'जगण्यासाठी शरीराचा सौदा करणारी "ती" आणि तिच्या मुलाची गोष्ट

जगण्यासाठी शरीराचा सौदा करणारी “ती” आणि तिच्या मुलाची गोष्ट

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम |

===

लेखक – सारंग भोईरकर 

वेश्यांच्या मुलांसाठी सुरु केलेल्या शाळेत यायचा तो. आपलं वय नेमकं किती हे त्याला सांगताही यायचं नाही. कारण जन्मतारीख वगैरे नेमकी माहित नाही, त्यालाही आणि त्याच्या अम्मालाही.  शरीर आणि दिसण्यावरून वाटायचा मात्र १३-१४ वर्षांचा.

कधी हाल्फ तर कधी फुल पॅन्ट, मळका टी-शर्ट आणि अनवाणी असायचा. उंचीला फार नव्हता, काळासावळा होता पण चेहरा बोलका होता त्याचा.

शिकण्यात लक्षचं लागायचं नाही त्याचं. पण गोष्टी सांगायला लागलो की तल्लीन होऊन ऐकायचा. तशी सगळीच मुलं (म्हणजे ८-१० च) गोष्टीत रमायची. पण याचं रमणं थोडं वेगळ्या पातळीवर आहे असं मला वाटायचं.

तास संपले कि घरी जायला नको म्हणायचा. उदासीनता आणि नैराश्य एकदम दाटून यायचं त्याच्या चेहऱ्यावर. आमचा हा प्रोजेक्ट सुरु करण्याचा अगोदर सर्व्हे केला होता तेव्हा त्याची आई म्हणाली होती की इसकू थोडा तो पढाओ.

पण कसं पढवणार हेच आम्हाला कळायचं नाही. कारण शिक्षणाचे जे बेसिक संस्कार व्हायला हवेत तेच या मुलांवर झालेले नव्हते, त्यामुळे आम्हाला तीन अधिक दोन पाच हे शिकवायला आणि त्यांना हे आकलन करून घ्यायला आठवडा सहज जायचा. त्यात पुन्हा रोज सगळे येतीलच याची काहीच गॅरेंंटी नाही. पण हा मात्र जवळ जवळ रोज असायचा.

 

alone-boy-marathipizza
smathew.deviantart.com

एकदा तो तीन चार दिवस गायबच होता. ज्या दिवशी आला त्या दिवशी थोडं तोंड सुजलेलं, काळनिळं पडलं होतं. वर्गात आल्यावर सगळ्यात शेवटच्या ओळीत बसून राहिला शाळा संपेपर्यंत.

सगळे निघून गेल्यावर मी आणि मानसी त्याच्या जवळ बसलो, तर एकदम रडायलाच लागला. शांत झाल्यावर म्हणाला, २ दिवसांपूर्वी एका गिऱ्हाईकांन खूप मारलं अम्माला.

मग ते कळल्यावर इतर बायांनी मिळून त्याला मारलं तर तो माणसं घेऊन आला आणि राडा घातला. अम्माच्या पोटात वार केले.  मलाही खूप मारलं. त्यादिवशी त्याने पहिल्यांदा मन मोकळं केलं. त्याचं लहानपण सांगितलं.

आपली आई नक्की काय आहे हे फार लवकर कळलं होतं त्याला. ज्यांच्या पदरात दैव दुःखाचं माप भरभरून टाकतं ना त्यांना फार लवकर समज येते आणि कदाचित कोडगेपणाही.

आधी त्यांच्याच खोलीत एक पडदा लावून पलीकडे काम चालायचं, पण एका रात्री याला आवाजाने जाग आली आणि हा उठून पलीकडे गेला तर चिडलेल्या गिऱ्हाईकानं अम्माला आणि याला मारला होता. तेव्हापासून हा माडीच्या एकदम शेवटच्या मजल्यावर रिकाम्या खोलीत झोपायला लागला.

 

India Sex Workers Inmarathi

आपण ज्याला घर म्हणतो त्या ३ मजली माडीचा जिना चढणारी लोकं आणि त्यांच्या वखवखलेल्या नजरा, त्यांच्या अंगाला येणारे दारू, गुटखा, मावा, तंबाखू, विडी-सिगारेटीचे अतिउग्र वास त्याच्या डोक्यात फिट्ट बसले होते.

त्याची अम्मा त्याला कधी काळी फिरायला न्यायची. बाजारात किंवा बागेत तेव्हा तिथे दिसणाऱ्या बायका, त्यांच्याबरोबर असणारे त्यांचे नवरे, मुलं हे त्याला दुसरं जग वाटायचं.

हा झोपेतून जागा होत असताना झोपायला जाणारी आणि संध्याकाळी कधीतरी जागी होऊन, नशा करून कामाला उभी राहणारी अम्मा फार कमी वाट्याला आली त्याच्या. अशा वेळेला मुलं जे करतात तेच तो करायचा.

व्यसनं, मारामाऱ्या वगैरे रोजचचं होतं, त्याला पण हॉस्पिटल मध्ये ऍडमिट पहिल्यांदाच करावं लागलं होतं. होईल ना माझी अम्मा बरी? असं त्याने जेव्हा विचारलं तेव्हाचा त्याचा चेहरा मला अजूनही आठवतो.

वस्त्यांमधून वाढणाऱ्या मुलांच्या चेहऱ्यावर एक जन्मजात उर्मटपणा, बेफिकिरी आणि कोडगेपणा असतो तो मला त्याच्या चेहऱ्यात कधीच दिसला नाही किंवा फार क्वचितच दिसला.

 

prostitution-marathipizza00
thinkinghatssix.blogspot.in

त्याला घेऊन ससूनला जाऊन त्याच्या अम्माला आम्ही भेटलो यातच तो खूप नॉर्मलला आला. डॉक्टरांशी बोलून त्याला सांगितलं की थोड्याच दिवसात अम्मा बरी होईल. त्याला तिथेच सोडून आम्ही निघालो आणि नरपतगिर चौकात चहाला थांबलो. आम्ही खूप ऑफ होतो त्या दिवशी.

नियती नावाची महा हरामखोर गोष्ट एखाद्याच्या पदरात कसल्या दुखाचं आणि विवंचनेच दान टाकेल आणि मजा बघत बसेल हे सांगता येत नाही. पु.ल म्हणतात तसं, “तहानलेल्याला पाणी मिळू नये हा तर नियतीचा लाडका खेळ”.

पेन्सिलपासून अगदी कुठल्याही गोष्टीचा हट्ट करण्यात आणि आयुष्यातल्या क्षुद्र समस्यांना “दुःख” मानून स्वतःच कोडकौतुक करून घेणाऱ्या आम्हाला त्याचं दुःख पचवणं तर दूरच पण समजणंही अवघड होतं.

===

InMarathi.com वर विविध लेखकांनी व्यक्त केलेले विचार ही त्यांची वैयक्तिक मतं असतात. InMarathi.com त्या मतांशी सहमत असेलच असं नाही. | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटरइंस्टाग्राम | Copyright © InMarathi.com | All rights reserved.

One thought on “जगण्यासाठी शरीराचा सौदा करणारी “ती” आणि तिच्या मुलाची गोष्ट

  • June 19, 2017 at 5:51 pm
    Permalink

    अति उत्तम

    Reply

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?