'सीबीएसईच्या विद्यार्थ्यांना ९०% गुण इतक्या सहज कसे काय मिळतात? यामागे काही गौडबंगाल आहे का?

सीबीएसईच्या विद्यार्थ्यांना ९०% गुण इतक्या सहज कसे काय मिळतात? यामागे काही गौडबंगाल आहे का?

आमच्या इतर लेखांच्या अपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या फेसबुकपेजला नक्की Like करा: facebook.com/InMarathi

===

 

अनेक नवपालकांच्या मनात सीबीएसई मंडळाचे आकर्षण असते. इंग्रजी शाळांचे आकर्षण तसेच सीबीएसई मध्ये भरघोस गुण मिळतात, हे देखील त्यामागील मुख्य कारण आहे. काही दिवसांपूर्वी इंडियन एक्स्प्रेस या दैनिकात, सीबीएसई मध्ये ९०-९०% गुण कसे मिळतात, यावर एक लेख आला होता. रितिका चोप्रा यांनी तो लेख लिहिला असून (मूळ लेखाची लिंक), लेखात देबार्घ्य दास यांनी अनेक अभ्यासपूर्ण मुद्दे मांडले आहेत. या लेखाचे मराठी रुपांतर खालीलप्रमाणे :

===

सन २००६ मध्ये, सीबीएसई १२ वीचे निकाल लागल्यावर प्राचार्य अशोक कुमार पांडे यांना कुठेतरी पाणी मुरतंय असा संशय आला. अनेक विद्यार्थ्यांना इंग्रजी, हिंदी, राज्यशास्त्र, इतिहासासारख्या विषयात ९९ गुण मिळाले होते. पांडे सर पूर्व दिल्लीतील अहलकॉन आंतरराष्ट्रीय शाळेत गेली २२ वर्षे प्राचार्य म्हणून काम बघत आहेत. पुढील ५ वर्षातच त्यांची शंका खरी ठरली. सीबीएसई बोर्ड गुण वाढवून देत होतं! परंतु २०१३ पर्यंत भक्कम पुरावे नसल्याने ही गोष्ट सिद्ध करता आली नाही.

विद्यार्थ्यांचे गुण वाढवून देणे, हा प्रकार २०१३ मध्ये देबार्घ्य दास आणि प्रशांत भट्टाचार्य या २ ब्लॉगर्सनी सर्वप्रथम जगासमोर आणला. त्याकरता त्यांनी सीबीएसई आणि आयएससीचे निकाल अक्षरशः पिंजून काढले आणि या दोन्ही मंडळांची फसवेगिरी लोकांसमोर आणली.

cbse-result-reality-marathipizza01
post.jagran.com

श्री. दास यांच्या मते,

गुण फुगवटा म्हणजे, एखाद्याला मिळालेले परिपूर्ण गुण समजा! ९०%, काही वर्षांपुर्वीच्या तुलनेत आज अगदीच बिनकामाचे ठरतात. कारण आज अनेक विद्यार्थांना तितके जास्ती गुण दिले गेलेत. उत्तरोत्तर ९५% गुण मिळवणे जसजसं सोपं होत जातं तसतसं उच्च गुणवत्ताधारी विद्यार्थ्यांमध्ये वर्गवारी करण अवघड काम होऊन बसलं आहे.

श्री. दास यांचा तुलनात्मक अभ्यास दाखवतो:-

सीबीएसई मंडळात, २००४ च्या तुलनेत आज (२०१७ मध्ये) सरासरी ९५% गुण २१ पट जास्त विद्यार्थांना मिळतात; तसचं सरासरी ९०% नऊपट जास्त विद्यार्थ्यांना मिळतात. आएससी बोर्डात, ९५% गुण पाच वर्षापुर्वीच्या तुलनेत दुप्पट विद्यार्थ्यांना मिळतात. यामुळे अभ्यास करून ९५% गुण मिळवणाऱ्याच्या मेहनतीवर वरवंटा फिरवला जातो आहे. कॉर्नेल विद्यापीठातून शिक्षण घेतलेल्या २४ वर्षीय दास यांनी “पूर्वी ज्या गुणांना उत्कृष्ट गुण, चांगले गुण म्हटलं जायचं, त्यांना आज काडीचीही किंमत नाही.” ही व्यथा बोलून दाखवली.

सीबीएसई किंवा आयएससी अशा दोन्ही मंडळांना वाढीव गुण देण्याचा आरोप मान्य नाही! निकालसुधार प्रक्रियेच्या वेळी असे गुण वाढवून दिले जातात असा सर्वसाधारण समज आहे; सर्वच मंडळे मूल्यमापन प्रक्रियेच्यावेळी एकसारखेपणा आणण्याकरता अशी पद्धत वापरतात.

अजून वेगळ्या शब्दात – विविध परीक्षकांच्या तपासणी पद्धतीची मानके(stds.) वेगवेगळी असू शकतात. त्याचप्रमाणे उत्तीर्ण मुलांच्या गुणांमध्ये एकसमानता यावी आणि ज्या मुलांना तुलनेने पेपर अवघड गेले आहेत, त्यांना थोडीफार भरपाई मिळावी हा उद्देश समोर ठेवून मिळालेल्या गुणांमध्ये बदल केले जातात.

cbse-result-reality-marathipizza02
newsd.in

गुणांमध्ये असे बदल करण्याला शास्त्रीय बैठक आहे, पण असे नियम धाब्यावर बसवून गुणांमध्ये फेरफार करण्यात आली. नियमाप्रमाणे मंडळाला भरपाई म्हणून ५ गुणांपेक्षा जास्त गुण विद्यार्थ्यांना देता येत नाहीत, परंतु मागील वर्षी सीबीएसईने विद्यार्थ्यांना काही विषयांत १० गुणांपर्यंत वाढीव गुण दिलेले आहेत, हे अस्वीकारार्ह आहे.

– श्री. अशोक गांगुली (माजी अध्यक्ष सीबीएसई)

“एनआयटी च्या प्रवेशांसाठी केंद्रीय मनुष्यबळ विकास मंत्रालयाने, १२ वीच्या गुणांना ४०% महत्त्व देण्याचा निर्णय घेतल्याचा परिणाम म्हणून अभ्यासमंडळांनी गुणांमध्ये फेरफार करण्याचे धोरण सर्रासपणे अवलंबले!” असा श्री. अशोक ठाकूर (मा. उच्च शिक्षण सचिव, भारत सरकार) यांना संशय आहे.

श्री ठाकूर पुढे असंही म्हणाले की,

आमची इच्छा होती की मुलांनी त्यांच्या शालेय शिक्षणावर अधिक लक्ष केंद्रित करावे, पण या निर्णयाचा अपेक्षित परिणाम झाला नाही. किंबहुना सर्वच शिक्षण मंडळांनी जेईई मेनचा अभ्यासक्रम असलेल्या एनआयटी आणि इतर अभियांत्रिकी संस्थांमध्ये प्रवेश मिळण्याकरता फायदा मिळावा म्हणून अविचारीपणे आपल्या विद्यार्थ्यांना अधिकचे गुणवाटप सुरु केले.

९ सदस्यांच्या शासकीय समितीने केलेला अभ्यास श्री. ठाकूर यांच्या मताला दुजोरा देतो.

cbse-result-reality-marathipizza03
indianexpress.com

राज्य आणि राष्ट्रीय पातळीवरील अभ्यासमंडळांनी वाढीव गुण देण्याचे प्रमाण २०१३ ते २०१५ या ३ वर्षांत वाढले. हे स्पष्ट आहे की, अभ्यासमंडळांनी दिलेल्या सरासरी गुणांमध्ये गेल्या काही वर्षांत वाढ झालेली आहे. अहवाल पाहून काही विद्यार्थ्यांना अभ्यास मंडळे गुणदानाच्या बाबतीत कालानुरूप अधिकाधिक सौम्य होत आहेत असे वाटू शकते, (जेणेकरून त्यांच्या विद्यार्थ्यांना जेईई मेनसाठी अधिकाधिक सोपे जाईल ही आशा)

श्री. दास यांनी केलेल्या सीबीएसई निकालांच्या विश्लेषणाप्रमाणे २०१३ ते २०१५ मध्ये विज्ञानाच्या विषयांत ९०% पेक्षा जास्त गुण मिळवणाऱ्या विद्यार्थ्यांच्या प्रमाणात तीक्ष्ण वाढ झालेली आहे.

cbse-result-reality-marathipizza04
indianexpress.com

गुणांमधील या वाढीमुळे, किंवा कृतीम फुगवट्यामुळे उत्कृष्ट विद्यापीठांमध्ये प्रवेश मिळण्याकरता पात्रतेचे निकष भयानक प्रमाणात वाढले. (२०११ मध्ये श्रीराम वाणिज्य महाविद्यालयाचा कट ऑफ – १००% होता.)

असा विचित्रपणाचा कळस गाठल्यावर सीबीएसईने देशातील ४० मुख्य अभ्यासमंडळांना बैठकीकरता आमंत्रित केले आणि गुणांमध्ये करण्यात येणाऱ्या कृतीम वाढीचा प्रकार तात्काळ थांबवावा असे आवाहन केले. सीबीएसई ने पुढे येऊन सर्वांसमोर आदर्श उदाहरण ठेवण्याकरता, आपण असे गुण वाढवणार नाही असं वचन इतर मंडळांना दिलं.

परंतु श्री. दास यांच्या मते तरी सीबीएसईने २०१७ मध्ये लावलेले निकाल सदोष आहेत. सीबीएसईने अजूनही वाढीव गुण देण्याचा प्रकार थांबवलेला नाही. गणित विषयाच्या ६.५% परीक्षार्थींना ९५% पेक्षा जास्त गुण मिळालेले आहेत जे २००४ च्या तुलनेत १० पटीने जास्त आहेत, तर भौतिकशास्त्राच्या ६ टक्केपेक्षा जास्त परीक्षार्थींनी ९५ किंवा त्यापेक्षा जास्त गुण मिळवलेले आहेत जे २००४ च्या तुलनेत ३५ पटीने जास्त आहेत.

पुढे श्री. दास म्हणाले,

जेव्हा महागाई वाढते त्यावेळी त्याला कसल्याही मर्यादा, नियंत्रण असत नाही, परंतु शाळेच्या निकालामध्ये श्रेणी व्यवस्था असते आणि अ/अ + अशा पद्धतीने निकाल नियंत्रित केले जातात. वाढीव गुण देण्याच्या अशा चुकीच्या पद्धतीमुळे शीर्षस्थानी असलेल्या गुणवत्ताधारी विद्यार्थ्यांची संख्या वाढते. एकाच श्रेणीत असे बळेच बनवलेले असंख्य हुशार विद्यार्थी खच्चून भरल्याने, त्या श्रेणीला किंमत राहत नाही, आणि विद्यार्थ्यांच्या क्षमता झाकोळल्या जातात. वाढीव गुणवाटप न करता एखाद्या अत्यंत हुशार विद्यार्थ्याला अ श्रेणी मिळेल, आणी थोड्या कमी हुशार, चांगल्या विद्यार्थ्याला ब+ श्रेणी मिळेल पण मंडळांनी केलेल्या वाढीव गुणवाटपामुळे दोन्ही वियार्थ्यांना अ श्रेणीच मिळेल. अशाने भविष्यात पदवीधर झाल्यानंतर या विद्यार्थ्यांच्या कौशल्यांचा, क्षमतेचा अंदाज पुढील नियोक्ते/कंपन्यांना घेणे कठीण जाईल.

 

शिक्षण मंडळांच्या निकालांमध्ये कसलीही समर्पकता राहिलेली नाही. विविध विद्यार्थ्यांमध्ये वर्गवारी करणे हा परीक्षेचा मुळ उद्देश असतो. असे वाढीव गुण देण्याचा प्रकार वेळीच थांबला नाही तर अशा गुणांचा उपयोग केवळ उच्च शिक्षण संस्थांमध्ये प्रवेश घेणे इतकाच राहील.

– राजा मुना(आयआयटी भिलाई संचालक)

————————

मराठी रुपांतर समाप्त
मुळ लेख – https://goo.gl/bB20Ds
————————

वरील मुद्द्यांवर आम्ही महाराष्ट्र राज्यातील सर्वाधिक विद्यार्थी शिक्षण घेत असलेल्या एस.एस. सी. मंडळात कशाप्रकारे गुण दिले जातात यावर २ माजी शिक्षण संचालकांना संपर्क साधला. त्यांनी मांडलेली मनोगते नवपालकांसाठी नक्कीच मार्गदर्शक ठरतील आणि नवपालक एसएससी बोर्डाच्या मराठी शाळांकडे मोठ्या प्रमाणात वळतील अशी आशा करुया.

ssc-marathipizza01
eprahaar.in

१. डॉ. श्री. वसंत काळपांडे सर म्हणतात-

एसएससी बोर्डाचे निकाल जास्त दिसले की ती सूज आणि आयसीएसई किंवा सीबीएसई बोर्डाचे निकाल त्यापेक्षाही जास्त असले तरी ती गुणवत्ता, ही भूमिका दुटप्पीपणाची आहे. सीबीएसईच्या मूल्यमापन पद्धतीचा बारकाईने अभ्यास केला तर हे लक्षात येईल की ८५ टक्के गुण शाळेच्या पातळीवर दिले जातात, तर बोर्डाच्या पातळीवर फक्त १५ टक्के गुण असतात. अनेक शाळा त्यांच्या पातळीवरच परीक्षा घेतात. प्रश्नपत्रिका स्वतःच काढतात, त्याच शाळांचे शिक्षक उत्तरपत्रिका तपासतात. बोर्ड फक्त प्रमाणपत्र देतात. थोडक्यात १०० टक्के गुण त्यांच्याच हातात. गुण अतिशय सढळ हाताने दिले जातात. आयसीएसई बोर्डाची परिस्थिती फारशी वेगळी नाही.

एसएससी बोर्डाचे शिक्षक, पालक, संस्थाचालक अप्रामाणिक म्हणून असा एक समज आहे. इतर दोन बोर्डाच्या शाळांचे संस्थाचालक, शिक्षक आणि पालक तर तेच असतात. या शाळा चालवताना, या शाळांत शिकवताना, या शाळेत आपल्या मुलांना पाठवताना त्यांची वृत्ती एखाद्या तीर्थक्षेत्राच्या ठिकाणी गेल्यावर बहुतेकांच्या मनोवृत्ती तात्पुरत्या का होईना बदलतात, तसा काही बदल इथेसुद्धा होतो काय?

आता आपले काही तरी चुकते आहे हे सीबीएसईला जाणवायला लागले हे सुलक्षण आहे. चुका दुरुस्त करण्याच्या दृष्टीने त्यांनी पावले उचलायला सुरवात केली आहे. केंद्रीय मनुष्यबळ विकास मंत्री यांनी सीबीएसईच्या सर्व शाळांना बोर्डाची परीक्षा अनिवार्य राहील असा निर्णय घेतला आहे. आयसीएसईलासुद्धा अशीच सुबुद्धी व्हावी ही पुढची अपेक्षा.

 

२. डॉ. श्री. शिवाजी तांबे सर म्हणतात-

महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ हे इ. १० वी आणि इ. १२वीचे निकाल तयार करताना विशेष दक्षता घेते. प्रत्त्येक विषयासाठी चिफ माॅडरेटर असतात. ते त्या विषयाच्या पेपर तपासणीचे धोरण,माॅडेल उत्तरसूचीनुसार करावयाची उत्तरपत्रिकांची तपासणी याबाबत माॅडरेटरांना मार्गदर्शन करतात. महत्वाच्या सूचना लेखी स्वरूपात संबधितानांपत पोहचवल्या जातात. त्यांच्या मार्गदर्शनाखाली माॅडरेटर काम करतात. परिक्षक माॅडरेटर यांच्या मार्गदर्शनानुसार उत्तरपत्रिका तपासतात. माॅडरेटर काही प्रमाणात उत्तरपत्रिकांची फेरतपासणी करतात. जादा/ कमी गुण दिल्यासंबंधी त्रुटी आढळल्यास दुरूस्त करतात. परिक्षकांना त्याबाबत सूचना देतात. अशा प्रक्रियेमुळे निकालाची विश्वसनीयता व वस्तुनिष्ठता वाढते. तसेच निकाल तयार झाल्यानंतर निकालाच्या वस्तुनिष्ठतेची तपासणी करण्याची मंडळाची कार्यपध्दती आहे.चुकांच्या सर्व शक्यता विचारात घेऊन ती तयार केलेली आहे.त्या पडताळणीनंतर खात्री पटल्यानंतर निकाल जाहीर केला जातो. या प्रक्रियेत गुण कमी /जादा करणे याला कुठेही वाव मिळत नाही. सन२०१२नंतर विद्यार्थ्यांना उत्तरपत्रिकांच्या छायाप्रती दिल्या जातात. त्यामध्ये मंडळाचे निकाल वस्तुनिष्ठ असल्याचे दिसून आले आहे. मंडळाच्या नियमानुसार अनुत्तीर्ण होत असलेल्या विद्यार्थ्यांना काही अटींच्या अधीन राहून सवलतीचे वाढीव गुण दिले जातात. मात्र तोंडी प्रात्यक्षिक परीक्षा शाळास्तरावर घेतल्या जातात. त्या परीक्षांमध्ये सर्व विद्यार्थ्यांना सढळ हाताने गुण दिले जात असल्याची चर्चा वरचेवर होताना दिसून येते.

ssc-marathipizza02
indiatvnews.com

 

सीबीएसई मध्ये भरमसाठ गुण का दिले जातात, कसे दिले जातात आणि त्याचवेळी एसएससी मंडळात कशा शास्त्रीय पद्धतीने गुणदान, किंवा गुणवाढ केली जाते हे चित्र आम्ही तुमच्यासमोर मांडलेले आहे. आता निर्णय तुम्ही घ्यायचा आहे! मी तरी माझ्या मुलीसाठी मराठी माध्यम – एसएससी बोर्डाची शाळाच निवडली आहे

– सुचिकांत वनारसे

===

मराठी अनुवाद               : सुचिकांत वनारसे
अनुवादासाठी मार्गदर्शन : निवेदिता खांडेकर
विशेष आभार                 : रितिका चोप्रा, देबार्घ्य दास, डॉ. वसंत काळपांडे, डॉ. शिवाजी तांबे

लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com तसेच, आमच्या लेखांच्या अपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या फेसबुकपेजला नक्की Like करा: facebook.com/InMarathi

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?