' भिकाऱ्यांना स्वतःच्या पायावर उभं करून त्यांना स्वयंपूर्ण बनवणारा अवलिया! – InMarathi

भिकाऱ्यांना स्वतःच्या पायावर उभं करून त्यांना स्वयंपूर्ण बनवणारा अवलिया!

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम शेअरचॅट

व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल 

===

भिकारी म्हटलं, की त्याबरोबरीने लगेच आठवते ती लाचारी. पोटापाण्यासाठी भीक मागून जगणाऱ्या भिकाऱ्यांना आत्मसन्मान ठाऊक नसतो. त्याच्या जगण्याला जगणं तरी कसं म्हणायचं हा प्रश्न आहे.

एरवी फार शिक्षण न झालेल्या पण राबराब राबणाऱ्या मजूर, कामगारांनासुद्धा दिवसाअखेरीस निदान आपल्या कष्टाच्या कामाईने खाल्लेली भाकरी खाऊन आपण झोपतोय याचं समाधान असतं, पण ज्यांच्यावर भीक मागायची वेळ आलेली असते त्यांनी चार ठिकाणी फिरून, काम मिळवून झडझडून कष्ट केले तर त्यांच्याही आयुष्याला काहीएक आकार येऊ शकतो.

 

woman-beggar_praying Inmarathi

 

आपल्या आजुबाजूला दिसणारे, झोपडपट्ट्यांच्या आसपास असणारे भिकारी बघता हे असं घडताना दिसत नाही हे नक्की. एखाद्या भिकाऱ्याच्या गबाळ्या, किळसवाण्या अवताराकडे पाहिल्यावर कुणी त्याला काम द्यायला पटकन तयारही होणार नाही कदाचित, पण एका इसमाने भिकाऱ्यांचा उद्धार व्हावा यासाठी अत्यंत विचारपूर्वक काही ठोस पावलं उचलली आहेत.

आयती भीक देऊन भिकाऱ्यांना सोकावून ठेवू नये तर त्यांनादेखील कष्ट करून स्वतःचे पैसे कमावता आले पाहिजेत यासाठी हा माणूस मनापासून प्रयत्न करतोय. या भिकाऱ्यांमधून उद्योजक घडवतोय.

आजच्या काळात स्वतःच्या वैयक्तिक सुखापलीकडे आपण समाजाचंही काहीतरी देणं लागतो असा विचार करणारी माणसं कमी होत चालली आहेत. बनारसची चंदन मिश्रा ही व्यक्ती त्या दुर्मिळ माणसांपैकीच एक. २०२३ पर्यंत बनारसला भिकारीमुक्त शहर करण्याचं एक उदात्त ध्येय त्यांनी स्वतःपुढे ठेवलं आहे.

आमचं युट्यूब चॅनल आणि त्यावरचे व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला फॉलो करा :

बनारसमध्ये राहणाऱ्या चंदन मिश्रा यांनी २०२१ साली ‘बेगर्स कॉर्पोरेशन’ नावाची एक एनजीओ स्थापन केली होती. या एनजीओच्या माध्यमातून त्यांना दान देऊन भिकाऱ्यांचं पुनर्वसन करायचं नाहीये तर भिकाऱ्यांना निरनिराळ्या कौशल्यांमध्ये पारंगत करून उद्योजक बनवायचं आहे.

१२ कुटुंबं आणि ५५ भिकारी त्यांच्या एनजीओसोबत जोडले गेले असल्याचं समजतंय. या १२ कुटूंबांतल्या कुटूंबियांमध्ये फार न्यूनगंड होता आणि त्यांच्यात आत्मविश्वासाचीही कमतरता होती.

मिश्रा यांनी प्रयत्नपूर्वक त्या सगळ्यांची मानसिकता बदलली. या एनजीओमध्ये भिकाऱ्यांना लॅपटॉप बॅग, कागदापासून आणि कापडापासून बनवल्या जाणाऱ्या बॅग, कॉन्फरन्स बॅग अशा विविध वस्तू बनवायला शिकवलं जातं. सामान्य माणसांबरोबरीनेच वेगवेगळ्या कंपन्यांमध्ये आणि बनारसमधल्या वेगवेगळ्या हॉटेल्समध्ये त्यांनी तयार केलेलं हे सामान पोहोचवलं जातं.

 

bag im

 

‘बेटर इंडिया’शी बोलताना चंदन मिश्रा म्हणाले, “मी भिकाऱ्यांना श्रमांचं महत्त्व समजावून देऊ इच्छितो. त्यांना दान देऊन मला त्यांचं पुनर्वसन करायचं नाहीये तर त्यांना उद्योजक बनवायचंय. त्यामुळे भिकाऱ्यांना समाजात मान मिळेल आणि ते सन्मानाने जीवन जगू शकतील.”

पुढे ते असं म्हणाले, “भारतात दरवर्षी सुमारे ४,१३,६७० भिकाऱ्यांना जवळपास ३४,२४२ करोड रुपये दान म्हणून मिळतात. जर या रकमेची बचत केली तर याहून जास्त रकमेची कमाई करता येईल. दानाच्या स्वरूपात मिळालेल्या या रकमेतून रोजगार निर्मिती करता येईल आणि पर्यायाने देशाची अर्थव्यवस्था बदलता येईल.”

मिश्रा यांनी बनारसमधले भिकारी शोधून काढायची परवानगी आपल्या संस्थेला मिळावी अशी सरकारला विनंती केली आहे. भिकाऱ्यांना ओळखपत्रं दिली जातील जेणेकरून कुठल्या भिकाऱ्यांना मदतीची खरंच गरज आहे आणि कुठले भिकारी रॅकेटचा भाग आहेत हे संस्थेतल्या कर्मचाऱ्यांच्या लक्षात येईल.

 

beggars foundation im

 

मिश्रा असं म्हणतात, की अपंग आणि वृद्ध भिकाऱ्यांना पुनर्वसन केंद्रांमध्ये हलवता येऊ शकतं आणि १८ ते ४५ वयोगटातल्या भिकाऱ्यांना तीन महिने प्रशिक्षण देऊन बांग्लादेशचे नोबेल विजेते मुहम्मद युनूस यांचा आदर्श  समोर ठेवून त्यांचा व्यवसाय विस्तारता यावा यासाठी कर्ज देता येऊ शकतं.

आपल्या या एनजीओची त्यांनी भविष्यात नफा कंपनी करण्याचं ठरवलं. मार्च महिन्यात या संस्थेची ‘नफा कंपनी’ म्हणून नोंदणी होणार असल्याचं समजतंय. यासाठी ते जवळपास २.५ करोड रुपयांचा निधी उभा करणार असल्याचं समोर आलंय.

ते म्हणाले, “सुरुवातीला आम्ही भिकारी काम करतील का आणि त्यांनी तयार केलेल्या वस्तू बाजारात खपतील का हे बघत होतो. त्यांनी बनवलेल्या वस्तू खपल्या गेल्या. त्यामुळे आता या एनजीओचं आम्ही नफा कंपनीत रूपांतर करण्याच्या प्रयत्नात आहोत.”

 

beggars foundation im1

 

चंदन मिश्रा यांनी शहराच्या राजेंद्र प्रसाद घाटावर ‘मॉर्निग स्कुल ऑफ लाईफ’ नावाची एक शाळादेखील स्थापन केली आहे. या शाळेच्या माध्यमातून भिकाऱ्यांची पुढची पिढी अशिक्षित राहू न देण्याचं त्यांचं ध्येय आहे. या शाळेत भिकारी बालकांना आणि भिकाऱ्यांच्या लहान मुलांना शिक्षण दिलं जातं. कुठल्याही लहान मुलावर भीक मागण्याची वेळ येऊ नये अशी मिश्रा यांची इच्छा आहे.

एखाद्या गोष्टीची आतून लख्ख जाणीव होऊन स्वयंप्रेरणेने एखादं कार्य हाती घेतलेल्या माणसाकडून आपण प्रेरित नक्की होऊ, पण ती निःस्वार्थ वृत्ती आपल्यात मुळात असावी लागते. दुसऱ्यासाठी घटकाभर हळहळणाऱ्या आणि शेवटी केवळ स्वतःपुरतंच बघणाऱ्या आपल्यातल्या अनेकांमध्ये ती नसते. चंदन मिश्रांसारखी माणसं मुलखावेगळी ठरतात ती याचमुळे!

आमचं युट्यूब चॅनल आणि त्यावरचे व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला फॉलो करा :

===

व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल

 शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम  | टेलिग्राम शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved. 

error: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?