' भारत पाकिस्तान मधल्या थ्रिलची चित्तरकथा : भाग १

भारत पाकिस्तान मधल्या थ्रिलची चित्तरकथा : भाग १

आमच्या इतर लेखांच्या अपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या फेसबुकपेजला नक्की Like करा: facebook.com/InMarathi
===

भारताचा पाकिस्तानवर असलेला अघोषित बहिष्कार हा क्रिकेटमध्ये उठून दिसत असतो. पारंपरिक प्रतिस्पर्धी आणि हाडवैरी कट्टर शत्रू असल्या कसल्या कसल्या विश्लेषणांमार्फत वृत्तवाहिन्यासुद्धा यात भरपूर तेल ओतत असतात. यासाठी ढोबळ पद्धतीने भारत पाकिस्तान सामन्यांच्या प्रेक्षकांची मानसिकता समजून घेण्याचा प्रयत्न आहे.

या देशात ‘क्रिकेट हे ऑक्सिजनएवढंच महत्वाचं आहे’ या गृहितकावर हा लेख आधारित आहे. त्यामुळे अर्थातच भारत पाकिस्तान सामने आणि त्यामागची गंमत मांडता येईल. भारतामध्ये प्रचंड मोठा वर्ग कट्टर देशभक्त आहे. “देव देश अन धर्मापायी प्राण घेतलं हाती” हे ब्रीदवाक्य मानणाऱ्या वर्गाची संख्या या देशात प्रचंड मोठी आहे. या देशावर प्रेम करण्याच्या त्यांच्या संकल्पनासुद्धा काही प्रमाणात भाबड्या आहेत. भारतमाता की जय, हिंदुस्थान की कसम, राष्ट्रध्वज, राष्ट्रगीत हे त्यांच्यासाठी ‘वीक पॉईंट्स’ असतात.

ind-vs-pak-marathipizza00
haribhoomi.com

“मेरा रंग दे बसंती चोला” हे चैतन्य घेऊन यांची आयुष्ये जात असतात. काश्मिरात शाहिद होणाऱ्या जवानांना धरून हा वर्ग प्रचंड भावनिक होत असतो. जालियनवाला बाग परिसरात या वर्गाला शांत राहावंसं वाटतं, कारगिल परिसरात हा वर्ग भावुक होऊन प्रसंगी एखाद अश्रूही ढाळत असतो. ‘लक्ष’ सिनेमातला ह्रितिक रोशनचा शेवटचा (लाजवाब) अर्धा तास हा वर्ग श्वास रोखून बघतो. देशभक्तीच्या एकूणच बटबटीत व्याख्या या वर्गाकडून अनुभवायला मिळतात. कुठल्याही विद्यापीठात भारतविरोधी घोषणा ऐकू आल्या की या वर्गाच्या तळपायाची आग मस्तकात गेलीच म्हणून समजा.

भारत पाकिस्तान सामने हा या वर्गाचा अक्षरशः प्राण असतो. पाकिस्तानची नांगी ठेचली की या वर्गाला एक मर्यादित हिस्टेरिया चढतो. या वर्गातल्या इंग्रजी ना कळणाऱ्या लोकांनाही अर्णव गोस्वामी आवडत असतो. या गटात धर्मांध लोक असतात.

देशभक्तांच्या दुसऱ्या वर्गात बहुतांशी अधिक शिकलेले आणि शिकून श्रम करून सधन झालेले लोक असतात. ह्या वर्गाच्या देशभक्तीच्या व्याख्या बटबटीत नसतात आणि प्रमाणाबाहेर टोकदारही नसतात. हा वर्ग व्यावहारिक तत्वांवर देशभक्ती बाळगून असतो. परदेशी जाऊन स्थायिक होण्याची संधी आली की हा वर्ग तिला नकार देत नाही आणि परदेशी जाऊनसुद्धा देशाची सेवा करता येते हे हा वर्ग तर्काने पटवून देऊ शकतो. देशात असेल तर शक्यतो आयकर वेळच्या वेळी भरणं, रेल्वेने तिकीट काढून प्रवास, रस्त्यात पान खाऊन न थुंकणं, फार प्रदूषण न करता प्रेमाने सण साजरे करणं, इतर देश आपल्या पुढे का? याची मीमांसा करणं, हे या गटाकडून अधिक होत असतं.

indian-patriotism-marathipizza
planetpuja.blogspot.in

देशभक्तीवर हा गट भाबडा नसतो परंतू संवेदनशील असतो. या गटाला अर्णव गोस्वामी कंठाळी वाटतो पण बरा वाटतो. भारत पाकिस्तान सामने या वर्गाला आवडतात, आणि पूर्वी इम्रान खान, मियांदाद, इंझमाम, वासिम अक्रम, वकार युनूस किंवा शोएब अख्तर उत्तम खेळत असत याची या गटाला जाण असते. पाकिस्तानी खेळाडूंना हा गट झिडकारत नाही, परंतू भारताने त्यांना कायम हरवावं असं या वर्गाचं मत असतं. या गटाकडे राष्ट्रभक्ती भले भावुक नसेल पण प्रतिकांचा आदर हा वर्ग नक्की करतो. भारत विरोधी घोषणा या वर्गाला रुचत नाहीत आणि हा प्रकार मोडून काढायला हवा या ठाम मताचा हा वर्ग असतो. या गटात धर्मांध फारसे लोक नसतात परंतु धार्मिक लोक मात्र असतात. तरीही हा गट धर्मनिरपेक्ष असलेल्या आस्तिक आणि नास्तिक गटांची जुळणी असते. सुधारणावादी नसला तरी हा गट विवेकवादी असतो.

तिसरा वर्ग हा अधिक शिकलेला असतो. पहिल्या गटाच्या मते या वर्गाला चार बुकं शिकून अधिक अक्कल आलेली असते. या गटाला पहिल्या गटाचा भाबडेपणा अजिबात सोसत नसतो. ‘भारतमाता की जय’ ही घोषणा या वर्गाला बिनडोक धर्मवादी वगैरे वाटत असते. बहुतेकदा हा गट माणसामाणसांमध्ये भेदभाव ना करायच्या मताचा असतो. माणूस जन्माला माणूस म्हणूनच येत असतो. त्याला तहान, भूक, प्रेम इत्यादी भावना जन्मजातच समान असतात. पण तरीही त्या जन्माला आलेल्या बालकावर समाजकडून धर्म भाषा आणि संस्कृती थोपवली जाते आणि त्या व्यक्तीचा पद्धतशीर ब्रेनवॉश केला जातो. आणि पुढे त्या व्यक्तीचा समाजाने बांधलेल्या गुरांमध्ये समावेश होत असतो. या वर्गाला देशभक्तीची भावना तुच्छ आणि गमतीशीर वाटत असते.

secularism-marathipizza

वैश्विक बंधुत्वाच्या गोष्टी करणारा हा वर्ग जाती धर्माच्या राजकारणाशी पूर्णपणे फटकून वागत असतो. आंतरधर्मीय विवाह या वर्गात सर्रास होतात. अर्णव गोस्वामीला गोळी घालायला हवी असं यांच्यातल्या काहींना वाटत असतं. भारताने पाकिस्तानशी संबंध ठेवावेत असं या गटाला वाटत असतं. पाकिस्तान शत्रूराष्ट्र नाही याची हा वर्ग जाण ठेऊन असतो. आणि जर राजकारण खराब असेल तर क्रिकेटमध्ये कशाला आणता? असं या वर्गाला वाटत असतं. आणि जर क्रिकेटमध्ये राजकारण असेल आणि जर तुम्ही भारत पाकिस्तान द्बिपक्षीय सामने भारवायचं बंद करत असाल तर बहुपक्षीय स्पर्धांमध्ये बरे तुम्ही त्यांच्याबरोबर खेळत असता ते का? असा या गटाचा प्रश्न असतो. आणि मुळात एका खेळाला धरून एवढी भावनिकता का आणि राष्ट्रप्रेमाचं अवडंबर का असा या वर्गाचा प्रश्न असतो. क्रिकेट या वर्गाला एक निव्वळ खेळ म्हणून आवडत असतं. हा एक अतिशय निखळ आणि गोड खेळ आहे असाच या वर्गाचा समज असतो. देशभक्ती वगैरे संकल्पना नाहक जोडत भावनेचा व्यापार बंद करावा असं या वर्गाला वाटत राहतं. देशविरोधी घोषणा ही या वर्गाला एक सहज अभिव्यक्ती वाटत असते. मूलभूत अधिकारांचा पुरेपूर उपभोग घेऊन असलेल्या वाजवी निर्बंधांना हा गट हुकूमशाही मानू शकतो. या गटात धर्मनिरपेक्ष आणि नास्तिक भरलेले असतात.

पुढच्या लेखात गेल्या पंचवीस वर्षांमधल्या भारत पाकिस्तान सामन्यांचा प्रवास (आढावा- अहवाल नव्हे).

InMarathi.com वर विविध लेखकांनी व्यक्त केलेले विचार ही त्यांची वैयक्तिक मतं असतात. InMarathi.com त्या मतांशी सहमत असेलच असे नाही. । आमच्या लेखांच्या अपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या फेसबुकपेजला नक्की Like करा: facebook.com/InMarathi

Sourabh Ganpatye

लेखक राजकीय विश्लेषक आणि अभ्यासक आहेत.

sourabh has 29 posts and counting.See all posts by sourabh

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?