' राहुल कॅप्टन पदावर? IPL च्या तद्दन व्यावसायिकतेचा भारतीय क्रिकेटमध्ये शिरकाव...

राहुल कॅप्टन पदावर? IPL च्या तद्दन व्यावसायिकतेचा भारतीय क्रिकेटमध्ये शिरकाव…

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम शेअरचॅट

व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल 

===

कुठलीही टीम असो, दीर्घकाळासाठी जर ती एकसंध आणि भक्कम राहायला हवी असेल तर त्या टीमचा ‘म्होरक्या’ तितक्या ताकदीचा, चोख नेतृत्त्व करणारा असायला हवा. कुठल्याही खेळाच्या बाबतीत ही बाब १००% खरी आहे. क्रिकेटही त्याला अपवाद नाही. संघ एकसंध आणि भक्कम राहायला हवा असेल तर कुठल्याही संघाला उत्तम कर्णधार लाभला पाहिजे.

आमचं युट्यूब चॅनल आणि त्यावरचे व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला फॉलो करा :

 

भारतीय क्रिकेट संघाला सुदैवाने गेली काही वर्षे धोनी, कोहली सारखे उत्तम कर्णधार लाभले ज्यांनी क्रिकेटच्या खेळात संघाला बरंच वर आणलं. पण सध्या या कर्णधारपदाच्या निवडीबाबतची परिस्थिती काहीशी डळमळीत झाल्याची चिन्हं दिसत आहेत.

ऑस्ट्रेलियाचा एक खूप जुना कर्णधार ‘रिची बेनो’चं एक प्रसिद्ध वाक्य आहे, “कर्णधारपद म्हणजे ९० टक्के तुमचं नशीब आणि १० टक्के तुमच्या क्षमता. पण जर त्या १० टक्के क्षमता तुमच्यात नसतील तर ९० टक्के नशीबावर अवलंबून राहण्यात काही अर्थ नाही.”

 

dhoni and virat inmarathi

 

एकेकाळचं हे निर्विवाद सत्य काळाच्या ओघात पार भुईसपाट झालंय. क्रिकेटचं झालेलं संस्थात्मकीकरण आणि फ्रँचाइजवर बेतलेल्या T-20 लीगचा खेळावर पडलेला वाईट प्रभाव याचंच ते द्योतक आहे.

कर्णधारपदाची व्याख्या आता ९० टक्के बाजारीकरण आणि १० टक्के नशिबाचा हवाला अशी झाली आहे. त्या १० टक्के क्षमता आता तुमच्यात नसतील तरी तुम्ही सहज तरुन जाऊ शकता.

IPL च्या प्रभावामुळे भारतीय क्रिकेट संघामध्ये हा मोठा पण नुकसानकारक बदल घडताना दिसतोय. IPL च्या बाजारीकरणाचं वारू भारतीय क्रिकेट संघातही झिरपलंय की काय अशी काळजी वाटतेय. विराट कोहलीने अचानक घेतलेल्या निवृत्तीच्या निर्णयानंतर केएल राहुल कडे तिन्ही फॉरमॅटचा स्किपर म्हणून पाहिलं जातंय. संघाकडेच आता कर्णधारपदासाठी चांगल्या खेळाडूंचा तुटवडा असल्यामुळे ही परिस्थिती उद्भवली असावी.

 

ipl trophy 2021 inmarathi

 

त्यामुळेच कदाचित  श्रीलंकेविरुद्धच्या टेस्ट सामन्याच्या कर्णधारपदी २९ वर्षांच्या केएल राहुलची निवड झालीये. त्यापूर्वी आता दक्षिण आफ्रिकेविरुद्धचे जे ३ आंतरराष्ट्रीय वन डे सामने असणार आहे त्यासाठीदेखील कर्णधार म्हणून इतक्या अननुभवी असलेल्या राहुलला कर्णधारपदाची धुरा सांभाळावी लागणार आहे. यापूर्वी, राहुलने केवळ एका प्रथम श्रेणी सामन्यात नेतृत्व केले आहे.

जोहान्सबर्ग मध्ये झालेल्या टेस्ट क्रिकेटच्या दुसऱ्या सामन्यात केएल राहुलला आयत्या वेळी कर्णधारपद भूषवावं लागलं असलं तरी कर्णधार म्हणून तो तेव्हा सपशेल अपयशी ठरला. त्याला या बाबतीत दोष देणं योग्य ठरणार नाही. पण त्याच्या नेतृत्त्वाखाली त्यावेळी भारतीय संघात खेळाला आवश्यक असणारा जोश कमी पडला.

 

kl rahul inmarathi

राहुल एक उत्तम फलंदाज म्हणून ओळखला जातो. पण भारतीय संघाचा होऊ घातलेला कर्णधार म्हणून आजतागायत त्याच्याकडे कधी पाहिलं गेलेलं नाही. तो कर्नाटक टीमकडून खेळलेला आहे, तो अंडर१९ वर्ल्ड कप जिंकलेल्या भारतीय संघातल्या खेळाडूंपैकी एक आहे, ‘इंडिया ए’च्या गटातला एक मुरलेला खेळाडू आहे.

आजवर कुणीही त्याच्याकडे भावी काळातला एक उत्तम कर्णधार म्हणून पाहिलेलं नाही. तसं जर कुणी पाहू शकलं असतं तर राहुलने एव्हाना अनेक सामन्यांचं कर्णधारपद चांगल्या प्रकारे भूषवलं असतं.

IPL च्या ‘किंग्ज इलेव्हन पंजाब’ संघाची अवस्था आजवर इतकी दोलायमान होती की आतापर्यंत झालेल्या १४ सीझन्स मध्ये त्या संघाला १० वेळा कर्णधार आणि ९ वेळा प्रशिक्षक बदलावे लागले. त्यामुळे त्यांनी जर राहुलकडे ‘किंग्ज इलेव्हन पंजाब’ संघाचं नेतृत्त्व दिलं असेल तर त्याविषयी आश्चर्य वाटण्याचं काहीच कारण नाही.

 

kl-rahul-ipl-inmarathi

 

कुठलीही फ्रँचाइज कधीही खोलात शिरून, अभ्यास करून संघाच्या कर्णधाराची निवड करत नाही. टीमचे जे मालक असतात त्यांना आर्थिक फायद्याच्या दृष्टीने एक स्टार व्हॅल्यू असलेला चेहरा संघाचं नेतृत्त्व करायला हवा असतो.

त्याच्याकडे नेतृत्त्वगुण आहेत की नाहीत याने काही फरक पडताना दिसत नाही. थोडक्यात T-20 च्या सामन्यांसाठी कर्णधारावर फारसा दबाव येऊ नये म्हणून माजी क्रिकेटपटूंना, जाणकारांना, फिल्डींग कोच, बॅटिंग कोचना निवडलं जातं आणि ते कर्णधाराला मार्गदर्शन करतात.

आपल्या संघात उत्तमोत्तम खेळाडूंना घेता यावं जेणेकरून आपला आर्थिक फायदा होईल हा संघ निवडीमागचा IPL चा स्पष्ट हेतू असतो. त्यामुळे राहुल यापूर्वी कर्णधार म्हणून कसा होता याने ‘किंग्ज इलेव्हन पंजाब’च्या संघाबाबतीत निर्णय घेणाऱ्यांना काहीच फरक पडत नाही.

राहुल हा भारतीय संघाचा खात्रीचा खेळाडू, सगळ्याच फॉरमॅट्ससाठीचा उत्तम फलंदाज, आणि ज्याची सोशल मीडियावर पॅन-इंडिया फॅन फॉलोईंग आहे असा खेळाडू आहे. या सगळ्या बाबी त्याला ‘किंग्ज इलेव्हन पंजाब’ संघाचा कर्णधार म्हणून निवडण्यासाठी पुरेश्या होत्या. त्यात बॉलिवूडच्या मंडळींमध्येही त्याची उठबस होतीच. त्यामुळे, IPL च्या दृष्टीने तर तो ‘युथ आयकॉन’च होता.

 

kl rahul 1 inmarathi

 

भारतीय संघाचा कर्णधार म्हणून त्याच्याकडे पाहणे हे केवळ IPL मुळे असूच शकत नाही. मग यामागे नेमकं काय कारण असावं? दोन वर्षांच्या कालावधीत ‘किंग्ज इलेव्हन पंजाब’ संघाचं नेतृत्त्व करताना संघाची जराही प्रगती होऊ शकली नाही. केवळ ४०% सामनेच संघ जिंकला आणि ८ संघांमध्ये तो स्पर्धेत सहाव्या क्रमांकावर होता.

दोन्ही सीझन्समध्ये कर्णधार म्हणून इतका अपयशी ठरल्यानंतरही त्याचा काहीच आर्थिक फटका राहुलला बसला नाही. त्यामुळे ज्याच्या नावावर मोठमोठाले ब्रॅण्ड्स आहेत त्या राहुलला आपल्या संघात घ्यायला IPL च्या ‘लखनौ’ आणि ‘अहमदाबाद’ या दोन नव्या टीम्स नक्कीच उत्सुक होत्या. पण आता असं ऐकायला मिळतंय की ‘मुंबई इंडियन्स’चा खेळाडू हार्दिक पंड्याला अहमदाबाद संघाचा कर्णधार करण्याचा विचार सुरू आहे.

हार्दिक आणि राहुल हे दोघेही खेळाडू म्हणून निर्विवाद उत्तम आहेत. पण कर्णधारपदासाठी जी कौशल्यं आवश्यक असतात ती त्या दोघांमध्येही दिसत नाहीत. हार्दिक पंड्या ‘मुंबई इंडियन्स’च्या संघाचा बराच काळ भाग होता. पण तेव्हा कधीही त्याच्याकडे हा भावी काळातला कर्णधार होऊ शकेल या नजरेने कधीच पाहीलं गेलं नाही.

IPL संघाच्या मालकांना, राहुल – हार्दिकसारख्या खेळाडूंवर बोली लावताना वरील सर्व गोष्टींमुळे कधीही फरक पडलेला नाही.पण IPL चा बिझनेस असाच चालतो

 

hardik and rahul inmarathi

 

IPL च्या सगळ्या आर्थिक गणितांचा विचार करताना ‘स्टार व्हॅल्यू’ असलेला खेळाडू संघात घेण्याशिवाय त्यांच्याकडे पर्यायच नसतो. तुम्ही जिंकलात तर चांगलंच आहे. पण तुम्ही हरलात म्हणून काही तुमच्यावर आपत्ती कोसळणार नसते. ही अशी लीग आहे जिथे एबी डीव्हिलर्स आणि ख्रिस गेल सारखे खेळाडू संघात असूनही सलग आठ वर्षांत एकदाही न जिंकलेल्या कोहलीला आरसीबीचा कर्णधार म्हणून कायम ठेवलं.

आरसीबीकडे कायमच चिन्नास्वामी स्टेडियम भरवणारे स्टार्स होते आणि संघाच्या आयकॉनिक स्टार्सबरोबर जोडलं जाण्यासाठी रांगा लागायच्या. भलेही संघाकडे चषक नव्हता. पण बक्कळ पैसा मात्र होता.

सुदैवाने भारतीय क्रिकेट संघाची अजूनतरी अशी अवस्था नाही. त्यामुळेच तिन्ही फॉरमॅट्ससाठी राहुलचा कर्णधार म्हणून विचार होणं आणि चाहत्यांपैकी कुणीही याला विरोध न दर्शवणं हे चित्र अस्वस्थ करणारं आहे.

IPL चा भारतीय संघावर पडलेला हा भलताच प्रभाव संघाच्या भवितव्याच्या दृष्टीने नुकसानकारक ठरू शकतो. राहुलमध्ये चांगला कर्णधार होण्याची कुवत सध्यस्थितीत दिसत नसताना भारतीय संघाने कर्णधार म्हणून राहुलवर मोठाच विश्वास टाकला आहे असं म्हणावं लागेल.

नुकतंच राहुल द्रविडला भारतीय संघांच्या प्रशिक्षकपदी नेमण्यात आले आहे आणि त्यातच कर्णधारपदी देखील राहुल हा म्हणजे एक योगायोग म्हणता येईल मात्र असेही बोलले जात आहे की बहुदा बॉलीवूडप्रमाणे भारतीय संघात देखील लॉबिंग होत आहे कारण हे दोन्ही राहुल मूळचे कर्नाटकचे आहेत.

 

rahul dravid inmarathi

 

राहुल द्रविडची प्रतिमा आपण अनेक वर्षांपासून बघत आलो आहोत, शांत संयमी, निष्पक्षता या सगळ्याच गोष्टी त्याच्यामध्ये आढळून आल्या आहेत, त्यामुळे संघांची कामगिरी उत्तम व्हावी यासाठी त नक्कीच प्रयत्न करेल. आज भारतीय संघांची कामगिरी उत्तमच राहिली आहे, यापुढे देखील अशीच राहू दे अशी अशा आपण सगळेच करूयात.

आमचं युट्यूब चॅनल आणि त्यावरचे व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला फॉलो करा :

 

===

व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल

 शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम  | टेलिग्राम शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?