' कष्टप्रद बालपण, नवऱ्याचा छळ, पण स्वतःला सिद्ध करत ७०० भूमिकांमधून राज्य करणारी ‘हेलन’ – InMarathi

कष्टप्रद बालपण, नवऱ्याचा छळ, पण स्वतःला सिद्ध करत ७०० भूमिकांमधून राज्य करणारी ‘हेलन’

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम शेअरचॅट

व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल 

===

लेखक – धनंजय कुरणे 

१६-१७ वर्षांची कोवळी पोर! दिसायला देखणी.. कामाची आणि पैशांची आत्यंतिक निकड…अशा वेळी जो कुणी आधार देईल तो देवासारखा भासायला लागतो.. हेलनचं ही असंच झालं.

‘पी. एन्. अरोरा’ नामक निर्माता- दिग्दर्शक तिच्या जीवनात आला… तिच्यापेक्षा तब्बल २७ वर्षांनी मोठा! त्यानं आपल्या ‘हूर-ए-अरब’ मधे तिला काम दिलं. भूमिका छोटीच होती, पण आपली वातानुकुलित केबीन बंद करुन तो तिच्यासोबत तासन् तास ‘चर्चा’ करत बसायचा.

 

helen inmarathi

 

केबिनच्या बाहेर अनेक सिनेइच्छुक उमेदवार, प्रचंड उष्म्यात ताटकळत बसलेले असायचे.. हेलनला मात्र थेट आत प्रवेश होता. याच ‘हूर-ए-अरब’चं काम चालू असताना एकदा साहीर, मजाज वगैरे कवी अरोराच्या केबीनबाहेर ‘घाम पुसत’ बसले होते… हेलन आत होती.. मजाज वैतागून म्हणाला..” ‘हूर’ अंदर हैं.. और हम यहाँ बाहर ‘अरबस्तान’में बैठे हैं ”

१९५७ साली, १९ वर्षांच्या हेलननं ४६ वर्षांच्या अरोराशी लग्न केलं. लग्नानंतर अरोरा बदलला. तिच्यावर अरेरावी (की ‘अरोरा’वी?) करु लागला. त्यानं तिचा सर्व प्रकारे छळ केला.. शारीरिक, मानसिक, आर्थिक… तिची अक्षरशः पिळवणूक केली. तिच्या जीवनाचं वाळवंट झालं… ‘हूर-ए-अरब’ हे नाव वेगळ्या तऱ्हेने सिद्ध झालं. तरीही तिनं त्याला १७ वर्षं सहन केलं. १९७४ साली घटस्फोट घेतला.

 

helen inmarathi1

तिचं बालपणही असंच.. विलक्षण कष्टप्रद! जपाननं ब्रह्मदेशावर केलेल्या हल्ल्यात तिचे वडील मृत्यु पावले. मग या कुटुंबानं ब्रह्मदेश सोडला.. अनेक दिवस सतत चालत-चालत हे लोक आसाममधे पोहोचले. हेलन तेव्हा सहा-सात वर्षांची होती. वाटेत तिच्या डोळ्यांसमोर आईचा गर्भपात झाला.

कालांतरानं ही फॕमिली मुंबईत आली. ‘रंगून’ची ही मुलगी ‘बंबई’ नगरीत सर्वार्थानं ‘रंगून गेली’. आईला नर्सच्या नोकरीत मिळणारा पैसा तुटपुंजा होता म्हणून हेलननं तेराव्या वर्षी आपल्या चेह-याला ‘रंग लावला’.. आणि सुमारे साडेतीन दशकं तो तसाच ठेवला. तब्बल ७०० सिनेमातून भूमिका केल्या.

 

helen inmarathi3

 

आयुष्यात ती खऱ्या अर्थी स्थिरावली ‘सलीम खान’शी लग्न झाल्यावर. त्याची व तिची पहिली भेट १९६३ मध्ये झाली होती.. ‘काबली खान’ या सिनेमात.. ती नायिका होती आणि त्याचीही मोठी भूमिका होती.

काही वर्षांनी ओळखीचं रुपांतर प्रेमात झालं.. १९८१ साली दोघांनी लग्न केलं.. पहिला नवरा २७ वर्षांनी मोठा होता.. दुसरा मात्र समवयस्क! ती ४३ वर्षांची आणि सलीम ४५ चा! मात्र तो विवाहीत होता. चार मुलांचा बाप. ‘सलमा’ची सवत बनून हेलन घरात आली.. आणि शब्दशः ‘सवत माझी लाडकी’ झाली.

घरात दुसरी पत्नी आल्यावर कुटुंब दुभंगणं हे खरं तर नैसर्गिक! पण इथं उलटच घडलं. हेलनमुळे हे कुटुंब अधिक घट्टपणे एकत्र आलं. सावत्र मुलांची ती आवडती बनली. हेलन व ‘सलमादिदी’ अनेक कार्यक्रमात एकत्र दिसू लागल्या.

हेलननं आणि सलीमनं एका अनाथ मुलीला दत्तक घेतलं. ‘अर्पिता’ तिचं नाव. फूटपाथवर राहणारी पोर. तिची आई एका अपघातात वारली होती. हेलननं तिला वाढवलं. २०१४ मधे, आयुष शर्मा या दिल्लीच्या एका धनाढ्य उद्योगपतीशी तिचं लग्न लावून दिलं.

 

helen inmarathi4

 

हेलनच्या जीवनापासून प्रेरणा घेऊन चार चित्रपट निघाले असं म्हणतात. ( मला नावं माहिती नाहीत.) तिच्या कारकीर्दीवर आधारित, ३० मिनिटांची एक डॉक्युमेंट्री निघालीः ‘The Queen of nautch girls!’ एक पुस्तकही निघालं.. ‘The life and times of an H-bomb !’ २००७ साली या पुस्तकाला सिनेमाविषयक सर्वोत्तम पुस्तकाचा राष्ट्रीय पुरस्कार मिळाला.

पडद्यावरचं तिचं वावरणं जितकं थरारक तितकीच तिची जीवनकथा विलक्षण! ‘गुमनाम’ मधे तिच्या तोंडी एक प्रसिद्ध गाणं आहे… ‘इस दुनियामें जीना हैं तो सुन लो मेरी बात.. गम छोडके मनाओ रंगरेली..!” हेच तिच्या जीवनाचं सूत्र असावं. पडद्यावर सदैव टवटवीत दिसणाऱ्या हेलनला अरोरा नावाचा राक्षस सतत छळत होता हे प्रेक्षकांना खूप उशीरा समजलं.

‘इस दुनियामें जीना हैं तो’ या गाण्याच्या प्रसंगात, ‘मायूस आणि उदास’ होऊन बसलेल्या ‘नंदा, प्राण आणि मदनपुरी’ यांच्या चित्तवृत्ती हेलनच्या नृत्यामुळे बहरतात, असं दृश्य आहे.

 

helen inmarathi2

 

हेलनचे डान्स पाहताना लाखो प्रेक्षकांनीही अगदी हाच अनुभव अनेकदा घेतला आहे. तिला पाहताना ‘ही बाई कधी म्हातारी होणारच नाही’ असं वाटायचं. २१ नोव्हेंबर २०२१ रोजी ती ८३ वर्षांची झाली असली तरी रसिकांच्या मनातली तिची प्रतिमा चिरतरुणच आहे. मनःपूर्वक अभिष्टचिंतन!

===

आमचं युट्यूब चॅनल आणि त्यावरचे व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला फॉलो करा :

व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल

इनमराठीच्या अपडेट्स शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम  | टेलिग्राम शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved. 

error: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?