' पासपोर्ट काढताना अडचणी येतात? टेन्शन विसरा, आता येणार 'इ पासपोर्ट'

पासपोर्ट काढताना अडचणी येतात? टेन्शन विसरा, आता येणार ‘इ पासपोर्ट’

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम शेअरचॅट

व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल 

===

काही वर्षांपूर्वी अशी परिस्थिती होती की महत्वाच्या कागदपत्रांसाठी सरकारी कार्यालयात जायचे म्हणजे आपले काम सहज होणार नाही हेच मनात धरून चालावे लागायचे. एका डॉक्युमेंट साठी किमान चार ते पाच खेपा घालाव्या लागायच्या. त्यात जर त्या सरकारी अधिकारी टेबलाखालून व्यवहार करत असेल तर मग आणखीनच त्रास! म्हणजे मानसिक त्रास तर व्हायचाच शिवाय खिशाला कात्री लागायची ती वेगळीच!

 

tension inmarathi

आमचं युट्यूब चॅनल आणि त्यावरचे व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला फॉलो करा :

 

 

पासपोर्टसारख्या अत्यंत महत्वाच्या डॉक्युमेंटसाठी तर एजन्टशिवाय काम व्हायचेच नाही. पासपोर्ट आपल्या हातात पडेपर्यंत तो आपल्याला मिळेलच ह्याची शाश्वती नसायची. आता गेल्या काही वर्षांपासून मात्र पासपोर्ट काढणे तुलनेने सोपे झाले आहे.

तुमची सगळी कागदपत्रे तर चोख असतील तर कुठल्याही एजन्टच्या मदतीशिवाय तुम्ही ऑनलाईन अर्ज करून सुद्धा नवा पासपोर्ट काढणे किंवा जुन्या पासपोर्टची मुदत संपली असल्यास तो रिन्यू करून घेणे अगदी सहज सोप्या मार्गाने करू शकता. अगदी पोलीस व्हेरिफिकेशनचे काम सुद्धा हल्ली सोपे आणि टेन्शन फ्री झाले आहे. तरीही काहींना पासपोर्ट काढण्यात अडचणी येत असतील तर आता सरकारने त्यावरही उपाय दिला आहे.

 

passport inmarathi

 

लवकरच भारतीय प्रवाशांना मायक्रोचिप असलेले ई-पासपोर्ट मिळणार आहेत. परराष्ट्र व्यवहार मंत्रालयाचे सचिव संजय भट्टाचार्य ह्यांनी नुकतीच ट्विटरवर माहिती जाहीर केली आहे की आता भारतीय नागरिकांना सुरक्षित बायोमेट्रिक डेटासह ई-पासपोर्ट मिळेल. त्यांनी नमूद केले आहे की हा ई-पासपोर्ट आंतरराष्ट्रीय नागरी विमान वाहतूक संघटनेच्या (ICAO) मानकांनुसार असेल. ई-पासपोर्टमध्ये मायक्रोचिप असतील ज्यामध्ये महत्त्वपूर्ण सुरक्षा डेटा संग्रहित असेल.

भट्टाचार्य ह्यांनी त्यांच्या ट्विटमध्ये ई-पासपोर्ट कसा असेल ह्याची माहिती दिली आहे. त्यांनी सांगितले की पासपोर्टमध्ये सुरक्षित बायोमेट्रिक डेटा असेल ज्यामुळे प्रवाश्यांना जागतिक स्तरावर इमिग्रेशन पोस्टमधून अगदी सहजतेने व सुरळीत प्रवास करता येईल. ह्या ई-पासपोर्टची निर्मिती इंडिया सिक्युरिटी प्रेस, नाशिक येथे केली जाईल.

 

e passport im

 

काही काळापूर्वी परराष्ट्र मंत्री एस जयशंकर ह्यांनी म्हटले होते की मायक्रोचिपबाबत मंत्रालय ‘इंडिया सिक्युरिटी प्रेस’ बरोबर चर्चा करीत आहे. जयशंकर म्हणाले होते की ,”आम्ही ई-पासपोर्टच्या निर्मितीचा पाठपुरावा करीत आहोत जेणेकरुन प्रगत सुरक्षा वैशिष्ट्यांसह नवीन पासपोर्ट पुस्तिका नजीकच्या भविष्यात आणता येतील.” मागे टीसीएसने सुद्धा माहिती दिली होती की ते ई -पासपोर्टचे तंत्रज्ञान भारतात आणण्याच्या प्रयत्नांत आहेत. टीसीएसला पासपोर्ट सेवा प्रोग्रॅम चालवण्यासाठी दुसरा कॉन्ट्रॅक्ट मिळाला आहे.

ई-पासपोर्ट म्हणजे काय?

ई-पासपोर्ट ही संकल्पना काही नवी नाही. यूएस, यूके आणि जर्मनीसह १२० हून अधिक देशांमध्ये आधीपासूनच बायोमेट्रिक ई-पासपोर्ट दिले जातात.

ई-पासपोर्ट किंवा डिजिटल पासपोर्ट हे पारंपारिक पासपोर्ट प्रमाणेच काम करतात. पण, ई-पासपोर्ट हा इलेक्ट्रॉनिक चिपसह येतो ज्यामध्ये मुद्रित पासपोर्ट सारखीच माहिती असते. मायक्रोचिपमध्ये पासपोर्ट धारकाचे नाव, जन्मतारीख आणि इतर तपशील दिलेले असतात.

 

e passport 1 im

 

हा ई-पासपोर्ट एकदा सादर केला की इमिग्रेशन काउंटरसमोर लांबच लांब रांगेत उभे राहण्याची गरज पडणार नाही. इमिग्रेशन काउंटरवर होणाऱ्या प्रत्यक्ष पडताळणीसाठी बराच वेळ लागतो. पण ई-पासपोर्ट स्कॅन करण्यासाठी अगदी काहीच मिनिटे लागतात.

ह्यामुळे बनावट पासपोर्ट व्यवसायावर अंकुश ठेवण्यास देखील मदत होईल. कारण घोटाळेबाजांना मायक्रोचिपवर रेकॉर्ड केलेला डेटा चोरणे तुलनेने अवघड जाईल.

ई-पासपोर्ट काम कसे करतो?

ई-पासपोर्टला एक चिप जोडलेली असेल. ह्या चिपमध्ये पासपोर्ट धारकाची सर्व वैयक्तिक माहिती असेल. पासपोर्टच्या मागील बाजूस जोडली जाणारी ही चिप ६४ किलोबाइट स्टोरेज स्पेस आणि एम्बेडेड आयताकृती अँटेनासह येईल. चिपमध्ये सुरुवातीला ३० आंतरराष्ट्रीय सहलींचा डेटा असेल. पण नंतरच्या टप्प्यात चिपमध्ये फिंगरप्रिंट्ससारख्या बायोमेट्रिक डेटासह पासपोर्ट धारकाचा फोटो देखील असेल.

 

passport 1 im

 

जर कोणी चिपमध्ये छेडछाड करण्याचा प्रयत्न केला तर पासपोर्ट ऑथेंटिकेशन (प्रमाणीकरण) अयशस्वी होईल.

सरकार डिजिटायझेशनचा प्रयत्न का करत आहे?

सरकारी सेवा डिजीटल करण्याच्या केंद्राच्या प्रयत्नांचा हा एक भाग आहे. MEA डेटानुसार, सध्या देशभरात एकूण ५१७ पासपोर्ट केंद्र कार्यरत आहेत, ज्यामध्ये सहा प्रादेशिक पासपोर्ट कार्यालये, ९३ पासपोर्ट सेवा केंद्रे आणि ४२४ पोस्ट ऑफिस पासपोर्ट सेवा केंद्रे यांचा समावेश आहे. असे असूनही, देशाच्या अनेक भागांतील लोकांना पासपोर्ट केंद्रात प्रवेश करण्यासाठी शेकडो किलोमीटरचा प्रवास करावा लागतो.

 

passport office im

 

रोजगारासाठी परदेशात जाणाऱ्या ब्लू- आणि व्हाईट कॉलर एम्प्लॉईजच्या संख्येत वाढ झाल्यामुळे पासपोर्ट सेवा केंद्रे कमी पडत आहेत. म्हणून सरकारने प्रत्येक लोकसभा मतदारसंघात पोस्ट ऑफिस पासपोर्ट सेवा केंद्र उघडण्याचा विचार जाहीर केला होता. परंतु ऑनलाइन सेवांवर जोर देण्याच्या निर्णयामुळे ही योजना बारगळली.

ह्यावर उपाय म्हणून, सरकारने mPassport सेवा हे ऍप लाँच केले आहे. ह्या ऍपद्वारे आपण पासपोर्टसाठी अर्ज करण्यापासून ते अपॉइंटमेंट घेणे आणि बदलांची नोंदणी करण्यापर्यंत पासपोर्टशी संबंधित सर्व बाबी थेट पूर्ण करू शकतो. त्याचप्रमाणे बॅकग्राउंड तपासणी आणि फिल्ड व्हेरिफिकेशन ह्या दोन्ही टीमचा भाग असलेल्या पोलिस कर्मचाऱ्यांसाठी mPassport पोलिस ऍप सुरू करण्यात आले आहे.

ई -पासपोर्ट कधीपासून मिळणार?

भारताच्या पासपोर्टची वैशिष्ट्ये आणि लूक अपग्रेड करण्याचा विचार गेल्या काही काळापासून सुरू आहे. २०१६ साली तत्कालीन परराष्ट्र व्यवहार राज्यमंत्री व्ही.के. सिंग म्हणाले होते की चिप-एम्बेडेड ई-पासपोर्ट्स २०१७ च्या सुरुवातीला सादर केले जातील. परंतु ही योजना वेळेत सुरु झाली नाही. जून २०२० मध्ये परराष्ट्र मंत्री एस जयशंकर म्हणाले होते की चिप-आधारित पासपोर्ट तयार करण्यासाठी खरेदी प्रक्रिया सुरू आहे. या प्रक्रियेला गती देण्याची गरज असल्याचेही ते म्हणाले होते.

 

passport 2 im

 

सर्व आवश्यक प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर भारतातील सर्व पासपोर्ट कार्यालये ePassport जारी करण्यासाठी सज्ज होतील.

आमचं युट्यूब चॅनल आणि त्यावरचे व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला फॉलो करा :

 

===

व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल

 शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम  | टेलिग्राम शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?