' पाकी शत्रू सेनेपासून बांगलादेशी VIP कुटुंबाला वाचवणाऱ्या निडर अधिकाऱ्याची रोमांचकारी गोष्ट! – InMarathi

पाकी शत्रू सेनेपासून बांगलादेशी VIP कुटुंबाला वाचवणाऱ्या निडर अधिकाऱ्याची रोमांचकारी गोष्ट!

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम शेअरचॅट

व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल 

===

भारत आणि पाकिस्तान हे सख्खे शेजारी आणि पक्के वैरी. आजवर बरेचदा दोन्ही देशांत लहान मोठ्या लढाया झाल्या आहेत. सीमेवर तर रोजचं काहींना काही सुरूच असते. यातीलच एक म्हणजे आपल्या पंतप्रधान इंदिरा गांधी यांच्या खंबीरपणाची साक्ष देणारे १९७१ सालचे भारत पाकिस्तान युद्ध. ज्याची समाप्ती बांगलादेशाच्या निर्मितीने झाली. त्यापूर्वी बांग्लादेश ‘पूर्वपाकिस्तान’ म्हणून ओळखला जात असे.

या युद्धात भारतीय जवानांनी असे शौर्य गाजवले होते की आझी आठवण झाली तरी शत्रू राष्ट्राच्या मनात धडकी भरते. या युद्धात एका योध्याने सहभाग घेतला होते. ज्याने बांगलादेशाच्या सुविद्य पंतप्रधान शेख हसिना आणि त्यांच्या कुटुंबाला पाकिस्तानी सैनिकांच्या ताब्यातून सोडवले होते. काय आहे या कहाणीमागची कहाणी? कोण आहे तो शूर आणि निडर योद्धा? चला जाऊ १९७१ मध्ये आणि जाणून घेवू एका सुटकेची थरारक कहाणी.

 

indian army inmarathi

 

झाले असे की १९७१ मध्ये भारताने युद्ध जिंकल्यानंतर पाकिस्तानचे विभाजन झाले. त्यातून बांगलादेशाची निर्मिती झाली. त्यावेळी मेजर दर्जाचा एक २९ वर्षांचा अधिकारी या युद्धात सहभागी होता. नंतर त्याला बांगलादेशातील व्हीआयपींची सुरक्षा व्यवस्था पाहण्याची जबाबदारी मिळाली. मात्र, त्यानंतर त्याला माहिती मिळाली की, ढाका येथे एका कुटुंबाला कैद करण्यात आले आहे.

आमचं युट्यूब चॅनल आणि त्यावरचे व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला फॉलो करा :

जरी पाकिस्तानने हार मानली होती आणि भारताच्या शौर्याची गाथा लिहायची होती तरी दुसरीकडे बांगलादेशचे पहिले कुटुंब किंवा बांगलादेशचे जनक शेख मुजीबुर रहमान यांचे कुटुंब अजूनही पाकिस्तानी सैनिकांच्या ताब्यात होते.

 

pakistan inmarathi
twitter.com

 

शेख मुजीबच्या कुटुंबाला १२ पाकिस्तानी सैनिकांनी ओलीस ठेवले होते. शेख मुजीब यांचे कुटुंब ढाक्यातील ‘धानमंडी’ भागात होते आणि जो कोणी त्या घराकडे जायचा त्याच्यावर पाकिस्तानी सैनिक हल्ला करत होते.

या कुटुंबाची सुटका करणे मोठे जिकरीचे बनले होते, त्यातच शेख यांना अटक करून तुरुंगात ठेवण्यात आले होते. अशा परिस्थितीत त्या तरुण अधिकार्‍याने आपली शस्त्रे सैनिकांना दिली आणि नि:शस्त्र पाकिस्तानी सैनिकांसमोर गेला.

अशोक तारा हे त्या निडर अधिकार्‍याचे नाव आहे, आजही जेव्हा आठवणी निघतात तेव्हा आता कर्नल म्हणून सेवानिवृत्त झालेले तारा सांगतात की, पाकिस्तानी सैनिक पंजाबीत शिवीगाळ करत होते आणि ओरडत होते. अशोक जी पंजाबी असल्याने त्यांना ते सारेकाही समजत होते.

 

bangla 2 inmarathi

 

मेजर अशोक तारा यांनी पाकिस्तानी सैनिकांना सांगितले की, पाकिस्तानी लष्कराने शरणागती पत्करली आहे, मात्र ते पाकिस्तानी सैनिक ते मान्य करायला तयार नव्हते. दरम्यान, त्या घरावरून एका भारतीय हेलिकॉप्टरने उड्डाण केले.

अशोक तारा यांनी पुन्हा एकदा पाकिस्तानी लोकांना विचारले की त्यांनी त्यांच्या भूमीवर असे भारतीय हेलिकॉप्टर पाहिले आहे का? तेव्हा पाकिस्तानी सैनिकांनी नकार दिला आणि आम्ही आमच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांना विचारू, असे सांगितले.

पाकिस्तानी अजूनही मागे हटायला तयार नव्हते. मेजर अशोक यांना धमकवण्यासाठी पाकिस्तानी सैनिकांनी जवळच्या घरांवर गोळीबार केला. पण मेजर अशोक ठाम राहिले. पाकिस्तानी लोकांना घाबरवण्यासाठी मेजर अशोक म्हणाले की बघा, जर तुम्ही उशीर केला तर केव्हाही मुक्ती वाहिनी आणि भारतीय सैन्याचे लोक येऊन तुम्हाला मारतील.

ashok 1 inmarathi

 

तुम्ही पाकिस्तानात असलेल्या कुटुंबाला भेटू शकणार नाही आणि तुमच्या मृत्यूनंतर तुमच्या शरीराचे काय होईल, याचाही विचार करा. आता पाकिस्तानी थोडे घाबरले. त्यांच्या लक्षात आले की आपले काही चुकत आहे. सुमारे २५ मिनिटे या घडामोडी घडत होत्या.

शेवटी अशोक तारा यांनी त्यांना ऑफर दिली की, एक भारतीय लष्कर अधिकारी म्हणून मी तुम्हाला तुमच्या मुख्यालयात घेऊन जाईन, जिथून तुम्ही तुमच्या देशात परत जाऊ शकता. यानंतर पाकिस्तानी सैनिकांनी आत्मसमर्पण केले.

पण खरी रोमांचक गोष्ट त्यानंतर घडली. पाकिस्तानी सैनिकांनी शरणागती पत्करली आणि मेजर तारा यांनी घराचा दरवाजा उघडताच शेख मुजीबुर रहमान यांची पत्नी प्रथम बाहेर आली आणि मेजर अशोक तारा यांना मिठी मारून म्हणाली की देवाने तुला आमचे रक्षण करण्यासाठी पाठवले आहे आणि तू माझा मुलगा आहेस. मग शेख मुजीबचा भाऊ आणि क्रांतिकारक ‘कोखा’ बाहेर आला त्याने मेजर तारा यांना बांगलादेशचा ध्वज दिला आणि म्हणाला, तो उचला आणि फडकावा आणि पाकिस्तानी ध्वज फेकून द्या.

 

ashok inmarathi

 

जेव्हा पाकिस्तानचा ध्वज जमिनीवर फेकला गेला तेव्हा मेजर तारा सांगतात की शेख मुजीबच्या पत्नीने त्याला पायाने चिरडले आणि जोरात ‘जय बांगला’ अशी घोषणा दिली. तो क्षण अविस्मरणीय असाच होता. त्या वेळी बांगलादेशच्या विद्यमान पंतप्रधान शेख हसीना आपल्या नवजात मुलासोबत त्या घरात होत्या.

नंतर शेख मुजीबुर रहमान यांनी मेजर अशोक तारा यांना फोन करून त्यांचा अनेक प्रसंगी सन्मान केला आणि कुटुंबाचे प्राण वाचवल्याबद्दल त्यांचे आभार मानले.

 

bangla 1 inmarathi

 

२०२० मध्ये झालेल्या द्विपक्षीय कार्यक्रमात शेख हसीना यांनी पंतप्रधान मोदींसोबत मंच शेअर केला आणि यावेळी त्यांनी कर्नल अशोक तारा यांचा उल्लेख करून आभार मानले. त्यावेळी मेजर असलेला तो अधिकारी म्हणजे कर्नल अशोक तारा असल्याचे शेख हसीना म्हणाल्या होत्या. १७ डिसेंबर रोजी सकाळी त्यांनी आम्हाला पाकिस्तानी तावडीतून सोडवले आणि आमचे प्राण वाचवले.

मी कर्नल तारा आणि भारतातील लोकांचा आभारी आहे… तर मित्रांनो हे कारण आहे की शेख हासिना यांना भारताबद्दल आत्मीयता का आहे याचे! ही कहाणीमागची कहाणी तुम्हाला कशी वाटली ते आम्हाला जरूर कळवा.

आमचं युट्यूब चॅनल आणि त्यावरचे व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला फॉलो करा :

===

व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल

 शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम  | टेलिग्राम शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.

error: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?