'माणसाने मुळाच्या शोधात राहावे आणि सिंचनाचे विसरू नये : जाऊ तुकोबांच्या गावा : भाग २३

माणसाने मुळाच्या शोधात राहावे आणि सिंचनाचे विसरू नये : जाऊ तुकोबांच्या गावा : भाग २३

आमच्या इतर लेखांच्या अपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या फेसबुकपेजला नक्की Like करा: facebook.com/InMarathi

===

मागील भागाची लिंक: जाऊ तुकोबांच्या गावा : भाग २२

===

jave-tukobanchya-gaava-marathipizza01

पूर्वरंगच नव्हे तर सारे कीर्तनच नारायणाने अतिशय गांभीर्याने केले. उत्तररंगात आख्यानाच्या वेळी तो थोडे अधिक गायला पण वाहावत गेला नाही. रात्री अंथरुणावर पडताना त्याला आपण स्वतःवर घालून घेतलेले बंधन आपण व्यवस्थित पाळू शकलो याचे समाधान वाटत होते.

पहाटे गाव जागे व्हायच्या आतच त्याने आबा आणि गाडीवानाला उठवले आणि गावकऱ्यांकडून कदाचित आदरसत्कार झाला असता तो टाळून तिघे मार्गाला लागले. थोड्या वेळाने उगवतीला तांबूस रंग भरू लागला. पक्ष्यांची किलबिल चालू झाली आणि आबालाही कंठ फुटला. म्हणू लागला,

बुवा, देहूत अंधार व्हता न्हाई? आता बघा, उजाडू लागलंया.

आबा काय म्हणतो आहे नारायणाच्या लगेच लक्षात आलं. तो म्हणाला,

त्या रात्री काशीबाईकडून आपण निघाल्यावर मोठ्या विजा चमकल्या, त्याचा परिणाम झाल्याशिवाय कसा राहील?

आबा म्हणतो,

लयी नशीबवान तुमी. पावन झाला म्हना. आदी सांगनारं कुनी नसतंय आणि सांगितलं कुनी तर काई बी सांगत्यात. म्यां लय लोक पाह्यलुया. बोलन्यात कमी नसत्यात. पन तुकोबाचं येगळं हाय. ह्यो अनुभव सांगतुया. सादं बोलनं न्हवे ते. द्येवाची वानीच म्हना.

नारायण म्हणाला,

ते सारं खरं पण वाईट वाटतं की हा प्रसंग खूप आधी घडायला हवा होता. आयुष्याची बरीच वर्षे वायां गेली.

आबा उत्तरला,

आसंच हुतं. तुम्हास्नी तर तुकोबा म्हाईत हुते. माला अाताच कळले. तुमी येऊन जाऊन हुतां. तरी बी आसं झालं. मंजी आपल्यांत शिकन्याचं बीज आसलं तरी काई उपेग न्हाई. आपलं मन जाया हवं तिकडं जायीतच न्हाई. येर गोष्टींतच फिरत राहतुया. म्हंजी बीज हाय, माती बी हाय आन पानी बी हाय. पन पानी हवं तितं पडत न्हाई. मग झाड यावं कसं? माजं आसं झालं. तुमचं जरा येगळं. तुमचं झाड उगिवल्येलं हाय. पन पानी मुळांस्नी मिळत न्हाय. म्हंजी उपद्येश हुताच पन हवा तितं पोचलाच न्हाई. तुकोबांचा आभंगच हाय.

 

सिंचन करितां मूळ । वृक्ष ओलावे सकळ ।।
नको पृथकाचे भरी । पडों एक मूळ धरीं ।।
पाणचोऱ्याचें दार । वरिल दाटावें तें थोर ।।
वश झाला राजा । मग आपुल्या त्या प्रजा ।।
तुका ह्मणे धांवा । आहे पंढरी विसावा ।।

 

नारायण म्हणाला,

याचा अर्थ आता मी सांगतो. ज्ञानदेवीच्या सुरुवातीस गुरुवंदनेत ज्ञानदेव म्हणतात,

 

ह्मणौनी जाणतेने गुरु भजिजे । तेणे कृतकार्य होईजे ।
जैसे मूळ सिंचने सहजे । शाखापल्लव संतोषती ।

 

ज्ञानदेवांच्या ह्या ओवीचा तुकोबांनी अभंग केलेला दिसतोय. ते म्हणत आहेत, मुळाला पाणी घातले तरच वृक्ष ओलावणार. हा दाखला सारखा लक्षात ठेवून माणसाने मुळाच्या शोधात राहावे आणि सिंचनाचे विसरू नये. दृष्टीला बरेच काही वेगवेगळे (पृथक) दिसत असते. जे दिसते त्याचे आकर्षण वाटते. मग त्याच्या भरीला आपण पडतो. तसे होऊ देऊ नये. न दिसणाऱ्या मुळाची ओढ राखावी. ही सृष्टी अशी पृथक, मोहमयी आहे. पण ती प्रजेसारखी आहे. तिचा विस्तार आणि त्यातील भेद इतका आहे की तुम्ही तिला कधीच जिंकू शकणार नाही. तिचा नाद सोडा आणि एक साधी गोष्ट करा. तिच्या राजालाच जिंका. राजाला जिंकलेत की प्रजा आपली होणार हे काय सांगायला हवे? आणि अजून एक. सांगितले हे करायला उशीर करू नका. लगोलग निघा! धावा!

नारायण असे बोलत असता त्याला आबाने अडवले,

बुवा, ह्ये सारं बरबर हाय पन ह्ये सांगा की पंढरीला कशापायी धांवा म्हनत्यात? हाय काय पंढरीत? येक देऊळ. त्येंत दगडाची मूर्ती. तिला म्हनायचं इठोबा. तो काय करीत न्हाय. म्यां इचारलं तुकोबांस्नी. तर त्येंनी काई काई सांगितलं पन माज्या डोस्क्यात ते काई शिरत न्हाई. अजून इचारलं तर म्हनत्यात,

 

आहे देव ऐसी वदवावी वाणी । नही ऐसा मनी अनुभवावा ।।
ह्यो अभंगाचा अर्थ जो कुनी सांगंल त्येचे पायच धरन्हार हाय म्यां.

हे सारे ऐकून मुकाट्याने बैलगाडी हाकणारा म्हणतो,

बुवा, आबाच ह्यो प्रश्नाचे उत्तर शोधून काढतील बघा. मला काल जेवताना सारं कळलं हाय.

नारायण म्हणतो,

काय रे सगळं कळलं तुला?

गाडीवान म्हणतो,

काल तुम्ही आमच्या पंगतीतली गानी ऐकली असतीलच की. कोनचं लक्ष्यात राह्यलं सांगा?

नारायण उत्तरला,

सगळे चांगलेच गात होते की. तरी…. एक गाणं विशेष होतं. आणि तो माणूस गायलाही छान. खरं तरं मी त्याला भेटणार होतो पण निघायची घाईच इतकी झाली की ते काम राहूनच गेलं. तो म्हणत होता,

 

अन्नासवे झाली भेटी । पडली श्री हरिची गाठी ।।
त्या माणसाचं नाव तरी कळायला हवं होतं.”

गाडीवान म्हणाला,

आबा ओळखतात त्याला. आबा सांगा हो कोन गात व्हता ते.

यावर आबा काही बोले ना. नारायणाने खूपच आग्रह केला तेव्हा आढेवेढे घेत तो म्हणाला,

पांडुरंग गायला!

आबा काय बोलला ते कळायला नारायणाला यावेळी एक क्षण जास्त गेला. मग त्याने विचारले,

पांडुरंग गायला ती रचना कुणाची होती?

आबा खालच्या आवाजात खालमानेनेच म्हणाला,

पांडुरंगाचीच हुती आन् पांडुरंगच गायला!

हे ऐकताच गाडीवानाला सांगून नारायणाने गाडी थांबविली, आबाला हाती धरून खाली उतरविला आणि चक्क त्याच्या पायावर डोके ठेवण्यासाठी वाकला! आबाने त्याला पुरा वाकू दिले नाही आणि म्हणाला,

आवं, काय करतया काय तुमी?

नारायण म्हणाला,

आबा, तुम्ही खरेच तुकोबांचे शिष्य शोभता. तुम्ही विचारता ते प्रश्न मी ऐकले पण तुम्ही गाताही छान आणि रचनाही केलीत आयत्या वेळी. मी तुम्हाला पूर्ण ओळखले नाही हेच खरे.

हे ऐकून आबा म्हणाला,

बुवा, चार महिनं तुकोबांच्या संगती राह्यलो म्हनून दोन शब्द गेले म्हना आन् द्या सोडून. ते काई बी खरं नव्हं. ल्हानपनी भजनी लोकांत जात हुतो म्हनून दोन सूर निघत्यात. येत काही बी न्हाई. बसा आता गाडीत आन् जाऊ फुडं.

गाडी पुढे निघाली तसा नारायण म्हणतो,

संतसंगतीला पर्याय नाही हेच खरं. तुमचा हा प्रकार पाहून माझी त्याबद्दल खात्रीच झाली. ती काशीबाईसुद्धा किती चांगली रचना करते! पण विचार केला तर यात विशेष काय? तुकोबांचा एक अभंग मला माहीत आहे….

 

प्रेमअमृते रसना ओलावली । मनाची राहिली वृत्ति पायीं ।।
सकळ ही तेथे वोळली मंगळें । वृष्टी केली जळें आनंदाच्या ।।
सकळ इंद्रिये झाली ब्रह्मरूप । ओतले स्वरूप माजी तया ।।
तुका ह्मणे जेथे वसे भक्तराव । तेथे नांदे देव संदेह नाही ।।

 

जेथे देव तेथे भक्त आणि जेथे भक्त तेथे देव. तुमचे पाहून, आबा, मला ह्या अभंगाचा थोडा अर्थ लागतोय. उदंड प्रेम करणाऱ्यालाच संत म्हटले पाहिजे नाही का? तुकोबांसारख्याना विचारले तर म्हणतील, ‘त्याच्या’ पायी वृत्ती ठेवली ना म्हणून जीभेवर ही रसना आली. सारी इंद्रिये त्याला वाहिल्यावर आनंदाची वृष्टी झाली त्यात नवल काय? असा भक्त जिथे भक्त वसेल तिथेच देव असेल ह्यात संदेह तो काय? आबा, ह्या चार महिन्यात तुम्ही खूप काही मिळविले असणार. आता रामकाकांकडे मी ही तुमच्याबरोबर राहतो. आपण मिळून अभ्यास करू. चालेल का तुम्हाला?

आबा म्हणाला,

आसं काय इचारता बुवा तुमी. तुमचे काका त्ये. मीच बाह्येरचा. संकोच माला होतु या. त्ये कसं आसतील? आपलं तितं कसं जुळावं? त्ये बामन. आपन तितं ग्येलेलं त्येंना आवडाया हवं. त्येंचं घरची लोक कसं म्हनतील? काल खूप इचार केला. मग मनाशी म्हनलं, न्हाई जमलं तर द्येतील परत पाठवून. तरी बरंच झालं म्हनायचं. पुन्ना यायाचं तुकोबांशी. त्ये तर हायेतच की. पन आता तुमी ऱ्हातो म्हनतया तर तसंच करा. ही दुधात साकरच की. माला सांभाळून घ्या मंजी जालं!

असा सुखसंवाद होता होता रामेश्वरभटांचं घर आले सुद्धा!

===

(साताऱ्यातील दैनिक ऐक्यच्या सौजन्याने त्यांच्या रविवार पुरवणी ‘झुंबर’ ह्यात प्रकाशित होणारी ‘जाऊ तुकोबांच्या गावा’ ही लेखमाला पुन:प्रकाशित करत आहोत.)

 

लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com तसेच, आमच्या लेखांच्या अपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या फेसबुकपेजला नक्की Like करा: facebook.com/InMarathi

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?