' गाडी मॉडिफाय करणं नुसतंच खर्चिक नाही, तर ‘महागात’ पडू शकतं… – InMarathi

गाडी मॉडिफाय करणं नुसतंच खर्चिक नाही, तर ‘महागात’ पडू शकतं…

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम शेअरचॅट

व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल 

===

धूम चित्रपटातल्या अलीची बाईक आठवतेय? ‘टारझन द वंडर कार’ सिनेमातील चकाचक जांभळी कार आठवतेय? या गाड्या दिसायला अगदीच अफलातून होत्या, नाही का? एक वेगळाच लूक, एक वेगळीच स्टाईल, आणि म्हणूनच गाडीची पडणारी एक वेगळीच छाप! गाडी चालवणं जितकं महत्त्वाचं, तितकीच ती लोकांना दाखवणं सुद्धा महत्त्वाचं असतं. त्यासाठी ती नेहमी स्वच्छ ठेवण्यापासून, ते तिचा संपूर्ण लूक बदलून टाकण्यापर्यंत अनेक गोष्टी केल्या जातात.

दिलीप छाब्रिया म्हणजेच डीसीसारखी मंडळी मग गाड्यांचा चेहरा मोहरा बदलून टाकणारी कंपनी चालवतात. काही काही हौशी मंडळी तर गाडीच्या किंमतीएवढी किंवा कधी त्याहूनही जास्त रक्कम गाडीच्या मॉडिफिकेशनवर म्हणजेच, गाडीचा लूक बदलण्यावर खर्च करतात. मात्र, हे असं करणं केवळ खर्चिकच नाही, तर चांगलंच महागाचं ठरू शकतं.

 

dc 1 inmarathi

 

कारण भारतातील सुप्रीम कोर्टाच्या निर्णयानुसार, गाडीच्या मूळ रूपात बदल करण्याला परवानगी नाही. आरटीओमधून पास झालेली गाडी रस्त्यावर चालवायची असेल, तर ती कंपनीने बनवून दिलेल्या स्थितीतच असायला हवी, असा सुप्रीम कोर्टाचा निर्णय आहे. यातही काही गोष्टींना मुभा दिली आहे. बघुयात हे प्रकरण नेमकं काय आहे ते…

 

white india favourite car colour IM

 

नेमका काय आहे कोर्टाचा निर्णय?

सुप्रीम कोर्टाने घेतलेल्या निर्णयानुसार कुठलेही वाहन रजिस्टर केलेले असताना, जो तपशील आरटीओमध्ये भरण्यात आला आहे, त्याच स्थितीत ते वाहन कायम असायला हवे. कंपनीने बनवून दिलेल्या या वाहनामध्ये कुणीही स्वतःच्या मर्जीनुसार बदल करू शकत नाही.

हा निर्णय जाहीर करताना, सुप्रीम कोर्टाने मोटार वाहन अधिनियम कायद्याचा आधार घेतलेला आहे. वाहनाचा संपूर्ण लूक बदलणं तर दूरच, टायर बदलण्यासाठी सुद्धा काही नियम पाळणं गरजेचं आहे. हे नियम पाळले जात नसतील, तर ते कायद्याचं उल्लंघन ठरतं.

 

supreme court inmarathi

 

२०१९ साली हा निर्णय सुप्रीम कोर्टाने जाहीर केला असून, न्यायधीश अरुण मिश्रा आणि विनीत सरण यांनी हा निर्णय घेतलेला आहे. या निर्णयात म्हटल्याप्रमाणे कारची निर्मिती केलेल्या कंपनीने निर्देशित केल्याप्रमाणे, त्याच नियमात बसणारी गाडी रस्त्यावर चालवणं योग्य आहे.
गंमत अशी की हॉर्नचा आवाज किती असावा याविषयीचा निर्णय सुद्धा वाहनांची निर्मिती करताना घेतलेला असतो. म्हणजेच भल्यामोठ्या आवाजात, कर्कश्यपणे वाजणारे हॉर्न सुद्धा बेकायदेशीर ठरतात.

आमचं युट्यूब चॅनल आणि त्यावरचे व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला फॉलो करा :

अर्थात काही विशिष्ट गोष्टी करण्यासाठी काही प्रमाणात मुभा देण्यात आलेली आहे. त्यामुळे काही छोटे बदल करण्याची परवानगी कायदयानुसार मिळते. काही महत्त्वाच्या गोष्टींसाठी काय नियम आहेत ते जाणून घेऊयात.

१. वाहनाची रचना

गाडीचा आकार आणि रचना यात कुठलाही बदल करण्याची परवानगी देण्यात आलेली नाही. अगदीच अपरिहार्य कारणासाठी असे बदल करायचे झाल्यास, ऑटोमोटिव्ह रिसर्च असोसिएशन ऑफ इंडियाकडून रीतसर परवानगी घेऊनच ते करता येऊ शकतात.

 

car3 inmarathi

 

२. हॉर्नचा आवाज

वाहनाच्या आकारमानानुसार त्या-त्या वाहनासाठी हॉर्नचा आवाज निश्चित केलेला असतो, जेणेकरून इतर वाहने आणि पादचाऱ्यांना वाहन नेमकं कुठलं आहे याविषयी कळावं. असं असलं तरी हॉर्नचा आवाज बदलण्याची सशर्त परवानगी आहे. हॉर्नच्या आवाज ८० डेसिबलहून अधिक असेल, तर मात्र कायदेशीर कारवाई केली जाऊ शकते.

 

car horn drive InMarathi

३. वाहनाचा रंग

वाहनचा लूक हा मुख्यत्वे करून त्याच्या रंगावर अवलंबून असतो. त्यामुळे रंग उत्तम राहील याची काळजी अनेकजण घेत असतात. कुठल्याही वाहनाला त्याचा मूळ रंग पुन्हा एकदा नव्याने दिला जात असेल, तर त्याची परवानगी देण्यात आली आहे. मात्र वाहनाचा रंग बदलायचा असल्यास, आरटीओला पूर्वकल्पना देऊन, रीतसर परवानगीने आणि वाहनाचा आरसी बुकवर त्याची नोंद करून तो बदलता येतो.

 

Clean white car IM

४. वाहनाचा एक्झॉस्ट

एक्झॉस्ट अर्थात इंजिनमधील अनावश्यक गोष्टी बाहेर टाकणारा पाईप वेगळ्या प्रकारचा लावण्याची परवानगी दिली जात नाही. कारण असं झाल्यास त्यातून येणारा आवाज वाढतो आणि इतरांना त्रास होऊ शकतो.

 

bike inmarathi

५. कार सस्पेन्शन

कुठल्याही गाडीचा ग्राउंड क्लिअरन्स, म्हणजेच गाडीचा खालचा भाग आणि जमीन यामधील अंतर हे निश्चित केलेलं असतं. या अंतरामध्ये फारसा फरक पडणार नाही याची काळजी घेऊनच कारचे सस्पेन्शन्स बदलले जाऊ शकतात.

 

car sus inmarathi

६. कारचं क्रॅश गार्ड

कारला क्रॅश गार्ड लावण्याची परवानगी नाकारण्यात आली आहे. याची दोन मुख्य कारणं आहेत. एक म्हणजे क्रॅशगार्डमुळे दोन गाड्यांमधील अंतर कमी होणार आणि दुसरं म्हणजे अपघाताचा इम्पॅक्ट गाडीच्या बॉनेटवर न येता क्रॅश गार्डवर गेल्यामुळे एअरबॅग्स उघडणार नाहीत. या दोन्ही गोष्टी अपघाताच्या वेळी अधिक नुकसानकारक ठरतात.

 

car 1 inmarathi

 

वाहन विकत घेतलं आणि ते मालकीचं झालं म्हणजे त्यात हवा तो आणि हवा तसा बदल करता येऊ शकतो हा गैरसमज करून घेतला असाल, तर तो दूर व्हायला तुम्हाला नक्कीच मदत झाली असेल. ही माहिती तुम्हाला कशी वाटली ते कमेंटमधून कळवा. आणि तुमच्या परिचयातील इतर मंडळींना सुद्धा हे नियम माहित व्हावेत यासाठी लेख शेअर करायलाही विसरू नका.

आमचं युट्यूब चॅनल आणि त्यावरचे व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला फॉलो करा :

 

व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल

 शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम  | टेलिग्राम शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.

error: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?