' गदर हा फक्त चित्रपट नाही, त्यामागे आहे मनाला चटका लावणारी एक दुर्दैवी प्रेमकथा – InMarathi

गदर हा फक्त चित्रपट नाही, त्यामागे आहे मनाला चटका लावणारी एक दुर्दैवी प्रेमकथा

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम शेअरचॅट

व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल 

===

दोन व्यक्ती एकमेकांच्या प्रेमात आकंठ बुडालेल्या आहेत याइतकी सुंदर गोष्ट कदाचित दुसरी कुठली नसेल. खरंतर एकमेकांच्या सहवासात खुश असणाऱ्या दोन व्यक्तींच्या एकत्र असण्याला जात, भाषा, धर्म, वय या कशाचंही बंधन असता कामा नये. असं वाटणं कितीही आदर्शवत असलं तरी प्रत्यक्षात असं घडतंच असं नाही.

आजही जर जात, धर्म, भाषा, वयाचे सगळे भेद दूर सारून एकमेकांवर प्रेम करणाऱ्या दोन व्यक्तींनी एकत्र नांदणं आणि त्यांना तसं नांदू देणं अगदी स्वप्नवत नाही, तरी दुर्मिळ गोष्ट वाटत असेल तर ज्या वेळी भारत-पाकिस्तानचं विभाजन झालं त्यावेळी दुर्दैवाने एकमेकांपासून विलग झालेल्या प्रेमिकांचं काय झालं असेल याचा विचारही करवत नाही.

आमचं युट्यूब चॅनल आणि त्यावरचे व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला फॉलो करा :

सनी देओल, अमिषा पटेल, अमरीश पुरी यांचा ‘गदर : एक प्रेम कहानी’ सारखा अत्यंत गाजलेला चित्रपट नक्कीच ठाऊक आहे. या चित्रपटात ‘तारा सिंग’ या ट्र्क डायव्हरच्या भूमिकेत असलेल्या सनी देओलच्या पात्राचं ‘सकीना’ या मुस्लिम तरुणीवर प्रेम जडतं, पण विभाजनादरम्यान झालेल्या हिंदू-मुस्लिम दंगलींमुळे त्याच्या प्रेमात अडथळा निर्माण होतो.

 

partition inmarathi

 

आपल्याला ही कथा केवळ एका चित्रपटाची कथा म्हणून माहीत असली तरी ही कथा ‘बूटा सिंग’ या खऱ्याखुऱ्या व्यक्तीच्या दुर्दैवी प्रेमकहाणीवर आधारित आहे.

विभाजनादरम्यान ‘जैनब’ या एका १७ वर्षांच्या मुस्लिम तरुणीची भडकलेल्या शिखांकडून कदाचित कत्तल होऊ शकली असती किंवा तिच्यावर बलात्कारही होऊ शकला असता. स्वतःला वाचवण्यासाठी अमृतसरच्या शेतांमध्ये पळणाऱ्या ‘जैनब’ला  ‘बूटा सिंग’ या ५५ वर्षांच्या निवृत्त सैनिकाने वाचवलं.

दंगली करणाऱ्यांना १,५०० रुपये देऊन बूटा सिंगने जैनबला त्यांच्याकडून विकत घेतलं. ५५ वर्षांचा बूटा सिंग १७ वर्षांच्या जैनबच्या प्रेमात पडला. ती आपल्यापाशी सुरक्षित रहावी म्हणून त्याने तिच्याशी लग्न केलं. एकमेकांबरोबर ते दोघेजण अतिशय खुश होते. काही काळाने त्यांना दोन मुलीही झाल्या.

जैनबला वाचवून बूटा सिंगने त्यांच्या आयुष्याला एक सुखद वळण दिलं होतं, पण त्यांच्या नशीबाला त्यांचं एकत्र असणं बघवलं नाही. फाळणीनंतर १९४७ साली दोन्ही देशांच्या संगनमताने असं ठरवलं गेलं ज्या महिलांना पळवून आणलं गेलंय, त्या विवाहित असतील अगर नसतील, त्यांना आपल्या देशात परत पाठवण्यात येईल.

बूटा सिंगच्या भाचरांचा त्याच्या संपत्तीवर डोळा होता. आपल्याला आता बूटा सिंगची संपत्ती मिळणार नाही की काय या भीतीने त्यांनी बूटा सिंगने जैनबला जबरदस्तीने स्वतःपाशी ठेवलंय अशी बातमी अधिकाऱ्यांना दिली.  अधिकाऱ्यांनी काही काळ जैनबला एका कॅम्पात ठेवलं. जोपर्यंत ती त्या कॅम्पात होती तोपर्यंत बूटा सिंगची आणि तिची भेट होऊ शकायची.

 

partition inmarathi

 

आपल्यावर ओढवलेली परिस्थिती पाहून त्या दोघांना रडू कोसळायचं. मी तुला कधीच विसरणार नाही आणि आपल्या मुलीला घेऊन लवकरात लवकर तुझ्याकडे परत येईन असं जैनब बूटा सिंगला सांगायची, पण सहा महिन्यांनी जैनबला पाकिस्तानात तिच्या कुटुंबीयांकडे पाठवून दिलं गेलं. त्यांची एक मुलगी बूटा सिंगकडे राहिली आणि एक मुलगी जैनब बरोबर गेली.

इकडे बूटा सिंग कमालीचा हवालदिल झाला होता. बूटा सिंगने आपल्या डोक्यावरचे सगळे केस भादरून धर्मांतर केलं. मूळच्या शीख असलेल्या बूटा सिंगने ‘जमील अहमद’ अशी मुस्लिम ओळख स्वीकारली. पाकिस्तानच्या हाय कमिशनरकडे त्याने आपल्या बायकोला आपल्याकडे परत धाडण्याची मागणी केली पण त्याचा काही उपयोग झाला नाही.

आपल्याला एक मुस्लिम म्हणून पाकिस्तानात स्थलांतरित होता यावं असा बूटा सिंगने अर्ज केला. तो अर्जही धुडकावून लावला गेला. त्याने व्हिसासाठी अर्ज केला. त्याचाही काही उपयोग झाला नाही. शेवटी त्याच्या मुलीला घेऊन तो अवैध मार्गाने पाकिस्तानात गेला. त्याने मुलीला लाहोरमध्ये ठेवलं आणि तो जैनबच्या गावी गेला.

तिथे गेल्यावर त्याने जे पाहिलं ते पाहून त्याच्या पायाखालची जमीनच सरकली. जैनबचं लग्न जबरदस्तीने तिच्या चुलत भावाशी लावून दिलं गेलं होतं. रडकुंडीला येऊन त्याने “माझी बायको मला परत द्या” अशी विनंती केली तेव्हा जैनबच्या भावांनी आणि चुलत भावंडांनी त्याला बेदम मारहाण केली आणि हा बेकायदेशीर मार्गाने आमच्या देशात आला आहे अशी पोलिसात तक्रार केली.

हे सगळं प्रकरण कोर्टात गेलं. ट्रायलच्या वेळी बूटा सिंगने “मला माझ्या बायकोला एकदा विचारू द्या, की ती माझ्याबरोबर मुलीला घेऊन भारतात परतेल का?” अशी जजना कळवळून विनवणी केली. त्याच्या विनवणीने भावनाविवश होऊन जजने त्याची विनवणी मान्य केली. आठवड्याभराने कुटुंबियांच्या दबावाने घाबऱ्याघुबऱ्या झालेलया जैनबला कोर्टात आणलं गेलं.

“तू या व्यक्तीला ओळखतेस का?” आणि “तुला त्यांच्याबरोबर भारतात परत जायचंय का?” असे दोन प्रश्न जजने तिला विचारले. “हो. मी यांना ओळखते. ते माझे पहिले पती आहेत.”, हे जैनबने जजसमोर मान्य केलं पण घरच्यांचा तिच्यावर इतका दबाव होता, की काही क्षणांच्या भयाण शांततेनंतर तिने बूटा सिंगबरोबर परत भारतात जायला नकार दिला. ‘मी इथेच पाकिस्तानात राहीन’ असं ती म्हणाली.

बूटा सिंगने तिच्या परत येण्याच्या होकाराची जी कणभर अपेक्षा ठेवली होती ती तिच्या उत्तराने मावळली. तिचं ते उत्तर ऐकून तो हादरला. पण ती असं मनापासून म्हणत नसून कुटुंबियांच्या दबावापोटी भीतीने म्हणतेय हे त्याला माहीत होत. बूटाला पाहून तिच्या डोळ्यांतून ओघळणारे अश्रू याचीच साक्ष देत होते.

हादरलेला बूटा भानावर आल्यानंतर त्याने “मी तुला तुझ्या मुलीपासून दूर करणार नाही. मी तिला इथेच तुझ्याजवळ सोडून जातो.” असं जैनबला सांगितलं . जजने तेव्हा जैनबला “तुला मुलीची कस्टडी हवीय का?” असं विचारलं तेव्हा कोर्टात पुन्हा एकदा भयाण शांतता पसरली. जैनबच्या नातेवाईकांच्या मनात धार्मिक द्वेष इतका तीव्र होता की त्यांनी संतापाने मान हलवली.

आपल्यात आपल्याला शिखांचं रक्त नको असा अत्यंत निर्दयी विचार त्यांच्या मनात होता. पोटच्या मुलीसाठी अतिशय व्याकूळ होऊनही काळजावर दगड ठेवत जैनब जजना “नाही” असं म्हणाली.

बूटा सिंगने शांतपणे आपल्या मुलीला उचलून घेतलं. आपल्या मुलीला घेऊन एका पीर बाबाच्या कबरीपाशी तो रात्रभर रडत राहिला. तिथल्याच एका खांबापाशी त्याची मुलगी झोपून गेली. पहाट झाली तसा तो मुलीला घेऊन बाजारात गेला. त्याने मुलीसाठी नवे सँडल्स विकत घेतले. तिचा हात हातात धरून तो प्लॅटफॉर्मवर गेला.

 

gadar inmarathi

 

“तू तुझ्या आईला आता पुन्हा कधीही पाहू शकणार नाहीस.” असं रडत रडत त्याने आपल्या मुलीला सांगितलं. आपल्या जगण्याला आता काही अर्थ राहिलेला नाही असं वाटून दुर्दैवाने त्याने समोरून येणाऱ्या ट्रेनखाली जीव दिला. बूटा सिंग तर गेला. पण त्याची मुलगी मात्र वाचली.

पोलिसांना बूटा सिंगची शेवटची चिठ्ठी मिळाली ज्यात त्याने आपल्या अस्थी जैनबच्या गावी पुरल्या जाव्यात अशी शेवटची इच्छा व्यक्त केली होती, पण जैनबच्या कुटुंबीयांनी आणि तिथल्या काही स्थानिक रहिवाशांनी बूटा सिंगची ही साधी इच्छाही अमान्य केली.

‘मियानी साहिब’ या लाहोरच्या सगळ्यात मोठ्या कब्रिस्तानात त्याच्या अस्थी पुरण्यात आल्या. जैनबच्या घरच्यांनी तिथेही येऊन त्याचं थडगं खोदायचा प्रयत्न केला. हा सगळा प्रकार पाहून शहरातलया लोकांच्या संतापाचा उद्रेक झाला आणि त्यांनी बूटा सिंगचं थडगं तिथेच दुसऱ्या ठिकाणी कायम ठेवलं.

मनाला चटका लावणाऱ्या बूटा सिंग आणि जैनबच्या या दुर्दैवी प्रेमकहाणीवर ‘गदर’ व्यतिरिक्त दोन्ही देशातले काही सिनेमे बेतलेले आहेत आणि दोन्ही देशांतल्या पुस्तकांमध्ये या प्रेमकहाणीचा उल्लेख आहे. उर्वशी बुटालिया यांच्या ‘द अदर साईड ऑफ सायलेन्स : व्हॉइसेस फ्रॉम द पार्टीशन ऑफ इंडिया’ या पुस्तकात, हिंदी लेखक आलोक भाटिया यांच्या ‘पार्टीशन डायलॉग्ज’ या संग्रहात या प्रेमकहाणीचा उल्लेख आहे.

 

jainab inmarathi

 

इशरत रहमानी यांनी या कहाणीवर एक कादंबरी लिहिली आहे. १९९९ साली आलेला गुरुदास मान आणि दिव्या दत्ता यांचा ‘शहीद-ए-मोहब्बत’ हा पंजाबी चित्रपट याच कहाणीवर बेतलेला आहे. याखेरीज अत्यंत गाजलेला ‘वीरझारा’ हा चित्रपटदेखील याच कहाणीने प्रेरित होऊन काढला होता.

धार्मिक द्वेष इतका पराकोटीला जाऊ शकतो, की त्याने माणसाचं माणूसपणही संपवून टाकावं इतकी विखारी जाणीव ही दुर्दैवी प्रेमकथा आपल्याला करून देते. विभाजन व्हायचं ते झालंच पण माणसांनीच यात माणसांचं किती काय काय हिरावून घेतलं!

बूटा सिंग आणि जैनब यांच्या दुर्दैवी प्रेमकथेचं उदाहरण आपल्या समोर आलं. आणखी अशी किती आणि कशाकशाची उदाहरणं इतिहासाकडे असतील?

आमचं युट्यूब चॅनल आणि त्यावरचे व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला फॉलो करा :

===

व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल

 शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम  | टेलिग्राम शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved. 

error: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?