' एका शिक्षिकेने घडवून आणला बदल, ९०० शेतकऱ्यांचं उत्पन्न झालंय तिप्पट!

एका शिक्षिकेने घडवून आणला बदल, ९०० शेतकऱ्यांचं उत्पन्न झालंय तिप्पट!

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम शेअरचॅट

व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल 

===

ईशान्य भारतातील मेघालय या राज्यातील त्रिनीती सायो यांनी अनेकांचे लक्ष आपल्याकडे वेधले आहे. ५२ वर्षीय त्रिनीती सायो या शिक्षिका असून १४ वर्षांपूर्वी त्यांनी आपल्या कुटुंबाला आर्थिक हातभार लावण्यासाठी हळदीची शेती करण्याचा निर्णय घेतला.

आज इतक्या वर्षांनंतर त्या या क्षेत्रात यशस्वी तर झाल्या आहेतच पण त्यांच्या शेती करण्याच्या निर्णयामुळे त्यांच्या आजूबाजूच्या शेतकऱ्यांचे जीवनमान देखील बदलले आहे.

त्यांनी असं काय केलं, की ज्यांमुळे अनेकांना त्याचा लाभ मिळाला हे वाचलत तर तुम्हालाही प्रेरणा मिळेल. तर हळदीच्या लागवडीतून नेहमीपेक्षा तिप्पट उत्पन्न मिळवले आणि हा फायदा इतर ९०० पेक्षा अधिक शेतकऱ्यांना देखील झाला.

त्यांची ही प्रेरणादायी यशोगाथा आपल्या स्वप्नांना देखील बळ देणारी ठरेल हे निश्चित!

 

halad inmarathi

 

मेघालय राज्यातील जैनतिया हिल्स हा प्रदेश तसा ओळखला जातो तो कोळश्याच्या खाणींसाठी. तिथल्या अनेक लोकांची उपजीविका या खाणींवरच अवलंबून होती.

मात्र त्या भागात मुलेह या लहान गावात राहणाऱ्या त्रिनीती सायो यांनी वेगळी वाट धरली आणि हळदीच्या शेतीकडे वळण्याचा निर्णय घेतला.

खरं म्हणजे या भागातील लोकांचा हळदीची शेती हाच व्यवसाय होता. मात्र कोळश्याच्या खाणी आल्या आणि अनेक लोक त्या क्षेत्रात रोजगार मिळवू लागले.

तेव्हा त्रिनीती सायो यांच्या पूर्वजांचा व्यवसाय हा शेतीच असल्याने आणि त्या भागात हळदीची शेती केली जात असल्याने त्यांनी हा निर्णय घेतला.

त्यांनी सुरुवात पारंपारिक पद्धतीनेच केली. मात्र त्यांच्या लक्षात आले की, यांत फारसा फायदा नाही. ते ज्या हळदीचे पीक घेत आहे त्याचे उत्पादन कमी होते आहे हे त्यांना समजलं.

या भागात कमीतकमी तीन प्रकारचे हळदीचे पीक घेतले जाते. लॅचिन, लाकाडोंग आणि लाडॉ हे तीन हळदीचे प्रकार आहेत.  प्रत्येकाची स्वतःची अशी काही गुणवैशिष्ट्ये आहेत.

तेव्हा त्यांनी याचा अधिक अभ्यास केला आणि त्यांच्या प्रयत्नाने त्यांनी लाकाडोंग या प्रकारच्या हळदीचे उत्पादन घेण्यास सुरुवात केली. त्यांचा हा निर्णय चांगलाच यशस्वी ठरला. पुढे त्यांना “लाकाडोंग” बद्दल अधिक माहिती मिळायला लागली.

 

Oli_halad inmarathi

 

पूर्वी लावत असलेल्या हळदीपेक्षा आताचे पीक अधिक पिवळे आहे. याचाच अर्थ ते पूर्वीच्या पिकापेक्षा अधिक चांगल्या प्रतीचे आहे. याव्यतिरिक्त पूर्वीपेक्षा त्यांना अधिक उत्पन्न मिळणे शक्य झाले. आता त्या पूर्वीपेक्षा तिप्पट उत्पन्न मिळवून एक यशस्वी शेतकरी झाल्या होत्या.

जसे त्यांचे उत्पन्न वाढले त्याबद्दल आजूबाजूच्या लोकांना उत्सुकता लागली. लोकांनाही त्याबद्दल अधिक माहिती हवी होती. परिणामी आजूबाजूच्या गावातून त्रिनीती सायो यांना आमंत्रणं येऊ लागली. त्यांनी देखील यांत सक्रियतेने भाग घेतला.

त्यांचे यश आता केवळ त्यांच्यापुरते मर्यादित राहिले नव्हते. अनेक शेतकऱ्यांनी त्रिनीती सायो यांच्या पावलावर पाऊल ठेवत “लाकाडोंग” या प्रजातीच्या हळदीची लागवड करण्यास सुरुवात केली.

अर्थात शेतकऱ्यांना मार्गदर्शन करण्यास त्या काही एकट्या नव्हत्या. हळदीची लागवड करून सुरुवात करण्यापूर्वी, त्रिनीती सायो यांना मेघालयाच्या शेती व उद्यान विभाग (एएचडी) मध्ये प्रशिक्षण मिळाले.

शेतकऱ्यांना त्यांच्या गावातून प्रशिक्षण देण्यासाठी तसेच त्यांना बियाणे मिळविण्यात अनुदान देऊन मदत केली.

संकट आणि संधी

त्रिनीती सायो यांच्या मार्गदर्शनाखाली ही चळवळ सुरु तर झाली. मात्र २०१४ मध्ये कोळश्याच्या खाणी हरित लवादाने बंद करण्याचा निर्णय घेतला.

परिणामी तेथील लोकांसमोर रोजगाराचा प्रश्न उभा राहिला. मात्र या संकटाला त्रिनीती सायो यांच्यामुळे उत्तर मिळाले.

 

triniti sayo

 

अनेक जण पुन्हा हळदीच्या शेतीकडे वळले. गेल्या काही वर्षापासून हळदीचे उत्पादनातं घट झाली होती. मात्र आता लोक पुन्हा शेतीकडे वळले आहेत.

आता मेघालयाचे “मिशन लाकाडोंग” २०१८-२०२३ या पुढील पाच वर्षांत प्रति वर्ष ५० दशलक्ष टन (मेट्रिक टन) हळद उत्पादन करण्याचे उद्दिष्ट ठेवले आहे.

२०१५-१६ च्या विभागीय आकडेवारीनुसार, राज्यात हळद लागवडीखालील एकूण क्षेत्र २५१६ हेक्टर आहे, जे दरवर्षी सुमारे १६ दशलक्ष टन हळद उत्पादन करतात. आता या भागात बहुतेक हळदी लाकडाँग प्रकाराची आहे.

या यशाच्या सूत्रधार अर्थात त्रिनीती सायो आहेत. त्या आज अनेकांना याकामी प्रशिक्षत करत आहेत. त्या सांगतात

“शिक्षक म्हणून मी त्यांना हळदीचे पीक घेण्यासाठी आणि कीटकनाशकांचे व्यवस्थापन करण्यासाठी मार्गदर्शन करते. मेघालयमधील महिला शेती कामांच्या केंद्रस्थानी आहेत आणि त्यांचे पती किंवा पुरुष सदस्य त्यांना मदत करतात. त्यामुळे त्यांच्या कौशल्यांना प्रोत्साहन देणे म्हणजे त्यांच्या कुटुंबाच्या उत्पन्नामध्ये वाढ होणे असा त्याचा सरळ अर्थ आहे”.

त्रिनीती सायो यांनी स्वयंरोजगार गटांचे या भागात चांगले जाळे निर्माण केले आहे.

त्याचा फायदा त्यांना उत्पादन घेणे, त्यावर प्रक्रिया करणे आणि बाजारपेठेत विकणे या ठिकाणी होतो. “हळदीच्या पिकाची कापणी, त्यांना वाळवणे आणि त्यापासून हळदीची भुकटी तयार करणे याकामी अनेकांना रोजगार प्राप्त होत असतो.

 

 

मात्र असे असले तरी त्यांच्यासमोर अनेक आव्हाने देखील आहेत. कीटकांचा प्रादुर्भाव हे सर्वात मोठे आव्हान आहे. त्यामुळे कीटकनाशकांचा खर्च वाढतो.

तो टाळण्यासाठी आता सेंद्रिय पद्धतीने यावर उपाय केले जात आहेत.

अजून एक आव्हान म्हणजे बियाणे महाग आहेत तेव्हा त्यासाठी अनुदान मिळवणे महत्वपूर्ण आहे. याव्यतिरिक्त बाजारपेठ हा सुद्धा तितकाच महत्वाचा मुद्दा आहे.

उत्पादनाला चांगला भाव मिळावा यासाठी अजून संघटीतपणे प्रयत्न गरजेचे आहेत. शिवाय अनेक शेतकऱ्यांना याबाबतीत पुरेसे ज्ञान नसल्याने त्यांची फसवणूक देखील होत असते.

त्रिनीती सायो भविष्याबद्दल सांगतात की, अजून या क्षेत्रात करता येण्यासारखं खूप आहे. बाजारपेठ विस्तारली जाणे खूप महत्वाचे आहे.

या हळदीवर इथेच प्रक्रिया झाली तर आणखी उत्पन्न मिळेल शिवाय रोजगार देखील वाढेल.

सहउत्पादने घेणे देखील शक्य आहेत जसे की यांपासून तेल मिळते. तेव्हा भविष्य अजून उज्ज्वल आहे. मात्र त्यासाठी हजारो हात जोडले गेले पाहिजेत.

 

 

मेघालय मधील हे भौगोलिक क्षेत्र हळदीच्या पिकासाठी अनुकूल आहे. आता अधिकाअधिक लोक हळदीच्या शेतीकडे वळत असल्याने त्यांचे उत्पन्न तर वाढतेच आहे त्याचबरोबर या भागाच्या विकासाला चालना देखील मिळत आहे.

एका स्त्रीने स्वतःच्या कुटुंबासाठी घेतलेला पुढाकार आज अनेकांना मदतीचा हात देऊन गेला.

त्यांना या कार्यासाठी केंद्र सरकारचा पुरस्कार देखील मिळाला आहे. त्यांची ही यशोगाथा प्रेरणा देणारी आहे. पुढील वाटचालीसाठी त्यांना खूप शुभेच्छा!

आमचं युट्यूब चॅनल आणि त्यावरचे व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला फॉलो करा :

===

व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल

इनमराठीच्या अपडेट्स शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम  | टेलिग्राम शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?