' १७ वर्षं उलटली, शाहरुखने अजूनही ‘स्वदेस’चा शेवट ‘या’ कारणासाठी पाहिला नाहीये – InMarathi

१७ वर्षं उलटली, शाहरुखने अजूनही ‘स्वदेस’चा शेवट ‘या’ कारणासाठी पाहिला नाहीये

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम शेअरचॅट

व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल 

===

कधी कधी एखाद्या ठिकाणाशी, गोष्टीशी, एखाद्या घटनेशी आपला इतका घट्ट भावनिक बंध आपसूक जोडला गेलेला असतो, की त्यांच्या स्मृती मनात दीर्घकाळ रुंजी घालत राहतात. कधी कधी हा अनुभव इतका गहिवरून टाकणारा असतो, की त्या आठवणींना उजाळा द्यायला गेलं की आपला बांधही फुटू शकतो.

असं व्हायला नको म्हणून आपण आत कुठेतरी त्या आठवणी दडवून ठेवतो. दुसऱ्या कशावरतरी आपलं लक्ष केंद्रित करतो आणि ती अवघड वेळ निभावून नेतो. सामान्य माणसाच्या बाबतीत हे होणं नवलाचं नाही, पण चक्क बॉलिवूडचा ‘बादशाह’ शाहरुख खानही त्याच्या एका चित्रपटाच्या अनुभवाबद्दल अतिशय भावनिक होतो. आजही होतो. अगदी तो चित्रपट येऊन १७ वर्षे उलटून गेली असली तरीही.

 

srk inmarathi 1

 

‘शाहरुख खान’ या नावातच काहीतरी विलक्षण आहे. शाहरुख, आमिर, सलमान या तिन्ही खान सुपरस्टार्सचा प्रचंड मोठा चाहतावर्ग आहे, पण गोष्ट जेव्हा ‘शाहरुख खान’ ची असते तेव्हा त्याच्या चाहत्यांना त्याने केवळ त्याच्या सुंदर गाण्यांमधून, अभिनयामधूनच भुरळ पाडलेली नसते तर त्याचा स्ट्रगल, त्याची ‘सेल्फ मेड’ इमेज, त्याची उत्तम भाषणं, त्याची विनोदबुद्धी, त्याची हुशारी, त्याच्या आत असलेलं उदंड प्रेम, त्याचा स्वतःवरचा प्रचंड आत्मविश्वास, त्याची डिसेन्सी अशा एक ना अनेक गोष्टी आपल्याला त्याच्या प्रेमात पाडतात.

आमचं युट्यूब चॅनल आणि त्यावरचे व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला फॉलो करा :

स्वप्न बघायला, ती सत्यात उतरवायला शिकवणारा शाहरुख बाहेरून अगदी कणखर दिसला आणि प्रत्यक्षातही असला तरी जितका तो कणखर आहे तितकाच सहृदयीही आहे. किंबहुना, इतका सहृदयी असल्यामुळेच इतका कणखर आहे.

शाहरुखने त्याचा ‘स्वदेस’ हा तेव्हा बॉक्स ऑफिस वर भरघोस कमाई न करू शकलेला मात्र समीक्षकांनी उचलून धरलेला चित्रपट गेल्या १७ वर्षांत अनेक वेळा पाहिला आहे. मात्र या चित्रपटाचा शेवट त्याने आजवर एकदाही पाहिलेला नाही. या चित्रपटाशी तो भावनिकदृष्ट्या फार जोडला गेला आहे.

 

swades inmarathi

 

एका मुलाखतीत शाहरुखने सांगितलं होतं, की या चित्रपटाच्या एडिटिंगपासून ते पडद्यावर येण्यापर्यंत आणि स्क्रीनिंगपर्यंत त्याने हा चित्रपट पाहिला होता, परंतु आजपर्यंत त्याने या चित्रपटाचा शेवटचा सीन कधीच पाहिला नाही.

खरंतर, शाहरुख आधी ‘स्वदेस’ मध्ये काम करणार नव्हता, पण दिग्दर्शक ‘आशुतोष गोवारीकर’ने त्याला या चित्रपटात काम करण्यासाठी राजी केलं. ‘मोहन भार्गव’ या मूळच्या भारतीय असलेल्या, पण ‘नासा’त शास्त्रज्ञ असलेल्या व्यक्तीची भूमिका यात शाहरूखने साकारली होती.

२००४ साली आलेला ‘स्वदेस’ हा पहिला भारतीय चित्रपट होता ज्याचं शूटिंग खऱ्याखुऱ्या ‘नासा रिसर्च सेंटर’मध्ये झालं होतं. ९०च्या दशकात आलेल्या ‘लव्ह स्टोरीज शो’ मधील ‘वापसी’ या कथेवरून प्रेरणा घेऊन आशुतोष गोवारीकरने या चित्रपटाची निर्मिती केली होती.

‘नासा’सारख्या ठिकाणी काम करत असतानाही मोहन भार्गव मायदेशात परततो. त्याच्या गावी परतल्यानंतर आपल्या मातीशी, आपल्या संस्कृतीशी, तिथल्या माणसांशी, त्यांच्या समस्यांशी त्याचा फार जवळून संबंध येतो. एका मातीच्या गडूपासून ते त्याच्या कावेरीअम्मापर्यंत सगळ्याशीच तो मनाने एकरूप होतो.

 

swades inmarathi

 

आपल्या मायदेशाशी, गावाशी अशा प्रकारे जुळलेली नाळ त्याला अंतर्बाह्य हेलावून टाकते. त्याला एक नवाच माणूस करून टाकते. त्यामुळे या सगळ्या अनुभवांनंतर पुन्हा एकदा अमेरिकेत गेलेला मोहन भार्गव हा एनआरआय आपण आपल्या मायदेशी, आपल्या गावी, आपल्या माणसांमध्येच खऱ्या अर्थाने खुश आहोत हे उमगून चित्रपटाच्या शेवटी त्याचा प्रकल्प पूर्ण करून, गावात वीज आणून मायदेशात कायमचा परततो.

शाहरुख असं म्हणाला होता की, “हा चित्रपट बनवणं हा एक अतिशय भावनिक करणारा अनुभव होता. त्यामुळे मी या चित्रपटाचा शेवट कधीच बघू शकलो नाही. माझ्या मनातली ही भावना मला कधीच संपू द्यायची नव्हती.”

यापूर्वी शाहरुखने या चित्रपटासाठी दिग्दर्शक आशुतोष गोवारीकर, या चित्रपटातली त्याची सहकलाकार गायत्री जोशी, ए. आर. रेहमान आणि जावेद अख्तर यांचे आभार मानले होते. आपलं आयुष्यच बदलून टाकल्याबद्दल त्याने आशुतोष गोवारीकरचे आभार मानले होते, तर ‘स्वदेस’ खऱ्या अर्थाने ‘स्वदेस’ म्हणून जगायला मदत केल्याबद्दल बाकीच्यांचे आभार मानले होते.

 

srk inmarathi 2

 

सगळ्यांविषयी आदरभाव व्यक्त केला होता. ‘स्वदेस’ हा आशुतोष गोवारीकरचा ‘ड्रीम प्रोजेक्ट’ होता. हा चित्रपट अरविंद पिल्लमरी आणि रवी कुचीमांची या दोघांच्या खऱ्याखुऱ्या आयुष्यावर बेतलेला आले. हे दोघेजण ‘पॅडल पॉवर जनरेटर’ तयार करण्यासाठी स्वदेशी परतले होते.

शाहरुख खानच्या आजवरच्या कारकिर्दीतला ‘स्वदेस’ हा एक महत्त्वाचा चित्रपट समजला जातो. यातल्या शाहरुखच्या भूमिकेने त्याच्या नेहमीच्या टिपिकल रोमँटिक हिरोच्या इमेजला बगल देत केवळ एक हुशार एनआरआय शास्त्रज्ञ म्हणूनच नाही, तर आपल्यातलाच एक सामान्य भारतीय म्हणूनही आपल्यावर छाप पाडली होती.

===

आमचं युट्यूब चॅनल आणि त्यावरचे व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला फॉलो करा :

व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल

 शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम  | टेलिग्राम शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.

error: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?