' राजकुमारशी पटत नव्हते पण ‘एका’ अटीवर केला नानांनी ‘तिरंगा’ चित्रपट… – InMarathi

राजकुमारशी पटत नव्हते पण ‘एका’ अटीवर केला नानांनी ‘तिरंगा’ चित्रपट…

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम शेअरचॅट

व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल 

===

कुठलाही चित्रपट आपल्यासमोर येतो तो केवळ त्या चित्रपटाच्या स्वरूपात. चित्रपटांवर आणि त्यातल्या कलाकारांवर मनापासून प्रेम करणारे आपण प्रेक्षक केवळ त्या चित्रपटाची कथा आणि त्यात काम केलेल्या कलाकारांचं काम या इतक्याच गोष्टींचे साक्षीदार असतो.

चित्रपटाच्या चित्रीकरणादरम्यान अशा कितीतरी गोष्टी घडलेल्या असतात ज्या कायम पडद्याआड राहतात. पण तरी वेगवेगळ्या प्रसारमाध्यमांमधून, मुलाखतींमधून आपल्याला त्या सगळ्याची थोडीफार कुणकुण लागत राहते.

आपल्याकडे दिग्दर्शकाला कलाकारांना चित्रपटांमध्ये घेतल्यावर केवळ त्या कलाकाराकडून अभिनयच करून घ्यायचा नसतो तर इतरही अनेक गोष्टींची काळजी त्याला घ्यावी लागते. असंही बघायला मिळतं, की काही काही कलाकार केवळ त्यांच्या अभिनयासाठीच नाही तर त्यांच्या स्वभावामुळे, त्यांच्या टँट्रम्समुळेही ओळखले जातात.

 

bollywood stars imarathi

 

आपल्यावर त्या कलाकाराच्या व्यक्तिमत्त्वाचा इतका घट्ट पगडा असतो की कित्येकदा त्या कलाकाराच्या दोषांसकट आपण त्या कलाकाराला जसंच्या तसं स्वीकारतो. आपल्या हृदयात त्याला अढळ स्थान देतो. ‘नाना पाटेकर’ या नावामागे मुळातच एक मोठं वलय आहे . नाना पाटेकरांवर प्रेम करणारा मराठीतच नाही तर हिंदीतही मोठा चाहतावर्ग आहे.

आमचं युट्यूब चॅनल आणि त्यावरचे व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला फॉलो करा :

मराठमोळ्या चाहत्यांना नाना पाटेकर त्यांच्यातलेच एक असल्यासारखे वाटतात आणि असे इतके जवळचे वाटले तरी त्यांच्या मनात नानांविषयी प्रचंड आदर असतो. केवढ्या कठीण परिस्थितीतून नाना वर आले याच्या कहाण्या आपण ऐकलेल्या असतात. पण नाना पाटेकर हे व्यक्तिमत्त्व केवळ यासाठीच प्रसिद्ध नाही.

 

nana patekar inmarathi 12
DNA india

 

फार पूर्वीपासूनच ते फटकळ, हजरजबाबी आणि तापट स्वभावाचे म्हणून ओळखले जातात. त्यात अलीकडे झालेल्या कॉंट्रोव्हर्सीमुळे तर ते आणखीनच वेगळ्या कारणासाठी चर्चेत आले होते. असं सगळं असलं तरी आजही नानांचा चाहतावर्ग प्रचंड मोठा आहे. पण आपल्यातल्या बऱ्याच जणांना कदाचित माहीत नसेल की ज्या ‘तिरंगा’ चित्रपटातलं नाना पाटेकरांचं काम गाजलं तो चित्रपट करण्यापूर्वी नाना पाटेकरांनी दिग्दर्शक-निर्माता मेहुल कुमार याला एक अट घातली होती. आपण चित्रपटात काम करू. पण राज कुमारने जर काही हस्तक्षेप केला तर आपण शूटिंग सोडू अशी ती अट होती.

दिवंगत बॉलिवूड अभिनेते राज कुमार हे जसे त्यांच्या उत्तम संवादफेकीसाठी प्रसिद्ध होते त्याचप्रमाणे ते त्यांच्या उर्मटपणे बोलण्याच्या सवयीसाठीही ओळखले जायचे. जर एखादी गोष्ट त्यांना रूचली नाही, पटली नाही तर ते ती गोष्ट सरळसरळ तोंडावर बोलून मोकळे व्हायचे. आपण कश्या प्रकारे बोलतोय, आपल्या बोलण्याचा समोरच्या व्यक्तीवर काय परिणाम होतोय याची ते पर्वा करत नसत.

 

raj kumar 3 inmarathi

 

नाना पाटेकरांसारखाच त्यांचाही स्वभाव तापट, हजरजबाबी होता. अशा दोन तापट माणसांना शूटिंगच्या निमित्ताने नाईलाजाने एकत्र आणावं लागणं हे दिग्दर्शकासाठी मोठं जोखमीचंच काम होतं. कारण असे स्वभाव असले तरी ते दोघेही उत्तम कलाकार होते.

आपल्या चित्रपटात त्यांनी काम करावं म्हणून त्याचे हे दोष झेलायलाही मेहुल कुमार तयार झाला. ‘तिरंगा’ साठी राज कुमार यांची निवड नक्की झाल्यानंतर चित्रपटातल्या दुसऱ्या एका भूमिकेसाठीची निवड बाकी होती. त्यादरम्यान नाना पाटेकरांचा ‘प्रहार’ हा चित्रपट आला होता. हा चित्रपट काही फार चालला नाही मात्र लोकांना यातलं नाना पाटेकरांचं काम प्रचंड आवडलं.

चित्रपटाच्याच एका फायनान्सरला जेव्हा चित्रपटातल्या दुसऱ्या भूमिकेसाठी आपल्या मनात नाना पाटेकर यांचं कास्टिंग करण्याचा विचार आहे असं मेहुल कुमार ने सांगितलं तेव्हा तो फायनान्सर त्याला म्हणाला की, “दोघांची तोंडं दोन विरुद्ध दिशांना आहेत. एकाचं पूर्वेला तर दुसऱ्याचं पश्चिमेला. अश्याने चित्रपट मध्येच अडकून पडेल.” हे म्हणताना अर्थातच त्या फायनान्सरच्या म्हणण्याचा रोख नानांच्या आणि राज कुमार यांच्या स्वभावाकडे होता.

 

nana patekar inmarathi 7
google play

 

मेहुल कुमारने राज कुमार यांना घेऊन त्यापूर्वी अनेक चित्रपट केले होते. त्यामुळे राज कुमार यांच्या स्वभावाची मेहुल कुमारला कल्पना होती. फायनान्सरचं म्हणणं ऐकून घेतल्यानंतरही मेहुलने नानांना फोन केला. मेहुल कुमारने जेव्हा नाना पाटेकरांना ‘तिरंगा’ या चित्रपटात काम कराल का अशी विचारणा केली तेव्हा सुरुवातीला नानांनी चित्रपटात काम करायला सरळसरळ नकार दिला.

आपण ‘कमर्शिअल फिल्म्स’ करतच नाही नानांनी त्याला सांगितलं. तरीही मेहुल कुमारला नानांना ‘तिरंगा’ चित्रपटात घ्यायचंच होतं. मेहुल कुमारने त्यावर “किमान चित्रपटाची कथा तरी एकदा ऐकून घ्या. त्यानंतर चित्रपटात काम करायचं की नाही ते ठरवा.”, अशी नानांना विनंती केली. नानांनी ती विनंती मान्य केली. त्यानंतर स्क्रिप्ट ऐकवायला मेहुल कुमार स्वतः नानांच्या घरी गेला.

नानांना स्क्रिप्ट आवडलं पण त्यांनी मेहुल कुमारच्या पुढ्यात एक अट ठेवली. “मी चित्रपट करतो. पण राज कुमारने शूटिंगदरम्यान खूप जास्त हस्तक्षेप केला तर मी शूटिंग थांबवेन आणि याची संपूर्ण जबाबदारी तुझी असेल. चित्रपट पुन्हा बनेल की नाही याची मी पर्वा करणार नाही.”, असं नाना मेहुल कुमारला म्हणाले.

 

tiranga inmarathi

नाना पाटेकरांचं कास्टिंग निश्चित झाल्यावर त्याच रात्री मेहुल कुमारने राज कुमार यांना फोन केला आणि चित्रपटातलया दुसऱ्या भूमिकेसाठी नाना पाटेकरांची निवड केली असल्याचं सांगितलं. हे ऐकताच राज कुमार फार चिडले. ” अरे यार, त्याला कशाला घेतलं? मी असं ऐकलंय की तो सेटवर शिवीगाळ करतो.”, असं राज कुमार म्हणाले. हे म्हणणारे राज कुमार हे सुद्धा एकदा भर मैफिलीत चक्क राज कपूर यांच्यावर चिडले होते.

थोडक्यात, नाईलाजास्तव का होईना या दोन सारख्या स्वभावाच्या उत्तम नटांना शूटिंगदरम्यान एकमेकांच्या आमनेसामने यावंच लागलं. ‘तिरंगा’ चं शूटिंग सुरू झाल्यानंतर सुरुवातीपासूनच चित्रपटाचा संपूर्ण क्रू या दोन्ही नटांचा स्वभाव माहीत असल्याने त्यांच्या बाबतीत प्रचंड सतर्क असायचा. राज कुमार आणि नाना पाटेकर मात्र एकमेकांशी अजिबात बोलायचे नाहीत.

मेहुलच्या म्हणण्यानुसार, “शूटिंगच्या दरम्यान सेटवर काही तणाव नसायचा कारण, नाना पाटेकर आणि राज कुमार वेगवेगळ्या खुर्च्या घेऊन दोन वेगवेगळ्या दिशांना बसायचे. जेव्हा ते एकमेकांच्या समोर यायचे तेव्हा ते एकमेकांशी अजिबात बोलायचे नाहीत. मात्र, चित्रपटाच्या एका गाण्याच्या शुटिंगनंतर दोघे एकमेकांच्या जवळ आले.” असं असलं तरी असंही म्हटलं जातं की चित्रीकरणादरम्यान राज कुमार नानांना ‘जाहिल’ असं म्हणाले होते.

 

tiranga inmarathi

 

‘तिरंगा’ या चित्रपटात नानांचे १२-१३ सीन्स होते. या चित्रपटात राजकुमार आणि नाना दोघांनीही उत्तम भूमिका साकारल्या होत्या. कलाकाराची कला ही त्याला मिळालेली दैवी देणगी असते. पण कलाकारातला माणूस हा कुठल्याही सामान्य माणसासारखाच, प्रसंगी सामान्य माणसापेक्षाही अधिक सदोष असू शकतो याचीच प्रचिती या वरच्या किश्श्यातून येते.

बाकी गोष्टी सोडल्या तरी ज्या ‘तिरंगा’ चित्रपटासाठी आपल्यासारख्या मराठमोळ्या माणसांना नाना पाटेकरांचं इतकं कौतुक आहे त्यात जर त्यांनी कामच केलं नसतं तर त्यांचा एक खूप मोठा चाहतावर्ग त्यांनी साकारलेली एक उत्तम भूमिका बघायला मुकला असता हे नक्की.

आमचं युट्यूब चॅनल आणि त्यावरचे व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला फॉलो करा :

===

व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल

 शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम  | टेलिग्राम शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.

error: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?