' तुरुंगातून आमदारकीची निवडणूक जिंकणारा बाहुबली, हरिशंकर तिवारी! – InMarathi

तुरुंगातून आमदारकीची निवडणूक जिंकणारा बाहुबली, हरिशंकर तिवारी!

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम शेअरचॅट

व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल 

===

भारतात कुणीही निवडणुकीत उभा राहू शकतो . मग ती व्यक्ती लिहिता वाचता न येणारी अशिक्षित असो की गुन्हेगार! अगदी तुम्ही कुणाचा मुडदा पडून तुरुंगात असाल आणि तुमच्याकडे भरपूर पैसा व पावर असेल तर तुम्ही तुरुंगात शिक्षा भोगताना देखील निवडणुकीला उभे राहू शकता. म्हणूनच कदाचित आज राजकारण म्हणजे गुंडांचा अड्डा झालाय असे सामान्य माणसाला वाटते.

कारण अश्या अनेक गुन्हे केलेल्यांना राजकारणात उजळ माथ्याने निवडणूका लढवताना लोकांनी प्रत्यक्ष बघितलेले आहे. आता राजकीय पक्ष गुंड-माफियांना राजकारणापासून दूर ठेवण्याचा दावा करत असले तरी एक काळ असा होता की ती पक्षाची गरज असायची.

 

Arun-Gawli-marathipizza
cdn.com

 

अश्याच एका नेत्याबद्दल आज आपण जाणून घेणार आहोत ज्याने चक्क तुरुंगात असताना निवडणूक लढवली आणि जिंकून सुद्धा दाखवली. जाणून घ्या तुरुंगातून आमदारकीची निवडणूक जिंकणाऱ्या पहिल्या बाहुबली म्हणजे हरिशंकर तिवारीबद्दल!

हरिशंकर तिवारींना पूर्वांचलचा (आताचे उत्तर प्रदेश ) बाहुबली असे म्हटले जात असे. त्यांनी चक्क तुरुंगातून अपक्ष उमेदवार म्हणून काँग्रेसला आव्हान तर दिलेच पण निवडणूक देखील जिंकून दाखवली. अलीकडेच हरिशंकर तिवारी यांचे संपूर्ण कुटुंब समाजवादी पक्षात सामील झाले. असे म्हणतात की देशाच्या राजकारणाचे गुन्हेगारीकरण त्यांच्यापासूनच सुरू झाले.

 

tiwari inmarathi

 

एकेकाळी हरिशंकर तिवारींना यूपीचा डॉन, नंतर बाहुबली राजकारणी आणि यूपीच्या राजकारणाचे पंडितजी म्हटले जात असे. १९८५ साली इंदिरा गांधींच्या मृत्यूनंतर संपूर्ण देशात काँग्रेसच्या बाजूने सहानुभूतीची लाट उसळली होती. त्यावेळी हरिशंकर तिवारी यूपीच्या तुरुंगात जेरबंद होते. त्यांच्यावर गँगस्टर कायद्यान्वये कारवाई सुरू होती.

त्यावेळी या डॉन आणि गुंडांची इतकी भीती होती की गॅंगवॉरची घोषणा केली जायची आणि लोकांना घराबाहेर पडायची मनाई असायची. बाहेर रस्त्यांवर दिवसाढवळ्या गॅंगवॉर सुरु आहे हे कळल्यावर स्थानिक लोक घाबरून आपापल्या घरातच थांबायचे. चित्रपटांत दाखवतात त्याप्रमाणे बाहेर गोळीबाराचे आवाज यायचे आणि अनेक लोक मारले जाण्याच्या घटना खरोखर घडल्या आहेत.

 

vastav inmarathi

 

त्यावेळी तुरुंगातून अपक्ष उमेदवार म्हणून हरिशंकर तिवारी यांनी काँग्रेसच्या उमेदवाराचा मोठ्या फरकाने पराभव करून खळबळ उडवून दिली होती. त्यांची ताकद ओळखून काँग्रेसने त्यांना पुढील निवडणुकीत तिकीट दिले आणि पुढील अनेक वर्षे ते गोरखपूरच्या चिल्लुपार येथून ते २००७ पर्यंत निवडून येत राहिले.

 

tiwari 2 inmarathi

 

दरम्यानच्या काळात ते वेगवेगळ्या पक्षांमध्ये गेले. सत्ताधारी पक्षांना त्यांची गरज पडत होती आणि त्यामुळे ते जिंकणाऱ्या पक्षात जात राहिले. १९९८ मध्ये कल्याण सिंह ह्यांनी त्यांना त्यांच्या सरकारमध्ये मंत्री केले, त्यानंतर रामप्रकाश गुप्ता आणि त्यांना राजनाथ सिंह सरकारमध्येही मंत्रीपद मिळाले. त्यानंतर मायावती सरकारमध्ये देखील त्यांना मंत्रीपद देण्यात आले आणि २००३ ते २००७ या काळात मुलायम सिंह यादव यांच्या सरकारमध्येही हरिशंकर तिवारी मंत्री होते.

 

mulayam singh IM

 

पूर्वांचलच्या राजकारणाची सखोल जाण असलेले NBT चे प्रतिनिधी शफी आझमी म्हणतात की, “१९९८ नंतर हरिशंकर तिवारी प्रत्येक पक्षाची गरज बनले होते. जगदंबिका पाल एका दिवसासाठी राज्याचे मुख्यमंत्री झाले तेव्हाही ते त्यांच्या मंत्रिमंडळात मंत्री होते.

खरे तर १९९८ मध्ये राज्यपाल रोमेश भंडारींनी कल्याण सिंगना मुख्यमंत्री पदावरून हटवले आणि डेमोक्रॅटिक काँग्रेसच्या जगदंबिका पाल ह्यांना मुख्यमंत्रीपदाची शपथ दिली, पण दुसऱ्याच दिवशी सत्तापालट झाली आणि कल्याण सिंग पुन्हा मुख्यमंत्री झाले.”

हरिशंकर तिवारी यांच्याविषयी बोलताना वीरेंद्र प्रताप शाही यांचा उल्लेख झाला नाही असे होत नाही. बाहुबलींनी पूर्वांचलच्या राजकारणात प्रवेश करण्याची सुरुवात हरिशंकर तिवारी आणि वीरेंद्र प्रताप शाही या दोघांनी केली. हे दोघेही एकाच भागातील रहिवासी असले तरी वर्चस्वाच्या लढाईवरून त्यांच्यात कट्टर वैर होते. १९८० च्या दशकात शाही आणि तिवारी यांच्यातील वैराची चर्चा देश-विदेशात देखील होत होती.

 

tiwari 1 inmarathi

 

शफी आझमींच्या मते १९८० च्या दशकात विद्यार्थी राजकारणाचा दबदबा वाढला आणि गोरखपूरमध्ये ब्राह्मण-ठाकूर लॉबी सुरू झाली. वीरेंद्र शाही यांना मठाचा पाठिंबा मिळाल्यावर हरिशंकर तिवारी हे ब्राह्मणांचे नेते म्हणून उदयास आले. येथूनच दोघांमध्ये वैर सुरू झाले आणि टोळीयुद्धास सुरुवात झाली. त्यावेळी या टोळीयुद्धाची लोकांना इतकी भीती होती की टोळीयुद्धापूर्वी आज कोणीही घराबाहेर पडायचे नाही, अशी घोषणा केली जात असे आणि स्थानिक लोक घाबरून आपापल्या घरातच थांबायचे.

त्यावेळी वीर बहादूर सिंह हे उत्तर प्रदेशाचे मुख्यमंत्री होते. तिवारी आणि शाही या दोघांवर कारवाई करण्यासाठी उत्तर प्रदेशात पहिल्यांदाच गँगस्टर कायदा लागू करण्यात आल्याचे सांगितले जाते. वीर बहादूर सिंह हे कायदा आणि सुव्यवस्थेला विशेष महत्त्व देणारे नेते होते आणि म्हणूनच ते माफियांवर करडी नजर ठेवून होते.

 

law-court-inmarathi

 

यानंतर १९८५ मध्ये हरिशंकर तिवारींनी तुरुंगात असताना निवडणूक लढवली आणि ते विजयी झाले. एका मुलाखतीत हरिशंकर तिवारी यांनी स्वतः राजकारणात आल्याचे सांगितले होते. त्यांनी सांगितले होते की तत्कालीन मुख्यमंत्री वीर बहादूर सिंह यांनी त्यांना खोट्या प्रकरणात अडकवून तुरुंगात पाठवले होते.

१९८० च्या दशकात गोरखपूरमध्ये हरिशंकर तिवारींवर २६ गुन्हे दाखल झाले होते. खुनाची सुपारी देणे, खुनाचा कट रचणे, अपहरण करणे, खंडणी उकळणे, सरकारी कामात अडथळा निर्माण करणे असे अनेक आरोप त्यांच्यावर होते. पण ह्यापैकी कुठलाही आरोप सिद्ध होऊ शकला नाही.

 

extortion inmarathi

१९८५ पासून सुरु असलेली हरिशंकर तिवारी ह्यांची विजयाची मालिका माजी पत्रकार राजेश त्रिपाठींनी २००७ सालच्या निवडणुकीत हरिशंकर तिवारींचा पराभव करून थांबवली.या निवडणुकीत त्यांचा विजयाचा विक्रम प्रथमच मोडला. राजेश त्रिपाठी हे बसपाचे उमेदवार होते. यानंतर २०१२ च्या निवडणुकीत त्यांना पुन्हा पराभवाला सामोरे जावे लागले. त्यानंतर हरिशंकर तिवारींनी त्यांचा राजकीय वारसा मुलगा विनय शंकर तिवारींकडे सोपवला.

एकेकाळी दहशतवादविरोधी कायदा, राष्ट्रीय सुरक्षा कायदा आणि गँगस्टर (प्रतिबंध) कायद्यांतर्गत आरोपी असलेल्या हरिशंकर तिवारींची आज मात्र सर्व आरोपांतून निर्दोष मुक्तता झाली आहे.

आमचं युट्यूब चॅनल आणि त्यावरचे व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला फॉलो करा :

 

===

व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल

 शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम  | टेलिग्राम शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.

error: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?