' गद्दाराला शोधून काढू आणि शिक्षाही देऊ, असा शब्द देणारे बाळासाहेबांचे “ठाणे”दार! – InMarathi

गद्दाराला शोधून काढू आणि शिक्षाही देऊ, असा शब्द देणारे बाळासाहेबांचे “ठाणे”दार!

आ़मचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम शेअरचॅट

व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल 

===

ठाण्यात शिवसेना रुजवली आणि ठाणे हा शिवसेनेचा अभेद्य बालेकिल्ला बनवला तो खर्‍या अर्थानं स्व. आनंद दिघे यांनी! ठाण्याच्या सामान्य जनतेचा तारणहार असा हा शिवसेनेचा नेता लहानपणापासून बाळासाहेब ठाकरे यांची सेंट्रल मैदानावाची तडफदार भाषणं ऐकत होता. सेनेचं बाळकडू अंगात पूर्ण भिनलेला असा हा सच्चा शिवसैनिक होता.

आजही आनंद दिघे ही केवळ ठाणे शिवसेनेची ओळख नाही तर सामान्य जनतेत आदरभावानं, मायेनं, आपुलकीनं घेतलं जाणारं नाव आहे. ठाण्यात शिवसेना अजबूत करण्याचं श्रेय आनंद दिघे यांना जातं. आजही या नावाचा दबदबा कायम आहे याचं कारण दिघेंच्या तालमीत तयार झालेली कार्यर्त्यांची फळी. प्रखर हिंदुत्व म्हणजे आनंद दिघे, सामान्यांचे तारणहार आनंद दिघे आणि ज्यांची साक्षात प्रती बाळासाहेब अशी प्रतिमा होती ते आनंद दिघे!

 

anand inmarathi

 

आनंद चिंतामणी दिघे २७ जानेवारी १९५२ रोजी जन्मले आणि ठाण्यातल्या गजबजलेल्या टेंभी नाका परिसरात लहानाचे मोठे झाले.

घरापासून अगदी हाकेच्या अंतरावर असणार्‍या सेंट्रल मैदानावर त्या काळात बाळासाहेब ठाकरे यांच्या सभा होत असत. बाळासाहेबांच्या कर्तृत्वाचा आणि शिवसेनेच्या सळसळत्या तारूण्याचा तो काळ होता. शेकडो, हजारो तरूण बाळासाहेब या व्यक्तित्वावर भाळून आणि त्यांच्या विचार, वक्तव्यानं भारावून जाऊन शिवसेनेत सहभागी होत होते.

मुंबई हा शिवसेनेचा मुख्य तळ होता आणि मुंबईला खेटून असणार्‍या ठाण्यात आनंद चिंतामणी दिघे नावाचा तरूण ठाण्यात शिवसेना तळागाळात रूजविण्यासाठी धडपडत होता. बाळासाहेबांच्या एका इशार्‍यासरशी जिवाची पर्वा न करता मैदानात उतरणारी कार्यकर्त्यांची फळी असण्याचा तो काळ होता. असाच एक सच्चा शिवसैनिक म्हणजे आनंद दिघे!

 

anand dighe inmarathi

 

आमचं युट्यूब चॅनल आणि त्यावरचे व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला फॉलो करा :

सामान्य मराठी मुंबईकराची शिवसेना होती. त्यांच्या छोट्या छोट्या न्याय हक्कांसाठी प्रसंगी रस्त्यावर उतरून सरकारला धारेवर धरण्याची ताकद या पक्षात आनंद दिघेंसारख्या प्रखर कार्यकर्त्यांमुळेच होती. बाळासाहेबांच्या आदर्शावर चालत आनंद दिघे यांनी ठाण्यात इतकं प्रचंड काम केलं की सामान्यांना प्रशासनाचा वाटत नसे इतका आधार आनंद दिघे यांचा वाटत असे.

बघता बघता सामान्य कार्यकर्ता असणार्‍या दिघेंचं ठाण्यातलं प्रस्थ वाढत गेलं. त्यांच्या रहात्या घराजवळच त्यांनी आनंदाश्रमची स्थापना केली. आजही ही वस्तू या ठिकाणी उभी आहे. सामान्यांच्या अडचणी ऐकण्यासाठी, त्यावर तोडग्याची चर्चा करण्यासाठी आनंद दिघे रोज जनता दरबार भरवत असत. त्यांच्या या जनता दरबाराची चर्चा तेंव्हा सर्वत्र होती.

ठाण्याचे प्रती बाळासाहेब अशी त्यांची ओळख बनली होती. आपल्या तक्रारी त्यांना ऐकविण्यासाठी लोक अक्षरश: सकाळी सहा वाजल्यापासूनच रांग लावून बसत असत. केवळ ठाणे शहरातीलच नाही तर संपूर्ण जिल्ह्यातील लोक येऊन आपली गार्‍हाणी त्यांच्यासमोर गात असत आणि सामान्यांचे लाडके दिघेसाहेब या तक्रारी तात्काळ सोडवतही असत.

कामाव्यतिरिक्त एकत्र खालेला डबा, कौटुंबिक चर्चा, मिळून मिसळून राहणारे दिघे ठाणेकरांना कधी परके वाटलेच नाहीत असं म्हणतात.

 

anand dighe 1 inmarathi

 

आनंद दिघेंनी बेरोजगार तरूणांना रोजगार मिळवून दिले. ठाणे परिवाहन सेवेत मराठी मुलांना काम मिळवून देण्याचं श्रेय त्यांनाच जातं. याशिवाय छोटे मोठे स्टॉल्स, दुकानं उभी करण्यासाठी, लहान-मोठे व्यवसाय उभे करण्यासाठी दिघे तरूणांना मोकळेपणानं मदत करत असत. त्यांच्या या कार्यामुळेच आज त्यांच्या मृत्युनंतर दीड तप उलटून जाऊनही ठाणेकर त्यांना विसरलेले नाहीत.

शिवसेना शाखा झाली ‘घरकुल’

पक्षानं जिल्हा प्रमुख पदाची जबाबदारी त्यांच्यावर सोपविली आणि त्यांना कामातून डोकं वर काढायची फुरसत मिळेनाशी झाली. त्यांनी आपला मुक्काम आनंदाश्रमातील त्यांच्या पक्ष कार्यालयातच हलविला. कार्यकर्तेच जेवणाचा डबा घेऊन येत असत आणि तिथेच चार घास खाऊन दिघे पुन्हा कामाला लागत असत.

 

anand 1 inmarathi

 

त्यांनी जे अहोरात्र कष्ट घेऊन ठाण्यात सेनेसाठी काम केलं त्याची फ़ळं आज इतक्या वर्षांनंतरही पक्ष चाखतो आहे. आजही ठाणे हा शिवसेनेचा बालेकिल्ला समजला जातो आणि आजही आनंद दिघे यांचं स्मरण करूनच सामान्य सेना कार्यकर्ता काम करत असतो.

उत्सवांचा प्रणेता

शहराच्या विकासासाठी लढणारे, करारी, कणखर आनंद दिघे आपल्या धार्मिक उत्सवांबाबत प्रचंड हळवे आणि आग्रही होते. टेंभी नाक्यात नवरात्रोत्सव साजरा करण्याची कल्पनाही त्यांचीच! नऊ दिवस देवीच्या मंडपात राबणारे दिघे आजही कार्यकर्त्याना आठवतात. टेंभी नाक्याच्या देवीच्या दर्शनासाठी येणाऱ्या ठाणेकरांना दिघेंची आठवण आली नाही तरच नवल!

 

godess inmarathi

 

ठाणे आणि दहिहंडी हे समीकरण नवं नाही. मात्र यामागेही आनंद दिघेंचाच सक्रीय सहभाग होता. कोणत्याही धार्मिक उत्सवात राजकारण बाजूला सारून झोकून देऊन काम करणाऱ्या दिघेंना म्हणून ‘धर्मवीर’ म्हटलं जातं.

दिघेंना अटक झाली आणि…

१९८९ ची महापौर निवडणूक झाली आणि आनंद दिघे हे नाव पुन्हा एकदा राज्यात वाऱ्यासारखं पसरंल. अर्थात दिघे हे निवडणूकीसाठी उभे नव्हतेच तर प्रकाश परांजपे या उमेदवाराला पाठींबा देणारे, त्यांना जिंकून आणणारे भक्कम आधार होते.

या निवडणूकीत एका मताने परांजपे हरले. अर्थात शिवसेनेचे नगरसेवक फुटल्याने शिवसेनेला हा पराभव पत्करावा लागला हे कळताच ‘गद्दार कोण?’ असा प्रश्न बाळासाहेबांनी विचारला. त्या गद्दाराला शोधून काढू आणि शिक्षाही देऊ असं म्हणत आनंद दिघे पेटून उठले.

 

anand dighe 2 inmarathi

 

श्रीधर खोपकर या शिवसेनेच्या नगरसेवकांने फितूरी केल्याची चर्चा सुरु झाली आणि महिन्याभरात दिवसाढवळ्या ठाण्यात खोपकरांचा खून झाला. पुढे पोलिसांनी या प्रकरणी आनंद दिघेंना अटक केली आणि लवकरच त्यांना जामिनही मिळाला.

आनंद दिघेंच्या मृत्युपर्यंत ही केस सुरुच राहिली.

आनंद साहेब गेले हे कळताच ठाणं पेटलं

गणेशोत्सवाची धुम असतानाच कार्यकर्त्याच्या घरून निघालेल्या आनंद दिघे यांच्या गाडीला अपघात झाला. त्यांना खाजगी रुग्णालयात हलवण्यात आलं. पायावर शस्त्रक्रिया झाली मात्र प्रकृती खालावत गेली. 

२६ तारखेला संध्याकाळी त्यांना एकापाठोपाठ एत असे २ ह्रदयविकाराचे झटके आले आणि रात्री १० च्या सुमारास दिघे साहेबांची प्राणज्योत मावळली. पन्नास वर्षांचे तडफदार दिघे शिवसेनेला, कार्यकर्त्याला सोडून निघून गेले, कायमचे…

कार्यकर्ते तळमळत होते. अखेर धाडस करून उद्धव ठाकरे यांनी धाडस करून ”दिघे साहेब सोडून गेले” ही औपचारिक घोषणा केली आणि अस्वस्थ कार्यकर्त्यांनी हॉस्पिटलमध्ये जाळपोळ सुरु केली. 

 

anand dighe death inmarathi

 

बाळासाहेबांनी मुंबई बंदची हाक दिली तरी अनेक शहरांत गोंधळ झालाच. ठाण्यातील व्यापारी, दुकानदार यांनी स्वच्छेने दुकानं बंद केली. ठाण्यातील घराघरात शोक व्यक्त केला जाऊ लागला. 

ठाण्याचा आधारस्तंभ हरपला.

 

dighe inmarathi

 

पुढील अनेक दिवस दिघे साहेब भेटतील, आपल्या समस्या सोडवतील या आशेने महाराष्ट्रातील जनता आशेने त्यांच्या कार्यलयाजवळ जाऊन उभी राहायची. त्यांच्या पुतळ्याचं दर्शन घ्यायची आणि खालमानेने परतायची.

आमचं युट्यूब चॅनल आणि त्यावरचे व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला फॉलो करा :

===

व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल

इनमराठीच्या अपडेट्स शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम  | टेलिग्राम शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.

error: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?