' झोपडपट्टीतलं बालपण ते आज थेट मायक्रोसॉफ्टमधील नोकरी, शाहिदाचा प्रेरणादायी प्रवास! – InMarathi

झोपडपट्टीतलं बालपण ते आज थेट मायक्रोसॉफ्टमधील नोकरी, शाहिदाचा प्रेरणादायी प्रवास!

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम शेअरचॅट

व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल 

===

बऱ्याचदा गोष्टी, सुखसोयी आपल्याला सहज उपलब्ध झाल्या की आपल्याला त्यांची किंमत कळत नाही. आपल्यातल्या अनेकांना सगळं काही असताना अगदी क्षुल्लक कारणांवरून रडारड करायची सवय असते. पण ज्यांचं रोजचं आयुष्यच हालअपेष्टांनी आणि रोज समोर येणाऱ्या नवनव्या आव्हानांनी भरलेलं असतं त्यांना ही अशी उगीचच्या उगीच अश्रू ढाळायची चैन परवडणारी नसते.

या अशा अत्यंत गरिबीत वाढलेल्या काही जणांच्या डोळ्यांत मात्र स्वप्नं पाहायची चमक आणि ती पूर्णत्वाला न्यायची धमक असते. आपल्या आसपासच्या परिस्थितीतून त्यांना आयुष्याच्या अत्यंत भीषण वास्तवाचं दर्शन घडलेलं असतं.

आमचं युट्यूब चॅनल आणि त्यावरचे व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला फॉलो करा :

आपल्याबरोबरच्या इतरांनी जशी परिस्थितीसमोर मान तुकवली आणि ते सोसत राहिले तशी अवस्था त्यांना आपल्या आयुष्याच्या बाबतीत होऊ द्यायची नसते. तुमचा पक्का निश्चय असेल आणि प्रचंड मेहनत घ्यायची तयारी असेल तर तुमचं नशीब बदलणं तुमच्या हातात असतं याची चालतीबोलती उदाहरणं म्हणजे ही दुर्मिळ माणसं असतात.

शाहिना अत्तरवाला ही अशीच एक व्यक्ती. झोपडपट्टीत वाढलेल्या शाहिना या आज मायक्रोसॉफ्टमध्ये ‘प्रॉडक्ट डिझाईन मॅनेजर’च्या पदावर आहे. त्यांना त्यांचं हे स्वप्न सत्यात उतरवायला जो प्रचंड मोठा संघर्ष करावा लागला तो अनेक छोट्या छोट्या संघर्षांनी भरलेला होता.

 

shaheena attarwala IM

 

परिस्थितीने त्यांची फार कठोर परीक्षा पाहिली पण त्या परिस्थितीला चांगल्याच पुरून उरल्या. आपल्या ट्विटमधून शाहिना यांनी नुकतंच आपल्या झोपडपट्टीत घालवलेल्या आयुष्याविषयी आणि तिथल्या अनुभवांनी आपलं आयुष्य कसं घडवलं याविषयी लिहिलंय.

हे ट्विट चांगलंच व्हायरल झालं असून त्याला ४०००हून अधिक लाईक्स मिळालेत त्यावर शेकडो कमेंट्स आल्या आहेत.

नेटफ्लिक्सवरील ‘बॅड बॉय बिलीनीयर्स : इंडिया’ या सिरीजमध्ये मुंबईतल्या झोपडपट्टीचं ओझरतं दर्शन घडतं. त्यात आपलं झोपडपट्टीतलं जुनं घर पाहून शाहिना यांच्या जुन्या स्मृतींना उजाळा मिळाला.

शाहिना त्यांच्या ट्विटमध्ये लिहितात, “नेटफ्लिक्सवरील ‘बॅड बॉय बिलीनीयर्स : इंडिया’ या सिरीजमध्ये २०१५ सालानंतर मी स्वतःचं आयुष्य घडवायला एकटीने बाहेर पडले त्यापूर्वी ज्या झोपडपट्टीत वाढले तिचं ओझरतं दर्शन घडवलं आहे. फोटोत तुम्ही जी घरं पाहताय त्यातलं एक घर आमचं आहे. तुम्हाला तिथली सार्वजनिक स्वच्छतागृहंही फार बऱ्या परिस्थितीत दिसत आहेत. पण आम्ही तिथे राहत असताना ती तशी नव्हती.”

 

shaheena IM

 

शाहिना या बांद्रा रेल्वे स्टेशनजवळच्या दर्गा गल्लीतील एका झोपडपट्टीत राहायच्या. त्यांचे वडील उत्तर प्रदेशातून मुंबईत राहायला आले होते आणि ते इसेन्शिअल ऑईल्सची विक्री करणारे व्यापारी होते. शाहिना यांना दर्गा गल्लीत पुरेश्या सुविधा उपलब्ध नसल्यामुळे अगदी रस्त्यावरसुद्धा झोपावं लागायचं.

शाहिना म्हणतात, “झोपडपट्टीतलं माझं आयुष्य अत्यंत हालाखीचं होतं आणि त्या आयुष्याने मला जगण्याची विविध रूपं दाखवली. तिथे मी लिंग भेद पाहिला, लैंगिक अत्याचार झालेले पाहिले. पण याच आयुष्याने माझ्यात शिकण्याचं आणि स्वतःचं एक वेगळं आयुष्य घडवण्याचं कुतूहलही जागवलं.”

एनडीटिव्हीला दिलेल्या मुलाखतीत शाहिना म्हणतात,”वयाच्या १५व्या वर्षापर्यंत मी माझ्या आसपास अनेक असहाय्य, परावलंबी, ज्यांच्याशी गैरवर्तन केलं गेलंय अश्या आणि हवी ती निवड करण्याचं आणि हवं ते बनण्याचं स्वातंत्र्य नसल्यामुळे आहे ते आयुष्य रेटत जगणाऱ्या बायका पाहिल्या होत्या. मला त्यांच्यासारखं परिस्थितीला शरण जायचं नव्हतं.”

शाहिना यांनी जेव्हा पहिल्यांदा त्यांच्या शाळेत कॉम्प्युटर पाहिला तेव्हाच कॉम्प्युटरने त्यांचं चित्त वेधून घेतलं. कॉम्प्युटरसमोर बसणं म्हणजे अनेक संधी आपल्यासाठी खुल्या होणं असं त्यांना वाटलं. पण मार्क कमी पडल्यामुळे त्यांना शिवणकाम करावं लागलं आणि कॉम्प्युटरच्या क्लासला जाता आलं नाही. पण तरीही त्या डगमगल्या नाहीत.

 

computer inmarathi

 

कॉम्प्युटर क्लासला बसायला नकार मिळाल्यानंतरही त्या तंत्रज्ञानाच्या क्षेत्रात करियर करण्याचं स्वप्न बघतच राहिल्या. तिथल्या स्थानिक कॉम्प्युटर क्लासमध्ये फी भरता यावी म्हणून त्यांनी त्यांच्या बाबांना इतरांकडून पैसे उसने घ्यायला लावले.

दुपारचं जेवण न जेवता आणि चालत घरी येऊन त्यांनी पैसे वाचवले आणि स्वतःसाठी कॉम्प्युटर विकत घेतला. कालांतराने आपलं प्रोग्रॅमिंगमधलं करियर सोडून त्यांनी डिझाईनचं करियर निवडलं.

डिझाईनममुळे आपला अनेक शक्यता असतात यावर विश्वास बसतो आणि तंत्रज्ञान हे बदल घडवून आणण्याचं एक साधन आहे अशी त्यांची ही निवड करण्यामागे धारणा आहे.

अनेक वर्षांच्या मेहनतीनंतर, अनेक त्याग केल्यानंतर, बऱ्याच आव्हानांशी दोन हात केल्यानंतर अखेरीस गेल्या वर्षी शाहिना आपल्या कुटुंबियांसोबत भरपूर सूर्यप्रकाश असलेल्या, हवेशीर आणि आजूबाजूला हिरवळ असलेल्या एका मस्त अपार्टमेंटमध्ये राहायला गेल्या.

 

design im

 

झोपडपट्टीत राहणाऱ्या, प्रसंगी ज्यांची उपासमार घडली अश्या शाहिना यांच्यासाठी या अपार्टमेंटमध्ये राहायला जाणं ही गोष्ट खूपच मोठी आणि त्यांच्या अथक परिश्रमांची पावती देणारी होती.

एका ट्विटमधून त्या लिहितात, ” वडील फेरीवाले  असणं आणि रस्त्यावर झोपायला लागणं इथपासून आम्ही जे आयुष्य जगायचं केवळ स्वप्नच पाहिलं होतं ते आयुष्य प्रत्यक्षात जगता येण्यासाठी नशीब, प्रचंड मेहनत आणि ज्या ज्या लढाया लढणं गरजेचं होतं त्या लढणं या गोष्टी महत्त्वाच्या ठरल्या.”

आपल्या वडिलांविषयी कृतज्ञता व्यक्त करायला शाहिना विसरल्या नाहीत. त्या म्हणतात, “त्यांचं औपचारिक शिक्षण झालेलं नाही. पण त्यांच्याकडे असलेल्या पर्फ्युम्सच्या कलेने सगळं बदललं. अनेक दशकं झोपडपट्टीत जगल्यानंतर त्यांच्यातल्या प्रचंड संयमामुळे आणि त्यांनी केलेल्या त्यागामुळे आम्हा सगळ्यांचं आयुष्य सुधारायला मदत झाली. बचत करण्यावर, काटकसर करून जगण्यावर आणि गरज असेल तिथे गोष्टींचा त्याग करण्यावर आम्ही भर द्यायचो.”

 

dharavi-slum INmarathi

 

त्या ज्या प्रतिकूल परिस्थिती होत्या तश्या प्रतिकूल परिस्थितीत असलेल्या अनेक मुलींना आणि महिलांना शाहिना संदेश देतात की, “शिक्षण घेण्यासाठी, कौशल्यं आत्मसात करण्यासाठी आणि करियरसाठी जितकी मेहनत घेता येईल तितकी घ्या. हेच मुलींसाठी गेम चेंजर ठरतं.”

ट्विटरच्या माध्यमातून नेटकऱ्यांनी शाहिना यांच्यावर कौतुकाचा प्रचंड वर्षाव केला आहे. केवळ शाहिना यांच्यासारख्या प्रतिकूल परिस्थितीतून वर येण्याचं स्वप्न बघणाऱ्या अनेकींनाच नाही तर सगळ्या सोयीसुविधा उपलब्द्ध असलेल्या आपल्यासारख्या अनेकींनाही शाहिना यांचा आयुष्याकडे पाहण्याचा सकारात्मक दृष्टिकोन स्फूर्ती देतो.

आहे त्या परिस्थितीत आपली सर्वोत्तम कामगिरी करायचा प्रयत्न करा हे सांगतो. “अनंत आमुची ध्येय्यासक्ती अनंत अन् आशा किनारा तुला पामराला” हेच शाहिना यांच्या जिद्दीकडे पाहून म्हणावंसं वाटतं.

आमचं युट्यूब चॅनल आणि त्यावरचे व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला फॉलो करा :

===

व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल

 शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम  | टेलिग्राम शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.

error: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?