' ‘एंडेमिक’, ‘एपिडेमिक’ आणि ‘पँडेमिक’ यातला नेमका फरक काय? – InMarathi

‘एंडेमिक’, ‘एपिडेमिक’ आणि ‘पँडेमिक’ यातला नेमका फरक काय?

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम शेअरचॅट

व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल 

===

‘कोरोना’चं सावट आपल्यावर अद्याप कायम आहे. त्यात आता ओमिक्रॉनची भर पडल्यामुळे रुग्णांचे नवेनवेच आकडे पाहायला मिळत आहेत. एव्हाना आपण कोरोनासोबत जगायलाही शिकलोय. पण जरी आपण सगळंच डिजिटल झाल्याला सरसावलो असलो तरी कोरोना कधी जाईल? जाईल की नाही? आपल्याला असंच कोरोनासोबत कायम जगत राहावं लागेल का? या प्रश्नांची उत्तरं आपल्यापाशी नाहीत.

आर्थिक, मानसिक सगळ्याच स्तरावर लोकांचं नुकसान झालंय. अनेकांचा रोजगार गेलाय. त्यांना नोकरी मिळवण्यासाठी झुंजावं लागतंय. एक विचित्र ताण आपण सगळेच सतत मनावर वागवतोय.

 

corona test 5 inmarathi

 

कोरोनाच्या बाबतीत आपण बातम्यांमधून ‘पँडेमिक’- ‘पँडेमिक’ असं खूप ऐकलंय. पण ‘पँडेमिक’ म्हणजे नेमकं काय हे आपल्यातल्या बहुतेकांना ठाऊक नसावं. हा प्रश्नही कदाचित आपल्याला पडला नसेल. चला तर मग जाणून घेऊयात यातील नेमका फरक…

आमचं युट्यूब चॅनल आणि त्यावरचे व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला फॉलो करा :

 

१. ‘एंडेमिक’ म्हणजे काय? –

काही विशिष्ट प्रदेशांमध्ये एखाद्या आजाराचे रुग्ण जर सातत्याने असतील तर तेव्हा त्याला ‘एंडेमिक’ असं म्हणतात. ‘एंडेमिक’ असतो तेव्हा त्या विशिष्ट प्रदेशांमध्ये रुग्णांच्या आकड्यात दीर्घ काळापर्यंत वाढ किंवा घट आढळून येत नाही. रुग्णांचा आकडा स्थिर राहतो.

 

pandemic inmarathi

 

‘एंडेमिक’ मध्ये एखादा विशिष्ट रोग किती पसरू शकतो आणि रुग्णसंख्या साधारण किती असू शकते याचा अंदाज बांधता येतो. त्या त्या प्रदेशांमध्ये रुग्णांची संख्या जास्त असतेच पण बराच काळ रुग्णसंख्येत वाढ होत नाही.

‘मलेरिया’ हा आजार ‘एंडेमिक’ या प्रकारात मोडतो. वर्षभरात जगभर साधारण ३०० मिलियन लोकांना मलेरिया होतो पण उष्ण कटिबंधीय प्रदेशांमध्ये या रुग्णांची संख्या जास्त असते. थोडक्यात. ‘एंडेमिक’ म्हणजे एखादा आजार हा आता जगात असणारच आहे हे माहीत असणे पण काही काही प्रदेशांमध्ये त्या आजाराची रुग्णसंख्या जास्त असणे आणि ती तशी दीर्घकाळ सातत्याने आणि स्थिर असणे.

 

climate inmarathi

 

‘एंडेमिक’मध्ये आपल्याला त्या आजारासोबतच जगावे लागते. ‘कोरोना’ हा ‘पँडेमिक’ सुद्धा भविष्यात ‘एंडेमिक’ होऊ शकतो असा अंदाज मे २०२० मध्ये ‘डब्यूएचओ’ कडून वर्तवण्यात आला आहे.

२. ‘एपिडेमिक’ म्हणजे काय?

एखाद्या विशिष्ट भौगोलिक प्रदेशात, देशात एखाद्या आजाराच्या रुग्णांच्या संख्येत जर अनपेक्षितपणे खूप वाढ झाली तर तो आजार ‘एपिडेमिक’ या प्रकारात मोडतो. ‘एपिडेमिक’ असतो तेव्हा एखाद्या आजाराच्या रुग्णसंख्येत सातत्याने वाढ होत असते पण ते रुग्ण केवळ एखाद्या विशिष्ट भौगोलिक प्रदेशापुरते किंवा देशापुरते मर्यादित असतात.

‘एपिडेमिक’ मध्ये एखाद्या व्हायरसची तीव्रता प्रचंड वाढते, त्याचे विषाणू बदलतात त्यामुळे त्या व्हायरसच्या मूळ स्वरूपात बदल होऊन त्या व्हायरसचा अधिकच संसर्ग व्हायला लागतो.

 

africa 1 inmarathi

 

स्मॉलपॉक्स’, ‘पोलिओ’ हे अमेरिकेत यापूर्वी येऊन गेलेले आजार ‘एपिडेमिक’ स्वरूपात होते. ‘कोरोना’ जेव्हा वुहान, चीनपुरताच मर्यादित होता तेव्हा तो ‘एपिडेमिक’ होता. नंतर ‘कोरोना’ ‘पँडेमिक’ आजार झाला.

३. ‘पँडेमिक’ म्हणजे काय? –

जेव्हा एखादा विशिष्ट आजार केवळ एका किंवा काही विशिष्ट प्रदेशांपुरता मर्यादित न राहता तो आजार वेगवेगळ्या देशांमध्ये, खंडांमध्ये पसरत जाऊन जगभर पसरतो तेव्हा तो आजार ‘पँडेमिक’ म्हणून ओळखला जातो. ‘डब्ल्यूएचओ’ आणि ‘यूएस सेंटर्स फॉर डिसीज कंट्रोल’च्या म्हणण्यानुसार, नव्यानेच जे व्हायरसेस उद्भवलेले असतात त्यांच्यामुळे ‘पँडेमिक’ होतो.

हा व्हायरस माणसांसाठी नवा असल्याने त्यावरची लस उपलब्ब्ध नसते. त्यामुळे सुरुवातीला खूप कमी लोकांना झालेला आजार अनेकांना होऊन पसरतो. ‘एपिडेमिक’ जर दीर्घकाळ तसाच राहिला आणि रुग्णसंख्येत वाढ होत जाऊन एका विशिष्ट् प्रदेशापुरता किंवा देशापुरता मर्यादित असलेला हा आजार जगभर पसरला तर त्याचा ‘पँडेमिक’ होतो.

 

corona test inmarathi

‘एपिडेमिक’ आणि ‘पँडेमिक’मधला फरक लक्षात घेताना रोगाची तीव्रता किती आहे हे बघितलं जात नाही तर रुग्णसंख्या किती आहे आणि कुठे कुठे रुग्ण आहेत यावरून तो आजार ‘एपिडेमिक’ प्रकारात मोडेल की ‘पँडेमिक’ प्रकारात मोडेल हे लक्षात येतं.

‘पँडेमिक’मध्ये दर दिवसाला वेगवेगळ्या देशांमध्ये रुग्णांचा आकडा वाढतच असतो. वेगवेगळ्या देशातल्या आरोग्य प्रणालींना एकमेकांच्या सहकार्याने या आजारावर नियंत्रण मिळवावं लागतं. हा आजार किती धोकादायक असू शकतो ते त्या रोगाच्या व्हायरसवर अवलंबून असतं. व्हायरस व्हायरसनुसार आणि माणसांच्या आरोग्यावर त्याचा किती परिणाम होतोय त्यानुसार आजाराच्या धोक्याची पातळी बदलत असते.

पँडेमिक असताना वेगवेगळे गंभीर आजार झालेल्या रुग्णांची संख्या फार मोठी असते. कारण, सगळीकडेच वेगवेगळ्या व्हायरसेस, बॅक्टेरियाजचा संसर्ग लोकांना झालेला असतो. ‘इन्फ्लुएंझा’ म्हणजेच ‘स्पॅनिश फ्लू’ आणि ‘स्वाईन फ्लू’ हे कोरोनापूर्वी आलेले पँडेमिक आजार होते.

 

sars virus inmarathi
NPR

 

४. ‘आउटब्रेक’ म्हणजे काय? ‘एंडेमिक’ ‘आउटब्रेक’पेक्षा कसा वेगळा असतो? –

‘एंडेमिक’ प्रकारात मोडणाऱ्या आजाराचा ‘आउटब्रेक’ होऊ शकतो. ‘एंडेमिक’ काही विशिष्ट प्रदेशांपुरता मर्यादित असला आणि त्या प्रदेशामध्ये त्या आजाराचे रुग्ण स्थिर संख्येने सातत्याने आढळत असले तरी ‘आउटब्रेक’ कुठेही होऊ शकतो. ‘एंडेमिक’ प्रकारात रुग्णांच्या संख्येचा एक अंदाज असतो.

‘आउटब्रेक’ मध्ये त्या आजाराच्या रुग्णांची संख्या प्रचंड वाढते. तो आजार ज्या प्रदेशांमध्ये ‘एंडेमिक’ आहे त्या प्रदेशांपेक्षा एका नव्याच ठिकाणी जर त्या आजाराचा एखादाही रुग्ण आढळला तरी त्याचा ‘आउटब्रेक’ होऊ शकतो.

‘आऊटब्रेक’ जर वेळीच आटोक्यात आणता आला नाही तर त्याचा ‘एपिडेमिक’ होऊ शकतो. आफ्रिकेत , मध्य आणि दक्षिण अमेरिकेत आणि कॅरिबियन मध्ये डेंग्यूचा ताप ‘एंडेमिक’ आहे.

डासांमार्फत हा आजार एका माणसाकडून दुसऱ्या माणसाला होतो. पण २०१९ मध्ये ‘हवाई’ मध्ये डेंग्यूच्या तापाचा ‘आऊटब्रेक’ झाला होता. ‘हवाई’ मध्ये हा आजार ‘एंडेमिक’ नाही. असं समजलं जातं, की डेंग्यू झालेला एक रुग्ण या बेटावर गेला होता तेव्हा त्याला तिथे डास चावले. ते डास ज्यांना ज्यांना चावले त्यांच्यात डासांमार्फत डेंग्यूचे हे विषाणू शिरले आणि अशा प्रकारे ‘हवाई’त डेंग्यूचा उद्रेक झाला.

 

dengue-inmarathi
egypttoday.com

 

‘एंडेमिक’, ‘एपिडेमिक’ आणि ‘पँडेमिक’ या संकल्पना अश्या प्रकारे एकाच वेळी एकमेकांशी निगडीतही आहेत आणि एकमेकांपेक्षा वेगळ्याही आहेत . ‘डब्यूएचओ’ ने या तिन्ही संकल्पनांची व्याख्या ही आजाराच्या तीव्रतेनुसार केलेली नाहीये तर आजार पसरण्याचा दर काय आहे त्यानुसार केलेली आहे. थोडक्यात, रुग्णसंख्या कशी आहे? ती स्थिर आहे की वाढते आहे? कुठल्या कुठल्या प्रदेशात एखादा आजार आहे? एखाद्या विशिष्ट प्रदेशातच एखादा आजार आहे की जगभर आजार पसरलेला आहे? यावरून तो आजार या तिन्ही संकल्पनांपैकी नेमक्या कुठल्या संकल्पनेत मोडतो हे लक्षात येऊ शकतं.

आमचं युट्यूब चॅनल आणि त्यावरचे व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला फॉलो करा :

===

व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल

 शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम  | टेलिग्राम शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.

error: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?