' क्रिकेटमधील VJD मेथड शोधणाऱ्या अवलियाला BCCI ने साधे मानधन दिले नाही – InMarathi

क्रिकेटमधील VJD मेथड शोधणाऱ्या अवलियाला BCCI ने साधे मानधन दिले नाही

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम शेअरचॅट

व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल 

===

भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका कसोटी मालिका सध्या सुरू आहे. पहिल्याच कसोटी सामन्याच्या दुसऱ्या दिवशी पावसाने हजेरी लावली आणि संपूर्ण दिवसाचा खेळ वाया गेला. क्रिकेट चाहत्यांसाठी ही बाब काही प्रमाणात उत्साहावर विरजण पडणारी ठरली. भारतीय संघ ऐन रंगात आलेला असताना, एक संपूर्ण दिवस खेळ बघायलाच मिळू नये, याचं वाईट वाटणं स्वाभाविक होतं.

अर्थात, वरुणराज फक्त कसोटीतच असा संपूर्ण भ्रमनिरास करू शकतात. कारण, मर्यादित षटकांच्या सामन्यात, अशी परिस्थिती उद्भवली तर दोघे जण हमखास मदतीला धावून येतात. हे दोघे म्हणजे डकवर्थ आणि लुईस; म्हणजेच डकवर्थ-लुईस या नियमाची मदत घेऊन नवी समीकरणं मांडली जातात आणि त्यानुसार षटकं विचारात घेऊन हा सामना पूर्ण केला जातो.

 

duckworth lewis inmarathi

 

डकवर्थ-लुईस ही जोडी तशी आता सगळ्यांच्याच परिचयाची झाली आहे. पण जर तुम्ही भारताचे देशांतर्गत क्रिकेट सामने पाहत असाल, तर तुमच्या हे लक्षात आलं असेल, की या सामन्यांमध्ये मात्र ही पद्धत अवलंबली जात नाही.

मग नेमकी कुठली पद्धती वापरली जाते? आणि ती कुणी शोधून काढली माहित आहे का? नाही माहित, अहो मग आम्ही आहोत ना सांगायला…

 

vyankatesh iyer ranji inmarathi

आमचं युट्यूब चॅनल आणि त्यावरचे व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला फॉलो करा :

माय क्रिकेट, माय रूल्स

क्रिकेट या खेळाची ओळख ब्रिटिशांनी जगाला करून दिली. इंग्लंड ही क्रिकेटची माउली, जन्मभूमी आणि लॉर्ड्स ही क्रिकेटची पंढरी मानली जाते. असं असलं तरीही, सध्याच्या घडीला क्रिकेट विश्वात बीसीसीआयच बाप आहे, असं म्हटलं तरी ते वावगं ठरणार नाही. त्यामुळे भारताच्या देशांतर्गत क्रिकेटमध्ये बीसीसीआयचे स्वतःचे असे काही नियम पाहायला मिळतात.

त्यांच्यापैकीच एक म्हणजे व्हीजेडी मेथड! विजय हजारे ट्रॉफी असो किंवा सय्यद मुश्ताक अली स्पर्धा, भारतीय स्पर्धांमध्ये डीएलएसची पर्यायी (डकवर्थ लुईस स्टर्न) व्हीजेडी मेथड वापरण्यात येते.

 

vjd 2 inmarathi

 

व्हीजेडी पद्धत नेमकी कशी आहे?

व्हीजेडी पद्धतीचा एक महत्त्वपूर्ण फायदा असा आहे, की यात त्या संघाच्या मागील सामन्यातील कामगिरी सुद्धा विचारात घेतली जाते. म्हणजेच फलंदाजी करणाऱ्या संघाचं सातत्य किती आहे याची पडताळणी होते. केवळ सध्याच्या फॉर्मच्या आधारे सुधारित लक्ष्य त्यांच्यासमोर ठेवले जात नाही.
याशिवाय सामन्यातील सुरुवातीच्या षटकांमध्ये क्षेत्ररक्षणासाठी असणारे नियम त्यामुळे अधिक धावगतीने होणाऱ्या धावा, मधल्या षटकांमधील कमी होणारी धावगती या सगळ्याचा सुद्धा विचार करण्यात येतो. परिणामी या आकडेवारीमधून मांडण्यात आलेलं नवं लक्ष्य हे अधिक व्यावहारिक आणि न्याय देणारं असतं.

 

vjd 3 inmarathi

 

कुणी शोधली व्हीजेडी पद्धत…

पेशाने सिव्हिल इंजिनियर असणाऱ्या व्ही जयदेवन यांनी ही पद्धत तयार केली आहे. डकवर्थ लुईस नियमामध्ये असणाऱ्या त्रुटी दूर करून, सामना अधिकाधिक रंजक आणि समतोल ठरेल याचा विचार करून ही पद्धती बनवण्यात आली आहे. आज दहा वर्षांपासून अधिक काळ ही पद्धत भारतीय क्रिकेट स्पर्धांमध्ये वापरण्यात येते. पावसाने खो घातलेल्या शेकडो सामन्यांचे निकाल आजवर या पद्धतीने काढण्यात आले आहेत.

 

VJD INMARATHI

 

ही पद्धत भारतात वापरण्याचा निर्णय घेण्यात आला त्यावेळी सुनील गावस्कर यांच्या अध्यक्षेतेखाली असणाऱ्या समितीने याचा निर्णय घेतला होता. विद्यमान बीसीसीआय अध्यक्ष सौरव गांगुली यांचा सुद्धा या समितीत समावेश होता.

असं असूनही…

गेली अनेक वर्ष जयदेवन यांची ही पद्धत अनेक स्पर्धांमध्ये वापरण्यात येत आहे. आयपीएलमध्ये सुद्धा या पद्धतीचा वापर करण्यात यावा यासाठी प्रयत्न करण्यात आले होते. ही पद्धत किती महत्त्वपूर्ण आणि उपयोगी आहे, हे एव्हाना तुमच्या लक्षात आलंच असेल. मात्र असं असूनही, ही पद्धत वापरण्यात येत असल्याचा कुठलाही फायदा जयदेवन यांना झाला नाही.

 

ipl inmarathi

 

ना त्यांना कुठलीही प्रसिद्धी मिळाली, ना त्यांना कुठल्याही प्रकारे मानधन देण्यात आलं. ही फारच खेदजनक बाब आहे, यात शंकाच नाही. मात्र सौरव गांगुली यांच्याकडे बीसीसीआय अध्यक्षपदाचा पदभार असल्यामुळे, आता तरी योग्य दखल घेण्यात येईल अशा अपेक्षेत जयदेवन आहेत. ही अपेक्षा रास्त आहे असं म्हणायला काहीच हरकत नाही.

 

saurav ganguly inmarathi

आयसीसीकडूनही उपेक्षा

नऊ वर्षांपूर्वी म्हणजेच २०१२ मध्ये व्ही जयदेवन यांनी आयसीसी समोर सुद्धा ही पद्धत वापरण्याचा प्रस्ताव ठेवला होता. डीएलएस मेथडमधील त्रुटींवर मात करून ही नवी पद्धत बनवण्यात आल्याचं यावेळी त्यांनी सांगितलं होतं. मात्र डकवर्थ-लुईस पद्धतीत कुठल्याही त्रुटी नसल्याचं म्हणत आयसीसीने त्यांचा प्रस्ताव फेटाळला होता.

 

icc inmarathi

 

हा निर्णय घेणाऱ्या समितीने पक्षपातीपणा केला आणि निष्पक्ष सुनावणी झाली नाही, असा आरोप सुद्धा जयदेवन यांनी केला होता. मात्र तिथेही त्यांना न्याय मिळू शकला नाही. जिथे मायदेशातील संस्थेकडूनच या उत्तम पद्धतीच्या वापरासाठी त्यांना योग्य तो मान-सन्मान दिला नाही, तिथे आयसीसीकडून काय अपेक्षा करावी?

याविषयी तुम्हाला काय वाटतं, तुमचं काय मत आहे? हे कमेंटमधून नक्की कळवा. भारतीय क्रिकेटला व्हीजेडीसारखा चांगला पर्याय देणाऱ्या या व्यक्तीबद्दलची माहिती इतरांना कळावी यासाठी लेख शेअर करायलाही विसरू नका.

आमचं युट्यूब चॅनल आणि त्यावरचे व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला फॉलो करा :

===

व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल

 शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम  | टेलिग्राम शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.

error: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?