' बॉलीवूडवाले म्हणत होते ‘स्टँडअप सोड सिनेमात ये’, मात्र राजू आपल्या कलेशी एकनिष्ठ होता – InMarathi

बॉलीवूडवाले म्हणत होते ‘स्टँडअप सोड सिनेमात ये’, मात्र राजू आपल्या कलेशी एकनिष्ठ होता

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम शेअरचॅट

व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल 

===

‘स्टॅन्ड अप कॉमेडी’ हा शब्द आपल्यापैकी कुणालाही आज अपरिचित नाही. केवळ विनोदाचे म्हणून वेगवेगळ्या भाषेत अनेक कार्यक्रम आहेत. मालिकांची रडगाणी नको आणि दिवसाअखेरीस थोडा विरंगुळा मिळावा म्हणून आपणही ते आवडीने बघतो. विनोदांचा दर्जा सगळ्याच कार्यक्रमांमध्ये चांगला असतोच असं नाही तरी मोठ्या संख्येने आपण विनोदी कार्यक्रम बघतो.

निलेश साबळे, भाऊ कदम, श्रेया बुगडेपासून कपिल शर्मा, सुनील ग्रोव्हर पर्यंतचे सगळे विनोदवीर आपल्या गळ्यातले ताईत झालेले असतात. पण कुठलीही कला अशी अचानक मोठी होत नाही. कुणीतरी ती मोठी व्हायला कारणीभूत ठरलेलं असतं.

 

chala hava yeu dya inmarathi

 

आपल्याकडे पूर्वी जेव्हा जॉनी लिव्हर म्हणजेच विनोद, त्याच्या अल्याडपल्याड काही नाही असं समीकरण होतं तेव्हा मुंबईत येऊन एका अवलियाने ‘स्टॅन्ड अप कॉमेडीयन’ म्हणून स्वतःची ओळख मिळवली. ‘राजू श्रीवास्तव’ असं या अवलियाचं नाव.

ही ओळख मिळवणं आणि राजू श्रीवास्तवच्या मोठं होण्याचा प्रवास काही सरळसाधा नव्हता. जेव्हा कुणी काहीतरी नवं करायचा प्रयत्न करत असतं तेव्हा होणाऱ्या विरोधाला आणि खिल्ली उडवण्याला जसं तोंड द्यावं लागतं तसं सुरुवातीच्या काळात ते राजू श्रीवास्तव यांनाही द्यावं लागलं. या क्षेत्रात त्यांचा जम बसायला सुरुवातीची ४-५ वर्षे गेली.

 

johny lever inmarathi

 

मूळच्या कानपूरच्या असलेल्या आणि कानपूरमध्ये लहानाच्या मोठ्या झालेल्या राजू श्रीवास्तव यांच्या विनोदाच्या कारकिर्दीची सुरुवात १९८२ साली झाली. त्यांचं खरं नाव हे ‘सत्यप्रकाश’ असं आहे. पण विनोदाच्या क्षेत्रात आल्यापासून ते ‘राजू श्रीवास्तव’ या नावाने ओळखले जाऊ लागले. आजही ते याच नावाने ओळखले जातात.

शाळेत असताना ते शिक्षकांच्या नकला करायचे. शिक्षक त्यांना ओरडायचे पण एका शिक्षकाने मात्र त्यांना प्रोत्साहन दिलं. शाळा, कॉलेजमध्ये असताना ते तिथल्या स्थानिक क्रिकेट मॅचेसची विनोदी कमेंटरी करून सगळ्यांचं मनोरंजन करायचे. तेव्हाच त्यांना पहिल्यांदा स्वतःच्या कलेविषयी आत्मविश्वास वाटू लागला. पण आपण या कलेकडे व्यावसायिकदृष्ट्या बघू शकू, रोजगार मिळवण्याचा मार्ग म्हणून बघू शकू असं त्यांना कधीच वाटलं नव्हतं.

 

raju 1 inmarathi

 

आपलं म्हणणं लोकांपुढे मांडता येण्याची कला त्यांना त्यांच्या वडिलांकडून मिळाली. त्यांचे वडील सरकारी नोकरी करत असत. पण ते कानपूरमधले एक लोकप्रिय कवी होते. राजू श्रीवास्तव यांना मात्र लहानपणापासूनच विनोदाची आवड होती. राजू श्रीवास्तव १९८२ मध्ये जेव्हा मुंबईत आले त्यावेळी विनोदी कलाकारांना फारसा आदर, महत्त्व दिलं जायचं नाही.

जॉनी वॉकर पासून सुरू होणारा विनोद जॉनी लिव्हरवर येऊन थांबायचा. मुंबईत आल्यानंतर सुरुवातीचा त्यांचा काळ खूप खडतर गेला. घरून मिळणारे पैसे पुरायचे नाहीत तेव्हा त्यांनी अगदी रिक्षा चालवून सुद्धा पैसे कमावले होते. कधी कधी त्यांना कार्यक्रम मिळायचे.

सुरुवातीला एका कार्यक्रमाचे अवघे ५० रुपये त्यांना मिळत असत. ‘टी टाइम मनोरंजन’ या टिव्हीवरल्या कार्यक्रमातून त्यांच्या विनोदाच्या कारकिर्दीला सुरुवात झाली. पण त्यांना खऱ्या अर्थाने ओळख मिळाली ती ‘द ग्रेट इंडियन लाफ्टर चॅलेंज’ या कार्यक्रमातून. त्यातला त्यांनी साकारलेला ‘गजोधर भैय्या’ स्पर्धेत रनर अप ठरला तरी प्रेक्षकांनी मात्र राजू श्रीवास्तव यांना ‘द किंग ऑफ कॉमेडी’चा किताब दिला.

 

Mumbai Rikshaw
Maharashtra News, Latest Marathi News, मराठी बातम्या

 

राजू श्रीवास्तव मुख्यत्वे ग्रामीण, शहरी भागातले लोक आणि नेतेमंडळींवर विनोदनिर्मिती करतात. गजोधर भैय्याच्या भूमिकेव्यतिरिक्त त्यांनी केलेलया लालू प्रसादजी, अमिताभ बच्चन, रामदेव बाबा यांच्या नकलांनाही लोकांनी उचलून धरले. राजू श्रीवास्तव ‘बिग बॉस ३’ या प्रसिद्ध कार्यक्रमाचाही भाग होते जिथेही त्यांनी लोकांचं मनोरंजन केलं. केवळ भारतातच नाही तर विदेशातही राजू श्रीवास्तव यांच्या विनोदकौशल्याला लोकमान्यता मिळाली.

त्यांनी ‘तेजाब’, ‘बाजीगर’, ‘आमदनी अठन्नी खर्चा रुपया’, ‘वाह तेरा क्या कहना’, ‘मै प्रेम की दीवानी हूँ’, ‘बिग ब्रदर’, ‘फिर हेरा फेरी’, ‘बॉंबे टू गोवा’ यांसारख्या चित्रपटांमधूनही काम केले आहे. चित्रपटांची निवड करताना त्यांनी ती अतिशय शांतपणे, संयमाने केली.

कारण, चित्रपटात काम करशील का अशी विचारणा करणारे इतके मागे लागायचे की ते म्हणायचे, तू हे विनोदाचं क्षेत्र सोड आणि चित्रपटांमध्ये ये. मात्र, राजू श्रीवास्तव यांना आपली ही कला छोटी नाही. आपली विनोदाप्रतीची निष्ठा सोडून आपल्याला चित्रपटांमध्ये कामं करायची नाहीत.

 

raju 2 final inmarathi

 

आपण आपली ही कलाच इतकी मोठी करू की केवळ सिनेमंडळींना पहायला येणारे लोक विनोदवीरांचा विनोद पहायला येतील असा ठाम विश्वास होता. नकला करणारे राजू श्रीवास्तव, जॉनी लिव्हर यांच्यासारखे कलाकार सुरुवातीला जेव्हा नेतेमंडळींच्या नकला करायचे तेव्हा आपली खिल्ली उडवली जातेय असं वाटून नेतेमंडळी त्यांच्यावर नाराज व्हायची.

कधी कधी चालू असलेला कार्यक्रमसुद्धा बंद केला जायचा. पण जसजसे चॅनल्स वाढले आणि इंटरनेटवरून अगदी ग्रामीण भागांमध्येही या नकला पोहोचायला लागल्या तसं तसं लोकांच्या लक्षात आलं की नकला करून हे कलाकार खरंतर त्या नेत्याला आणखीन मोठं करत आहेत.

त्यानंतर मात्र नेत्यांची नक्कल केल्यावर नेतेमंडळी खूष होऊ लागली आणि कलाकारांवर शुभेच्छांचा वर्षाव करू लागली. पत्नी आणि दोन मुलं यांच्याबरोबर ते मुंबईत राहतात.

 

raju 2 inmarathi

राजू श्रीवास्तव यांनी आधी समाजवादी पार्टी आणि मग भाजपातून राजकारणातही पाऊल टाकलं होतं . पण अखेरीस त्यांच्यातला विनोदवीर वरचढ ठरला आणि ते राजकारणात रमले नाहीत.आजूबाजूच्या अनेक विनोदी कलाकारांनी अश्लील विनोदाचा सोपा पर्याय निवडायला सुरुवात केली तरी राजू श्रीवास्तव यांनी कधीही कुटुंबीय बसून बघू शकतील त्यापलीकडचा विनोद केला नाही.

त्यांनी नेहमीच चांगल्या विनोदाची निर्मिती केली. देवाने आपल्याला कुठलीही कला दिलेली असो, त्या कलेतून कधी आपल्या देशाचा, धर्मांचा, कुठल्याही देवदेवतांचा अपमान होणार नाही याची दक्षता आपण पाळली आहे असं त्यांचं ठाम म्हणणं आहे.

आमचं युट्यूब चॅनल आणि त्यावरचे व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला फॉलो करा :

 

===

व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल

 शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम  | टेलिग्राम शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.

error: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?