' हिरो आणि व्हिलन सशक्तपणे निभावणाऱ्या ‘दयावान अमर’ ला विसरणे शक्यच नाही! – InMarathi

हिरो आणि व्हिलन सशक्तपणे निभावणाऱ्या ‘दयावान अमर’ ला विसरणे शक्यच नाही!

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम शेअरचॅट

व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल

===

लेखिका – वैदही जोशी 

‘अमर, अकबर, अँथनी’ ह्या त्रिकुटातील मोठा भाऊ अमर म्हणजेच ज्येष्ठ अभिनेता विनोद खन्ना ह्यांचे एप्रिल २०१७ मध्ये अनपेक्षित निधन झाले. ते ७० वर्षांचे होते. गेल्या काही दिवसांपासून प्रकृती अस्वास्थामुळे त्यांना इस्पितळात हलवण्यात आले होते. त्यांना कॅन्सर होता.

सोशल मिडीयावर जेव्हा आजारी असलेल्या विनोद खन्नांचा फोटो व्हायरल झाला होता, तेव्हाच अनेकांच्या काळजाचा ठोका चुकला होता. कारण भारदस्त व्यक्तिमत्वाचे विनोद खन्ना फोटो मध्ये ओळखू येणार नाहीत असे अशक्त व आजारी दिसत होते.

Vinod-Khanna-marathipizza
india.com

आपल्या आवडत्या अभिनेत्याच्या तब्येतीची अशी अवस्था बघून त्यांच्या चाहत्यांनी तेव्हाच त्यांच्या तब्येतीसाठी प्रार्थना करणे सुरु केले होते पण काळाने डाव साधून, एप्रिल २०१७ मध्ये विनोद खन्ना ह्यांना त्यांच्या चाहत्यांपासून अतिशय लांब नेले.

‘अमर अकबर अँथनी’, ‘मुकद्दर का सिकंदर’,’दयावान’, चांदनी’, ‘हाथ कि सफाई’, ‘कुरबानी’,’परवरीश’ ते अलीकडे ‘दबंग’ आणि ‘दिलवाले’ पर्यंत विनोद खांना ह्यांनी चित्रपटसृष्टीची सेवा केली.

Vinod-Khanna-marathipizza01
iindianexpress.com

हिंदी चित्रपटसृष्टीतील सर्वात देखण्या व भारदस्त अभिनेत्यांमध्ये विनोद खन्ना ह्यांचे नाव घेतले जाते. त्यांच्या काळात ते हाय्येस्ट पेड अभिनेते होते. काही काही सिनेमांमध्ये तर अमिताभ बच्चन आणि ऋषी कपूर ह्यांच्यापेक्षा जास्त मानधन विनोद खन्ना ह्यांना देण्यात आले. आपल्या कारकीर्दीमध्ये यशस्वीतेच्या शिखरावर असताना त्यांनी चित्रपटांतून संन्यास घेतला व ते ओशो रजनीश ह्यांचे अनुयायी झाले.

विनोद खन्ना ह्यांचा जन्म ६ ऑक्टोबर १९४६ साली एका पंजाबी कुटुंबात पेशावर (फाळणीपूर्व भारत) येथे झाला. त्यांच्या वडिलांचे नाव किशनचंद खन्ना व आईचे नाव कमला खन्ना होते. त्यांच्या वडिलांचा टेक्स्टाइल, डाय आणि केमिकल्सचा बिझनेस होता.

आमचं युट्यूब चॅनल आणि त्यावरचे व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला फॉलो करा :

 

विनोद खन्ना ह्यांना तीन बहिणी व एक भाऊ अशी भावंड होती. त्यांच्या जन्मानंतर काहीच काळात भारताची फाळणी झाल्यामुळे त्यांचे कुटुंब पेशावर सोडून मुंबईला स्थायीक झाले.

सेंट. मेरी स्कूल, मुंबई येथे दुसऱ्या वर्गापर्यंत शिक्षण घेतल्यानंतर त्यांचे कुटुंब दिल्लीस स्थायीक झाले व तेथे मथुरा रोड येथील दिल्ली पब्लिक स्कूल येथे त्यांनी त्यांचे शालेय शिक्षण घेतले.

Vinod-Khanna-marathipizza02
thequint.com

१९६० साली त्यांचे कुटुंब परत मुंबईस आले आणि त्यानंतर त्यांनी देवळालीच्या Barnes School मधून त्यांचे उरलेले शालेय शिक्षण पूर्ण केले. मुंबईच्या Sydenham College मधून त्यांनी त्यांचे कॉमर्सचे पदवीपर्यंतचे शिक्षण घेतले. ते बोर्डिंग स्कूल मध्ये असताना त्यांनी ‘सोलवा साल’ आणि ‘मुघल-ए-आझम’ हे चित्रपट बघितले व ते चित्रपटांच्या प्रेमात पडले.

आपल्या चित्रपटांच्या कारकिर्दीची सुरुवात विनोद खन्ना ह्यांनी १९६८ साली सुनील दत्त ह्यांच्या ‘मन का मित’ ह्या चित्रपटाद्वारे केली. ह्यात त्यांची भूमिका खलनायकाची होती व ह्या चित्रपटाचे दिग्दर्शक होते अदुर्थी सुब्बा राव.

हा चित्रपट एका तमिळ चित्रपटाचा रिमेक होता. विनोद खन्ना ह्यांनी त्यांच्या कारकीर्दीच्या सुरुवातीला सहाय्यक अभिनेत्याची किंवा खलनायकाची भूमिका साकारली होती. त्यांचा देखणा व्हिलन किंवा सहायक अभिनेता लोकांना १९७० साली ‘पूरब और पश्चिम’, ‘सच्चा झूठा’, ‘आन मिलो सजना’, ’मस्ताना’, व १९७१ साली  ‘मेरा गाव मेरा देश’ आणि ‘ऐलान’ ह्या चित्रपटांत आवडला.

विनोद खन्ना ह्यांनी अभिनयाची सुरुवात व्हिलन म्हणून केली आणि नंतर मात्र ते हिरो म्हणून नावारूपाला आले. त्यांची मुख्य भूमिका असलेला पहिला चित्रपट होता ‘हम तुम और वोह’.

Vinod-Khanna-marathipizza03
youtube.com

हा चित्रपट १९७१ साली आला होता. ह्या चित्रपटात त्यांच्या बरोबर भारती विष्णूवर्धन ह्या अभिनेत्री होत्या. त्यानंतर त्यांनी मल्टीस्टारर ’मेरे अपने’ ह्या गुलझार दिग्दर्शित चित्रपटात काम केले. १९७३ साली ‘अचानक’ ह्या चित्रपटाने त्यांना खरी ओळख मिळवून दिली. ह्यात त्यांनी खरे नौसेना अधिकारी कावस नानावटी ह्यांची भूमिका केली होती. हा चित्रपट त्यांच्या आयुष्यावर आधारित होता. ह्या चित्रपटाचे व खन्ना ह्यांच्या अभिनयाचे सर्व समीक्षकांनी खूप कौतुक केले.

हम तुम और वोह ह्या चित्रपटाच्या आधी त्यांना रोमँटिक भूमिका मिळाल्या नव्हत्या. पण ह्या सिनेमातली कल्याणजी आनंदजी ह्यांनी संगीत दिलेली गाणी प्रसिद्ध झाली. तसेच १९७३ साली आलेल्या ‘परछाइयां’ ह्या चित्रपटातील ‘सांसो मी कभी’ हे गाणं जेव्हा लोकांना खूप आवडलं तेव्हा त्यांना रोमँटिक चित्रपटांच्या ऑफर येणे सुरु झाले.

१९७३ ते १९८२ ह्या काळात विनोद खन्ना ह्यांनी मुख्य अभिनेता म्हणून अनेक चित्रपटांत भूमिका केल्या. त्यातील ‘फरेबी’, ‘हत्यारा’ हे चित्रपट मौशुमी चॅटर्जी ह्यांच्याबरोबर, लीना चंदावरकर ह्यांच्याबरोबर १९७५ साली कैद व १९८० साली ‘झालीम’ व १९७८ साली विद्या सिन्हा ह्यांच्याबरोबर ‘इनकार’ हे चित्रपट केले.

त्यांचे काही चित्रपट म्हणजे १९७३ सालचा योगिता बाली ह्यांच्याबरोबरचा ‘गद्दार’ , रेखा ह्यांच्याबरोबरचे ‘राजमहल’ आणि १९७७ सालचा ‘आप कि खातीर’, नीता मेहता ह्यांच्याबरोबरचा  ‘मै तुलसी तेरे आंगन की’, तसेच शबाना आझमी ह्यांच्याबरोबर ‘खून कि पुकार’ , ‘शक’ आणि ‘आधा दिन आधी रात’ , सायरा बानू ह्यांच्याबरोबर ‘आरोप’, परवीन बाबी आणि राखी ह्यांच्या बरोबर ‘ताकत’, ‘द बर्निंग ट्रेन’ , रीना रॉय ह्यांच्याबरोबर ‘जेल यात्रा’ आणि झीनत अमान ह्यांच्याबरोबर ‘दौलत’ हे चित्रपट केले. १९८० साली त्यांनी फिरोज खानच्या ‘कुरबानी’ ह्या चित्रपटात काम केले. हा चित्रपट त्या सालचा सर्वात यशस्वी चित्रपट होता.

Vinod-Khanna-marathipizza04
rushisbiz.com

विनोद खन्ना ह्यांची राजेश खन्ना ह्यांच्याशी चांगली मैत्री होती. त्यांच्याबरोबर त्यांनी ‘आन मिलो सजना’ ह्या चित्रपटात खलनायक साकारला तर ‘सच्चा झूठा’, ‘कुदरत’, ‘राजपूत’ आणि ‘प्रेम कहानी’ ह्यात त्यांनी राजेश खन्ना ह्यांच्यासह चरित्र भूमिका केल्या.

विनोद खन्ना ह्यांनी ४७ मल्टी हिरो चित्रपटात भूमिका केल्या आहेत. त्यात अमिताभ बच्चन, शशी कपूर, रणधीर कपूर, सुनील दत्त , जितेंद्र, धर्मेंद्र ह्यांच्या बरोबर काम केले आहे. अमिताभ बच्चन ह्यांच्याबरोबर त्यांनी अनेक चित्रपट केले.

१९८२ साली ते ओशो रजनीश ह्यांचे अनुयायी झाले व ५ वर्षांसाठी त्यांनी चित्रपटांतून ब्रेक घेतला. त्यानंतर १९८७ साली त्यांनी ‘इन्साफ’ ह्या चित्रपटाद्वारे पुनरागमन केले. त्यांचे गाजलेले चित्रपट म्हणजे ‘अमर अकबर अँथनी’, ‘हेरा फेरी’, ‘हाथ कि सफाई’, ‘मुकद्दर का सिकंदर’, ‘कुरबानी’, ‘मेरा गाव मेरा देश’, ‘मेरे अपने’, ‘सत्यमेव जयते’, ‘दयावान’, ‘परवरीश’, ‘आन मिलो सजना’, ‘चांदनी’, ‘खून पसीना’, ‘अचानक’, ‘द बर्निंग ट्रेन’, ‘कैद’, ‘रिहाई’, ‘जुर्म’, ‘लहू के दो रंग’, ‘कच्चे धागे’, ‘फरिश्ते’, ‘शक’, ‘इम्तिहान’, ‘लेकीन’, ‘इन्साफ’,’ इन्सान’, ‘बटवारा’, ‘कुदरत’, ‘पूरब और पश्चिम’, ‘क्षत्रिय’ ते अलीकडे ‘दबंग’, ‘वॉन्टेड’, ‘रेड अलर्ट –द वार विदिन’, ‘दीवानापन’ , ‘पेहचान- द फेस ऑफ ट्रुथ’, ‘रिस्क’ आणि ‘दिलवाले’ हे आहेत. त्यांनी ‘godfather’ ह्या एका पाकिस्तानी चित्रपटात सुद्धा २००७ साली भूमिका केली होती.

त्यांच्या ३० वर्षांच्या यशस्वी कारकिर्दीसाठी त्यांना १९९९ साली फिल्मफेअरचा लाईफटाईम अचिव्हमेंट पुरस्कार देण्यात आला.

Vinod-Khanna-marathipizza05
indiatimes.com

१९९७ साली ते भारतीय जनता पक्षात जॉईन झाले आणि गुरुदासपूर ह्या पंजाब मधील मतदारसंघातून ते लोक सभेत निवडून आले. जुलै २००२ मध्ये युनियन मिनिस्टर म्हणून त्यांची निवड झाली. त्यानंतर त्यांची मिनिस्टर ऑफ स्टेट ह्या महत्वाच्या पदी निवड झाली. २०१४ सालच्या लोकसभा निवडणुकीत ते परत गुरुदासपूरहून निवडून आले.

विनोद खन्ना ह्यांनी गीतांजली ह्यांच्याशी १९७१ साली विवाह केला होता. त्यांना राहुल खन्ना व अक्षय खन्ना हि दोन मुले आहेत. हे दोघेही चित्रपटसृष्टीत नावाजलेले अभिनेते आहेत. त्यानंतर काही कारणामुळे त्यांचा घटस्फोट झाला व १९९० साली त्यांनी कविता ह्यांच्याची विवाह केला. त्यांना साक्षी व श्रद्धा हि दोन अपत्ये आहेत.

विनोद खन्ना ह्यांना त्यांच्या कारकिर्दीत तीन वेळा ‘हेरा फेरी’, ‘मुकद्दर का सिकंदर’ व ‘कुर्बानी’ साठी फिल्मफेअरचे नॉमिनेशन मिळाले होते. त्यांना सर्वोत्कृष्ट सहायक अभिनेता म्हणून हाथ कि सफाई ह्या चित्रपटासाठी १९७५ साली फिल्मफेअर पुरस्कार मिळाला होता.

Vinod-Khanna-marathipizza07

अतिशय उत्कृष्ट अभिनय असलेल्या विनोद खन्ना ह्यांचा चाहतावर्ग अफाट आहे. त्या काळी ते मुलींचे हार्टथ्रोब म्हणून ओळखले जात असत. अतिशय चतुरस्त्र अशा अभिनेत्याला काळाने एप्रिल २०१७ मध्ये आपल्यातून हिरावून नेले.

आमचं युट्यूब चॅनल आणि त्यावरचे व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला फॉलो करा :

 

===

व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल

इनमराठीच्या अपडेट्स शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

InMarathi.com वर विविध लेखकांनी व्यक्त केलेले विचार ही त्यांची वैयक्तिक मतं असतात. InMarathi.com त्या मतांशी सहमत असेलच असं नाही. | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटरइंस्टाग्राम | टेलिग्रामशेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.

error: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?