' तो आला, त्याने पाहिलं, त्याने जिंकलं.. ३०० रूपये खिशात घेऊन आलेल्या ‘यश’चा प्रवास – InMarathi

तो आला, त्याने पाहिलं, त्याने जिंकलं.. ३०० रूपये खिशात घेऊन आलेल्या ‘यश’चा प्रवास

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम शेअरचॅट

व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल 

===

आमचं युट्यूब चॅनल आणि त्यावरचे व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला फॉलो करा :

दक्षिण सिनेसृष्टी ही सध्या बॉलीवूड इतकीच लोकप्रिय आहे असं म्हंटल्यास वावगं ठरणार नाही. तिथला प्रेक्षक आजही सिनेमा थिएटर मध्येच जाऊन पसंत करतो. तो कधीच सिनेमाची ओटीटीवर येण्याची वाट बघत नाही. सिनेमा बरा की वेबसिरीज चांगली ? या वादात तो कधीच अडकत नाही.

हेच कारण आहे की, टॉलीवूड मध्ये २१ व्या शतकात सुद्धा ‘सुपरस्टार’ तयार होतात आणि तिथल्या सिनेमांना ‘यश’ मिळतं. केजीएफ नंतर हे समीकरण थोडं बदललं आहे. सिनेमात जर ‘यश’ असेल सिनेमा बॉक्स ऑफिसवर यशस्वी होणारच असा एक निर्विवाद सत्य आता सिद्ध झालं आहे.

“मी आलो, मी पाहिलं, मी लढलो, मी जिंकून घेतलं सारं” या मराठी गाण्याप्रमाणे नवीन कुमार गौडा म्हणजेच ‘यश’ हा केवळ ३०० रुपये खिश्यात घेऊन बँगलोरला आला आणि पुढे जे घडलं तो एक सुवर्ण अक्षरात लिहिला जाईल असा इतिहास आहे.

 

actor yash inmarathi

 

जगभरात लोकप्रिय असलेल्या ‘यश’ची काय संघर्ष कथा आहे? हे त्याने मध्यंतरी एका मुलाखतीत सांगितलं होतं.

नवीन कुमार गौडाचा जन्म ८ जानेवारी १९८६ रोजी ‘भुवनहल्ली’ या कर्नाटकातील एका छोट्या गावात झाला होता. त्यांचे वडील हे बँगलोर म्युन्सीपल ट्रान्सपोर्ट मध्ये वाहन चालक म्हणून काम करायचे.

त्यांची आई घरातच एक छोटं दुकान चालवायची ज्यामध्ये नवीन त्यांना मदत करायचे. नवीन यांनी एक सरकारी अधिकारी व्हावं अशी त्यांच्या वडिलांची इच्छा होती, पण नवीन ने लहानपणीच हिरो व्हायचं असं मनोमन ठरवलं होतं.

अभिनयाची प्रचंड आवड असलेल्या नवीनला डान्स करण्याची सुद्धा खूप आवड होती. नवीन शालेय जीवनात प्रत्येक सांस्कृतिक कार्यक्रमात भाग घ्यायचा. टाळया, शिट्ट्या यांची लहानपणीच सवय झालेल्या नवीन यांना त्यांचे शाळेचे शिक्षक सुद्धा ‘हिरो’ म्हणूनच हाक मारायचे.

अभिनय म्हणजे केवळ फायटिंग नाही हे नवीन यांना आधीच कळलं होतं. आपल्याला ही कला शिकणं गरजेचं आहे आणि त्यासाठी बँगलोर गाठणं आवश्यक आहे नवीन कुमार यांच्या लक्षात आलं होतं.

 

actor yash inmarathi3

 

‘जिंकू किंवा मरू’ सारखा निर्धार करून नवीन कुमार आई वडिलांच्या विरोध पत्करून केवळ ३०० रुपये सोबत घेऊन बँगलोरला आले. “एक तर अभिनेता व्हायचं, नाही तर मी सांगेल ती सरकारी नोकरी करायची” वडिलांसोबत झालेल्या या बोलीवरच ते घराबाहेर पडले होते.

बँगलोरमध्ये येऊन रंगभूमीवर वेगवेगळे रोल करत त्यांनी रुपेरी पडद्यावरील आपल्या प्रवासाची सुरुवात करायचं त्यांनी ठरवलं होतं. टीव्ही मालिकांमध्ये काम करणार नाही हे त्यांच्या डोक्यात आधीच पक्कं होतं.

रंगभूमीवर काम मिळेपर्यंत नवीन हे ‘बॅकस्टेज’ मध्ये राहून प्रस्थापित कलाकारांना चहा आणून द्यायचे, दिगदर्शकांना सहकार्य करायचे. नाटकांचे प्रयोग हे वेगवेगळ्या शहरांमध्ये असायचे आणि नवीन हे प्रत्येक प्रयोगाच्या ठिकाणी नाटकाच्या बसमधून सहकारी म्हणून प्रवास करायचे आणि गरज पडल्यावर नाटकात छोटे रोल करायचे.

नाटकांचे दिगदर्शक हेच सिनेमांच्या दिगदर्शनात सहकार्य करण्यासाठी नवीन कुमार यांना स्टुडिओ मध्ये बोलवू लागले. स्टुडिओचे दरवाजे नवीन यांच्यासाठी असे उघडले गेले.

 

actor yash inmarathi1

 

छोट्या पडद्यावर काम न करण्याच्या आपल्या निर्णयाला नवीन कुमार यांना पैशांच्या अडचणीमुळे मुरड घालावी लागली होती, पण त्यामुळे ते आपल्या परिवाराला बँगलोरला घेऊन येऊ शकले.

टेलिव्हिजन, नाटक यामधून नवीन कुमार हे कानडी सिनेसृष्टीतील निर्मात्यांच्या नजरेस पडू लागले आणि त्यांना २००५ मध्ये पहिला कानडी सिनेमा ‘मोगिना मनसू’ ऑफर करण्यात आला.

नवीन कुमार यांनी मोठ्या पडद्यावर दाखल होतांना ‘यश’ हे नाव स्वीकारलं होतं. त्यांचा पहिला सिनेमा बॉक्स ऑफिसवर विशेष चालला नव्हता. त्यानंतर आलेल्या रॉकी, सांथे आणि ‘गोकुला’ सारख्या सिनेमांनी त्यांचं करिअर सुरू ठेवलं.

२०१० मध्ये रिलीज झालेल्या ‘मोडालासला’ हा यश यांचा पहिला हिट सिनेमा ठरला ज्यानंतर त्यांनी कधीच मागे वळून बघितलं नाही. त्यानंतर २०११ मध्ये रिलीज झालेल्या ‘राजधानी’, ‘किराताका’, ‘लकी’, ‘जानू’ सारख्या सिनेमातून ते समीक्षकांच्या पसंतीस पडले.

२०१३ मधील ‘गुगली’ हा त्यांचा बॉक्स ऑफिसवर सर्वात जास्त यशस्वी झालेला सिनेमा होता. त्यानंतर आलेल्या ‘रामाचारी’, ‘मास्टरपीस’, ‘सांथू स्ट्रेट फॉरवर्ड’ सारख्या सिनेमातून यश हे नाव घराघरात पोहोचलं. यश यांनी केलेलं हे सर्व काम हे २०१८ मध्ये त्यांना मिळालेल्या ‘केजीएफ’ साठी त्यांना तयार करत होतं.

‘केजीएफ १’ रिलीज झाला आणि यश कोण आहे ? हे पूर्ण भारताला कळलं. कन्नड भाषेत तयार झालेला हा सिनेमा हिंदी, तेलगू, तामिळ, मल्याळम भाषेत डब करण्यात आला आणि लोकांना तो खूप आवडला.

२५० कोटी रुपयांची कमाई करणारा ‘केजीएफ’ हा कन्नडा सिनेसृष्टीच्या सर्वात यशस्वी सिनेमांपैकी एक ठरला आणि ‘यश’ हा सुपरस्टार झाला. २०२२ मध्ये रिलीज होणं अपेक्षित असलेल्या ‘केजीएफ २’ मध्ये सुद्धा ‘यश’ लोकांना दिसणार आहे.

 

actor yash inmarathi2

 

यश यांचा राधिका पंडित यांच्यासोबत २०१६ मध्ये विवाह झाला. राधिका पंडित या दक्षिणेतील अभिनेत्री आहेत. दोघांनी ‘मिस्टर अँड मिसेस रामाचारी’ मध्ये सोबत काम केलं होतं.

‘केजीएफ’च्या यशाचं क्रेडिट हे दिगदर्शक प्रशांत निल आणि निर्माता विजय किरंगदूर यांना देण्यास ‘यश’ कधीच विसरत नाहीत. ‘बाहुबली’च्या दोन्ही भागांनी ज्या प्रकारे भाषेचे बंधनं तोडले तसंच केजीएफ ने सुद्धा कन्नडा फिल्म इंडस्ट्रीला जगभरात पोहोचवलं असं म्हणता येईल.

बाहुबली इतका सामायिक प्रेक्षक मिळाला नसला तरीही ‘केजीएफ’चा आणि ‘यश’चा आपला एक चाहतावर्ग आता तयार झाला आहे हे नक्की. ‘केजीएफ २’ ला सुद्धा लोकांचं मनोरंजन करण्यात यश मिळो अशी आशा व्यक्त करूयात.

===

आमचं युट्यूब चॅनल आणि त्यावरचे व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला फॉलो करा :

व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल

 शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम  | टेलिग्राम शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved. 

error: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?