' OTT वर येऊनसुद्धा थिएटरमध्ये ‘पुष्पा’ची छप्परफाड कमाई; यशाची ४ कारणं… – InMarathi

OTT वर येऊनसुद्धा थिएटरमध्ये ‘पुष्पा’ची छप्परफाड कमाई; यशाची ४ कारणं…

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम शेअरचॅट

व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल 

===

लेखक : अखिलेश विवेक नेलेकर

===

“पुष्पा…पुष्पराजू…मै झुकेगा नहीं साला” श्रेयस तळपदेच्या आवजात हिंदीत डब केलेला बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घालणाऱ्या अल्लू अर्जुनच्या पुष्पा सिनेमातल्या या डायलॉगने सगळ्यांनाच वेड लावलं आहे.

बाहुबली आणि KGF नंतर पुष्पा हा पोस्ट कोविड काळातला पहिला पॅन इंडिया सिनेमा ठरला, हा सिनेमा २ भागात येणार हे तर लोकांना ठाऊक होतंच, पण पहिल्याच भागाला इतकं अभूतपूर्व यश मिळेल असं कोणालाही वाटलं नव्हतं.

आमचं युट्यूब चॅनल आणि त्यावरचे व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला फॉलो करा :

आर्यासारख्या सिनेमातून अल्लू अर्जुनने स्वतःची छाप तेलुगू इंडस्ट्रीवर सोडलीच पण फक्त साऊथच नव्हे तर साऱ्या देशभरातल्या प्रेक्षकांनी अल्लू अर्जुनला अक्षरशः डोक्यावर घेतलं. त्याचा स्क्रीन प्रेझेंस, त्याची संवादफेक, त्याचं नृत्यकौशल्य यामुळे तो एक मास हीरो म्हणून नावारूपाला आला.

 

allu arjun IM

 

आज याच अल्लू अर्जुनच्या पुष्पाने पुन्हा एकदा बॉक्स ऑफिसवर बॉलिवूडकरांना मात दिली आहे. रणवीरच्या ८३ च्याही आधी पुष्पा थिएटरमध्ये प्रदर्शित झाला, पण का कुणास ठाऊक या पुष्पाच्या हिंदी डबमधले खूपच कमी शो महाराष्ट्रात ठेवले होते.

पॅन इंडिया लेवल सिनेमा असूनसुद्धा या सिनेमाला सुरुवातीला म्हणाव्या तशा स्क्रीन्स मिळाल्या नाहीत कारण रणवीरचा ८३ येणार होता. आता याला योगायोग म्हणा नाहीतर जनता जनार्दनचा कौल, बॉक्स ऑफिसची गणितं अचानक बदलू लागली.

८३ ची कथा, सादरीकरण उत्कृष्ट असलं तरी प्रमोशनच्या बाबतीत सिनेमा मागे पडला आणि वेगवेगळ्या भाषांमध्ये सिनेमा रिलीज करूनसुद्धा म्हणावा तसा बिझनेस करण्यात ८३ अयशस्वी ठरला.

 

83 flop featured IM

 

लोकं ८३ पेक्षा पुष्पासाठी बॉक्स ऑफिसवर गर्दी करू लागले, अर्थात प्रेक्षकांसमोर कोणाचं काय चालणार, थिएटरचालकांनासुद्धा ८३ चे बरेचसे शो रद्द करून पुष्पाला देण्यात आले आणि न भूतो न भविष्यती एका दाक्षिणात्य सिनेमाने बॉलिवूडचं संपूर्ण मार्केट खाल्लं!

७ जानेवारीला पुष्पा amazon prime या ओटीटी प्लॅटफॉर्मवरसुद्धा प्रदर्शित करण्यात आला, पण तरी या सिनेमाची बॉक्स ऑफिस कमाई रोज नवनवे उच्चांक गाठताना आपल्याला दिसत आहे, खरंतर ओटीटी रिलीज नंतरसुद्धा तिकीटबारीवर एवढी तगडी कमाई करणारा हा पहिला भारतीय सिनेमा आहे.

हिंदी, मराठी तसेच इतर भाषिक प्रेक्षकसुद्धा या सिनेमासाठी एवढे उत्सुक का आहेत? जे आजवर बॉलिवूड किंवा इतर मराठी सिनेमांना जमलं नाही ते अल्लू अर्जुनने महामारीच्या काळात कसं करून दाखवलं? याविषयीच आपण आज चर्चा करणार आहोत!

कथा जुनीच पण उत्तम सादरीकरण आणि फ्रेश ट्रीटमेंट :

पुष्पाची कथा ही आपण ढीगभर चित्रपटातून अनुभवली आहे. गरीब मजूर ते गुन्हेगारी विश्वाचा डॉन हा प्रवास आपण प्रत्येक गँगस्टर फिल्ममध्ये पाहिला आहे, मग पुष्पामध्ये असं वेगळं काय?

पुष्पाची कथा चंदन तस्करीवर बेतलेली आहेच पण चंदन तस्करी करणाऱ्या गॅंगचं रॅकेट कसं काम करतं? त्यांचे खाचखळगे काय आहेत? आणि या गुन्हेगारी विश्वाचं जगभर पसरलेलं जाळं दाखवण्यात पुष्पा सरस ठरतो. जंगलातले चंदन तस्करीचे सीन्स हे खूप बारकाईने चित्रित केले आहेत त्यामुळे चित्रपट तिथल्या लोकांच्या मूळ मातीशी जोडलेला राहतो, त्यात तुम्हाला कुठलाच नकलीपणा जाणवत नाही.

 

pushpa scenes IM

 

एका गुन्हेगारावर हा सिनेमा बेतला असला तरी तो फक्त चोर पोलिसांच्या खेळापुरता मर्यादित न राहता हे गुन्हेगारी विश्व कसं काम करतं आणि ते किती खोलवर पसरलं आहे हे दाखवण्यात पुष्पा वेगळा ठरतो.

सध्याच्या काळात कुणीच २ तासाच्यावर एका जागी बसून सिनेमा पाहू शकत नाही, पण पुष्पाची लांबी तब्बल ३ तासांची असूनसुद्धा सिनेमा तुम्हाला कुठेच उसंत मिळू देत नाही.

फक्त आणि फक्त अल्लू अर्जुन शो :

पुष्पामध्ये एक हाती बॅटिंग केलीये ती म्हणजे अल्लू अर्जुनने. पाहायला गेलं तर पुष्पाच्या या भागात फक्त त्या पात्राचा बेस तयार करण्यात आला आहे, पण बेस पक्का का असतो हे तुम्हाला हा भाग बघून नक्की कळेल.

शे दोनशे रुपयांसाठी मंजूरी करणारा पुष्पा नोकरीवर का लाथ मारतो, शिवाय या गुन्हेगारी विश्वात आल्यावरसुद्धा सगळ्यात उंचावर जायची त्याची प्रबळ इच्छाशक्ति त्याला स्वस्थ बसू देत नाही, तसंच त्याची लहानपणीची ट्रॅजडी आणि त्याचं ते सतत एक खांदा वर करून वावरणं हे सगळं अल्लू अर्जुनने खूप बारकाईने पडद्यावर मांडलं आहे.

 

allu arjun 2 IM

 

 

तो मास हीरो जरी असला तरी अभिनयाच्या बाबतीत तो किती मुरलेला आहे हे पुष्पा बघताना प्रकर्षाने जाणवतं. संवादफेक, नृत्य याबाबतीत अल्लू अर्जुन किती सरस आहे ते आपण जाणतोच, पण पुष्पासारखं पात्र साकारताना त्याची देहबोली, त्याची मानसिकता तितकीच अचूक पकडणं खूप गरजेचं होतं हे सिनेमा बघताना प्रकर्षाने जाणवतं.

वरवर जरी हा एक मसालापट वाटत असला तरी संपूर्ण गुन्हेगारी विश्व उभं करणं आणि त्यातल्या मास्टरमाइंडचा प्रवास मांडणं हे तेवढं सोप्पं नव्हतं, पण अल्लू अर्जुनच्या सहज अभिनयाने पुष्पा वेगळा ठरतो हे मात्र अगदी खरं आहे.

हिरोच्या तोडीस तोड व्हीलन्स :

मसालापट जरी असला तरी यातले व्हिलन्सचा syndicate उभारण्यात दिग्दर्शक सुकुमार यांनी विशेष मेहनत घेतली आहे. कथानकात सिस्टिम, कायदा सुव्यवस्था यांना नकारात्मकच दाखवलं असलं तरी या चंदन तस्करांची modus operandi समजून देण्यासाठी त्यातले व्हीलन्ससुद्धा खूपच शातीर दाखवले आहेत.

चंदनाची तस्करी करणारी लोकल गॅंग, त्या लोकल गॅंगच्या वर बसलेला एक मोठा बॉस आणि या सगळ्यावर अंकुश ठेवणारी आपली भ्रष्ट सिस्टिम किंवा पोलिस यंत्रणा यांचा अचूक वापर सिनेमात आपल्याला दिसून येतो.

सिनेमाच्या शेवटच्या २० मिनिटात येणारं शेखावत हे पोलिस ऑफिसरचं पात्र संपूर्ण कथानक फिरवतं. पुष्पाला टक्कर देण्यासाठी हे पात्र कथानकात एंट्री घेतं खरं पण इथून पुढे हे पात्र पुष्पावर किती भारी पडेल याचा आपल्याला अंदाज येतो.

 

fahad faasil IM

 

या २० मिनिटात हा सिनेमा अल्लू अर्जुनचा नसून फहाद फाजीलचा होतो आणि आपण नुसतं सुन्न राहून तो क्लायमॅक्स बघत बसतो. हिरोच्याच ताकदीचे खलनायक आणि त्यांना दिलेलं योग्य महत्व यामुळेच पुष्पा वेगळा ठरतो!

दाक्षिणात्य सिनेमांचं वर्चस्व :

बाहुबली आणि KGF ने सगळ्या भाषांची बंधनं तोडली आणि तिथूनच खरंतर दाक्षिणात्य सिनेमाने जोर धरला. आज जो बिझनेस बॉलिवूडमधल्या मोठमोठ्या कलाकारांना करता येत नाहीये तो बिझनेस साऊथचे सिनेमे करू लागले आहेत.

मराठीत सैराटनंतर कुठल्याच सिनेमाने एवढं यश पाहिलेलं नाहीये, त्यामुळे या सगळ्या गर्दीत मराठी सिनेमा तर आपल्याला शोधून सापडणार नाही. पुष्पासारखे सिनेमे लोकांना आवडायचं महत्वाचं कारण हेच आहे की हे सिनेमे बहुतांश प्रेक्षकांना कनेक्ट करणारे ठरतात.

 

sairat inmarathi

 

रजनीकांत, कमल हासन यांनी हिन्दी चित्रपटसृष्टीतसुद्धा तितकंच भरगोस योगदान दिलं कारण तेव्हा इथेसुद्धा त्या ताकदीचे निर्माते आणि दिग्दर्शक होते. आज साऊथचा एकही मोठा सुपरस्टार हिंदीत येऊ इच्छित नाही त्यामागेसुद्धा हेच कारण आहे. आणि यामुळेच दाक्षिणात्य सिनेमांचं वर्चस्व वाढतानाच आपल्याला दिसतंय!

महामारीच्या इतक्या कठीण काळात पुष्पासारखा सिनेमा ओटीटी आणि बॉक्स ऑफिसवरही छप्परफाड कमाई करतोय त्यामागची ही प्रमुख कारणं असली तरी सिनेमातलं संगीत, चित्रीकरण, इतर सहकलाकारांचे अभिनय यामुळे तो आणखीनच स्पेशल बनला आहे याबद्दल काहीच दुमत नाही.

पुष्पाच्या या अभूतपूर्व यशामधून बॉलिवूडने किंवा मराठी चित्रपटसृष्टीने नक्कीच धडा घ्यायला हवा, लोकांना जे हवंय ते दिलं तर लोकं तुम्हाला डोक्यावर घेतात हे नक्की!

===

आमचं युट्यूब चॅनल आणि त्यावरचे व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला फॉलो करा :

===

व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल

इनमराठीच्या अपडेट्स शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

InMarathi.com वर विविध लेखकांनी व्यक्त केलेले विचार ही त्यांची वैयक्तिक मतं असतात. InMarathi.com त्या मतांशी सहमत असेलच असं नाही. | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटरइंस्टाग्राम | टेलिग्रामशेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.

error: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?