' २ महान वैज्ञानिकांच्या मैत्रीची, संघर्षाची कथा मांडणारी सिरीज लवकरच लोकांच्या भेटीला! – InMarathi

२ महान वैज्ञानिकांच्या मैत्रीची, संघर्षाची कथा मांडणारी सिरीज लवकरच लोकांच्या भेटीला!

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम शेअरचॅट

व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल 

===

ओटीटी प्लॅटफॉर्म्सनी एव्हाना जनमानसावर चांगलीच पकड मिळवली आहे. केवळ मनोरंजनात्मकच नाही तर अनेक सामाजिक, इतर महत्त्वपूर्ण विषय विविध ओटीटी प्लॅटफॉर्म्सवरच्या सिरीज मधून हाताळले जाताना दिसत आहेत. उत्तम कथानकाला तितक्याच ताकदीच्या कलाकारांची जोड मिळाल्यामुळे रसिकांना उत्तम कन्टेन्टची  मेजवानी मिळतेय.

आमचं युट्यूब चॅनल आणि त्यावरचे व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला फॉलो करा :

 

निर्मितीक्षेतातली आजच्या काळातली सगळ्यात सुखावह बाब ही आज सगळ्यात जास्त महत्त्व कथानकाला दिलं जातं.

 

OTT platform IM

 

आज कोण किती मोठा स्टार आहे यापेक्षा कलाकार किती कसदार अभिनय करतो याने प्रेक्षक प्रभावित होत आहेत. दिवसेंदिवस प्रेक्षक चोखंदळ होत चालल्यामुळे ओटीटी माध्यमही अधिकाधिक प्रभावी होत चालली आहेत.

कलेचा दर्जा आणि व्यावसायिक गणित दोन्ही गोष्टी हातात हात घालून चालणाऱ्या सुदैवी काळाचे आपण साक्षीदार आहोत. अशीच एक उत्तम सिरीज ‘सोनी लिव्ह’ वरून लवकरच प्रदर्शित होणार आहे.

भारतीय अणू वैज्ञानिक आणि ज्यांना भारत देशातील अणू ऊर्जा कार्यक्रमाचे जनक असंदेखील म्हटलं जातं ते डॉ. होमी भाभा आणि भारतीय भौतिकशास्त्रज्ञ आणि खगोलशास्त्रज्ञ विक्रम साराभाई या २ महान वैज्ञानिकांचा संघर्ष ‘रॉकेट बॉईज’ या सिरीजमधून आपल्याला पाहायला मिळेल.

 

rocket boys IM

२० जानेवारीला या सिरीजचा ट्रेलर ‘सोनी लिव्ह’ने शेअर केलेला असून ही सिरीज ४ फेब्रुवारी २०२२ ला तमाम प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

गेल्या वर्षी १५ ऑगस्टला म्हणजेच आपल्या ७५व्या स्वातंत्र्यदिनी या सिरीजचा पहिला टीजर आल्यापासूनच या सिरीजविषयी प्रेक्षकांच्या मनात फार उत्कंठा निर्माण झाली होती. त्यात स्वतंत्र भारताचे पहिले पंतप्रधान जवाहरलाल नेहरू याचं भाषण लोक ऐकत आहेत आणि स्वतंत्र भारताच्या भविष्यासंदर्भात होमी भाभा आणि विक्रम साराभाई चर्चा करत आहेत अशी २ दृश्यं दाखवली होती.

त्यानंतर ३० ऑक्टोबरला होमी भाभा यांच्या ११२व्या जयंतीला या सिरीजचा दुसरा टीजर आला. या सिरीज मध्ये आपल्याला डॉ. होमी भाभांच्या भूमिकेत भारतीय चित्रपट आणि रंगभूमीवरचा अभिनेता जिम सार्भ तर विक्रम साराभाईंच्या भूमिकेत ईश्वाक सिंग हा अभिनेता दिसेल.

 

jim sarbh and ishwak IM

 

यापूर्वी पद्मावत, मेड इन हेवन, फ्लिप, तैश या गाजलेल्या चित्रपट आणि वेब सिरीजमधल्या जिम सार्भच्या कामाला कौतुकाची पावती मिळाली होती तर ऍमेझॉन प्राईमवरच्या ‘पाताल लोक’ या सिरीज मुळे घराघरात पोहोचलेला ईश्वाक सिंग हा अभिनेता ‘अनपॉज्ड’, ‘विरे दि वेडिंग’सारख्या बक्षिसपात्र ठरलेल्या अनेक वेगवेगळ्या प्रॉजेक्ट्सचा भाग होता.

इतक्यातच प्रदर्शित झालेल्या ‘रॉकेट बॉईज’च्या ट्रेलरमध्ये होमी भाभा आणि विक्रम साराभाई एकमेकांना कसे पहिल्यांदा भेटले, त्यांच्यात कशी मैत्री झाली आणि भारत देशाला परमाणू महाशक्ती बनवण्याच्या मार्गातलं पहिलं पाऊल टाकण्यासाठी ते कसे एकत्र आले हे दाखवलं आहे.

विशेष आनंदाची बाब ही की या ट्रेलरमधून स्वतंत्र भारताचे पहिले पंतप्रधान जवाहरलाल नेहरू आणि सगळ्या भारतीयांचे लाडके राष्ट्रपती ज्यांची ‘भारताचा मिसाईल मॅन’ अशीही ओळख आहे ते डॉ. एपीजे अब्दुल कलाम यांचा कॅमियोसुद्धा आपल्याला पाहायला मिळतोय.

 

abdul kalam sir IM

 

आतापर्यंत या ट्रेलरला १९ मिलियन्सपेक्षा जास्त व्ह्यूज मिळालेले असून या दोन महान वैज्ञानिकांचा इतिहास लोकांसमोर आणण्यात येणार आहे त्याबद्दल जगभरात सर्वत्र या ट्रेलरचं कौतुक होतंय.

जिम आणि ईश्वाक या दोन अभिनेत्यांसोबत या सिरीज मध्ये तमिळ आणि तेलगू इंडस्ट्रीतली अभिनेत्री रेजिना कैसेन्द्रा आणखी एका मुख्य भूमिकेत झळकणार आहे.

रेजिना यापूर्वी सोनम कपूरच्या ‘एक लडकी को देखा तो ऐसा लगा’ या हिंदी चित्रपटात दिसली होती. निर्माता निखिल अडवाणी, रॉय-कपूर फिल्म्स आणि एम्मे एंटरटेनमेन्ट या बॅनर्सखाली या सिरीजची निर्मिती झाली असून ‘मरजावां’ फेम दिग्दर्शक-लेखक अभय पन्नू याने ती दिग्दर्शित केली आहे.

आपल्या भूमिकेविषयी सांगताना जिम म्हणाला, “ही भूमिका माझ्यासाठी अतिशय खास आहे. मी पारसी आहे आणि होमी भाभाही पारसी होते यामुळे तर ती खास आहेच पण त्याहून कैक पटींनी जास्त होमी भाभांसारख्या एका ध्येय्यासक्त, प्रेरणादायी आणि नवनिर्मितीशील व्यक्तिमत्त्वाची भूमिका मला साकारायला मिळतेय म्हणून आहे.”

 

homi bhabha and vikram sarabhai IM

 

तर ईश्वाक म्हणाला, “आपण बऱ्याचदा खेळाडू आणि स्वातंत्र्यसैनिकांच्या चरित्रपटांविषयी ऐकतो. पण जेव्हा मी पहिल्यांदा कथानक ऐकलं तेव्हा भारतातल्या महान वैज्ञानिकांवर ‘रॉकेट बॉईज’ ही सिरीज असणार आहे या गोष्टीने माझं लक्ष वेधून घेतलं.”

ही सिरीज प्रदर्शित होण्याची चाहते अगदी आतुरतेने वाट पाहत असल्याचं दिसतंय.

“एक भौतिकशास्त्रज्ञ म्हणून मला हा ट्रेलर बघून खूप आनंद झालाय. या सिरीज मध्ये महत्त्वाच्या वैज्ञानिक तपशिलांवर भर दिला गेलेला असेल, या बुद्धिमान माणसांचे कष्ट आणि देशाच्या प्रगतीसाठी संशोधनाला किती महत्त्व आहे हे लोकांपर्यंत पोहोचेल अशी मी आशा करतो.” अशी कमेंट एका व्यक्तीने केली आहे.

 

rocket boys series IM

 

तर “अंगावर शहारे आले. मला का रडू येतंय ते मला कळत नाहीये.” अशी कमेंट दुसऱ्या एका चाहत्याने केली आहे.

उत्तम कलाकार असल्यामुळे या दोन्ही महान वैज्ञानिकांच्या कर्तृत्त्वाला ही सिरीज पुरेपूर न्याय देईल अशी आशा बाळगायला हरकत नाही. भारताचं नाव मोठं केलेल्या, देशाच्या प्रगतीत फार महत्त्वाचं योगदान दिलेल्या या दोन्ही वैज्ञानिकांना सलाम!

===

आमचं युट्यूब चॅनल आणि त्यावरचे व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला फॉलो करा :

===

व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल

 शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम  | टेलिग्राम शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.

error: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?