' गढकुंडार किल्ल्याचे रहस्य; वाजत-गाजत गेलेली लग्नाची वरात पुन्हा परतलीच नाही...

गढकुंडार किल्ल्याचे रहस्य; वाजत-गाजत गेलेली लग्नाची वरात पुन्हा परतलीच नाही…

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम शेअरचॅट

व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल 

===

मानवी मनाला अनेकानेक गोष्टींचे आकर्षण, औत्सुक्य असते. एखादी गोष्ट कळत नाहीये म्हटल्यावर त्याविषयी जाणून घेण्याकडे आपला नैसर्गिक कल असतो. एखाद्या कोड्यात टाकणाऱ्या गोष्टीचं उत्तर पटकन सापडत असेल तर काय मजा? त्या कोड्याने, गूढाने आपलं मन घोळवत ठेवलं पाहीजे त्या गूढाभोवती. जितका उत्तरांची उकल व्हायला वेळ लागतो, कधीकधी ती उत्तरं मिळणं अशक्य झालंय असं वाटू लागतं तेवढंच ते गूढ, ते कोडं आधीपेक्षाही अधिक रंजक होत जातं.

आपल्याला भयपटांचा, गूढ-भीतीदायक कादंबऱ्यांचा नाद असतो. खरंतर भयपट अनुभवणे किंवा भीतीदायक कादंबरी वाचणे हा प्रत्यक्षात काही खऱ्याखुऱ्या भीतीदायक घटनांचा किंवा प्रसंगांचा अनुभव नसतो. तरीही भयपट पाहताना, भीतीदायक कादंबऱ्या वाचताना आपण त्यात पुरते गुंग होऊन जातो.

 

horror inmarathi

 

ही अशा प्रकारे आपणच आपल्यासाठी केलेली भयाची निर्मिती आणि त्यातून आपलं होणारं मनोरंजन ही गोष्ट कितीही चमत्कारिक वाटली तरी आहे बुवा हे असं! हे थोडं चमत्कारिक आहे हेही आपल्याला पुरेसा विचार केल्याशिवाय उमगत नाही आणि अधून मधून आपण हे असे भयपटांचे, भीतीदायक कादंबऱ्यांचे अनुभव घेत राहतो.

आमचं युट्यूब चॅनल आणि त्यावरचे व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला फॉलो करा :

मनाला असं मनोरंजनाचं टॉनिक पुरवत राहतो. हे झालं भयपट आणि भीतीदायक पुस्तकांपुरतं. पण आपल्या देशात मनात भय उत्पन्न करणारी अशी कितीतरी खरीखुरी रहस्यमय ठिकाणं आहेत. मंदिरं, किल्ले आहेत. पर्यटकांसाठी ही अशी ठिकाणं पाहण्याचं धाडस करणं ही पर्वणी असतेच पण जे तिथे जात नाहीत त्यांच्याही मनात या गढकिल्य्यांच्या, मंदिरांच्या गूढ, भीतीदायक रहस्यांविषयी वाचून, ऐकून मनात कुतूहल उत्पन्न होतं.

भारताला जसा अनेक प्रेक्षणीय वास्तूंचा, मंदिरं, किल्य्यांचा समृद्ध वारसा लाभला आहे जिथे लोक खास त्या त्या वास्तूंचं, मंदिरांचं, किल्ल्यांचं सौंदर्य बघण्यासाठी जातात तसाच समृद्ध वारसा या अशा भीतीदायक, गूढ मंदिरांचा आणि किल्ल्यांचा लाभला आहे ज्या रहस्यांविषयी जाणून घ्यायला पर्यटक अशा ठिकाणी मोठ्या संख्येने गर्दी करतात.

 

nagar fort inmarathi

 

भारतातला असाच एक रहस्यमयी किल्ला आहे ‘गढकुंडार’ हा किल्ला. फार पूर्वी एकदा ५०-६० लोकांची वरात या किल्ल्यावर फिरायला गेली होती आणि त्या वरातीतली सगळीच्या सगळी माणसंच तिथून गायब झाली होती. त्या ५०-६० लोकांचं त्यानंतर काय झालं हे आजपर्यंत कळू शकलेलं नाही.

असं मानलं जातं की, हा ‘गढकुंडार’ किल्ला साधारण १५०० ते २००० वर्षे इतका प्राचीन आहे. हा किल्ला उत्तर प्रदेशच्या झाशीपासून साधारण ७० किलोमीटर दूर आहे. नेमका कधी आणि कुणी हा किल्ला बनवला याविषयीचे काही ठोस पुरावे नाहीत. मात्र चंदेल राजा यशोवर्मन याने ९व्या शतकात हा किल्ला बनवल्याचं समजलं जातं. त्यानंतर चंदेलांच्या काही पिढ्यांनी तिथे राज्य केलं.

या किल्ल्यावर चंदेल, बुंदेल, खंगार यांसारख्या शासकांनी राज्य केलं. हा ‘गढकुंडार’ किल्ला पूर्वी ‘जिनागढ महाल’ या नावाने ओळखला जायचा. पृथ्वीराज चौहान यांचे प्रमुख आणि जवळचे स्नेही असलेल्या गुजरातच्या खेत सिंह यांनी हा किल्ला जिंकून खंगार वंशाची इथे स्थापना केली. तोवर हा किल्ला ‘जिनागढ महाल’ या नावाने ओळखला जायचा.

 

gadh inmarathi

 

खेत सिंह याने खंगारांचं शासन इथे बळकट केलं. खंगारांच्या ५ पिढ्यांनी या किल्ल्यावर राज्य केलं. खेत सिंह यांचा नातू महाराज खुब सिंह खंगार याने ‘जिनागढ महाल’ हे नाव बदलून ‘गढकुंडार किल्ला’ असं या किल्ल्याचं नाव ठेवलं. कालांतराने मोहम्मद तुघलकाने हा किल्ला जिंकल्यावर बुंदेलांनी इथे राज्य केलं.

आज आपल्याला किल्ल्याचं जे स्वरूप दिसतं ते बुंदेल राजा वीर सिंह देव ने त्यावेळच्या आवश्यक्तेनुसार किल्ल्याचं जे नूतनीकरण केलं तसं आहे. या किल्ल्याची रचना भारतातल्या इतर किल्ल्यांपेक्षा अगदी वेगळीच आहे. या किल्ल्याचे एकूण ५ मजले आहेत.

त्यातले ३ मजले आपल्याला वर दिसतात तर २ मजले जमिनीच्या खाली आहेत.. तिथल्या स्थानिक, सहज उपलब्ध असलेल्या रेती, दगडांपासून एका भल्यामोठ्या मोकळ्या अंगणाजवळ हा किल्ला बनवला गेलेला आहे.

बाहेरून आत पाहणाऱ्या माणसाला आत काय आहे ते दिसू शकत नाही अशा प्रकारची गूढ रचना या किल्ल्याची आहे. त्या किल्ल्यात आत गेल्यावर आपल्याला तिथल्या खडकांवर आणि स्तंभांवर शिलालेख आढळून येतात. आत प्रवेश केल्यावर डावीकडे आपल्याला एक छोटी सैनिकी बराक दिसते.

किल्ल्यावर आक्रमण करायचा प्रयत्न करणाऱ्यांना किल्ल्यापर्यंत पोहोचताच येऊ नये आणि त्यांनी कुठेतरी भरकटून जावं अशा प्रकारची या किल्ल्याची रचना आहे. त्यामुळे सुरक्षेच्या दृष्टीने हा एक महत्त्वाचा किल्ला आहे.

 

gadh inmarathi 2

 

या किल्ल्याविषयी ज्या अनेक रहस्यमयी गोष्टी आहेत त्यातली एक गोष्ट अशी की ४-५ किलोमीटर अंतरावरून पाहिलं तर आपल्याला हा किल्ला दिसतो. पण जसजसं आपण किल्ल्याच्या अधिकाधिक जवळ जाऊ लागतो तसा हा किल्ला अचानक दिसेनासा होतो. त्या रस्त्यावर आपण गेलो की किल्ल्याकडे जायला दुसराच एक रस्ता आहे असं लक्षात येतं. आपण जो रस्ता किल्ल्याकडे जाणारा म्हणून आधी समजत असतो तो रस्ता आपल्याला भलत्याच कुठल्यातरी ठिकाणी घेऊन जातो.

ज्या पर्यटकांना हा सगळा सावळागोंधळ ठाऊक नसतो त्यांची अशा वेळी तारंबळ उडते. ते गोंधळून जातात आणि तिथेच त्यांना हरवल्यासारखं होतं. अनेक वर्षांपूर्वी या किल्ल्यावर ५०-६० जणांची वरात फिरायला आली होती. फिरता फिरता ती सगळीजणं तळघरात गेली. कुणीही पोहोचू शकत नाही अशा ठिकाणी ही सगळी मंडळी पोहोचली. तिथून ती माणसं परत वर येऊच शकली नाहीत.

आजपर्यंत त्या सगळ्यांचं त्यानंतर काय झालं हे न कळलेलं गूढ आहे. त्यांच्या अस्तित्त्वाची पुसटशीदेखील खूण सापडलेली नाही. त्यानंतरही किल्ल्यात अशा काही घटना घडल्याचं समजलं जातं. त्यानंतर मात्र या किल्ल्यात खाली जाणारे सगळे दरवाजे बंद करण्यात आले. हा किल्ला मुळातच गूढ आहे त्यात या किल्ल्यात दिवसाउजेडीही अंधारच असतो त्यामुळे तर हा किल्ला अधिकच भीतीदायक वाटतो.

 

gadh inmarathi 3

या किल्ल्याविषयीचं आणखी एक रहस्य असं की इथे खूप मोठ्या प्रमाणावर खजिना दडलेला असल्याचं समजलं जातं. हा खजिना सापडू शकला तर भारत जगातल्या सर्वाधिक श्रीमंत राष्ट्रांपैकी एक राष्ट्र ठरू शकतं. इतिहासकारांच्या म्हणण्यानुसार, इथे ज्यांनी ज्यांनी राज्य केलं त्यांना सोने- हिरे, दागदागिने या कशाचीही कमतरता नव्हती.

मुघल आणि ब्रिटिशांनीही अनेक वेळा इथली संपत्ती लुटल्याची आख्यायिका आहे. अलीकडच्या काही वर्षांत तिथल्या स्थानिक चोर-दरोडेखोरांनी आणि बाकीही लोकांनी हा खजिना शोधायचा प्रयत्न केला. पण त्या सगळ्यांना आपले प्राण गमवावे लागले.

 

gold coins inmarathi

 

‘गढकुंडार’ सारखे असे अनेक वेगवेगळे किल्ले, अनेक वेगवेगळ्या वास्तू, मंदिरं वेळोवेळो आपल्या रहस्यांनी केवळ आपल्यासारख्या सामान्य माणसांच्याच कुतुहलाला नाही तर वेगवेगळे इतिहासकार, अभ्यासकांच्या केवळ कुतुहलावरच न थांबलेल्या शोधाला खतपाणी घालत आलेली आहेत. अशा अनेकविध रहस्यांनी भरलेल्या आपल्या देशाचा असाही बराच इतिहास असणार ज्याच्या कथा अद्याप आपल्यापर्यंत पोहोचलेल्या नसतील. थोड्या थोड्या काळानंतर आपल्यापर्यंत अशाच पोहोचत राहतील.

आमचं युट्यूब चॅनल आणि त्यावरचे व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला फॉलो करा :

 

===

व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल

 शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम  | टेलिग्राम शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?