' मधुचंद्र ठरला काळरात्र : त्याने क्रूर डाव साधला आणि…. – InMarathi

मधुचंद्र ठरला काळरात्र : त्याने क्रूर डाव साधला आणि….

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम शेअरचॅट

व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल 

===

लग्न करणाऱ्या बहुतेकांसाठी मधुचंद्र म्हणजे एक गोड गुलाबी स्वप्न असते. पण जेव्हा एका सुंदर कर्तबगार तरुणीसाठी तोच मधुचंद्र आयुष्याचा अकाली अंत होण्यासाठी कारणीभूत ठरतो तेव्हा दैवाच्या अनाकलनियतेचा प्रत्यय येतो.

मूळची भारतीय वंशाची, स्वीडन देशाची नागरिक असलेली ॲनी देवानी हिच्यासाठी दक्षिण आफ्रिकेतील तिचे मधुचंद्राचे दिवस आयुष्यातील अखेरचे दिवस ठरले. तिचे माहेरचे नाव ॲनी हिंदोचा होते.

 

shreyan inmarathi

 

भारतातून युगांडा देशात स्थलांतरित झालेल्या हिंदोचा कुटुंबाला सत्तरच्या दशकात कुप्रसिद्ध इदी अमीन यांच्या फर्मानामुळे तो देशही सोडून स्वीडनमध्ये स्थायिक व्हावे लागले. तिथेच त्यांच्या मुलीचा ॲनीचा जन्म झाला.

या हुशार, सुंदर मुलीला वाढवताना तिच्या मातापित्यांना कल्पनाही नसेल की ऐन तारुण्यातच तिचा अतिशय दुदैवी असा अंत जगाच्या दुसऱ्या टोकाला होईल.

काय घडलं होतं?

२००९ साली ॲनीची श्रीयेन देवानी या तरुण उद्योजकाशी लंडनमध्ये भेट झाली. सुमारे एक वर्ष त्याच्याबरोबर ‘लाँग डिस्टन्स रिलेनशीप’मध्ये राहिल्यावर ॲनी मार्च २०१०मध्ये इंग्लंडला स्थलांतरित झाली.

दोनच महिन्यांमध्ये श्रीयेनने तिला मागणी घातली आणि तिने होकार दिला. त्यांच्या नात्यामध्ये काही चढउतार असले तरी त्यांनी २९ ऑक्टोबर २०१० रोजी मुंबईत पवई येथे थाटात लग्न केले.

 

annie inmarathi

 

लग्नानंतर हे नवदांपत्य मधुचंद्रासाठी नोव्हेंबरमध्ये दक्षिण आफ्रिकेत गेले. तेथील सुप्रसिद्ध क्रूगर नॅशनल पार्कमध्ये चार दिवस घालवून ते परत केप टाऊन या राजधानीच्या ठिकाणी परत आले.

विमानतळावरून हॉटेलमध्ये जाण्यासाठी त्यांनी टॅक्सी केली. यावेळी टॅक्सीचालक झोला टोंगो याच्याशी त्यांची ओळख झाली. त्यांनी पुढील दोन दिवसांच्या भटकंतीसाठी त्याचीच टॅक्सी नक्की केली.

१३ नोव्हेंबर रोजी ते राजधानीच्या आसपासच्या स्थळांना भेटी देण्यासाठी झोला टोंगो याच्या टॅक्सीतून बाहेर पडले. स्थळदर्शन, जेवण झाल्यावर त्यांनी प्रवासाला सुरुवात केली. मुख्य रस्त्याहून वेगळ्या वाटेने जाताना दोन शस्त्रसज्ज गुंडांनी त्यांची गाडी अडवली आणि ते जबरदस्तीने आत शिरले.

थोडे अंतर प्रवास केल्यावर त्यांनी टॅक्सीचालक झोला टोंगो याला गाडीतून बाहेर ढकलून दिले. वीसेक मिनिटांच्या प्रवासानंतर त्यांनी श्रीयेनच्याकडून त्याचे पाकीट, महागडे घड्याळ, मोबाईल काढून घेत त्यालाही गाडीतून ढकलून दिले. त्यावेळी रस्त्यावरील एका व्यक्तीने त्याला मदत केली. त्याच्या फोनवरूनच श्रीयेनने पोलिसांना झालेल्या घटनेची माहिती दिली.

१४ नोव्हेंबर रोजी ॲनीचा मृतदेह आणि ती गाडी पोलिसांना मिळाली. ॲनीच्या हात, गळ्यामध्ये गोळी लागल्याची एक जखम होती. तिच्या पायावरही झटापटीच्या खुणा दिसत होत्या. असे असले तरी तिच्यावर बलात्कार झाला नव्हता असे पोस्टमार्टेम तपासणीत कळले.

 

murder inmarathi

 

तिच्याकडील अरमानी घड्याळ, व्हाइट गोल्ड डायमंडचे ब्रेसलेट, पर्स आणि ब्लॅकबेरी मोबाईल फोन गायब होते. यामुळे ही घटना दरोड्याची असावी असा पोलिसांचा समज झाला.

गाडीत सापडलेल्या ठशांवरून दोनच दिवसांनी दक्षिण आफ्रिकेतील पोलिसांनी क्झोलिले मेगेनी याला अटक केली. मेगेनी याने उलटतपासणीनंतर अपहरण, जबरी दरोडा अशा गुन्ह्यांची कबुली दिली. त्याचा साथीदार असलेल्या झिवामडोडा क्वाबे याच्या गुन्ह्यातील सहभागाबद्दलही त्याने पोलिसांना सांगितले.

क्वाबे याने पर्स खेचून घेताना ॲनीने त्याला प्रतिकार केल्याचे व त्या झटापटीत क्वाबे याने तिला गोळी मारली असेही त्याने सांगितले. पोलिसांनी क्वाबे यालाही अटक केली. त्याने सुरुवातीला काही माहिती नसल्याची बतावणी केली पण अखेर कबुलीजबाब दिला. मात्र दुसऱ्या दिवशी त्याने हा कबुलीजबाब बदलून नवी कहाणी सांगितली.

श्रीयेन देवानी याने त्याच्या पत्नीची हत्या करण्यासाठी कट रचल्याचे त्याने पोलिसांना सांगितले. त्याचप्रमाणे टॅक्सी चालक झोला टोंगो यालाही पोलिसांनी अटक केली. त्याने सुरुवातीस आपण निरपराध असल्याचा दावा केला. पण नंतर त्याने वकिलांच्या सल्ल्याने आपल्या जबाबामध्ये बदल केला आणि त्यानेही हा कट श्रीयेन देवानी याच्या सांगण्यावरून झाल्याचे सांगितले.

 

murder case inmarathi

 

ॲनीचा मृतदेह मिळाल्यावर आणि संशयितांच्या अटकेनंतर दक्षिण आफ्रिकेतच नव्हे तर जगभरातील माध्यमांमध्ये या घटनेला प्रसिद्धी मिळाली. श्रीयेन देवानी हा ब्रिटिश नागरिक असल्याने त्याच्यावर दक्षिण आफ्रिकेत खटला भरण्याआधी बरेच कायदेशीर सोपस्कार होणे गरजेचे होते. ही अटक टाळण्यासाठी देवानी याने बरेच प्रयत्न केले. पण अखेर चार वर्षांनी ७ एप्रिल २०१४ रोजी ब्रिटिश सरकारने त्याला दक्षिण आफ्रिकेच्या पोलिसांकडे हस्तांतरित केले.

६ ऑक्टोबरला त्याच्यावर दक्षिण आफ्रिकेत खटला सुरू झाला. आफ्रिकन नॅशनल काँग्रेसच्या महिला आघाडीने श्रीयेन देवानीच्या आगमनाच्यावेळी निदर्शने केली. ॲनीचे फोटो असलेली पोस्टर्स हातात घेऊन हे निदर्शक श्रीयेनला शिक्षा करण्याची मागणी करत होते. खटल्या दरम्यान श्रीयेनवर ॲनीच्या कुटुंबीयांनी समलिंगी संबंधांमध्ये सहभागी असल्याचा आणि त्यामुळेच ॲनीच्या खुनाचा कट रचल्याचा आरोप केला.

 

shriyan inmarathi

 

खटल्यादरम्यान उलटतपासणीमध्ये तिन्ही साक्षीदारांच्या जबाबांमध्ये खूप फरक आढळून येऊ लागला. त्यांनी आधी सांगितलेल्या घटना, फोनवरील संभाषणे यामध्येही विसंगती असल्याचे दिसले.

यामुळे फिर्यादी पक्ष आणि दक्षिण आफ्रिकेतील पोलिसांना श्रीयेन देवानी याने त्याच्या पत्नीच्या खुनाचा कट रचल्याचे सिद्ध करता आले नाही. यामुळे देवानी याच्या वकिलांनी त्याच्या बचावास आरंभ करण्याआधीच न्यायमूर्ती श्रीमती जेनेट ट्रॅव्हर्सो यांनी त्याची विनाशर्त मुक्तता केली.

अशा रीतीने अवघ्या २८ वर्षांचे आयुष्य जगलेल्या ॲनी देवानीच्या हत्येचे गूढ गुलदस्त्यातच राहिले. एका सुंदर हुशार तरुणीच्या जीवनाचा अकाली अंत झाला.

आमचं युट्यूब चॅनल आणि त्यावरचे व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला फॉलो करा :

===

व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल

इनमराठीच्या अपडेट्स शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम  | टेलिग्राम शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.

error: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?