' प्रसिद्धी, पैसा की अन्य काही? ३२ वर्षांपुर्वी घडलेल्या गायकाच्या हत्येचं न सुटलेलं कोडं – InMarathi

प्रसिद्धी, पैसा की अन्य काही? ३२ वर्षांपुर्वी घडलेल्या गायकाच्या हत्येचं न सुटलेलं कोडं

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम शेअरचॅट

व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल 

===

कला म्हणजे खरं तर जीवनात आनंद देणारा, उत्साह निर्माण करणारा विषय आहे. एखाद्या कलाकाराविषयी कुणालाही राग, वैयक्तिक तेढ किंवा तत्सम काही भावना असणं तसं विरळाच म्हणायला हवं. पण परिस्थिती अशी सुद्धा असू शकते, एखादा कलाकार जीवानिशी जाऊ शकतो, आणि ही हत्या एक कधीही न उमगणारं गूढ रहस्य निर्माण करू शकते.

 

murder inmarathi

आमचं युट्यूब चॅनल आणि त्यावरचे व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला फॉलो करा :

एका पंजाबी गायकाच्या बाबतीत असं घडलं होतं. त्या गायकाचं नाव होतं अमरसिंह चमकीला. पंजाबमधील एक अत्यंत सुप्रसिद्ध आणि रसिकांचा लाडका गायक म्हणून हे नाव प्रसिद्ध झालं होतं. दर्जेदार स्टेज परफॉर्मन्स करण्यात त्यांचा हातखंडा होता. याशिवाय त्यांचा स्वतःचा एक बँड होता, ज्यात त्यांची पत्नी अमरजोत सिंह चमकीला सुद्धा होती. एक उत्तम गायक असणारे अमरसिंह स्वतःच गीतकारही होते. त्यांच्या उत्तमोत्तम गाण्यांमध्ये धार्मिक गीतांचा सुद्धा समावेश होता.

गोष्ट ऐंशीच्या दशकातली…

ऐंशीच्या दशकाचा शेवट होण्याकडे झुकलेला तो काळ होता. १९८८ साली पंजाबमधील महसामपूर इथे एका कार्यक्रमासाठी चमकीला दाम्पत्य निघालं होतं. परफॉर्मन्ससाठी ते पोचू शकणारच नाहीत, हे मात्र त्यावेळी त्यांना माहित नव्हतं.

वाटेवरच दोन दुचाकीस्वारांनी त्यांना गाठलं. अवघ्या २७ वर्षांचे अमरसिंह आणि त्यांची पत्नी अमरजोत यांच्यावर गोळ्यांचा वर्षाव झाला. दोघांना मरणाच्या दारात सोडून, आपलं काम पूर्ण करून ती दुचाकी निघून गेली. त्यानंतर कधीही ना ते दुचाकीस्वार हाती आले, ना या सगळ्या कटामागचा सूत्रधार!

 

singer im

 

रसिकांच्या आवडत्या गायकाची हत्या, एक कोडं बनून राहिली. त्यांच्या जीवनाचा प्रवास अचानक संपला, मात्र एक गायक म्हणून त्यांचा प्रवास फारच उत्तम होता,

असे वळले गायन क्षेत्राकडे…

अमरसिंह चमकीला यांचा जन्म २१ जुलै १९६० ला झाला होता. लुधियानामधील डुगरी गावचे निवासी असणाऱ्या अमरसिंह यांना इलेक्ट्रीशियन व्हायचं होतं. मात्र तसं होऊ शकलं नाही. गाण्याची आवड असणाऱ्या या तरुणाने रोजीरोटीसाठी एका कपड्याच्या मिलमध्ये नोकरी पत्करली.

संगीत क्षेत्रातील आवड म्हणून ढोलकी आणि हार्मोनियम वाजवायला शिकलेल्या अमरसिंह यांना वयाच्या अठराव्या वर्षी सुरेंद्र शिंदा भेटले. त्यांनी अमरसिंहमधील कलाकार ओळखला आणि त्याच्यासह काम करायला सुरुवात केली. हळूहळू या क्षेत्रात त्यांची प्रगती होऊ लागली. सुरेंद्र यांच्यासाठी गीतकार म्हणून ते काम करूलागले. याच दरम्यान त्यांचं लग्नही झालं.

 

singer 1 im

 

लग्न झाल्यावर कुटुंबाची जबाबदारी अंगावर पडली. पैशांचं सोंग घेणं शक्य नसतं, तो कमवावा लागतो, हे सत्य आहे. याच सत्याचं फलित आणि पैशांची गरज म्हणून अमरसिंह यांनी स्वतःचे शोज करायला सुरुवात केली. यातून पैशांची निकड भागली जाऊ लागली. दुसरीकडे, गाण्यांमधून सर्वसामान्य जीवन मांडत असलेल्या या गायकाची लोकप्रियता सुद्धा वाढू लागली.

सुरेंद्र शिंदा यांची सहकलाकर सोनिया शिंदा हिच्यासह त्यांनी आपला पहिला अल्बम रेकॉर्ड केला. १९८१ साली प्रसिद्ध झालेला ‘बापू साडा गुम हो गया’ हा अल्बम त्यांच्या कारकिर्दीतील यशाची महत्त्वाची पायरी ठरला.

ऐशीच्या दशकातील मध्यावर चमकीला यांनी बाबा तेरा ननकाना, नाम जप ले, तलवार मैं कलगीधार दी अशी धार्मिक गाणी गायली. यामुळे त्यांची लोकप्रियता अधिकच वाढली. पहले ललकारे नाल हे त्यांचं एक गीत १९८७ साली एका चित्रपटाचा भाग झालं. त्यामुळे प्लेबॅक सिंगरचा शिक्का सुद्धा त्यांच्या कारकीर्दीवर दिमाखात चमकू लागला.

 

couple im

 

अमरजोत यांच्याशी लग्न…

सोनिया शिंदासह काम करून झाल्यावर उषा नावाच्या गायिकेसह सुद्धा त्यांनी काम केलं. त्याच काळात अमरजोत आणि अमरसिंह यांनी सुद्धा काम करायला सुरुवात केली. कुलदीप मानक सारख्या नावाजलेल्या कलाकारासह काम करणारी अमरजोत सुद्धा प्रसिद्धी होती. या दोघांनी एकत्र काम सुरु केल्यानंतर मात्र, दोघांची खास छाप रसिकांवर पडली. ही लोकप्रियता कायम राहावी आणि चाहत्यांच्या मनात असणारी जागा आणखी दृढ व्हावी यासाठी त्या दोघांनी लग्न केलं. अमरसिंह चमकीला यांचा हा दुसरा विवाह होता.

 

amar singh im

 

या गाण्यानंतर त्यांचा संगीत क्षेत्रातील प्रवास वेगळ्या उंचीवर पोचला असंही म्हटलं जातं. १९८३ च्या मे महिन्यात हे लग्न झालं आणि १९८५ पासून चमकीलाची लोकप्रियता वेगळ्याच उंचीवर पोचली. कॅनडा, दुबई, बहरीन, यूएस अशा देशांमध्ये त्यांचे लाईव्ह परफॉर्मन्स होऊ लागले.

लग्न समारंभानाच्या सुपाऱ्या घेण्यास त्यांनी सुरुवात केली. हे सगळं करत असताना, सुरेंद्र शिंदा यांच्यासाठी गीतलेखन करणं त्यांनी थांबवलं नव्हतं. त्यांच्यासह जगमोहन, के एस कुनर अशा काही गायकांसाठी सुद्धा त्यांनी गीतलेखन सुरु केलं होतं. थोडक्यात सांगायचं झालं, तर त्यांची लोकप्रियता आणि त्यांचा संगीतक्षेत्रातील वावर अधिकाधिक उंची गाठू लागला होता.

याच वळणावर असताना त्यांच्या आयुष्याचा प्रवास मात्र अचानक संपला. एका सुप्रसिद्ध आणि लोकप्रिय गायकाचा मृत्यू एक कोडं बनून राहिलं. ‘चमकीलाची प्रसिद्धी आणि पैसा याला कारणीभूत होता की दुसरं लग्न?’ की याहूनही काही वेगळं कारण या हत्येमागे होतं, हे गूढ मात्र कधीही उकललं गेलं नाही. कारण आज तीन दशकं उलटून गेली, तरीही दुचाकीस्वारांचा कुठलाही पत्ता लागला नाही.

 

murder im

 

खरंतर या घटनेनंतर पंजाबचे राजकारण ढवळून निघाले होते. देशभरात या हत्येचे पडसाद उमटले होते, गुणी गायकाच्या हत्येचे गूढ उलगडून काढावे, अशी मागणी होत होती. मात्र तरिही आजतागायत या घटनेमागील सुत्रधार न सापडणे याला नक्की काय म्हणावे? राजकीय हस्तक्षेप? यंत्रणेचे दुर्लक्ष की आणखीन काही?…

आमचं युट्यूब चॅनल आणि त्यावरचे व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला फॉलो करा :

 

===

व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल

 शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम  | टेलिग्राम शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.

error: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?