' हजारो मुलांची माय होण्यासाठी स्वतःच्या मुलीला दूर ठेवणारी "माऊली"

हजारो मुलांची माय होण्यासाठी स्वतःच्या मुलीला दूर ठेवणारी “माऊली”

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम शेअरचॅट

व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल 

===

सिंधुताई सकपाळ हे नाव माहीत नाही अशी व्यक्ती किमान महाराष्ट्रात तरी सापडणार नाही. स्वत: खडतर आयुष्य जगूनही शेकडो, अनाथांची माय झालेल्या सिंधूताई आज सगळ्यांना पोरकं करून अनंताच्या प्रवासाला निघून गेल्या आहेत.तरी त्यांच्या मायेची ऊब पुढील अनेक वर्ष महाराष्ट्राला जाणवत राहील यात शंका नाही.

 

sindhutai im

आमचं युट्यूब चॅनल आणि त्यावरचे व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला फॉलो करा :

वर्धा जिल्ह्यातल्या पिंपरी मेघे गावात अभिमान साठेंच्या घरी जन्मलेली मुलगी. जिचं नावच चिंधी ठेवलं गेलं तिच्या जन्माचं काय कौतुक असणार आहे हे उघड आहे. पोटची आई या मुलीचा दुस्वास करायची. वडिलांची पोरीवर माया होती मात्र बायकोसमोर काही चालणं कठीण होतं.

चिंधीला शाळेत जायची, शिकायची खूप आवड पण घरी इतकं दारिद्र्य की अक्षरं गिरवायला पाटी पेन्सिलही मिळणं मुश्किल. भराडाच्या पानावर अक्षरं गिरवत चिंधीचं शिक्षण चालू होतं. कसं बसं चौथीपर्यंतचं शिक्षण पूर्ण झाल्यावर वयाच्या अकराव्या वर्षी चिंधीचं लग्न तिच्याहून वीस एक वर्षं मोठ्या असणार्‍या श्रीराम सकपाळ याच्याशी झालं.

लग्नानंतर अर्थातच शिक्षणाशी संबंध संपला. सासरी गुरं वळण्याचा व्यवसाय होता. लग्न करून दोन वेळचं रांधायला जशी एक बाई मिळाली तशीच कामाला दोन हात जास्तीचे मिळाले. इतर महिलांसोबत सिंधूताईंनाही गुरांच्या कामाला जुंपलं गेलं. अक्षरश: शेकड्यानं गुरं असत आणि या गुरांचं शेण काढून महिलांच्या कंबरेचा खुळखुळा होत असे. गुरासारखं राबूनही एक पैशाची मजुरी या महिलांना मिळत नसे. सिंधूताईंना हा अन्याय सहन होईना. त्यांनी याविरुध्द बंड पुकारले आणि प्रसंगी मारहाण सहन करूनही हा लढा त्या जिंकल्या.

अर्थातच या बंडखोरीची पुरेपूर किंमत त्यांनी चुकविली. गावातील जमिनदार दमडाजी असतकर या बाईच्या धैर्यानं डिवचला गेला. त्याची जंगलातून येणारी मिळकत सिंधूताईंच्या बंडामुळे बंद पडली होती. आता गावातल्या महिल्यांचं धारिष्ट्य वाढलं होतं. माईचा काटा काढण्यासाठी दमडाजीनं नीच चाल खेळली. माईच्या पोटातलं मूल आपलं आहे असा अपप्रचार त्यानं सुरू केला.

 

sindhutai 1 im

 

बाईचं आयुष्य चूल आणि मूल सांभाळण्यासाठीच असतं अशा संस्कारातल्या समाजातल्या सिंधूताईंची अठराव्या वर्षापर्यंत ३ बाळंतपणं झाली. चौथ्यावेळेस गर्भवती असताना त्यांच्या खडतर आयुष्याला कलाटणी मिळाली. दमडाजीच्या अपप्रचामुळे माईचा नवरा श्रीहरी सपकाळ याच्या मनात बायकोविषयी संशय निर्माण झाला. त्यानं माईंना बेदम मारहाण केली. माईचे दिवस भरलेले होते. कोणत्याही क्षणी प्रसुती होईल अशी वेळ असताना नवरा लाथाबुक्क्यांनी मारत होता. अर्धमेल्या अवस्थेतल्या माईंना गुराच्या गोठ्यात आणून टाकून दिलं आणि तिथेच माईंनी आपल्या मुलीला जन्म दिला.

नुकतं जन्मलेलं ते बाळ पोटाशी धरून माईंनी गावातली दारं ठोठावली पण नवर्‍यानं टाकून दिलेल्या माईसाठी गावातलं एकही दार उघडलं गेलं नाही. अखेर माई कशीबशी चालत ठेचकळत माहेरी आली. जन्मदात्या आईनंही माईकडे पाठ फिरवली. माहेरचं दारही माईसाठी उघडलं गेलं नाही. नुकतं जन्मलेलं लेकरू घेऊन माई रेल्वेस्टेशनवर आल्या आणि पोटाची भूक भागविण्यासाठी भीक मागू लागल्या. याच रेल्वेस्थानकार त्यांना त्यांच्यासारखीच घरदार हरवलेली अनाथ मुलं भेटली आणि माईंना आपलं दु:ख सावरून या मुलांसाठी काहीतरी करण्याची उर्मी बळावली.

कोणतीही आई आधी स्वतःच्या लेकराला जवळ करते आणि मग इतरांच्या मुलांना माया देते, मात्र सिंधुताईंनी नेमकं उलट केलं. इतर लेकांना मायेची ऊब देताना त्यांच्याकडे दुर्लक्ष होऊ नये यासाठी त्यांनी  आपल्या मुलीला, ममताला त्यांनी दगडूशेट ट्रस्टच्या हवाली करत ही अनाथ मुलं जवळ केली. नुसती जवळ केली नाहीत तर दत्तक घेत ती कायदेशीत आई बनली.

 

sindhutai 2 im

 

एक अडाणी गुरांच्या गोठ्यात राबणारी मुलगी अजाणता एक मोठं कार्य करत होती. पुढे ही अडाणी मुलगी, जिला सगळ्यांनी दारं बंद केल्यानं भीक मागायची वेळ आली होती ती हजारोंची माय बनली. आपलं दार कधिही तिनं कोणाही आधार मागायला आलेल्यासाठी बंद केलं नाही. मुलांचं पालन पोषण, शिक्षण, लग्न देखिल लावून हजारोंच्या आयुष्यात मायेचा ओलावा दिला.

ममता बालगृहात आज हजारो मुलं राहतात, खेळतात, शिकतात. कोरोनाच्या संकटात माईंपुढे आर्थिक प्रश्न उभे राहिले, त्यावेळी स्वतः अर्धपोटी रहात त्यांनी मुलांचं पोट भरलं. इतकंच नव्हे तर काळाची गरज ओळखून त्यांनी सोशल मिडीयाची मदत घेत मदतीचं आव्हान केलं. देशातूनच नव्हे तर परदेशातूनही माईंच्या हाकेला प्रतिसाद मिळाला.

 

sindhutai 3 im

 

आज माईंनी जगाचा निरोप घेतला, शरीराने त्या आपल्यात नसल्या तरी राज्यातील हजारो मुलांवर त्यांची ‘ममता’ कायम राहणार हे नक्की.

आमचं युट्यूब चॅनल आणि त्यावरचे व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला फॉलो करा :

 

===

व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल

 शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम  | टेलिग्राम शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?