासाठी गायल्या नसत्या तर या स्पर्धेतून मी केव्हाच दूर फेकलो गेलो असतो.”

पुढे ते म्हणाले, “आमिर खानचे वडील ताहीर हुसेन यांच्या ‘जखमी’ या चित्रपटातल्या गाण्यांना मी दिलेलं संगीत हे बॉलिवूडमधलं माझं पाहिलं गाजलेलं संगीत. या चित्रपटातली ‘अभी अभी थी दुष्मनी’ आणि ‘आओ तुझे चांद पे ले जाऊं’ ही गाणी लतादीदींनी गायली होती आणि ही दोन्ही गाणी लोकांनी डोक्यावर घेतली. या चित्रपटातलं ‘जलता है जिया मेरा भिगी भिगी रातों में’ हे आशा भोसले आणि किशोर कुमार यांचं ड्युएटही खूप लोकप्रिय झालं होतं.

‘चलते चलते’ आणि ‘आप की खातीर’ या चित्रपटांतल्या माझ्या संगीतालाही लोकांचं चिक्कार प्रेम मिळालं. ‘आप की खातीर’ मधलं ‘बम्बई से आया मेरा दोस्त’ हे गाणं लोक आजही गुणगुणतात. तर अशा प्रकारे माझ्या करियरची सुरुवात झाली.”

 

bappi da IM

 

लतादीदींच्या निधनानंतर त्यांनी अनेकांना केलेल्या मदतीच्या किश्श्यांना आपण नव्याने उजाळा दिला असेलच. अगदी बप्पी लहिरींचं नावही या यादीत आहे हे वाचून आपल्यातल्या अनेकांना आश्चर्य वाटेल.

बप्पीदा नवोदित कलाकार असताना त्यांना पुढे आणणाऱ्या लतादीदी आणि याची शेवट्पर्यंत जाणीव ठेवलेले बप्पीदा या दोघांनाही केवळ त्यांच्या कलेमुळेच नव्हे तर या अशा अनुभवांमुळेही रसिकांच्या मनात विशेष स्थान मिळालंय.

सलमान खानच्या ‘बिग बॉस १५’ या कार्यक्रमात बप्पीदा शेवटचे दिसले होते. तिथे त्यांनी आपला नातू स्वस्तिकच्या ‘बच्चा पार्टी’ या गाण्याचं प्रमोशन केलं होतं. २०२० साली आलेल्या ‘बाघी ३’ या चित्रपटातलं ‘भंकस’ हे गाणं बप्पीदांचं बॉलिवूडमधलं शेवटचं गाणं ठरलं.

 

bappi da 2 IM

 

आरोग्यासंबंधीच्या बऱ्याच समस्यांमुळे बप्पीदांचं वयाच्या ६९ व्या वर्षी मुंबईतील जुहूमधल्या ‘क्रिटीकेअर’ या रुग्णालयात मंगळवारी रात्री निधन झालं.

बॉलिवूड जगताप्रमाणेच त्यांच्या तमाम चाहत्यांना त्यांच्या जाण्याची चुटपूट दीर्घकाळ लागून राहणार आहे. बप्पीदा जरी हे जग सोडून गेले असले तरी त्यांच्या गाण्यांमधून ते सदैव आपल्यासोबत असतील. बप्पीदांना आदरपूर्वक श्रद्धांजली!

===

आमचं युट्यूब चॅनल आणि त्यावरचे व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला फॉलो करा :

===

व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल

 शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम  | टेलिग्राम शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.

error: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?