' घटस्फोट आणि समाजाच्या विचित्र नजरा, याबाबतच परखड मत नक्की वाचा – InMarathi

घटस्फोट आणि समाजाच्या विचित्र नजरा, याबाबतच परखड मत नक्की वाचा

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम शेअरचॅट

लेखाच्या शेवटी येणाऱ्या पोलवर आपलं मत नोंदवायला विसरू नका. 

===

लेखक : अखिलेश विवेक नेरलेकर

===

“शादी ऐसा लड्डू है जो खाये वो भी पछताये और जो ना खाये वो भी पछताये” हिंदीतली ही म्हण तुम्हाला परिचयाची असेलच नाही का? याचा अर्थ असा की लग्न हे अशी गोष्ट की जो करतो तो त्याचे भोग भोगतोच पण जो करत नाही तोही भोगतो.

लग्न हे आपल्या हिंदू संस्कृतीतलं एक पवित्र बंधन आहे, फक्त तेवढंच नाही तर जन्मजन्मांतरीचं नातं आहे आणि या नात्याचा खेळखंडोबा केलाय तो या बॉलिवूड सेलेब्रिटीजनी!

आमचं युट्यूब चॅनल आणि त्यावरचे व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला फॉलो करा :

नुकतंच आमिर खान आणि किरण राव यांनी १५ वर्षांच्या संसारानंतर घटस्फोट घेत असल्याचं त्यांच्या सोशल मीडिया हँडलवरून जाहीर केलं, ही बातमी बाहेर येताच सगळ्याच समाज माध्यमांनी आपली पोळी भाजून घेतली, प्रत्येक चॅनल न्यूज ऑनलाईन साईट्स सगळीकडे याच चर्चा रंगू लागल्या.

 

dhanush 1 im

 

 

एवढं झाल्यावर आमिर आणि किरण राव यांनी लाईव्ह येऊन याबाबत माहिती दिली तरी अजूनही या चर्चांना पूर्णविराम लागलेला नाही.

फातिमा सना शेखच्या एक्स्ट्रा मॅरिटल अफेअरपासून लव्ह जिहाद पर्यंत काय काय कनेक्शन लावली गेली, एकंदर सोशल मीडियावर बाबर नंतर क्रूर कोण असेल तर तो आमिरच असं चित्र तयार झालं.

हे ही वाचा आमिरच्या घटस्फोटावर द्वारकानाथ संझगिरींची ही पोस्ट अनेकांच्या भुवया उंचावणारी आहे!

अगदी आमिरचा निर्णय हा कसा चुकीचा आहे इथवर काही लोकांनी त्यांची अक्कल पाजळली, काहींनी आमिरच्या समर्थनार्थ वक्तव्य केलं तर काहींनी त्याच्यावर अगदी टोकाची टीका केली.

मुळात हा मुद्दा खरंतर खूप खासगी आहे पण आमिरचा घटस्फोट जागतिक घटस्फोट दिन म्हणून जाहीर करावा अशी मिम्स येईपर्यंत सगळ्यांनी या खासगी विषयाचा पार चावून चोथा केला.

आज या सगळ्यापलीकडे जाऊन एक सामान्य माणसाच्या नजरेतून हा सगळा प्रकार समजून घ्यायचा प्रयत्न करू, घटस्फोट घेणं हे योग्य नाहीच पण केवळ समाजाच्या ओझ्याखाली दबून राहून किंवा “४ लोक काय म्हणतील” याचा विचार करत तोंड दाबून बुक्क्यांचा मार सहन करणं हेदेखील योग्य नाही.

 

divorce inmarathi

 

या लेखातून आमिरच्या घटस्फोटाचं समर्थन करायचा उद्देश नाही, उलट सामान्य माणसाच्या दृष्टिकोनातून या गोष्टीकडे बघायचा प्रयत्न आहे.

मुळात वयाची ५० झाल्यानंतर घटस्फोट घेणारा आमिर आणि त्याची बायको म्हणजे पृथ्वीतलावरचे पहिले जोडपे नव्हे, केवळ ते सेलिब्रिटी आहेत, पब्लिक फिगर आहेत म्हणून त्यांची चर्चा होते इतकंच काय ते!

बऱ्याच बॉलिवूडच्या जोडप्यांनी केवळ स्वतःला चर्चेत ठेवण्यासाठी घटस्फोटाचा वापर केलेला आहे, त्यामुळे या बेगडी सिनेस्टार्सच्या लग्नाचे किंवा घटस्फोटाचे अप्रुप वाटायच्याही मी पलीकडे गेलोय.

मलायका अरोरा खान हीची चर्चा तिच्या आयटम सॉंगपेक्षा अधिक तिच्या वादग्रस्त लग्नामुळे झाली. बाईसाहेबांना अभिनयाचा काहीही गंध नाही तरी ‘अभिनेत्री’ हे बिरुद कारण नसताना ती मिरवताना दिसते.

 

malaika arora inmarathi

 

अरबाज खानसोबत घटस्फोट घेतल्यानंतर तर ती आणखीन जास्त चर्चेत आली ती म्हणजे आपल्या मुलाच्या वयाच्या अर्जुन कपूरसोबतच्या अफेअरमुळे, एकंदरच काय तर कर्तृत्व नसतानाही मलायका चर्चेत राहिली ते केवळ वादग्रस्त लग्न आणि घटस्फोटामुळे!

हृतिक रोशनची बायको सुजेन खान हिचीदेखील तीच अवस्था, एकतर या सगळ्या स्टार्सच्या बायका स्वतःला इंटेरिअर डिझायनर म्हणवतात खऱ्या पण त्यातला त्यांना किती गंध आहे त्याच जाणे, कारण यांची इंटिरिअर खरेदी करणारी फक्त साऊथ बॉम्बेच्या कार्टर रोडवर राहणारीच जमात.

त्यामुळे देशातल्या बहुतांश लोकांशी यांचा काहीच संबंध नाही, अशीच एक इंटिरिअर डेकोरेटर म्हणवली जाणारी सुजेन रोशन हिची चर्चा तेव्हाच झाली जेव्हा हृतिकची लफडी बाहेर आली आणि या सगळ्याला कंटाळून सुझेनने हृतिकला घटस्फोट दिला.

यानंतर हृतिकच्या करियरची पार राखरांगोळी झाली पण यातून सुझेन खान हे नाव चर्चेत आलं, अशी कित्येक बॉलिवूडची जोडपी आहेत ज्यांनी लग्न म्हणजे एक तमाशाच करून ठेवला.

 

hrithik sussane inmarathi

 

बरं हे सगळं आत्ताच होतंय अशातलाही भाग नाही, किशोर कुमारसारख्या अवलिया गायकाने ५ लग्न केली, आजही कित्येकांना आपल्या अदांनी घायाळ करणाऱ्या रेखानेही ३ लग्नं केली, पण त्यावेळेस या लोकांनी किंवा कलाकारांनी स्वतःच्या या खासगी गोष्टींना ग्लॉरिफाय केलं नाही.

सध्याचा जमाना सोशल मीडियाचा आहे आणि इथला एकच नियम आहे जर इथे टिकून राहायचं असेल तर चर्चेत राहायला पाहिजे बॉस, आणि त्यासाठी ही सध्याची स्टारमंडळी कोणत्याही थराला जातात आणि त्यांच्या याच वर्तनामुळे यांचं कोणतंही वागणं योग्य आणि अयोग्य हे ठरवणं मुश्किल होतं.

आता साधं आमिरच्या घटस्फोटाचं बघा, एक बातमी आली अगदी लफडयांपासून थेट लव्ह जिहाद पर्यंत चर्चा झाल्या, पण त्या एवढ्या टोकाला जाणं गरजेचं होतं का? लग्न किंवा घटस्फोट ह्या अत्यंत खासगी गोष्टी आहेत आणि याचा बिझनेस स्टार लोकांना करायचा जरी असेल तरी त्याला खतपाणी आपणच घालतो.

आज जगात कित्येक लोकांचे घटस्फोट होतात ते सगळेच असे तमाशे करतात का? ही मोठी लोकं आहेत यांची लफडीसुद्धा मोठीच असतात पण त्याला खतपाणी आपणच घालतो चर्चा करून.

हे ही वाचा प्रत्येक पुरुषाने लग्नाआधी या “१३” गोष्टी समजून घ्यायला हव्यातच..!

आज आमिरच्या या निर्णयामुळे काही लोक आमिरला दोष देतायत, काही त्याच्या बायकोला देतायत तर काही या लग्नव्यवस्थेला दोषी मानतायत, पण या सगळ्यात सर्वात जास्त दोषी कोण असेल तर तो समाज आणि या समाजाचा घटक म्हणजे आपण.

 

marriage inmarathi

 

आपणच एकीकडे या सेलेब्रिटीजच्या घटस्फोटांना ग्लॉरिफाय करतो आणि दुसरीकडे घटस्फोट घेणं हे कसं अयोग्य आहे यावर धडे देतो!

एखादं जोडपं जर त्याच्या वैवाहिक आयुष्यात सुखी नसेल मग ते कोणतंही कारण असो, ते जेव्हा वेगळं व्हायचा निर्णय घेतात तेव्हा पहिला प्रश्न त्यांच्या किंवा त्यांच्या घरच्यांच्या मनात येतो तो म्हणजे ‘लोक काय म्हणतील?’

मग नंतर याच दडपणाखाली येऊन काही तडजोडी करून ते दोघे एकमेकांच्या चुकीच्या स्वभावाशी जुळवून घेत आयुष्याची महत्वाची वर्षं वाया घालवतात, आणि नंतर आपल्याला वेगळं होता का नाही आलं याचं खापर शेवटी समाजाच्याच माथी फोडतात. इथून कींवा तिथून बदनाम नेहमी समाजच होतो.

त्यावेळेस कित्येकांना या अशा फेमस सेलिब्रिटीजनी घेतलेल्या घटस्फोटांची आठवण येते आणि मनात कुठेतरी हा विचार येऊन जातो की “आपणपण त्यावेळेस ही हिंमत दाखवली असती तर!”

फक्त फरक इतकाच असतो की आपल्या आयुष्यात आणि सेलिब्रिटीजच्या आयुष्यात जमीन आस्मानाचा फरक असतो, त्यामुळे लग्न असो किंवा घटस्फोट असो सेलिब्रिटीजच्या आयुष्यातल्या या खासगी गोष्टींची उदाहरणं कधीच देऊ नका कारण त्यांचं आयुष्य, त्यांच्या समस्या ह्या फार वेगळ्या असतात.

समाज माध्यमं, वृत्तपत्र यांनी कितीही त्यांच्या या खासगी गोष्टींना उचलून धरलं तरी आपण त्यावर चर्चा न करता त्यांना खतपाणी घालणं बंद करायला हवं!

 

bollywood couple inmarathi

 

जसं लग्न ही खूप मोठी गोष्ट आहे, एक कमिटमेंट आहे तसंच घटस्फोट घेणं हेसुद्धा खूप धाडसी पाऊल आहे. आपली लोकं अजूनही त्याकडे कुत्सित नजरेनेच बघतात.

आजही घटस्फोट घेणाऱ्या कोणत्याही जोडप्याला ज्या गोष्टींचा सामना करावा लागतो त्यांचा आपण विचारच करू शकत नाही त्यामुळे जर आपण त्या व्यक्तीच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहत नसू तर निदान त्यांच्या निर्णयाचा अवमान तरी करू नये असं माझं स्पष्ट मत आहे.

आपलं आयुष्य म्हणजे सेलिब्रिटीजचं आयुष्य नव्हे की आज घटस्फोट घेतला आणि उद्या कॅमेरा समोर हसतखेळत उभे राहिलो. लग्नानंतर जसं आयुष्य बदलतं तसंच घटस्फोटानंतरही बऱ्याच गोष्टी बदलतात.

समाजातली लोकं तुमच्याकडे वेगळ्याच नजरेतून बघतात मग ती स्त्री असो वा पुरुष, त्यामुळे ज्यांच्यात हे सगळं फेस करून आयुष्यात पुढे जायची इच्छा आहे त्याच जोडप्यांना घटस्फोट घेता येतो आणि त्यातून सहीसलामत बाहेरही पडता येतं!

जसं लग्नं हे एक पवित्र बंधन आहे तसंच घटस्फोट हे सुद्धा सध्याचं वास्तव आहे हे आपण मान्य करायलाच हवं. सध्या लिव्ह इन किंवा डिंकसारख्या विचित्र संकल्पनांपेक्षा घटस्फोट हा कधीही उत्तम पर्याय आहे.

लग्नं टिकणार नसेल, तर ते रबरबँडसारखं ओढून ताणून ठेवण्यात काहीच अर्थ नाहीये, हे वास्तव आमच्या पिढीने पचवलं आहे.

 

problematic couple inmarathi

 

त्यामुळे आमिर असो किंवा आपल्या ओळखीतली आणखीन कुणी व्यक्ती असो जी घटस्फोटाला सामोरी जात आहे, तुम्हाला त्या व्यक्तीचा निर्णय पटत नसेल तर तुम्ही त्यांच्यापासून फारकत घ्या.

जर त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहत नसाल तर निदान त्यांच्या निर्णयाचा मान ठेवायला तरी आपण शिकलंच पाहिजे, तरच आपला समाज पुढे जाईल आणि घटस्फोट या गोष्टीकडे टॅबू म्हणून बघितलं जाणार नाही!

आमचं युट्यूब चॅनल आणि त्यावरचे व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला फॉलो करा :

===

हे ही वाचा परदेशातील उच्चभ्रू मंडळींच्या लग्नातल्या उपद्व्यापांपुढे ‘भारतीय’ लग्नसंस्थेचं पावित्र्य लख्ख उजळून दिसतं

===

इनमराठीच्या अपडेट्स शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

InMarathi.com वर विविध लेखकांनी व्यक्त केलेले विचार ही त्यांची वैयक्तिक मतं असतात. InMarathi.com त्या मतांशी सहमत असेलच असं नाही. | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटरइंस्टाग्राम | टेलिग्रामशेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.

error: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?