' दगडातून ज्योत ते डोळे बंद करून पहावी लागणारी मूर्ती, ११०० वर्ष जुने रहस्यमय मंदिर – InMarathi

दगडातून ज्योत ते डोळे बंद करून पहावी लागणारी मूर्ती, ११०० वर्ष जुने रहस्यमय मंदिर

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम शेअरचॅट

व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल 

===

कितीही तर्काला धरून चालायचं म्हटलं तरी अनेक वेळा आपल्याला कितीतरी गोष्टी तर्कापल्याड असल्याचं लक्षात येत असतं. अशा अनेक गोष्टी असतात ज्या तशा का असतात याचं कुठलंच सबळ कारण आपल्याला मिळत नाही आणि तरीदेखील त्या गोष्टींचं अस्तित्त्व आपल्याला अमान्य करता येत नाही.

आमचं युट्यूब चॅनल आणि त्यावरचे व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला फॉलो करा :

भारतीय संस्कृतीतदेखील अश्या  कितीतरी गोष्टी, कितीतरी स्थळं आहेत जी आपली हीच बौद्धिक मर्यादा अधोरेखित करतात. त्यांची रहस्यं कुतूहलाचा, चर्चेचा आणि अभ्यासकांसाठी अभ्यासाचा विषय ठरतात, पण ती सगळी रहस्यं समजून घ्यावी लागतात ती केवळ त्या रहस्यांविषयी असलेल्या आख्यायिका जाणून घेऊन.

भारतात अशी अनेक प्राचीन रहस्यमयी मंदिरं आहेत ज्यांच्याविषयी आपल्याला माहिती नसते. जेव्हा आपल्याला त्यांची माहिती मिळते, तेव्हा आपण केवळ आश्चर्य व्यक्त करतो. काहीवेळा भीतीची भावनाही मनात येते पण तरीदेखील त्यांच्याविषयी जाणून घेण्याचं औत्सुक्य आटत नाही.

मनोभावे देवाची पूजा करणारा एक पुजारी असं चित्र डोळ्यांसमोर आणा. पूजा करण्यात तल्लीन झालेला हा पुजारी कदाचित आपोआप डोळे मिटून घेईल. पण डोळ्यांवर पट्टी बांधून मूर्तीची पूजा केली जाण्याविषयी तुम्ही कधी ऐकलं आहे?

 

mahamaya temple im

 

भारतातल्या झारखंड राज्यातील गुमान जिल्ह्यात हपामुनी नावाच्या गावात महामाया नावाचं एक मंदिर आहे. या मंदिरात आजही मूळ मूर्तीची पूजा डोळ्यांवर पट्टी बांधून केली जाते. कारण, ही मूर्ती नुसत्या डोळ्यांनी पाहता येत नाही असं सांगितलं जातं.

या महामाया मंदिरातली मूळ मूर्ती आजही पेटीत बंद आहे. बाहेर या देवीची प्रतिमा आहे. अमावस्येला तिथे डोलजत्रा असते. त्यावेळी ही पेटी डोल चबुतऱ्यावर आणली जाते. पुजारी ती पेटी उघडतात आणि डोळ्यांवर पट्टी बांधून त्या मूर्तीची पूजा करतात.

या मूर्तीचे प्रतीक म्हणून दुसरी मूर्ती मंदिरात स्थापन केली आहे. हे मंदिर फार चमत्कारिक मंदिर म्हणून ओळखलं जातं. केवळ देशातले नागरिकच नाही तर अनेक विदेशी माणसंसुद्धा मातेचं दर्शन घेण्यासाठी या मंदिरात येतात.

असं मानलं जातं, की नवरात्रीत जर इथे कुणी काही अगदी मनापासून मागितलं तर त्या व्यक्तीची ती इच्छा पूर्ण होते. जवळपास ११०० वर्षांपूर्वी हे मंदिर स्थापन केलं गेलं होतं.

 

mahamaya temple im1

 

या मंदिराविषयी अनेक कथा आहेत. या मंदिरात आजही एक परंपरा कायम आहे. वैदिक मंत्रोच्चारांच्या वेळी दगडाचे तुकडे एकमेकांवर घासून जी ठिणगी उडते त्यातून मंदिरात रोज तिथली पहिली ज्योत पेटवली जाते. तिथले स्थानिक मंदिराविषयीची अशीच एक आख्यायिका सांगतात.

बरुजू राम नावाचा एक पुजारी एकदा या मंदिरात पूजा करत होता. त्याच वेळी बाहेरच्या काही लोकांनी तिथे हल्ला चढवला आणि त्याच्या पत्नी आणि मुलांना मारलं. बरजूचा मित्र राधो राम याच्याकडून बरजूला ही गोष्ट कळली. त्यानंतर महामाया मातेकडून शक्ती मिळाल्यामुळे राधो राम हल्ला करणाऱ्यांशी लढू लागला.

त्यावेळी माता महामाया प्रकट झाली आणि तिने राधो रामला सांगितलं, की ‘तू एकटा या सगळ्यांशी लढू शकतोस, पण जर तू मागे वळून पाहिलंस तर तुझं शीर धडापासून वेगळं होईल. ‘मातेच्या कृपाशीर्वादाने तो त्या हल्लेखोरांशी लढू शकला, मात्र आपण आता जिंकतोय असं त्याला वाटलं आणि त्याने मागे वळून पाहिलं. तत्क्षणी त्याचं शीर धडापासून वेगळं झालं. बरजू राम जिथे पूजा करायचा तिथे आता त्या दोघांचीही समाधी आहे.

या मंदिरात अनेक देव-देवतांच्या मूर्ती आहेत. या मंदिराच्या गाभाऱ्याची रचना तांत्रिक विधींनुसार केलेली असून मंदिराच्या घुमटाचा आकार श्री यंत्रासारखा आहे. या मंदिरात महामाया देवीमाता महाकालीच्या स्वरूपात विराजमान आहे. समोरच सरस्वती मातेच्या स्वरूपात सम्लेश्वरी देवीमातेचं मंदिर आहे.

अशाप्रकारे महाकाली, सरस्वती आणि महालक्ष्मी या तिन्ही देवीमाता तिथे प्रत्यक्ष विराजमान आहेत. देशातलं हे असं पाहिलंच मंदिर आहे जिथे दोन वेगवगेळ्या स्वरूपातल्या भगवान भैरवांची दोन वेगवगेळी मंदिरं आहेत.

 

mahamaya temple im2

 

ज्या हपामुनी गावात हे मंदिर आहे त्या गावाला ‘हपामुनी’ हे नाव कसं पडलं यामागे एक रंजक कथा आहे. सुमारे ११०० वर्षांपूर्वी तिथे एक मुनी आले होते. ते फार कमी बोलत असत त्यामुळे मुंडा जातीचे लोक त्यांना ‘हप्पा मुनी’ असं म्हणायचे. मुंडा भाषेत ‘हप्पा’ या शब्दाचा अर्थ होतो ‘गप्प बसणे’. त्यावरून या गावाचे नाव ‘हप्पामुनी’ पडले.

‘हप्पामुनी’चा अपभ्रंश होऊन आता ते ‘हपामुनी’ असे झाले आहे. तिथल्या दक्षिण कोयल नदीत एका ठिकाणी अतिशय खोल पाणी आहे. तिथे आत हिरे-मोती मिळतात असं लोक म्हणतात. असं म्हटलं जातं की विक्रम संवत ९५९ मध्ये हिरे आणि मोत्यांचा शोध घेण्यासाठी गेलेले हजारो लोक त्या खोल पाण्यात बुडून मेले.

डुंबलेले लोक आपापल्या गावांमध्ये भूत बनून फिरत असल्याची बातमी सगळीकडे पसरली. हप्पामुनीच्या आदेशानुसार तिथला नागवंशी राजा भगवती मातेला आणण्यासाठी विंध्याचल ला गेला.

तिथे गेल्यावर राजाने ३ वर्षे भगवती मातेची तपस्या केली. तपस्या झाल्यानंतर भगवती मातेला घेऊन राजा चालत येऊ लागला. त्या दरम्यान त्याने टांगीनाथधामला देवी भगवतीला जमिनीवर ठेवलं आणि ती जमिनीत विलीन झाली. मातेची स्तुती केल्यांनतर ती मुरलीधराला घेऊन बाहेर आली. राजा मातेला घेऊन गावात आला आणि अशाप्रकारे गावावरचं भूतांचं संकट संपलं.

 

mahamaya temple im3

 

महामाया मंदिराची स्थापना झाली त्या काळात फार गोंधळवून टाकणाऱ्या चित्रविचित्र घटना घडायच्या. त्यावेळी तिथे भूताखेतांचा संचार असल्याचंही म्हटलं जायचं. त्यामुळे तिथे तांत्रिक पूजा सुरू झाली होती.

असं समजलं जातं, की त्यावेळी गुन्हे करणाऱ्याला मंदिरात येऊन शपथ घेण्यासाठी सांगितलं जायचं. ज्याने गुन्हा केला असेल तो भीतीने मंदिरात जाण्यापूर्वीच गुन्हा कबूल करत असे. त्या काळात मंदिरातले पुजारी जे सांगायचे ते लोक ऐकायचे. त्यावेळी या प्रकाराला मान्यता होती. आता ही प्रथा मागे पडली आहे.

आता या मंदिरातली पेटीत ठेवलेली ती मूळ मूर्ती नुसत्या डोळ्यांना का दिसत नाही हे कदाचित खुद्द तिथल्या पुजाऱ्यांनाही माहीत नसावं. कुठलंही विज्ञान त्याचं उत्तर द्यायला असमर्थ आहे. केवळ आख्यायिकांना प्रमाण मानून आणि परंपरांचा आदर राखून भारतातल्या वेगवगेळ्या स्थळी आजही अश्या कितीतरी गोष्टी घडत असतील. देशाच्या कानाकोपऱ्यापर्यंत अद्याप पोहोचायच्या बाकी असतील.

आमचं युट्यूब चॅनल आणि त्यावरचे व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला फॉलो करा :

===

व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल

 शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम  | टेलिग्राम शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved. 

error: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?