' सासुरवाडी त्रासदायक वाटतीय? या ७ टिप्समुळे सासरी जुळवून घेणं सोपं होईल – InMarathi

सासुरवाडी त्रासदायक वाटतीय? या ७ टिप्समुळे सासरी जुळवून घेणं सोपं होईल

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम शेअरचॅट

व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल 

===

आयुष्यात एका टप्प्यावर आलं की जोडीदाराची साथ हवीहवीशी वाटते. आपल्याला हवी तशी साथ मिळणं ही भाग्याची गोष्ट असते. पण मुलगी जेव्हा लग्न करून सासरी जाते तेव्हा तिचा संबंध केवळ तिच्या नवऱ्याशीच येणार नसतो. नव्या घराशी, सासरच्या मंडळींशी तिला जुळवून घ्यावं लागतं. या सगळ्यात तिला तिच्या नवऱ्याची साथ मिळणं फार महत्त्वाचं असतं. कारण, सासरच्या मंडळींशी व्यवस्थित ओळख होण्यापूर्वी नवऱ्याकडूनच तिला त्यांच्याविषयी जाणून घेता येणार असतं.

 

wedding 1 inmarathi

आमचं युट्यूब चॅनल आणि त्यावरचे व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला फॉलो करा :

 

ज्या घरात आता उभं आयुष्य काढायचंय तिथल्या माणसांच्या छोट्या छोट्या सवयी, त्यांचे स्वभाव इथपासून ते त्या घरातलया स्वयंपाकाच्या, खाण्यापिण्याच्या वेगवेगळ्या पद्धती, त्यांचे रीतिरिवाज हे सगळंच एकेक करून समजून घ्यायला लागणार असतं.

प्रत्येकाच्या लग्नाची आणि सासरी जाऊन सासरच्या माणसांसोबत राहण्याची गोष्ट इथूनतिथून जरी सारखी असली तरी प्रत्येक मुलीसाठी ती तिच्यापुरती वेगवेगळीच असणार असते. त्यामुळे नाही म्हटलं तरी लग्नानंतर सासरच्या मंडळींबरोबर राहायचं दडपण मुलींना असतंच. कधीतरी भांड्याला भांडं लागणार असतंच. अशा वेळी शांत राहून, प्रगल्भपणे समोरची परिस्थिती तिला हाताळावी लागणार असते. याचं कुठलंही प्रशिक्षण तिला आधीपासून मिळालेलं नसतं.

“अरे बापरे, सासर म्हणजे त्रास, कटकट.”, असं कुणी कितीही पढवायचा प्रयत्न केला तरी ते ऐकून तिने तिच्या आयुष्यात नव्याने प्रवेश करणाऱ्या माणसांबद्दल आधीच मनात पूर्वग्रह बाळगायचा नसतो. पण त्याच बरोबरीने सासरी गेल्यानंतर सासरचे जर उगीचच त्रास देत असतील तर तो त्रासही मुकाटपणे सहन करायचा नसतो.

आईआजीचे कितीही अनुभव ऐकलेले असले तरी नवंनवं लग्न झालेल्या मुलीने सासरच्यांशी जुळवून घेणं ही खरोखरच तारेवरची कसरत असते.

 

women inmarathi

 

सासरच्या मंडळींबरोबर राहणं हा कटकटीचा अनुभव होऊ द्यायचा नसेल तर प्रत्येक मुलीने तिच्या बाजूने काळजी घेणं महत्त्वाचं असतं. अर्थात मुलींसह मुलांनाही हल्ली सासुरवाडीशी जिव्हाळ्याचे संबंध  निर्माण करावे लागतात नाहीतर होममिनिस्टर रुसतात.

तुमच्या सासुरवाडीतल्या मंडळींशी तुम्हाला छान जुळवून घेता यावं यासाठी या ७ टिप्स तुम्हाला नक्की उपयोगी पडतील :

१. ठाम रहा

आपल्या म्हणण्यावर ठाम राहणं, वागण्याबोलण्यात स्पष्टपणा असणं आणि उद्धट असणं या दोन वेगळ्या गोष्टी आहेत. आपण उगीचच हेकेखोरपणा करायचा नाही आणि उद्धटासारखंही वागायचं नाही. पण आपल्यापाशी गोष्टींवर आपली आपली अशी ठाम मतं असणं आवश्यक आहे.

 

family im

 

अर्थात मतं मांडताना विनाकारण आरडाओरडा किंवा अरेरावी होणार नाही याची काळजी घ्या.

२. आदर करा पण दबून जाऊ नका 

नव्या घरात गेल्यानंतर सासरच्या मंडळींची आपल्याला आपल्या माहेरच्या मंडळींशी तुलना करायची नाहीये. प्रत्येक माणूस जसा वेगळा असतो तसं प्रत्येक कुटुंब वेगळं असतं. त्यामुळे सासरची माणसं जशी आहेत तसं त्यांना स्वीकारता आलं पाहिजे आणि त्यांचा आदरही करता आला पाहिजे. पण आदर करायचा याचा अर्थ त्यांच्यासमोर खाली मान घालून, गप्प बसून त्यांनी काहीही सांगितलं तरी सहन करू नका. तुम्हाला या दोन्हीतला सुवर्णमध्य साधता येणं फार गरजेचं आहे.

 

women im

 

घरातल्या वयस्कर मंडळींकडे विशेष लक्ष द्या. त्यांची काळजी घ्या. घरात बच्चेकंपनी असेल तर त्यांच्यात मिसळा. सगळ्यांशी ओळख करून घेण्यासाठी, संवाद साधण्यासाठी स्वतःहून पुढाकार घ्या. घरातल्या परंपरांविषयी स्वतःहून जाणून घ्या. नवऱ्याच्या भावंडांसोबत मैत्रीपूर्ण नातं निर्माण करायचा प्रयत्न करा.

३. ‘परफेक्शनिस्ट’ बनणं टाळा आणि ‘त्यागमूर्ती’ बनू नका 

सासरी गेलात आणि तिथे नाना प्रकारे जुळवून घ्यायचं याचा अर्थ आपलं स्वत्व हरवू द्यायचं असा नाही. तुम्ही जसे आधी होतात तसेच रहा. उगीचच सासरच्या मंडळींच्या नजरेत ‘पर्फेक्ट’ बनण्यासाठी खूप मेहनत घेऊ नका. सासरच्यांनाही तुम्ही खरे कसे आहात ते कळलं पाहिजे. तुमच्या इच्छा-आकांक्षा, तुमची स्वप्नं जपा. ‘त्यागमूर्ती’ बनू नका.

 

serial inmarathi

 

जर सासरच्या मंडळींपैकी कुणी तुमच्याकडून तुम्हाला फार प्रिय असलेल्या एखाद्या गोष्टीचा त्याग करण्याची अपेक्षा करत असेल तर त्या व्यक्तीसोबत बसा आणि त्या व्यक्तीशी संवाद साधून ही अशी अपेक्षा करणं फारच चुकीचं आहे याची जाणीव त्या व्यक्तीला करून द्या.

४. “मी हे बरोबर करतेय ना?” असं पालुपद लावू नका

तुमच्या सासरच्यांचा आदर करायचा याचा अर्थ असा नाही की थोडं काही झालं की तुम्ही लगेच त्यांना विचारायचं, “मी अमुक अमुक गोष्ट बरोबर करतेय ना?”. हे असं सारखं सारखं विचारणं तुमचा स्वतःचाच स्वतःवर विश्वास नसणं दाखवतं. दृढ आत्मविश्वास बाळगा आणि आपण जे करतोय ते बरोबरच करतोय याची खात्री असू द्या.

५. भांडणं उकरून काढू नका

संवाद साधून प्रश्नांवर तोडगा काढणे हे प्रगल्भ असल्याचं लक्षण आहे. तुम्ही जर सारखी सारखी भांडणं उकरून काढणारे असाल तर सासरच्या मंडळींच्या नजरेत पटकन वाईट व्हाल. तुम्हाला सासरच्या मंडळींविषयी जे काही खुपत, खटकत असेल ते त्यांच्याशी बोलून, चर्चा करून सोडवा. उगीचच त्यांच्यातली खुसपटं काढत बसू नका.

 

matichya chuli im

 

जर वाद होत आहेत असं वाटत असेल तर खरं तर तुम्ही शांत राहायची भूमिका घेतली पाहिजे आणि संयम ठेवून सगळ्यांचं म्हणणं ऐकून घेतलं पाहिजे. तुमच्या घरचं वातावरण छान रहायला त्यामुळे मदतच होईल आणि आपापसातले तुमचे संबंध सुधारतील.

विवाहित महिलांनो तुमच्यविषयीचे हे कायदेशीर अधिकार जाणून घ्या!!

या भयंकर घटनांमुळे बिहारमधील तरुण म्हणायचे,”ओ स्री कल आना”

६. तुमची प्रायव्हसी जपा पण सासरच्यांकडे दुर्लक्ष करू नका

सासरी असताना तुमच्यावर इतक्या जबाबदाऱ्या असतात, सगळ्यांचं सगळं बघायचं असतं की यात तुमची प्रायव्हसी, तुमचा एकांत हरवू शकतो. त्यामुळे सुरुवातीपासूनच काही ठराविक मर्यादा आखून घेणं महत्त्वाचं आहे. मर्यादा आखताना समोरच्याचा अनादर होता कामा नये याची काळजी घ्या आणि मर्यादा आखणे याचा अर्थ सासरच्यांकडे दुर्लक्ष करणे असाही सोयीस्करपणे घेऊ नका.

 

family 1 im

 

सासरच्या मंडळींशी संवाद साधताना एकीकडे बोलतेय आणि सगळं लक्ष फोनमध्ये किंवा दुसऱ्या कामात आहे असं व्हायला नको. तुम्हाला खरोखरच मनापासून समोरच्याशी गप्पा माराव्याशा वाटत आहेत हे सासरच्या मंडळींना कळलं पाहिजे.

७. अहंकाराला कात्री लावा आणि सोडून द्यायला शिका

आपला अहंकारच एखाद्या चांगल्या घडत चाललेल्या नात्याचा घात करतो. त्यामुळे कुठल्याही घरी, पण विशेषतः सासरी असाल तेव्हा अहंकाराला कात्री लावा आणि प्रेमाने सगळ्यांची मन जिंकून घ्या. नातं टिकवून ठेवण्यासाठी मनापासून प्रयत्न करा. स्वतःहून पुढाकार घेऊन सासरच्यांकडून नव्यानव्या गोष्टी शिकून घ्या.

घरात एखादी तुटलेली वस्तू असेल तर शक्कल लढवून ‘टाकाऊतून टिकाऊ’ची निर्मिती करा. ही गोष्ट तुमच्या सासरच्या मंडळींबरोबरच्या नात्याला एक वेगळाच टच देईल. हिला आपल्यात आवडतंय, ही आपल्यात रमलीये याची त्यांना जाणीव होईल.

समोरच्यावर राग धरून कुढत बसू नका. गोष्टी सोडून द्यायला शिका. तुम्ही गोष्टी सोडून देताय, माफ करू शकताय याचा अर्थ तुम्ही कुठेही कमकुवत आहात असा होत नसतो तर तुमच्यातला हा गुण खरंतर तुम्ही किती प्रगल्भ आहात हेच दाखवतो. तुम्हाला आणि समोरच्याला मानसिक शांती मिळावी यासाठी तुम्हाला गोष्टी सोडून देता येणं फार महत्त्वाचं आहे.

सासरच्यांशी जुळवून घेणं ही नक्कीच सोपी गोष्ट नाही. पण या काही टिप्स पाळल्या तर त्यांच्याशी जुळवून घेणं तुम्हाला नक्कीच सोपं जाईल आणि तुमचं सासरच्यांबरोबरचं नातं दिवसेंदिवस अधिकाधिक घट्ट होत जाईल.

 

family inmarathi

 

सासरच्या घरातलं वातावरण चांगलं असणं, सासरची मंडळी समजून घेणारी मिळणं या गोष्टी पूर्णतः जरी तुमच्या हातात नसल्या तरी या सगळ्यात आपण आपलं मानसिक स्थैर्य तर गमावत नाहीयोत ना याची काळजी तुम्ही घेतलीच पाहिजे. कारण, जर तुमचं मन स्थिर असेल तर तुम्हाला वेळ आणि प्रसंगानुसार कशाकशा गोष्टी करत जायचं हे आपोआप लक्षात येत जाईल.

आमचं युट्यूब चॅनल आणि त्यावरचे व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला फॉलो करा :

 

 

व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल

 शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम  | टेलिग्राम शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.

error: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?