' करियर संपले अशी भीती असतानाही दमदार पुरागमन आणि रचला विश्वविक्रम! – InMarathi

करियर संपले अशी भीती असतानाही दमदार पुरागमन आणि रचला विश्वविक्रम!

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम शेअरचॅट

व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल 

===

भारत विरुद्ध न्यूझीलंड कसोटी मालिका नुकतीच संपली. पहिल्या सामन्यात थोडक्यात विजय हुकला आणि सामना अनिर्णित राहिला. मात्र भारतीय संघाने दुसऱ्या सामन्यात दणदणीत विजय मिळवत मालिका खिशात घातली.

एजाज पटेल याने एकाच डावात भारताचे १० गडी बाद करत विश्वविक्रमाला गवसणी घातली खरी, पण तेवढी एक गोष्ट सोडली तर न्यूझीलंडचा संघ ही मालिका लवकरात लवकर विसरण्याचा प्रयत्न करेल.

 

ajaz patel featured inmarathi

 

दुसऱ्या कसोटीत न्यूझीलंडच्या संघाची दाणादाण उडवण्यात महत्त्वाची भूमिका बजावली ती रविचंद्रन अश्विन याने. दोन्ही डावात प्रतिस्पर्ध्यांचे ४ गडी बाद करत त्याने गोलंदाजीत महत्त्वपूर्ण भूमिका पार पाडली. वेळ पडली तर उपयुत फलंदाजी करू शकणारा अश्विन, भारतीय कसोटी संघाचा अविभाज्य घटक आहे.

मात्र मागच्या वर्षी याच खेळाडूला स्वतःच्याच भविष्याविषयी शंका वाटली होती. गेल्या वर्षी म्हणजेच २०२० मधील फेब्रुवारी महिन्यात न्यूझीलंडविरुद्धच्या सामन्यात अश्विनला संघाबाहेर ठेवण्यात आलं. तिथेच त्याच्या मनात शंकेची पाल चुकचुकली. तो मनाने काहीसा खचला, त्याला भविष्याची चिंता वाटू लागली.

आमचं युट्यूब चॅनल आणि त्यावरचे व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला फॉलो करा :

याच अश्विनने नुकत्याच संपलेल्या मालिकेत एका विक्रमाला गवसणी घातली आहे. हा विक्रम कुठला, ते क्रिकेटप्रेमींना ठाऊक असेलच; पण संघातील स्थान गमावल्यावर खचून गेलेल्या अश्विनने पुनरागमन करण्याची जिद्द नेमकी मिळवली कुठून?

 

r ashwin inmarathi

हरभजनकडून प्रेरणा :

कॅरम बॉल टाकू शकणाऱ्या अश्विनची गोलंदाजी खेळताना भल्याभल्या फलंदाजांची आजही भंबेरी उडते. वयाची पस्तिशी गाठली असली, तरी त्याच्या फिरकीची धार अजून कमी झालेली नाही. या फिरकीच्या बरोबरीने अश्विन कामचलाऊ फलंदाजी करण्यात सुद्धा पटाईत आहे.

एक काळ असा होता, की ऑफस्पिनरच नव्हे तर गोलंदाज होण्याचीसुद्धा अश्विनची इच्छा नव्हती. फलंदाजीकडे त्याने लक्ष केंद्रित केलं होतं. एक दर्जेदार फलंदाज असणारा अश्विन चक्क सलामीवीर म्हणून फलंदाजी करत असे.

२००१ साली मात्र एक किमया घडली. भारताने कसोटीत ऐतिहासिक विजय मिळवला. द्रविड आणि लक्ष्मणच्या दमदार फलंदाजीनंतर हरभजनच्या फिरकीने ऑस्ट्रेलियन फलंदाजांना एका वेगळ्याच तालावर नाचवलं.

ऑस्ट्रलियाची फलंदाजी साफ झोपली, पण अश्विनच्या मनात एका ऑफस्पिन गोलंदाजाने जन्म घेतला.

हरभजनच्या जादुई गोलंदाजीने अश्विनला भुरळ घातली आणि त्याने फिरकी गोलंदाजीला सुरुवात केली. आज त्याच ऑफस्पिनच्या जोरावर, हरभजनच्या कसोटी विकेट्सचा आकडा त्याने मागे टाकलाय. अगदी बरोबर, हाच विक्रम तुम्हाला माहित असेल असं मगाशी आम्ही म्हणालो होतो.

harbhajan inmarathi

 

८१ कसोटी सामन्यात ४२७ विकेट्स घेत अश्विनने ४१७ गडी बाद करणाऱ्या हरभजनला मागे टाकलंय. न्यूझीलंडविरुद्ध पहिल्या कसोटीतच त्याने हरभजनला ओव्हरटेक केलं.

भारतीय गोलंदाजांची यादी मांडायची झाली, तर माजी कर्णधार कपिल देव आणि जम्बो म्हणजेच अनिल कुंबळे हे दोनच गोलंदाज या यादीत अश्विनहून वरच्या स्थानावर दिसतील. कपिल देव यांचा ४३४ विकेट्सच्या आकडा सुद्धा अश्विन लवकरच मागे टाकेल यात शंका नाही.

लॉकडाऊन आणि शंका-कुशंका :

गेल्या वर्षी फेब्रुवारीच्या अखेरच्या दिवशी सुरु झालेल्या कसोटी सामन्यातून अश्विनला वगळण्यात आलं. त्यानंतर कोरोना काळात लॉकडाऊनचं संकट उभं ठाकलं आणि अश्विनची चिंता वाढली असं त्याने म्हटलं आहे.

पहिल्या कसोटी सामन्यानंतर, संघसहकारी श्रेयसशी बातचीत करताना, अश्विनने तो किती तणावाखाली होता याविषयी माहिती दिली. गेल्या दोन वर्षात आयुष्यात आलेले चढउतार आणि गटांगळ्या खाणारं क्रिकेट करिअर पाहून अश्विन खचून गेला होता.

 

ashwin inmarathi

 

टी-२० आणि वनडे संघातील स्थान केव्हाच गमावलं असल्याने, भारतीय संघाचं प्रतिनिधित्व करण्यासाठी कसोटी हा एकमेव फॉरमॅट उरला होता. त्यातही कसोटी संघात सुद्धा स्थान मिळेल का, याबद्दल अश्विनला शंका वाटत होती.

“आपलं करिअर संपलं असल्याची भावना मनात येऊन गेली होती.” असं अश्विनने श्रेयसशी बोलताना सांगितलं. आयपीएलमधील दिल्ली कॅपिटल्स या संघाच्या कर्णधारपदाची माळ श्रेयस अय्यरच्या गळ्यात पडली आणि आपल्या नशिबाचे फासे पलटले असंही, या संवादादरम्यान अश्विनने गंमतीत म्हटलं होतं.

टी-२० संघात पुनरागमन :

श्रेयसच्या कर्णधारपदाबद्दल बोलणारा अश्विन त्यावेळी दिल्ली कॅपिटल्स संघाचा सदस्य होता. आयपीएलच्या स्पर्धेत चांगली कामगिरी करत अश्विनने पुन्हा एकदा आपली चांगली छाप पाडली. त्यावेळी या संघाचा कर्णधार अय्यरच होता. म्हणेजच श्रेयसचं कर्णधारपद त्याच्या पथ्यावर पडलं असं म्हणायला हरकत नाही.

गेल्या हंगामात अश्विनने अधिकच दमदार कामगिरी केली. या उत्तम कामगिरीची बक्षिशी म्हणून, त्याला थेट भारताच्या वर्ल्डकप टीममध्ये स्थान मिळालं. तब्बल ४ वर्षांनंतर संघात पुनरागमन करणाऱ्या अश्विनच्या निवडीविषयी अनेकांनी प्रश्नचिन्ह निर्माण केलं होतं.

 

r ashwin 2 inmarathi

 

अश्विनने मात्र या सगळ्या गोष्टींकडे अजिबातच लक्ष दिलं नाही, असं म्हणायला हवं. वर्ल्डकप दौऱ्यावर जाऊन आल्यानंतर अश्विनने कसोटी संघात सुद्धा पुनरागमन केलं. नुसतंच पुनरागमन केलं नाही, तर त्याने भन्नाट गोलंदाजी करत आपली निवड योग्य असल्याचं सिद्ध केलं.

हरभजनला मागे टाकत सर्वाधिक कसोटी विकेट्सच्या भारतीय गोलंदाजांच्या यादीत तिसऱ्या स्थानावर पोचला. याशिवाय दुसऱ्या कसोटीत जडेजाच्या अनुपस्थितीत त्याने भारतीय फिरकी गोलंदाजीचं नेतृत्व सुद्धा केलं.

अश्विनच्या गोलंदाजीची आकडेवारी

आजवर ८१ कसोटी सामने खेळलेल्या अश्विनने ४२७ फलंदाजांना तंबूचा रस्ता दाखवला आहे. यात त्याने ३० डावांमध्ये ५ किंवा त्यापेक्षा अधिक फलंदाज बाद करण्याची कामगिरी केली आहे. वनडे आणि टी-२० सामन्यांमध्ये सुद्धा त्याने आपली छाप सोडली आहे.

 

ashwin bowler inmarathi

 

१११ एकदिवसीय सामन्यांत त्याने १५० गडी बाद केले असून, ५१ टी-२० आंतरराष्ट्रीय सामन्यांमध्ये ६० जणांना माघारी धाडलं आहे. कसोटी सामन्यांमधील त्याचं धडाकेबाज पुनरागमन, म्हणजे भारतीय संघासाठी आनंदाची बाब म्हणायला हवी. त्याच्या अनुभवाचा फायदा भारतीय संघ आणि इतर तरुण गोलंदाजांना सुद्धा होईल हे नक्की.

पुन्हा एकदा कसोटी संघाचा अविभाज्य भाग झालेला रविचंद्रन अश्विन आता कपिल देव यांच्या ४३४ विकेट्सचा आकडा कधी मागे टाकतो, याकडे भारतीय क्रिकेटप्रेमींचं लक्ष नक्कीच असणार. अश्विनला त्याच्या पुढील कारकिर्दीसाठी शुभेच्छा…

===

आमचं युट्यूब चॅनल आणि त्यावरचे व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला फॉलो करा :

===

व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल

इनमराठीच्या अपडेट्स शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम  | टेलिग्राम शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.

error: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?