' शेतकऱ्यांचा नाद नाय करायचा, कार शोरुममध्ये सेल्समनला शिकवला धडा… – InMarathi

शेतकऱ्यांचा नाद नाय करायचा, कार शोरुममध्ये सेल्समनला शिकवला धडा…

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम शेअरचॅट

व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल 

===

आजच्या काळात तुम्ही स्वतःला जगासमोर कसे ‘प्रेझेंट’ करता त्यावरून जग तुमच्याबद्दल मत बनवून मोकळं होतं. पण तुमच्या बाह्य व्यक्तिमत्त्वाचा तुम्ही खरे कसे आहात याच्याशी संबंध असेलच असं नाही. आज ‘जमाना दिखाने का है’ हे वाक्य कुणीही अगदी सहज म्हणतं.

 

man im

आमचं युट्यूब चॅनल आणि त्यावरचे व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला फॉलो करा :

 

काही माणसं प्रत्यक्ष आयुष्यात अगदी सर्वसाधारण असली, फार कमावती नसली तरी केवळ आत्मविश्वासाच्या जोरावर आणि पॉश राहून आपली खोटी का होईना एक प्रभावी छाप समोरच्यावर पाडण्यात यशस्वी होतात. पण आजच्याच काळात याच्या अगदी उलटही चित्र पाहायला मिळतं. या अश्या दिखाऊपणाचं वारं स्वतःला लागू न देता काही माणसं आजही साधी राहणी पसंत करतात.

“अरे एवढं कमावतोस, तरी असा बावळटासारखा, गावंढळ काय राहतोस?” अशीही शेरेबाजी त्यांच्यावर होते. पण तरीही आपल्या दिसण्याचा आपल्या असण्याशी काही संबंध नाही हे ही माणसं मनोमन जाणून असतात आणि आपल्यावर झालेल्या या फुकाच्या शेरेबाजीला न जुमानता आपल्या वैयक्तिक राहणीमानाबाबत ती ठाम राहतात.

खरी गंमत तेव्हा असते जेव्हा अश्या माणसांची आगाऊपणे टर उडवणारा,त्यांचा अपमान करणारा एखादा माणूस त्या माणसाची प्रत्यक्षातली उत्तम परिस्थिती कळल्यावर स्वतःचंच हसं करून घेतो. अशीच काहीशी घटना एका शेतकऱ्याच्या आणि महिंद्रा शोरूमच्या सेल्समनमध्ये घडलीये. पण इथे केवळ सेल्समनच हसंच झालं नाही तर प्रकरण थेट पोलिसांपर्यंत गेलं.

कर्नाटकातल्या रमनपल्या या गावात राहणारा केम्पेगौडा नावाचा एक शेतकरी त्याचे काही मित्र आणि नातेवाईकांसोबत कर्नाटकातल्या तुमकुरू इथल्या महिंद्राच्या गाडीच्या शोरूममध्ये ‘बोरेलो पिक-अप ट्र्क’ खरेदी करायला गेला.

 

car showrrom im

 

शेतकऱ्याचे आणि त्याच्यासोबत असलेल्यांचे कपडे, त्यांचं एकूण दिसणं बघून शोरूममध्ये काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांनी त्यांच्यावर शेरेबाजी करायला, त्यांना टोमणे मारायला सुरुवात केली. ”हा शेतकरी काय गाडी खरेदी करणार” असं त्या सगळ्यांना वाटत होतं.

तिथला एक सेल्समन त्या शेतकऱ्याला म्हणाला, “या गाडीची किंमत १० लाख रुपये आहे. तुमच्या खिश्यात कदाचित १० रुपयेही नसतील.”

सेल्समनने त्यांना त्यांच्या दिसण्यावरून शोरूममधून बाहेर काढलं असा आरोप शेतकरी आणि त्याच्या मित्रांनी केला आहे. एनडीटीव्हीने यासंदर्भात वृत्त दिलं आहे. त्यानंतर सेल्समन आणि शेतकऱ्यामध्ये वाद झाला.

 

car karnatak im

 

या सगळ्या प्रकारामुळे चिडलेल्या शेतकऱ्याने “अर्ध्या तासाच्या आत या गाडीची रक्कम आणून तुझ्या हातात ठेवतो. ‘एसयुव्ही’ ची डिलिव्हरी तयार ठेव.” असं आव्हान त्या सेल्समनला दिलं.

रागाने निघून गेलेला शेतकरी आता काही परत येत नाही यावर शोरुममधील कर्मचाऱ्यांचे एकमत झाले. मात्र प्रत्यक्षात घडलं वेगळंच.

बोलल्याप्रमाणे केम्पेगौडा अवघ्या अर्ध्या तासात १० लाख रुपये घेऊन शोरूममध्ये हजर झाला. तो जाण्यापूर्वी त्याने सांगितल्यावरसुद्धा गाडीचं साधं बुकिंगही करून ठेवायची तसदी कुणी घेतली नाही. पण बोलल्याप्रमाणे त्याने ही रक्कम आणली ते बघून सेल्समनबरोबरीनेच तिथले इतर अधिकारीदेखील चकित झाले.

 

money inmarathi

आधी गॅस, मग निवारा : उद्योगपती आनंद महिंद्रांमुळे इडली आम्माचं बळ वाढलं

लय भारी… मराठी तरुणाने बनवलीये जुगाड जीप केवळ ५० हजारात!

त्यांनी काही गाडी तयार ठेवलेली नव्हती. आपण आज गाडीची डिलिव्हरी देऊ शकणार नाही कारण, गाडी खरेदी करताना बरीच मोठी वेटिंग लिस्ट असते असं त्यांनी सांगितलं. ४ दिवसांत गाडी तुमच्यापर्यंत नक्की पोहोचवली जाईल अशी खात्री शेतकरी आणि त्याच्या मित्रांना देण्यात आली.

आधीच शेतकऱ्याचा विनाकारण अपमान झाला होता, त्यात गाडी तयार नाही हे कळल्यावर आणखीनच वैतागलेल्या शेतकऱ्याचा आणि त्याच्या मित्रांचा त्या सेल्समनसोबत आणखीनच वाद झाला आणि सेल्समनला त्यांनी आपली माफी मागायला सांगितली.

हे प्रकरण थेट पोलिसात गेलं आणि पोलिसांच्या मध्यस्तीने मिटलं. सरतेशेवटी सेल्समनने शेतकऱ्याची माफी मागितली. शेतकऱ्याने आपला आब राखत गाडी खरेदी करणं नाकारलं. “मला तुमच्या शोरूममधून कार घ्यायची नाही”, असं म्हणत आपल्याजवळचे १० लाख रुपये घेऊन शेतकरी स्वाभिमानाने शोरूमबाहेर पडला.

 

car 1 im

 

शुक्रवारी महिंद्रा शोरूममध्ये घडलेल्या या घटनेचा व्हिडियो मोठ्या प्रमाणावर व्हायरल झाला. महिंद्रासारख्या शोरूममध्ये अशी घटना घडावी हे जास्त नवलाचं होतं. बऱ्याच जणांनी ट्विटरवर हा व्हिडियो शेअर करत आनंद महिंद्रा यांना टॅग केलंय. “महिंद्रा ऑटोच्या स्टाफने आनंद महिंद्रांकडून बरंच काही शिकलं पाहिजे. महिंद्रा ‘एसयूव्ही’ खरेदी करायला गेलेल्या एका शेतकऱ्याचा अपमान झालाय.”, असं ट्विट एका व्यक्तीने केलंय.

एखाद्याच्या दिसण्यावरून, राहणीमानावरून जेव्हा आपण त्या व्यक्तीच्या एकूणच कुवतींविषयी, व्यक्तिमत्त्वाविषयी अंदाज बांधतो तेव्हा त्यातून कुठेतरी आपलीच संकुचित मनोवृत्ती दिसत असते हे लक्षात घेतलं पाहिजे. हा वरचा प्रसंग जरी गाडी खरेदी करण्याविषयी असला तरी कुठल्याही प्रसंगाच्या बाबतीत हे लागू होतं.

केम्पेगौडाच्या या उदाहरणाने या अश्या अपमानाने खचून न जाता ताठ मानेने समोरच्याला पुरून उरण्याची ताकद मात्र अनेकांना दिली आहे.

आमचं युट्यूब चॅनल आणि त्यावरचे व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला फॉलो करा :

 

===

व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल

 शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम  | टेलिग्राम शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.

error: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?