' समुद्रात अडकलेल्या व्यापाराच्या मदतीला धावून आले शिवशंकर, वाचावी अशी पुराणकथा – InMarathi

समुद्रात अडकलेल्या व्यापाराच्या मदतीला धावून आले शिवशंकर, वाचावी अशी पुराणकथा

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम शेअरचॅट

व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल 

===

भारत आणि आजूबाजूच्या देशांमध्ये देखील भगवान शंकरांची अनेक तीर्थस्थाने आपल्याला बघायला मिळतात. शिव मंदिरातील शांतता- गंभीरता भक्तांना शिवाच्या चरणी लीन होण्यास भाग पडते हे नक्की! या प्रत्येक शिवालयाच्या स्थापनेमागे एक कहाणी जरूर दडलेली आहे.

आमचं युट्यूब चॅनल आणि त्यावरचे व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला फॉलो करा :

असाच अनेक कथा आणि गुपिते लपवून ठेवणारा प्रांत म्हणजे ‘कोकण’. जितका रमणीय, निसर्गाने नटलेला तेवढाच गूढ. इथेच एक शिवालय आहे जे कोकणातील धार्मिक इतिहासाचा मुकुटमणी आहे. कोणते आहे हे शिवालय? चला जाणून घेऊया.

सिंधुदुर्ग जिल्ह्यातील देवगडच्या दक्षिणेस २० किमी. वर असलेले श्री क्षेत्र कुणकेश्वर निसर्गरम्य सौंदर्यस्थळ आणि दक्षिण काशी म्हणून समजले जाते.

 

kunkeshwar temple inmrathi

 

एसटी थांबते तेथून अवघ्या ५-७ मिनिटांच्या अंतरावर असणार्‍या मंदिराचा कळस लक्ष वेधून घेतो. ऐन किनाऱ्याशी असणाऱ्या उंचवट्यावर उभारलेल्या या मंदिराचा सागराकडील भाग भक्कम तटाने सुरक्षित राखला आहे.

८-९ मीटर उंचीच्या या तटावर असणार्‍या सपाट जागेवर मंदिर आहे. खाली जांभ्या दगडाची फरशी आहे. हे मंदिर ११ व्या शतकात बांधले गेले असे मानले जाते. मंदिराचे संपूर्ण बांधकाम अत्यंत कलात्मक आहे. अशा या कुणकेश्वर मंदीराचा इतिहास सुद्धा तितकाच प्राचीन, रोमांचकारी आणि रहस्यमय असा आहे.

या मंदिराच्या निर्मितीची एक कथा सांगितली जाते. फार पूर्वी एक इराणी व्यापारी आपले गलबत घेऊन अरबी समुद्रामार्गे जात होता. सारे काही सुरळीत आहे असे वाटत असताना अचानक मोठे वादळ सुरु झाले. पाहता पाहता काही दिसेनासे झाले. या वादळात त्याचे गलबत भरकटले.

 

kunkeshwar temple inmarathi

 

या भरकटलेल्या जहाजाला थांबविण्यासाठी कोठे किनारा दिसतो का याचा तो व्यापारी शोध घेऊ लागला. याच वेळी त्या प्रचंड वादळात त्याला लांबवर एक लुकलुकणारा दिवा दिसला. त्या दिव्याच्या दिशेने त्याने आपले गलबत महत्प्रयासाने नेले.

घोंघावणाऱ्या वादळातही न विझता त्या व्यापाऱ्याला सुखरूप किनाऱ्यावर आणणारा तो दिवा म्हणजे शंकराच्या छोट्याशा मंदिरातील पणती होती. कृतज्ञतेपोटी त्या व्यापाऱ्याने या ठिकाणी मंदिराची उभारणी केली.

ही बातमी इराणच्या शहाच्या कानावर गेली आणि त्याने व्यापार्‍याविरुद्ध फरमान काढले. घाबरून जाऊन त्या व्यापार्‍याने जवळच्या टेकडीवरून उडी मारून आत्महत्या केली. त्याची कबर मंदिर परिसरात आहे.

 

kunkeshwar temple inmarathi1

 

काही इतिहास संशोधक ही कथा खोटी असल्याचे सांगतात. त्यांच्या मते, इस्लामी आक्रमणात हे मंदिर उध्वस्त होऊ नये यासाठी हे हिंदू मंदिर वाटू नये म्हणून ही कबर बांधण्यात आले असावी.

या मंदिराशी जोडलेली दुसरी दंतकथा अशी की अज्ञातवासात असताना पांडव या भागातून प्रवास करत होते. तेव्हा या भागातील पवित्रता पाहून त्यांनी इथे प्रतिकाशी तयार करायचे ठरवले.

एका रात्रीत त्यांना १०८ शिवलिंगे तयार करायची होती. तशी त्यांनी तयारी देखील सुरू केली होती, पण असे जर घडले तर काशीचे महत्त्व कमी होईल म्हणून स्वत: काशीविश्वेश्वराने कोंबड्याच्या रूपात येऊन बांग दिली. तेव्हा पहाट झाली असे वाटून पांडव तेथून निघून गेले, पण त्यांनी बनवलेली २१ शिवलिंगे आज ही तिथे बघायला मिळतात.

कुणकेश्वर मंदिराच्या पूर्वेला डोंगर उतारावर खोदकाम करताना १९२० साली एक गुहा सापडली. ही गुहा जांभ्या दगडात कोरून काढलेली आहे. आत १८ कोरीव मुखवटे, शिवलिंग आणि नंदी मिळून २० मूर्ती आहेत.

 

kunkeshwar temple inmarathi2

 

मुखवट्यांची मांडणी जोडी जोडीने केलेली आहे. पुरूष व स्त्री अशा ८ जोड्या आणि एक तरूण पुरुषाचा मुखवटा स्वतंत्र बसवलेला आहे. एका पुतळ्याची नासधूस झाल्यामुळे तो पुरूषाचा आहे की स्त्रीचा हे नीट ओळखता येत नाही.

गुहेतील मूर्ती या देवतांच्या मूर्ती नसून राजघराण्यातील स्त्री पुरूषांचे ते मुखवटे आहेत. त्यांचे कोरीव काम उच्च दर्जाचे दिसून येते. प्रत्येक मुखवट्याला राजास आणि राजघराण्यातील स्त्रीपुरूषांस शोभेल असाच पेहराव केलेला आहे. प्रत्येक मुखवट्यास शिरपेच, तुरा, मोत्याचे पेड दाखविले आहेत.

या मूर्ती गुहेत कोरलेल्या नसून स्वतंत्रपणे मांडलेल्या आहेत. यासंदर्भात संशोधन सुरू आहे. अत्यंत निसर्गरम्य तरीही शांत असलेले हे ठिकाण पर्यटकांचे लाडके आहे.

कुणकेश्वर जवळ तारकर्ली हा अतिशय स्वच्छ आणि सुंदर समुद्रकिनारा आहे. तेव्हा कुणकेश्वर आणि तारकर्ली असा बेत तुम्ही आखू शकता. आता कुणकेश्वर भक्त मंडळानेही तिथे भक्तनिवास उभारले असून तिथेही राहण्याची उत्तम सोय होते. जेव्हा मनाला शांतता हवी असेल तेव्हा थोडा वेळ हाताशी ठेवून कुणकेश्वर गाठावे आणि ‘चिदानंद रूपं शिवोहम शिवोहम’ या स्थितीचा अनुभव घ्यावा.

===

आमचं युट्यूब चॅनल आणि त्यावरचे व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला फॉलो करा :

व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल

इनमराठीच्या अपडेट्स शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम  | टेलिग्राम शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.

error: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?