' इस्राईलची मुलं जो धडा गिरवतात ते पाहून भारतीय असल्याचा सार्थ अभिमान वाटतो...

इस्राईलची मुलं जो धडा गिरवतात ते पाहून भारतीय असल्याचा सार्थ अभिमान वाटतो…

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम शेअरचॅट

व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल

===

ज्या त्या राज्यात आणि देशात जे सत्ताधीश, महान नेते, संत, महात्मे होऊन गेले त्यांच्या  कारकिर्दीची ओळख पुढच्या पिढीला व्हायला हवी. पराक्रमी राजे, त्यांचे सेनापती, महान योद्धे यांचा पराक्रम नवीन पिढीला कळावा यासाठी विद्यार्थ्यांना इतिहास शिकवला जातो.

त्यामुळे आपले पूर्वज कसे होते? त्यांनी देशासाठी काय कार्य केले?काय शिकवण दिली? काय पराक्रम केले? याची माहिती पुढील पिढीला मिळते. त्यातुन त्यांना देशासाठी चांगले कार्य करण्याची प्रेरणा मिळते.

आपल्या देशात परकीयांनी राज्य केले ते त्यांच्या मोठ्या सैन्यबळावर, त्यांच्याकडे असणाऱ्या शस्त्रास्त्रांच्या बळावर. आपला देश केवळ साधन म्हणून ओळखला जायचा.

आपल्या देशात एवढी संपत्ती होती की, इथे ‘सोन्याचा धूर निघायचा’ असे म्हटले जाते.

त्या संपत्तीच्या आकर्षणाने इतर आसपासच्या राष्ट्रांचे लोक आपल्या देशावर चाल करून आले. त्यांनी आपल्या देशातील संपत्ती लुटली. दहशत निर्माण केली. अनेकांचे बळी घेतले.

म्हणून इतर राज्यकर्ते क्रूर, स्वार्थी, दहशतवादी, लुटारू म्हणूनच आपल्या देशवासीयांच्या मनात राहिले. कुठलीही चांगली भावना त्यांच्याबद्दल भारतीयांच्या मनात राहिली नाही.

खरंतर एखाद्या परकीय राष्ट्राबद्दल प्रेम व आदराची भावना असणे तसे दुर्मिळच. पण भारतवासीयांना अभिमान वाटावा अशी कृती एका देशाने केली आहे.

“इस्रायल” हा देश तिथल्या शाळेत शिकणाऱ्या मुलांना पाठ्यपुस्तकात एक धडा (lesson) छापून मुलांना इतिहास म्हणून शिकवतात.

आपल्या भारत देशातल्या शूर वीर सैनिकांबद्दल कृतज्ञतापूर्वक आदर भावना व्यक्त करण्यासाठी आपल्या शूर सैनिकांची माहिती त्यांनी पाठ्यपुस्तकात समाविष्ट केली आहे.

काय कारण असावे इतक्या लांब असलेल्या देशात आपल्या भारतीय सैनिकांबद्दल शालेय शिक्षणातून आदर भावना, आपुलकी प्रकट करण्याचे?

 

Falls_map_21-inmarathi

 

बरोबर शंभर वर्षांपूर्वी पहिले जागतिक महायुद्ध चालू होते.

जर्मनी आणि तुर्की सत्तेविरुद्ध ग्रेट ब्रिटन, फ्रान्स, रशिया ह्यांच्या युती होती.

त्यावेळी इंग्रज भारतावर राज्य करत होते. इंग्रजांना रशिया आणि फ्रान्स मदत करत होते, त्यावेळी युद्ध खूप पेटलेले होते.

जर्मन आणि तुर्की सैन्याकडे आधुनिक शस्त्रास्त्रे होती, रणगाडे होते आणि सैन्य सुद्धा मोठ्या प्रमाणावर होते.

आमचं युट्यूब चॅनल आणि त्यावरचे व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला फॉलो करा :

समुद्राच्या जवळची शहरे ते काबीज करत होते आणि तिथून शस्त्र साठा जलमार्गाने सगळीकडे पोहोचवत होते. त्यामुळे ते आधी ताब्यात घेता येतील अशी समुद्रकिनाऱ्या जवळची शहरे हल्ले करून ताब्यात घेत होते. अनेक अशी शहरे त्यांनी ताब्यातही घेतली होती.

इंग्रजांना शत्रूही अनेक होते. त्यामुळे त्यांची कुमक पुढे पोहोचेपर्यंत जर्मनी आणि तुर्की सैन्य बरीच शहरे काबीज करत होते.

पूर्ण जग ताब्यात घ्यायच्या इच्छेने त्यांची आगेकूच चालू होती. मोठ्या प्रमाणावर मनुष्य हानी होत होती आणि युद्ध ऐन भरात आले होते.

जर्मन आणि तुर्की सैन्याने “हायफा” हे शहर ताब्यात घेतले.

हायफा, नाझरथ आणि दमास्कस ही इस्रायली शहरे दळणवळणाच्या दृष्टीने सोयीची होती. म्हणून प्रथम जर्मनी-तुर्की सैन्याने ‘हायफा’ शहर ताब्यात घेतले.

वास्तविक प्रथम इंग्रज, फ्रान्स आणि रशिया ह्यांचा ही तिन्ही शहरे ताब्यात घ्यायचा प्रयत्न होता. पण तुर्की सैन्य आधी पोहोचले आणि त्यांनी ‘हायफा’ शहर ताब्यात घेतले. जे इस्रायल मध्ये आहे.

 

Indian Lancers in Haifa-inmarathi

 

ब्रिटिशांना ते ‘हायफा’ शहर परत मिळवायचे होते. त्याच्यावर ताबा मिळवण्यासाठी ताकदवान सैन्याचा वापर करणे आवश्यक होते.

म्हणून ब्रिटिशांनी अनेक सेना एकत्र करून एक ताकतवान ब्रिगेड तयार करण्यासाठी भारतातल्या अनेक राजांना एकत्र आणलं.

त्यात म्हैसूर संस्थान, हैद्राबाद संस्थान, पतियाळा संस्थान, अलवार आणि जोधपूर संस्थान यांच्या घोडदळांना एकत्र आणलं आणि त्यांना नाव दिले “१५ वी इमपीरिअल सर्विस कॅवलरी ब्रिगेड”.

या ब्रिगेडचे नेतृत्व म्हैसूर घोड दळ आणि जोधपूर घोडदळ ह्यांच्याकडे दिले. त्यामध्ये आणखीन जामनगर, बडोदा, भावनगर आणि इंदोर ह्या संस्थानांच्या घोड दलांचाही समावेश केला.

या ताकदवान ब्रिगेडमध्ये अनेक भारतीय शूर वीर लढवय्ये होते. त्यामुळे ब्रिटिशांना त्यांच्या यशाची खात्री होती.

पण भारतापासून “हायफा” शहर फारच लांब असल्यामुळे ह्या सैन्याची भारत देश सोडून तिकडे नेण्याची मोठी व्यवस्था करावी लागली.

हे भारतीय जवान मायदेश सोडून दुसऱ्या देशात लढाईसाठी मोठ्या जोशात निघाले. आपले घरदार, शेतीवाडी, मुलेबाळे, ह्यांचे सगळे पाश तोडून “हायफा” शहराजवळ पोहोचले.

 

Indian Lancers in Haifa-inmarathi03

 

तुर्की सैन्याकडे मशीन गन, रणगाडे, दूरवर मारा करणारी भारी भारी अस्त्रशास्त्रे अशी अधुनिक शस्त्रास्त्रे होती. याउलट भारतीय सैन्य घोड्यावरून लढणार होते आणि शस्त्र म्हणून फक्त भाले वापरणार होते. त्यामुळे अजस्त्र रणगाड्यांपुढे त्यांचा निभाव कसा लागणार?

पण “हायफा” शहर कसे काबीज करता येईल याची भारतीय घोडदळाच्या प्रमुखांनी आधी पाहणी करून व्यूह रचना केली. जयघोष केला गेला आणि ही भारतीय सेना तुर्की सैन्यावर चाल करून गेली.

तुर्की सैन्याने रणगाडे फिरवून लांबवर मारा सुरू केला. पण भारतीय सैनिक घोडे छोट्या छोट्या वाटा शोधून शहरात घुसले. यापुढे तुर्की सैन्याचे रणगाडे निकामी ठरले.

घोड्याचा चपळाईने आणि भाल्याच्या कुठूनही होणाऱ्या माऱ्यामुळे तुर्की सैन्याची गडबड उडाली. त्याचाच फायदा भारतीय सैन्याला झाला. घोड्यावरून अचानक होणाऱ्या माऱ्याने शत्रूची दाणादाण उडाली. अंगावर येणारा भाला रोखता येत नव्हता आणि तुर्की सैन्य मारले जात होते.

 

Indian Lancers in Haifa-inmarathi04

 

घनघोर युद्ध सुरू होते आणि अनेक सैनिक मारले जात होते. मशीन गन धडाडत होत्या. पण त्यांना घोड दळाशी सामना करणे कठीण जात होते. कारण घोडे क्षणात कुठेही घुसू शकत होते आणि मशीन गन जागेवरच राहून मारा करत होत्या.

त्यामुळे घोडदळाची सरशी होत होती आणि तुर्की सैन्य मार खात होतं. अधुनिक शस्त्रांनी अनेक भारतीय जवानांचे प्राण घेतले होते.

तरीही भारतीय सैन्य निकराने लढत होते. खरे तर ही लढाई भारताविरुद्ध नव्हती. ही होती ब्रिटिशांविरुद्ध जर्मनी. पण भारतीय सैन्य प्राणपणाने लढत होते. शेकडो भारतीय जवान या लढाईत मारले गेले.

पण या भारतीय घोड दलाने तुर्की सैन्याची दाणादाण उडवली आणि तुर्की-जर्मनीच्या सैन्याचा मोठा पराभव केला. त्यांनी यशस्वीपणे “हायफा” शहरावर ताबा मिळवला.

ती तारीख होती २३ सप्टेंबर १९१८. भारतीय सैन्याने बलाढ्य तुर्की-जर्मनीच्या सैन्यावर आश्चर्यकारक विजय मिळवला.

पराक्रमाची पराकाष्ठा झाली. अधुनिक शस्त्रे असलेल्या सैन्यावर आपल्या घोडदळाने फक्त भाल्याचा वापर करून “हायफा” शहर ताब्यात घेतले.

अनेक भारतीय सैनिक या तुंबळ युद्धात मारले गेले. आपला देश सोडून परदेशात त्यांना प्राण गमवावे लागले.

ही अत्यंत दु:खदायक घटना होती. एवढ्या लांबून भारतीय सैनिकांचे मृतदेह भारतात आणणे शक्य नव्हते. म्हणून त्या मृतदेहांना इस्रायल मधेच दफन करण्यात आले.

ज्या सैनिकांनी इस्रायलच्या ह्या “हायफा” शहरासाठी आपल्या प्राणांचे बलिदान दिले त्या शूर सैनिकांबद्दल शहरवासीयांनी कृतज्ञता व्यक्त केली. आणि भारताबद्दल त्यांचे भावनिक नाते जोडले गेले.

इस्रायलच्या नागरिकांच्या मनात त्या लढलेल्या सगळ्या सैनिकांबद्दल आदर भाव वाढला. त्यांचे सतत स्मरण राहावे म्हणून त्या शहराचे महापौर योना याहाव यांनी मुलांच्या शालेय पाठ्यपुस्तकात भारतीय जवानांच्या शौर्याची माहिती देणारा धडा (lesson) समाविष्ट केला आहे.

 

Indian Lancers in Haifa-inmarathi05

 

दरवर्षी हायफा शहराच्या स्वातंत्र्य दिवसाचा समारोह साजरा केला जातो. यावर्षी भारतीय सैन्याच्या बलिदानास आणि विजयास शंभर वर्षे पूर्ण झाली. त्यानिमित्त “हायफा” शहराचे महापौर योना याहाव यांनी भाषण करताना म्हटले की,

या भारतीय जवानांनी “हायफा” शहरासाठी जे बलिदान केले आहे, ते आम्ही कधीही विसरणार नाही. त्यासाठी आम्ही ह्या समारोहात दरवर्षी त्यांचे स्मरण करू.

या स्वातंत्र्य लढाईत कॅप्टन अमरसिंह बहादूर, दफ्तरदार जोर सिंह, कॅप्टन अनुपसिंह आणि मेजर दलपत सिंह या अधिकाऱ्यांनी ४०० खंदया जवानांसह हायफा शहराला स्वातंत्र्य मिळवून दिले. त्यांच्या ह्या शौर्याबद्दल आम्ही सदैव कुतज्ञ राहू.

 इस्रायलचे पंतप्रधान भारतभेटीसाठी आले होते. त्यांनी राजधानी दिल्ली मधल्या तीन मूर्ती चौकाचे पुनः नामांकन केले. “तीन मूर्ती हायफा चौक” असे नाव त्या चौकाला दिले.

अशी ही भारत इस्रायल संबंध दृढ होण्यामागची महत्वाची कारणे आहेत. जी आपल्यापैकी बऱ्याच लोकांना माहिती नाही. २३ सप्टेंबर २०१८ ला ह्या भारतीय सैनिकांच्या शौर्यागाथेला १०० वर्षे पूर्ण झाली म्हणून हे स्मरण…

आमचं युट्यूब चॅनल आणि त्यावरचे व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला फॉलो करा :

 

===

व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल

इनमराठीच्या अपडेट्स शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम  | टेलिग्राम शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?