' स्वतः कमवतोय आणि इतरांनाही शिकवतोय लाखभर रुपये देणारी मोत्यांची शेती!

स्वतः कमवतोय आणि इतरांनाही शिकवतोय लाखभर रुपये देणारी मोत्यांची शेती!

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम शेअरचॅट

व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल 

===

मोती म्हणजे अनेकांचा आवडता दागिना. अर्थात, हा जितका आवडता तितकाच महाग सुद्धा असतो. खरे मोती महाग असले, तरी कृत्रिम मोत्यांचा वापर अगदी सर्रासपणे झालेला पाहायला मिळतो. लहान लहान मोत्यांच्या माळांपासून मोत्याची अंगठी, कर्णफुलं, बांगड्या असे दागिने वापरले जातात.

 

moti dagine inmarathi

आमचं युट्यूब चॅनल आणि त्यावरचे व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला फॉलो करा :

 

कृत्रिम मोती अधिक वापरले जात असले, तरी एखादा तरी खरा मोती आपल्याकडे असावा अशी अनेकांची इच्छा असते. शिंपल्यात बनणारा मोती, समुद्राच्या खोल तळाशी निर्माण होत असतो आणि म्हणूनच तो अतिशय मौल्यवान ठरतो.

 

pearl inmarathi

 

मोत्याची लकाकी, त्याचा शुभ्रता नजरेत भरते आणि एक निराळीच छाप टाकते. हे असे आकर्षक मोती केवळ समुद्रात तयार होण्याचा काळ मात्र आता संपला आहे. आता काळ बदलला आहे. आता या मोत्यांची चक्क शेती केली जाते. नाही पण म्हणजे मोती झाडावर उगवत नाहीत, ते शिंपल्यातच तयार होतात; मात्र समुद्रात नाही तर चक्क तुम्ही ठरवलेल्या तलावात!

एका मराठमोळ्या तरुणाने अशीच मोत्यांची शेती करत लाखमोलाचा व्यवसाय सुरु केलाय. या व्यवसायातून तो थोडेथोडके नव्हे, तर वर्षभरात लाखो रुपये कमावतोय. कोण आहे हा तरुण? आणि कशी केली जाते ही मोत्यांची शेती, ते जाणून घेऊयात.

सरकारी नोकरी मिळाली नाही पण…

आपल्या महाराष्ट्रातील गडचिरोली जिल्ह्यातला एक तरुण, सरकारी नोकरी मिळवण्यासाठी धडपडणारा. आज ३८ वर्षीय असलेल्या संजय गंडाते यांचे वडील शेतकरी आहेत. लहानपणी घरातील परिस्थिती तशी बेताची होती आणि म्हणूनच सरकारी नोकरी मिळवणं हाच ध्यास त्याने घेतला होता.

 

pearl farming

 

काही वर्ष त्यासाठी त्याने मोठ्या कष्टाने प्रयत्न केले, मात्र त्याच्या मेहनतीला यश आलं नाही. सरकारी नोकरी मिळत नाही म्हटल्यावर त्याने प्रयत्न सोडून दिले. स्वतःचं विश्व उभारण्याचा निर्णय घेतला.

पारंपरिक शेती करायची इच्छा नव्हती

सरकारी नोकरी मिळत नाही म्हणून खचून न जाता स्वतःचं काहीतरी सुरु करण्याचा निर्णय संजय याने घेतला खरा, पण वडील करत असलेली पारंपरिक शेती करण्याची त्यांची इच्छा नव्हती. खरं तर आपण आयुष्यात कधीही व्यवसाय करण्याचा निर्णय घेऊ, असं संजय यांना स्वप्नातही वाटलं नव्हतं. त्यामुळे सरकारी नोकरी व्यतिरिक्त काही करायचं ठरवलंच आहे, तर वेगळं काहीतरी करायचं असं त्यांनी मनाशी पक्कं केलं.

इंटरनेटच्या मदतीने काहीतरी आगळंवेगळं शोधण्याचा ध्यास त्याने घेतला. बराच काळ शोधकार्य करूनही काही मिळत नव्हतं, पण अचानक त्याला मोत्यांच्या शेतीचा शोध लागला. याविषयी अधिक माहिती घेण्यासाठी त्याने कृषी विज्ञान केंद्र गाठलं. तिथे त्याच्या लक्षात आलं, की शिंपल्यांच्या साहाय्याने मोत्यांची शेती करणं शक्य आहे.

लहानपणी गावातील नदीकाठी जाऊन त्याने अनेक शिंपले गोळा केले होते. लहानपणी निरनिराळी स्वप्नं पाह्यला शिकवणारे हे शंखशिंपले, आता तरुण वयात त्याचं भलंमोठं स्वप्न सत्यात उतरवू शकतात, हे लक्षात आलं आणि त्याने कंबर कसली.

 

pearl 1 inmarathi

 

इंटरनेट, कृषी क्षेत्र, गावकरी, पुस्तकं अशा मिळेल त्या मार्गाने त्याने मोत्यांची शेती म्हणजेच pearl farming या विषयाबद्दलची माहिती मिळवायला सुरुवात केली. काहीतरी वेगळं करून दाखवण्यासाठी हा पर्याय उत्तम आहे, हे त्याला आता पक्कं ठाऊक झालं होतं. पर्ल फार्मिंगबद्दल पुरेशी माहिती मिळाली आहे याची खात्री पटल्यानंतर, त्यांनी एक तलाव भाड्याने घेतला आणि आपल्या व्यवसायाचा श्रीगणेशा केला. यासाठी त्याने सुरुवातीला गुंतवलेलं भांडवल होतं, मात्र दहा हजार रुपये!

असा बहरत गेला व्यवसाय

कुठलाही व्यवसाय करायचा, म्हणजे पहिल्या दिवसापासूनच किंवा सुरुवातीच्या दिवसांतच नफा होईल अशी अपेक्षा ठेऊन चालत नाही. व्यवसायाचे चढउतार, प्रसंगी होणारा तोटा, त्यासाठी खर्च करावी लागणारी पदरची रक्कम, नफा होत नसेल तरीही राखावा लागणार संयम अशा सगळ्याच गोष्टींचा अनुभव संजयने व्यवसायाच्या सुरुवातीला घेतला.

मिळालेली माहिती पुरेशी आहे, वाटत होतं, पण ती पुरेशी ठरली नाही. अनेक शिंपले मेले. नुकसान सहन करावं लागलं. मात्र संजयने हार मानली नाही. सुरुवातीलाच नुकसान झालं म्हणून एखाद्याने व्यवसाय सोडून दिला असता. संजयने तसं केलं नाही. इंटरनेटचा वापर करून अधिकाधिक माहिती मिळवत गेला.

पुन्हा नव्याने मोती बनवायला सुरुवात केली. यावेळी त्याच्या महेनतीला यश आलं. सुरुवातीलाच तोटयात गेलेला व्यवसाय पुन्हा उभा करणारा संजय आज भाड्याच्या नव्हे, तर स्वतःच्या तलावात मोत्यांची शेती करतो. एवढंच नाही, तर मोत्यांची शेती करण्याचे धडे सुद्धा तो आता इतरांना देतो.

 

farming inmarathi

 

महाराष्ट्र, बिहार, राजस्थान, मध्यप्रदेश अशा राज्यांमधून पर्ल फार्मिंग शिकण्यासाठी लोक येतात. संजय गंडाते त्याच्या घरीच प्रॅक्टिकल ज्ञान देऊन ही कला इतरांना शिकवतो. हे शिक्षण घेण्यासाठी नाममात्र अशी सहा हजार रुपये फी आकारून त्याने यातूनही उत्पन्नाचं साधन सुरु केलं आहे.

मार्केटिंग सुद्धा स्वबळावर…

नुसतंच पर्ल फार्मिंग करून संजय थांबला नाही. त्याने या मोत्यांची विक्री सुद्धा स्वतःच्या हिंमतीवर केली आहे. इतर कुठल्याही कंपनीची मदत घेतली, तर नफा कमी होतो असं त्याचं म्हणणं आहे. म्हणूननच स्वतःची वेबसाईट तयार करून त्याने मोती विकायला ठेवले आहेत.

या मोत्यांची खरेदी ग्राहक ऑनलाईन करतात आणि कुरियरच्या माध्यमातून मोत्यांची डिलिव्हरी केली जाते. सोशल मीडियाचा वापर करून मोती विकण्याची कला सुद्धा संजयने अवगत केली. त्यामुळे मोती बनवण्याच्या या कलेबद्दल हक्काने इतरांना शिक्षण देणं संजयसाठी सोपं असणार हे नक्की!

कसं कराल पर्ल फार्मिंग?

मोती तयार करण्यासाठी एका तलावाची आवश्यकता असते, हे तर तुम्हाला एव्हाना लक्षात आलंच असेल. नुसताच तलाव असून चालत नाही. तो एका विशिष्ट स्थितीत असायला हवा. १० बाय १५ फूट आकाराचा तलाव यासाठी आवश्यक असतो.

 

lake inmarathi

 

या तलावाची खोली किमान ८ ते दहा फूट असायला हवी. यातील पाणी पिण्यायोग्य असणं हादेखील एक महत्त्वाचा भाग ठरतो. पाणी क्षारयुक्त असेल, तर शिंपल्यांमध्ये मोत्यांची निर्मिती होऊ शकत नाही.

मोती तयार करण्यासाठी लागणारी दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे जिवंत शिंपले. हे शिंपले तुम्ही स्वतः नदीतून पकडून आणलेत तर उत्तमच; मात्र जिवंत शिंपले विकत सुद्धा मिळतात.

या दोन गोष्टींपेक्षा कठीण बाब म्हणजे मोत्यांचे बीज आणि शिंपल्यांची निगा राखणं. २ ते ३ दिवस शिंपले तलावाच्या पाण्यात ठेवल्यानंतर जंगली वनस्पतींपासून बनवलेलं बीज त्यांच्यात पेरलं जातं. यानंतर शिंपले पुन्हा पाण्यात सोडण्यात येतात. बीज पेरल्यानंतर शिंपला नाही, तर त्याच्यावर योग्य उपचार करावे लागतात. या शिंपल्याच्या आत मोती तयार होण्यासाठी जवळपास एक ते दीड वर्षांचा कालावधी लागतो.

या काळात शिंपल्यांची योग्य काळजी घेतली गेली नाही, तर मोती निर्माण होऊ शकत नाहीत. पाण्यातील शेवाळ आणि प्राण्यांची विष्ठा हे खाद्य शिंपल्यांना पुरवलं जातं. अनेक शिंपले यादरम्यान मृत होतात. असे मृत्यू शिंपले पाण्याबाहेर काढावे लागतात. अन्यथा इतर शिंपल्यांना मोती निर्माण करण्यात अडचणी येऊ शकतात. अशी सगळी मशागत केल्यावर, जवळपास १५ ते १८ महिन्यांच्या मेहनतीनंतर मोती हाती लागतात.

 

pearl 2 inmarathi

 

म्हणजेच, पर्ल फार्मिंग मधून लाखोंची कमाई होत असली, तरी तेवढी मेहनत घेण्याची तयारी सुद्धा ठेवावी लागते.

आमचं युट्यूब चॅनल आणि त्यावरचे व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला फॉलो करा :

===

व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल

 शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम  | टेलिग्राम शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?