' पु. ल. कुठेच गेले नाहीत, तर ही असामी रोज नव्याने सापडते! हे बघा.. – InMarathi

पु. ल. कुठेच गेले नाहीत, तर ही असामी रोज नव्याने सापडते! हे बघा..

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्रामशेअरचॅट

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

इनमराठीच्या अपडेट्स शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

===
लेखक – ऋषिकेश पांडकर
===

आठवण यावी यासाठी विसरण्याची गरज असते. जीवशास्त्राच्या भाषेत आज तुम्ही आमच्यात नसालही कदाचित पण सकाळी उठल्यापासून ते रात्री पाठ टेकवेपर्यंत तुम्ही आमच्या सोबतच आहात ‘भाई’!

 इतकी वर्ष पूर्ण झाली तुमच्या लिखाणाला पूर्णविराम मिळून. पण तुम्ही लिहिलेला शब्दन शब्द डोळ्यासमोर घडताना आम्ही रोज अनुभवतो.

त्यामुळे आमच्या दिनचर्येच्या प्रत्येक क्षणाचे तुम्ही खऱ्या अर्थी भागीदार आहात.

खेळ, राजकारण, शिक्षण, अर्थकारण, नाटक, संगीत, सिनेमा, साहित्य ते अगदी आहार, प्रवास, भाषा, व्यक्ती इथपर्यंत झाडून सगळ्या विषयांचा उल्लेख असलेले आपले लिखाण आज पदोपदी आठवते आणि म्हणूनच तुम्ही विस्मरणात जाण्याचा प्रश्नच उद्भवत नाही.

 

P.L.Deshpande-marathipizza02
notablebrahmins.com

 

एसटीचा प्रवास तितका होत नाही हल्ली पण जेव्हा कधी करण्याची वेळ येते तेव्हा तुम्ही वर्णन केलेली सगळी पात्र पुन्हा एकदा डोळ्यासमोर तरळून जातात.

प्रत्येक प्रवासात सुबक ठेंगणी शोधण्याचा प्रयत्न मी दर वेळी करतो. कोकणात जाण्याचा योग्य अनेकदा येतो तेव्हा मधल्या चाळीत राहणारी लोकोत्तर मंडळी आठवण्यात एक वेगळीच मजा येते.

आजही रेल्वे प्रवासात लाभलेले शेजारी मी तुमच्या चष्म्यातून न्याहाळण्याचा प्रयत्न करतो. रेल्वेने पुरवलेल्या सोयी आणि वेळ पाळण्याची शिस्त या गोष्टींचा उल्लेख झाल्यावर पेस्तनकाकांचा ‘साला गोरा साहेब’ आठवल्याशिवाय राहत नाही.

पावसाळ्यात रस्त्यावरून जाताना कितीही गर्दी असली तरी सायकल आणि दुचाकी स्वार ज्या पद्धतीने आणि ज्या वेगात अधे मध्ये घुसतात ते पाहून ‘दोन थेंबांमधून जाण्याचा प्रयत्न करणारा सायकलस्वार’ आज पुन्हा आठवतो.

 

P.L.Deshpande-marathipizza01
facebook.com

 

अगदी घरच्या चहात देखील थोडे दूध कमी पडले तर ‘समस्त चितळ्यांच्या म्हशी तूर्तास गाभण काय ग आई’ असे विचारायची इच्छा होते. बिल्डिंगचे रीकन्स्ट्रक्शन चालू असताना बांधकाम बघायला जायचो तेव्हा ‘ह्या विटा..ह्या विटा कुठून मागवल्या असतील बरं ?’ या प्रसंगाची आठवण झाली.

घराचे संबंध इंटिरिअर ठरवताना तुमचा शत्रुपक्ष माझ्यादेखील डोळ्यासमोरून गेला. हल्ली लोक आपले सगळेच फोटो फेसबुक आणि इतर सोशल मीडिया वर पापड वाळत घालावेत तसे पसरून ठेवतात.

त्यामुळे तुमच्या शत्रुपक्षातील काश्मीरचे फोटो दाखवणारे कुटुंब आता आम्हाला इंटरनेट व्हॉट्सऍप येथे कायमच भेटते.

दुर्दैवाने चाळीत कधी रहायला मिळाले नाही पण त्याच चाळींच्या इमारती झाल्या आणि लाकडी जिन्यांची जागा लिफ्टने घेतली पण आता गच्च्या रिकाम्या राहिल्या नाहीत कारण तिथे सोलर वॉटर हिटर ने जागा मिळवली.

त्यामुळे अजूनही गच्यांचा प्रश्न आहे तसाच भिजत पडलाय. ‘गच्ची सह झालीच पाहिजे’ हाच मिटिंगचा अजेंडा आहे तसाच अबाधित राहिला. मिटिंग मधली पात्र पाहिल्यावर बटाट्याच्या चाळीची उजळणी झाली.

सध्या ‘डेस्टिनेशन वेडिंग’ पासून ते इव्हेंट मॅनेज करणाऱ्या कंपनीला सर्वस्व बहाल करण्यापर्यंत मजल गेली आहे, पण मुंडासे हातात घेऊन लढणारा मांडवातला नारायणरुपी मुरारबाजी अजूनही तितकाच खंबीरपणे खिंड लढवताना अजूनही पहायला मिळतो.

अजूनही पानपट्टीवाला तितकाच हुशार आहे जितका तुम्ही तुमचा पानवाला रंगवला होता.

 

P.L.Deshpande-marathipizza03
thepicta.com

 

तुमच्या दुर्दैवाने आणि ओघाने आमच्याही दुर्दैवाने आता चौकोनी कुटुंब तुमच्यासारखे राहिले नाहीये. पण अशा कुटुंबाला भेटले कि तुम्ही वर्णिलेल्या एकनंएक गोष्टीचा पाढा पुन्हा एकदा वाचला जातो एवढे नक्की.

शाळेच्या फिया, आई वडिलांची नोकरी, मुलांचे क्लासेस यामुळे त्या कुटुंबाचा चौकोन तेवढा शिल्लक आहे पण तुम्ही सांगितलेला चौरस त्यातून केव्हाच हरवलाय.

हल्ली जी पी एस आले, माणशी एक मोबाईल आला पण ‘असा मी असामी’ मधल्या पत्ता शोधणाऱ्या त्या कुटुंबाचा पसारा आजही बेमालूम पहायला मिळतो.

जीव तोडून शिकवणारे शिक्षक आता औषधाला अवघड झाले आहेत, पण आमच्या शाळेच्या दिवसात भूमिती आणि बीजगणित शिकवणाऱ्या सरांनी चितळे मास्तर जिवंत केले.

मांजरीला वाघाची मावशी का म्हणतात, कुत्र्याचा स्वभाव, कावळा चिमणी यांचे वैशिष्ट्य हे तुम्ही सांगितलेल्या शैलीमुळे अजूनही तितकेच लख्ख स्मरणात आहे. किंबहुना ‘पाळीव प्राणी’ या नावाखाली जरी तुम्ही त्याचे वर्णन केले असेल तरीपण जंगलात फिरत असताना देखील तुमच्या शब्दांची आठवण आल्याखेरीज रहात नाही.

जपानला जाण्याचा योग्य आला तेव्हा ‘पूर्वरंग’ ची उजळणी झाली. कमरेत वाकणारा जपानी, बारीक, गोऱ्या आणि नाजूक डोळ्यांच्या बाहुल्या, निक्कोचे सौंदर्य, टोकिओची महागाई पाहून तुम्ही परत आठवलात. परदेश वारीची तयारी करताना ‘अपूर्वाई’ नजरेसमोर आली.

 

P.L.Deshpande-marathipizza04
swarajyamag.com

 

पु.ल. तुम्ही कधी आमच्यातून गेला नाहीतच आणि जावू शकणारही नाही. दैनंदिन जीवनात आणि डोळ्यासमोर घडणाऱ्या गोष्टींना तुमच्या लेखणीने बंदिस्त केले आहे.

त्यामुळे त्यातले नावीन्य कधीच कमी होणार नाही. तुमचे लेखन कधी कथारूप नव्हतेच मुळी, जे वाचून पूर्ण होईल. तो एक अनुभव होता. तो वाचायला घेतला कि नव्याने यायचा आणि येईलही.

१२ जून २००० रोजी तुमच्या लेखणीने पूर्णविराम दिला हि तेवढी खंत. बाकी ‘भाई’ तुम्ही अजरामर आहात.

===

इनमराठीच्या अपडेट्स शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

InMarathi.com वर विविध लेखकांनी व्यक्त केलेले विचार ही त्यांची वैयक्तिक मतं असतात. InMarathi.com त्या मतांशी सहमत असेलच असं नाही. | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटरइंस्टाग्राम | टेलिग्रामशेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.

error: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?