' नीरा आणि ताडी मध्ये नेमका फरक काय? नीरा खरंच आरोग्यदायी असते का? – InMarathi

नीरा आणि ताडी मध्ये नेमका फरक काय? नीरा खरंच आरोग्यदायी असते का?

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम शेअरचॅट

व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल 

===

आपण प्रवास करताना थकलेले असतो तेव्हा आसपास कोल्ड्रिंक्स, ज्युस, सरबतांचे स्टॉल्स, उसाच्या रसाचं गुऱ्हाळ आहे का हे शोधायला आपली नजर लगेच भिरभिरते. ते ग्लासभर पेयं आपला शीण घालवतं आणि आपल्याला तरतरीत करून पुढल्या प्रवासासाठी ऊर्जा देतं.

असंच एक पेयं म्हणजे नीरा. नीराचे स्टॉल्स जरी आपल्याला फारसे दिसत नसले तरी या पेयाची चव आपण कधीतरी चाखलेली असते. सकाळी मॉर्निंग वॉकला जाणारी काही मंडळीदेखील आपल्या रोज चालायच्या रस्त्यावर नीराचा स्टॉल असेल तर नीरा पितात.

 

neera IM

 

नीरा शरीरासाठी खूप उपयुक्त असते हे आपण मोठ्यांकडून विशेषतः आजी आजोबांच्या पिढीतल्यांकडून ऐकलेलं असतं. नीराची चव जरी गोड असली तरी थोडी वेगळी असल्याने काही जणांना ती आवडते तर काही जण नाकं मुरडतात.

आमचं युट्यूब चॅनल आणि त्यावरचे व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला फॉलो करा :

नारळाच्या झाडाला आपण ‘कल्पवृक्ष’ असं म्हणतो. या झाडाच्या प्रत्येक भागाचा काही ना काही उपयोग होतो. तसाच तो नीरा बनवण्यासाठीही होतो.

नारळाच्या आणि ताडाच्या झाडापासून नीरा बनवली जाते. पण नीरा इतर पेयांसारखी आपल्यासाठी सहजासहजी उपलब्द्ध होऊ शकली का? ती ताडीपेक्षा वेगळी कशी? तिचे फायदे काय आहेत? हे आपल्यातल्या अनेकांना माहीत नसेल. तर जाणून घेऊया या सगळ्याविषयी.

 

toddy IM

 

नारळाच्या आणि ताडाच्या झाडांच्या फुलांना कोंब यायला लागला की तो दोरीने घट्ट बांधून त्याच्या टोकाला कोयत्याने चिर दिली जाते. त्यातून बाहेर पडणारा द्रव खाली मडक्यात साठवला जातो. हीच नीरा असते. पण काही तासांपुरतीच ती आहे त्या स्थितीत राहते. त्यानंतर ती नैसर्गिकरित्या आंबून त्याचं ताडीत रूपांतर होतं.

नीरा जरी शरीराकरता उपयुक्त असली तरी ताडीत ४%अल्कोहोलचा अंश असल्याने त्यामुळे ती चढते आणि ती शरीरासाठी अपायकारक समजली जाते.

नीरा जर विक्रीकरता उपलब्ध करून दिली तर ती तिच्या शुद्ध स्वरूपात आहे की तिची ताडी झालेली आहे याची खात्री देता येणार नाही म्हणून पूर्वी सरकारने नीराविक्रीवर बंदी आणली होती. ती बंदी हटवायला शेतकऱ्यांना फार संघर्ष करावा लागला.

नीराची गणना ताडीतच केली जायची. तिच्या उत्पादनावर अबकारी कायद्याअंतर्गत सरकारचं नियंत्रण असायचं. नीरा काढणं शेतकऱ्यांना अमान्य केलं गेलं होतं. नीरा ही आरोग्याच्या दृष्टीने कशी चांगली आहे हा आपला मुद्दा शेतकऱ्यांनी लावून धरला होता. अखेरीस नीरा उत्पादन आणि विक्रीला शासनाची परवानगी मिळाली.

 

neera 3 IM

 

नीरा उत्पादनासाठी अबकारी कायद्यात बदल करण्याची गरज नाही असं ठरलं. नीरा काढल्यावर त्यावर प्रक्रिया केली जावी आणि ती आंबणार नाही अशा प्रकारे तिचं पॅकेजिंग केलं जावं जेणेकरून तिच्यातले पोषक घटक तसेच राहून ती टिकवता येईल असा प्रस्ताव सरकारने मांडला.

सरकारने नेमलेल्या समितीच्या म्हणण्यानुसार, नीरा काढण्यासाठी दिलेल्या परवानगीचा कुणी गैरवापर करायला नको म्हणून उत्पादन शुल्क विभागाने नीराच्या उत्पादनावर देखरेख करायला सुरुवात केली आणि केवळ ‘कोकोनट डेव्हलपमेन्ट बोर्ड’कडे नोंदणी असलेल्या नारळ आणि ताडाच्या उत्पादकांनीच नीरा काढावी असं सांगण्यात आलं.

अशा प्रकारे नीराविक्रीला अधिकृत मान्यता मिळाली. आपण जेव्हा नीराच्या स्टॉलवर जातो तेव्हा जर तिथे ‘सरकारमान्य’ असा फलक लावलेला असेल तर याचा अर्थ असा की इथली नीरा ही पिण्यायोग्य आहे.

 

neera stalls IM

 

सूर्योदयापूर्वीच झाडातून नीराचा द्रव काढला जातो. त्यानंतर तंत्रज्ञानाच्या द्वारे तिच्यावर प्रक्रिया करून तिच्या मूळ पोषकमूल्यांच्या सहित तिची साठवणूक केली जाते. ती आंबू नये म्हणून तिच्यावर प्रक्रिया करून झाली की तिच्यात असलेला मायक्रोफ्लोरा हा घटक काढून टाकण्यासाठी ती पाश्चराइज केली जाते. त्यानंतरही नीरा आंबू नये म्हणून ती बर्फात थंड करत ठेवली जाते.

तंत्रज्ञानाच्या साहाय्याने प्रक्रिया केलेली ही नीरा नॉर्मल तापमानात केवळ २ महिनेच टिकू शकते. मात्र फ्रिजमध्ये ती अगदी ४-६ महिनेसुद्धा साठवता येते.

नीरापासून गूळ, कॉन्सन्ट्रेटेड सिरप, स्वीटनर्स तयार करता येतात. आरोग्याच्या दृष्टीने नीराचे अनेक फायदे आहेत. बंगलोरच्या ‘इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ सायन्स’च्या अभ्यासानुसार यकृताचे आजार, विशेषतः अल्कोहोलच्या सेवनामुळे झालेले आजार बरे करण्यासाठी नीरा उपयुक्त ठरते.

इथेनॉलमधलया ‘एसेटालडेहाइड’ या विषारी घटकामुळे यकृताला नुकसान पोहोचतं. हा विषारी घटक काढून टाकण्यासाठी नीराचा उपयोग होतो. नीरा प्यायल्यामुळे यकृत नेहमीपेक्षा अधिक चांगल्या प्रकारे कार्यरत राहतं. मधुमेहाचा त्रास असणाऱ्यांसाठी तर नीरा हे उत्तम पेयं आहे. कारण, नीरामधली ग्लायसेमिक इंडेक्सची पातळी कमी असते.

 

neera 4 IM

 

आपण एखादा पदार्थ खाल्ल्यानंतर रक्तात ग्लुकोज मिसळून त्यामुळे रक्तातील साखरेचं प्रमाण किती वाढलं हे ग्लायसेमिक इंडेक्स मोजतो. नीरात आणि नीरापासून बनवलेल्या स्वीटनर्समध्ये एरव्ही आपण वापरतो त्या स्वीटनर्सइतकाच गोडवा असतो शिवाय त्यामुळे बाकी स्वीटनर्सच्या तुलनेत रक्तातली साखरेची पातळीही वाढत नाही.

ग्लायसेमिक इंडेक्सची पातळी कमी असल्यामुळे नीराच्या सेवनाने लठ्ठपणा, हृदय आणि रक्तवाहिन्यांच्या संबंधित आजार, छातीचा, मोठ्या आतड्याचा, स्वादुपिंडाचा आणि प्रोस्टेटचा कर्करोग होण्याचा धोका टळायलाही मदत होते.

दमा, क्षयरोग, मुत्राशयाशी संबंधित इन्फेक्शन्स बरी करण्यासाठी नीराचा उपयोग होऊ शकतो का यावर अभ्यास केला जात आहे.

 

neera 5 IM

 

नीरा काढल्यावर लगेचच त्यावर प्रक्रिया केलेली नीरा उत्तम समजली जाते. पण नारळाच्या आणि ताडाच्या झाडांच्या जवळपासच्या ठिकाणीच इतक्या पटकन हा द्रव काढणं शक्य होत असल्याने नीरा मिळण्याची जी ठिकाणं दूरवर असतात तिथे इतक्या चांगल्या दर्जाची नीरा मिळणं थोडं कठीण असतं.

त्यामुळे यापुढे जेव्हा तुम्ही नीरा प्यायचं ठरवाल तेव्हा शक्यतो आसपास ताडामाडाची झाडं भरपूर असतील अशाच ठिकाणी प्या. जेणेकरून ती ताडी असण्याची शक्यता फार कमी असेल आणि तुम्हाला तिचा फायदाही होईल.

===

आमचं युट्यूब चॅनल आणि त्यावरचे व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला फॉलो करा :

===

व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल

 शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम  | टेलिग्राम शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.

error: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?