' रतन टाटांचा मित्र, तत्वज्ञ आणि वाटाड्या... वाचा २८ वर्षाच्या शंतनूच्या अफाट यशाबद्दल

रतन टाटांचा मित्र, तत्वज्ञ आणि वाटाड्या… वाचा २८ वर्षाच्या शंतनूच्या अफाट यशाबद्दल

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम शेअरचॅट

व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल 

===

माणसाची कुणासाठीतरी काहीतरी करण्याची मनापासून इच्छा असेल आणि समोर त्यासाठीचा मार्ग सहजासहजी दिसत नसेल तरी आपल्या बुद्धीच्या आणि कल्पकतेच्या जोरावर माणूस आपल्याला जे करायचं ते साध्य करतोच.

आमचं युट्यूब चॅनल आणि त्यावरचे व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला फॉलो करा :

रात्री अपरात्री रस्त्यावर फिरणाऱ्या भटक्या कुत्र्यांचं संरक्षण व्हावं या हेतूने शंतनू नायडू या मुलाने एक उपक्रम हाती घेतला, एक संस्था काढली आणि तो उपक्रम इतका यशस्वी झाला की अगदी टाटा कंपनीकडून त्याची दखल घेण्यात आली आणि खुद्द रतन टाटांनी भेटीसाठी शंतनूला निमंत्रण धाडलं.

कालांतराने शंतनूने ‘टाटा ट्रस्ट’ च्या चेअरमनच्या ऑफीसमध्ये ‘डेप्युटी जनरल मॅनेजर’ म्हणून काम करायला सुरुवात केली आणि रतन टाटांशी त्याच्या असलेल्या ओळखीचे गाढ मैत्रीत रूपांतर झाले. शंतनू अवघ्या २८ वर्षांचा आहे.

 

shantanu naidu inmarathi

 

शंतनूने पुणे विद्यापीठातून ‘मेकॅनिकल इंजिनियरिंग’चे शिक्षण पूर्ण केलं आणि नंतर ‘टाटा एलक्सी’मध्ये ‘जुनियर डिझाईन इंजिनियर’ म्हणून काम करायला सुरुवात केली. जुनियर इंजिनियर असताना त्याला नाईट शिफ्ट करावी लागायची.

मोटारसायकलवरून घरी पोहोचायला त्याला रात्रीचे १-२ व्हायचे. त्यावेळी त्याने भरघाव वेगाने गाडी अंगावर आल्यामुळे कार अपघातात रस्त्यावरच्या अनेक कुत्र्यांचे प्राण जाताना पाहिले.

शंतनूच्या जागी दुसरं कुणी असतं तर ती व्यक्ती या सगळ्याकडे सहज दुर्लक्ष करू शकली असती, पण कुत्रे वाचले पाहिजेत ही कळकळ त्याला स्वस्थ बसू देईना.

दुरूनही कुत्रे लोकांना ओळखू यावेत म्हणून ‘रेट्रो रिफ्लेक्टिव्ह मटेरियल’ स्वतःकडे उपलब्ध असलेल्या, स्वतः डिझाईन इंजिनियर असलेल्या शंतनूने कुत्र्यांकरता ‘ग्लो इन द डार्क’ कॉलर्स तयार करायच्या ठरवल्या.

शंतनूने आपल्या या उपक्रमावरच न थांबता त्यानंतर ‘मोटोपाव्ह्ज’ ही संस्था काढली. सुरुवातीला या उपक्रमासाठी पुरेसा निधी उपलब्ध नसल्याने या संस्थेने आजूबाजूच्या घरांमधून डेनिम पँट्स गोळा केल्या. शंतनू आणि त्याच्या सहकाऱ्यांनी त्या पँट्स वापरून ५०० रिफ्लेक्टिव्ह कॉलर्स तयार केल्या आणि ५०० कुत्र्यांना त्या घातल्या.

 

shantanu naidu inmarathi1

 

हा उपक्रम इतका मोठा झाला की थेट टाटा कंपनीच्या वृत्तपत्राने त्याची दखल घेतली आणि खुद्द रतन टाटांनी भेटीसाठी शंतनूला निमंत्रण धाडले.

रतन टाटा म्हणतात, “शंतनू आणि मी पहिल्यांदा भेटलो ते आम्हा दोघांनाही भटक्या कुत्र्यांविषयी असणारी कळकळ आणि प्रेमामुळे. शंतनूच्या नेतृत्त्वाखाली कॉलेजला जाणारी त्याच्या टीममधली तरुण मंडळी कुत्र्यांना प्रेम देतात, अन्न पुरवतात, कुत्र्यांना आपलं म्हणून जिथे सामावून घेतलं जाईल अशी घरं त्यांना मिळवून देतात.”

त्यानंतर थोड्याच काळात शंतनू अमेरिकेतल्या ‘कॉर्नल युनिव्हर्सिटी’तल्या टाटांच्याच ‘अल्मा मॅटर’मध्ये ‘एमबीए’ करण्यासाठी गेला. तिथून भारतात परत आल्यानंतर त्याने ‘टाटा ट्रस्ट’ च्या चेअरमनच्या ऑफीसमध्ये ‘डेप्युटी जनरल मॅनेजर’ म्हणून काम करायला सुरुवात केली.

अनेक वर्षांच्या सहवासातून शंतनू आणि रतन टाटा यांच्यातलं मैत्रं घट्ट होत गेलं. मिलेनियल जनरेशनच्या शंतनूच्या त्यांच्यावर असलेल्या प्रभावामुळे रतन टाटा ‘सोशल मीडिया स्टार’ झाले.

जे जे बिझनेसमन इंस्टाग्रामवर सक्रिय आहेत त्यातले एक ८४ वर्षांचे रतन टाटाही आहेत. शंतनूने त्यांना सोशल मीडियाचे सगळे ट्रेंड्स, लिंगो, इमोजीज, हॅशटॅग्स हे सगळं शिकवलं. रतन टाटांच्या हँडलवर सध्या त्यांचे ५ मिलियन फॉलोवर्स आहेत.

रतन टाटांना शंतनूचा उत्साह आणि त्याची कळकळ याविषयी कौतुक आहे. आजच्या जगात असं अभावानेच बघायला मिळतं असं ते म्हणतात. टाटा ऑफिसमधल्या कामकाजाचं व्यवस्थापन बघण्यात शंतनू फार महत्त्वाची भूमिका बजावतो.

टाटा ब्रँडला जर काही नवे स्टार्टअप्स सुरू करायचे असतील तर त्यासाठीदेखील रतन टाटा शंतनूचे सल्ले घेतात. शंतनू म्हणतो, “मिटींग्जच्या वेळेस मी पुष्कळ नोट्स काढतो आणि भविष्यात काय काय बोलणी करायची आहेत याच्याही नोंदी करून ठेवतो.

जसे रतन टाटा सर आत येतात तशी मी त्यांना पूर्ण दिवसाच्या दिनक्रमाची थोडक्यात कल्पना देतो. ते मला त्यानंतर त्यांची योजना सांगतात आणि आम्ही एकेक काम हातावेगळं करायला सुरुवात करतो. ते अत्यंत एकाग्रतेने काम करतात. मध्ये ब्रेक्स न घेता सलग काम करतात.”

रतन टाटांबरोबर काम करत असताना तो उद्योजकतेच्या क्षेत्रात पाऊल ठेवायला भीती वाटणाऱ्या विद्यार्थ्यांच्या संपर्कात आला. ज्यांना उद्योजक व्हायचंय अशा विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करण्यासाठी शंतनूने लॉकडाऊनच्या काळात ‘ऑन युवर स्पार्क्स’ या नावाने ऑनलाईन टॉक सुरू केला.

आयुष्यात आपण जे धडे शिकतो ते वापरून त्यांचं उद्योजकांसाठी आवश्यक असलेल्या धड्यांमध्ये त्याने रूपांतर केलं आणि अशाप्रकारे त्याने त्याच्या टॉक्सना सुरुवात केली.

 

shantanu naidu inmarathi3

 

आता तो दर रविवारी त्याच्या इंस्टाग्राम अकाउंटवरून ‘ऑन युवर स्पार्क्स’संबंधी लाईव्ह येतो आणि उपस्थित राहिलेल्या प्रत्येकाकडून ५०० रुपये म्हणजेच ७. १४ डॉलर्स इतके चार्जेस घेतो. यातून जो पैसा जमतो तो ‘मोटोपाव्ह्ज’ या संस्थेसाठी वापरला जातो. आता ‘मोटोपाव्ह्ज’ ही संस्था २० शहरं आणि ४ देशांपर्यंत पोहोचली आहे.

शंतनू आता ‘गुडफेलोज’ या स्टार्टअपचादेखील संस्थापक आहे. हे स्टार्टअप वेगवेगळ्या पिढ्यांमधल्या लहानथोरांची मैत्री व्हावी या उद्देशाने सुरू केले गेले आहे.

इथे ३० वर्षांखालच्या तरुण आणि सुशिक्षित पदवीधरांच्या वेगवेगळ्या ‘सायकोमेट्रिक टेस्ट्स’ घेतल्या जातील आणि त्यांची ‘एम्पथी’ म्हणजेच दुसऱ्यांना समजून घेण्याची कुवत मोजली जाईल. या अशा तरुण मंडळींचे त्यांच्या आजीआजोबांसोबतचे संबंध सुधारून या दोन्ही पिढ्यांमध्ये मैत्री होण्यासाठी प्रयत्न करणे आणि वयस्कर मंडळींना येणारं एकटेपण आणि एकाकीपण कमी करणे हा ‘गुडफेलोज’ या स्टार्टअपचा प्रयत्न असणार आहे.

याविषयी रतन टाटा म्हणतात, “भिन्न पिढ्यांमधलया परस्परांमध्ये मैत्रं व्हावं या भावनेने एकट्या राहणाऱ्या वयस्कर मंडळींसाठी ‘गुडफेलोज’ ने अतिशय प्रेमाने आणि अगदी मनापसून आपलेपणाचा हात पुढे केला आहे. ‘गुडफेलोज’ कशी प्रगती करतंय हे बघायला मी उत्सुक आहे. यासाठी शंतनू आणि त्याच्या टीमला माझ्याकडून शुभेच्छा.”

या मिलेनियल जनरेशनच्या शंतनूने आपण रतन टाटांसोबत एकत्र घालवलेली वर्षे आणि त्यादरम्यान त्यांच्यात आणि शंतनूत झालेला दृढ बंध जगासमोर उलगडणारं एक पुस्तकदेखील लिहिलं आहे. ‘आय केम अपॉन ए लाईटहाऊस’ असं या पुस्तकाचं नाव.

काही वर्षांपूर्वी जेव्हा शंतनू रतन टाटांना फार जवळून ओळखू लागला तेव्हा त्याच्या आईने त्याला घडणाऱ्या सगळ्या गोष्टींच्या नोंदी एका लहान लाल डायरीत करण्याचं सुचवलं.

आधी एक, मग एकाच्या दोन, दोनाच्या तीन अशा एकूण तीन डायऱ्या रतन टाटांच्या सहवासातल्या त्याच्या अनुभवांनी भरल्यानंतर घरच्यांचा आणि ज्यांना या अनुभवांविषयी कळले त्यांचा सकारात्मक प्रतिसाद पाहून त्याने हे सगळे अनुभव लोकांसमोर आणायचे ठरवले आणि हे पुस्तक काढले.

 

shantanu naidu inmarathi2

 

शंतनू नायडू आणि रतन टाटा यांच्यातली मैत्री इतकी अनोखी आहे, की ते दोघं एकत्र बसून ‘द अदर गाईज’, ‘द लोन रेंजर’ असे सिनेमेही पाहतात.

बीसीसीच्या म्हणण्यानुसार, “शंतनूच्या कुटुंबियांचे टाटा ब्रँडशी जवळचे संबंध होते, पण शंतनू कधीतरी खुद्द रतन टाटांसोबत सोबत करेल असं त्यांना कधीच वाटलं नव्हतं. त्या दोघांच्या कुत्र्यांविषयीच्या प्रेमाने त्यांना एकमेकांच्या जवळ आणलं आणि पिढीतलं अंतर भेदत त्यांची दिवसेंदिवस अगदी घट्ट मैत्री होत गेली.”

इतक्या कमी वयात शंतनू नायडूने घेतलेली ही झेप थक्क करणारी आहे. रात्रीच्या वेळी रस्त्यावर फिरणाऱ्या कुत्र्यांना वाचवण्यासाठी शंतनूने जी विचारपूर्वक पावलं उचलली, जी संस्था काढली ते शंतनूचे सगळे प्रयत्न त्याला कुठच्या कुठे घेऊन गेले.

जे काही करण्याची तुम्हाला मनापासून इच्छा आहे ते करत राहा. तुमचं नशीब केव्हाही झळाळू शकतं असा विश्वास शंतनू आपल्यासारख्या अनेक सामान्य तरुण मंडळींना देतो, पण केवळ नशीब पालटावं या संकुचित हेतूने आपण हे करता कामा नये.

पिढ्यापिढ्यांमधला दुरावा कमी करण्याचा प्रयत्न करणारा शंतनू, कुत्र्यांविषयी कळकळ असणारा शंतनू आपल्या स्वतःच्या पलीकडे इतरांचा फारसा विचार न करणाऱ्या आपल्यातलया बहुतेकांना बरंच काही शिकवतो. आपल्याला मात्र ते घेता यायला हवं. आपल्या परीने आपल्यालाही आपल्या आजूबाजूच्या समाजासाठी खारीचा वाटा उचलता यायला हवा.

===

आमचं युट्यूब चॅनल आणि त्यावरचे व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला फॉलो करा :

व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल

 शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम  | टेलिग्राम शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?