' मासे खाण्याचं निमंत्रण ते शिवसेना प्रवेशाबद्दल विचारणा, दीदी-बाळासाहेबांच्या नात्याचे किस्से – InMarathi

मासे खाण्याचं निमंत्रण ते शिवसेना प्रवेशाबद्दल विचारणा, दीदी-बाळासाहेबांच्या नात्याचे किस्से

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम शेअरचॅट

व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल 

===

महाराष्ट्रात जी महत्वाची आणि प्रतिष्ठीत कुटुंबं आहेत त्यात ठाकरे आणि मंगेशकर कुटुंब वरच्या स्थानावर आहेत.  या दोन कुटुंबातला जिव्हाळाही सर्वपरिचित आहे. बाळासाहेब लता दीदींना घरचा सदस्य मानत. या दोन्ही कुटुंबियांचं परस्परांकडे नियमित येणं जाणं असे.

लता दीदी आणि बाळासाहेब त्यांच्या त्यांच्या कामात इतके व्यस्त असत, की कधी कधी महिनोन महिने भेटी होत नसत मात्र एकमेकांचे वाढदिवस त्यांनी कधीही चुकू दिले नाहीत. एकमेकांच्या वाढदिवसांच्या शुभेच्छा देण्यासाठी दोघेही आवर्जून घरी जात असत.

आमचं युट्यूब चॅनल आणि त्यावरचे व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला फॉलो करा :

सार्‍या जगावर ज्यांच्या आवाजाची मोहिनी आहे, त्या दीदींच्या स्वर्गीय आवाजाची मोहिनी बाळासाहेबांवरही होती. दीदींचं प्रत्येक गाणं त्यांनी ऐकलं होतं.

बाळासाहेबांना जेव्हा कधी एखादं त्यांच्या संग्रही नसणारं दीदींचं गाणं ऐकण्याची इच्छा होत असे तेव्हा बाळासाहेब राज यांना दीदींकडे पाठवून कॅसेट मागवून घेत असत. दीदींना बाळासाहेबांनी भगिनी मानलं होतं तो मान आजही ठाकरे कुटुंबानं राखला आहे.  मुंबईबाहेर असले, तरीही दोघे फ़ोनवरून संपर्कात रहात असत. दोन्ही कुटुंबियांचा नुकताच कौटुंबिक जिव्हाळा जडला होता. त्या दरम्यानचा हा किस्सा-

दीदी एकदा कोल्हापूरला कामानिमित्त वास्तव्यास होत्या. दीदींच्या कानावर आलं की बाळासाहेबांची तब्येत बरी नाही.  त्यांनी ताबडतोब बाळासाहेबांना विचारपूस करणारा फ़ोन करून तब्येतीची विचारपूस केली.

 

lata mangeshkar im

 

बोलता बोलता गप्पा खानपानावर आल्या आणि दीदींना बाळासाहेबांनी विचारलं की ‘मासळी वगैरे खाता की नाही?’ यावर दीदी म्हणाल्या,’मासळी खाते, पण तिखट नाही’ मुंबईला गेल्यावर बाळासाहेबांकडून दीदींना मासळी जेवणाचे खास आमंत्रण गेले आणि त्यांना आवडते तशी मासळी मातोश्रीवर रांधली गेली.

हा जिव्हाळा दिवसें दिवस दृढ होत गेला. शिवसेनेच्या जाहिर कार्यक्रमांना लतादीदींना आवर्जून आमंत्रण जाऊ लागलं आणि दीदीही आमंत्रणाचा मान ठेवत या कार्यक्रमांना हजर राहू लागल्या. एकदा शिवौद्योग सेनेच्या कार्यक्रमाला दीदी उपस्थित राहिल्या होत्या. या कर्यक्रमात दीदींनी आग्रहास्तव काही गाणी गायली.

त्यानंतर उपस्थितांतून इतके वन्स मोअर येत राहिले की हा कार्यक्रम जवळपास तीन साडेतीन तास चालला. बाळासाहेबांना लतादीदींचं भयंकर कौतुक होतं. त्यांना मिळणारं चाहत्यांचं प्रेम बघून ते भारावून गेले.

बाळासाहेबांचा आणि लतादीदींचा प्रवास हिंदुत्वाच्या दिशेनं जाणारा होता. बाळासाहेबांनी परिचय दृढ झाल्यानंतर दीदींच्या लोकप्रियता आणि प्रतिमेचा पक्षाला उपयोग करून घेता येईल या विचारानं एकदा दीदींना शिवसेनेकडून राजकारणात प्रवेश करण्याबाबत सुचविलं.

 

lata mangeshkar im2]

 

बाळासाहेबांच्या या सूचनेला दीदींनी विनम्रपणे समोर नकार देत सांगितलं की, ‘तुम्ही तुमच्या क्षेत्रात ज्याप्रमाणे प्रामाणिकपणे काम करत आहात त्याचप्रमाणे मलाही माझ्याच क्षेत्रात राहूद्या. राजकारण हा माझा प्रांत नव्हे.’ बाळासाहेबांनीही हा विनम्र नकार स्विकारत पुन्हा कधीही हा विषय दीदींकडे काढला नाही.

बाळासाहेब एका कलाकाराचं संवेदनशील मन जाणून होते. त्यामुळे दीदी आजूबाजूला असताना राजकारणाविषयी शब्दही बोलला जाणार नाही याची ते दक्षता घेत. एक दिवस बाळासाहेबांचा दीदींना फ़ोन आला आणि त्यांनी दीनानाथांच्या स्मृतीप्रित्यर्थ बांधलेल्या प्रेक्षागृहाची पहाणी करण्याबाबत सुचविलं, ‘तेरे पिताजी के नाम से मैंने हॉल बनाया है तुम आओ और बताओ कैसा लगा”.

खारमधे पंडित दीनानाथ मंगेशकर सभागृह  बांधून बाळासाहेबांनी दीदींना अनोखी भेट दिली तर दीदींनी या भेटीची परतभेट म्हणून बाळासाहेबांना स्वत: दीनानाथांनी काढलेलं चित्र दिलं.

 

lata mangeshkar im3

 

बाळासाहेबांच्या अखेरच्या काळात त्यांचं लोकांना भेटणं कमी झालं होतं. दिवसें दिवस तब्येत खालावत चालली होती. बाळासाहेबांनी लतादीदींना फ़ोन करून भेटण्याची इच्छा व्यक्त केली आणि दीदी सगळी कामं बाजूला सारुन बाळासाहेबांना भेटण्यासाठी मातोश्रीवर पोहोचल्या.

 

lata mangeshkar im1

 

दीदींसोबत झालेल्या गप्पांत बाळासाहेबांनी खंत व्यक्त केली की, आयुष्यभर मी सतत फ़िरलो, सतत माणसांच्या गोतावळ्यात राहिलो आणि आता हे असं बिछान्यावर पडून रहाताना क्लेष होतात. त्यांना असं दु:खी कष्टी बघून दीदींना गलबलून आलं. त्यांनी बाळासाहेबांना थोडं काहीतरी आवडीचं खाण्याचा आग्रह केला. अखेर दीदींच्या समजावण्यानं बाळाहेसाहेबांनी थोडं सूप प्यायलं.

दीदींना निरोप देताना बाळासाहेबांनी नेहमीप्रमाणेच भरभरून आशिर्वाद दिले. लता दीदींसाठी ते वडीलबंधूंप्रमाणे, वडिलांच्या स्थानी होते.  यानंतर बाळासाहेबांनी दीदींना प्रेमळ आदेशच दिला, की आता त्यांनी रोज मातोश्रीवर भेटीला यायचं आहे.

लतादीदींची मनापासून इच्छा होती, की या त्यांच्या अखेरच्या दिवसात रोज भेटीला जावं, त्यांच्याशी चार शब्द बोलावेत, त्यांचं मन हलकं करावं, पण वलयांकीत असण्याचा हा तोटा होता की बाळासाहेबांच्या घराबाहेरच्या गर्दीला लतादीदींच्या जाण्यानं ठाकरे कुटुंबियाना आणखीन त्रासच झाला असता.

गर्दी थोडी कमी होण्याची वाट बघत असतानाच ती दु:खद बातमी दीदींना समजली आणि त्यांना दु:खावेग आवरेना. बाळासाहेब गेल्यावर सदगदीद होऊन त्या म्हणाल्या, की ‘बाळासाहेब म्हणजेच महाराष्ट्र होता ते नाहीत तर काही उरलं नाही.’ 

आमचं युट्यूब चॅनल आणि त्यावरचे व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला फॉलो करा :

===

व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल

 शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम  | टेलिग्राम शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved. 

error: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?