' लहान-सहान भूमिका ते आजचा भरवशाचा नायक, विकी कौशलचा दमदार प्रवास

लहान-सहान भूमिका ते आजचा भरवशाचा नायक, विकी कौशलचा दमदार प्रवास

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम शेअरचॅट

व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल 

===

बॉलिवूडचा नायक हा गोरा असला पाहिजे हा एकेकाळी अलिखित नियम होता, पण मागील पाच वर्षांपासून गोष्टी बदलत आहेत. अजय देवगण आणि आता विकी कौशल या नायकांनी आपल्या अभिनयाच्या जोरावर हा अदृश्य रंगभेद मोडीत काढला आहे ही बाब कौतुकास्पद आहे.

आमचं युट्यूब चॅनल आणि त्यावरचे व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला फॉलो करा :

नुकताच रिलीज झालेला ‘उधम सिंग’ आणि २०१९ मध्ये रिलीज झालेला ‘उरी – द सर्जिकल स्ट्राईक’ या सिनेमातून विकी कौशलने आपलं अभिनय कौशल्य दाखवलं आणि आज तो बॉलीवूडचा भरवश्याचा नायक म्हणून उदयास आला आहे. सिनेमा ‘भूत’ असो वा ‘मनमार्जिया’, ‘राझी’, ‘संजू’असो वा ‘मसान’ विकी कौशल काम चांगलंच करतो हे लोकांनी मान्य केलं आहे.

कोणत्याही मोठ्या सेलिब्रिटीचा मुलगा नसलेल्या विकी कौशल या मुंबईत जन्मलेल्या इंजिनियरने मिळवलेला राष्ट्रीय पुरस्कार ही गोष्ट बॉलिवूड मधील त्यांचं स्थान अढळ सांगण्यासाठी पुरेशी आहे. विकी कौशलला हे यश मिळवण्यासाठी कशी आणि किती मेहनत घ्यावी लागली? हे जाणून घेऊयात.

 

vicky kaushal inmarathi

विकी कौशलचा जन्म १६ मे १९८८ रोजी शाम आणि वीणा कौशल यांच्या घरी झाला. शाम कौशल हे बॉलिवूड मध्ये ‘स्टंटमॅन’ आहेत. विकी कौशलचा जन्म झाला तेव्हा हे पंजाबी कुटुंब मुंबईतील एका चाळीत रहायचे.

शालेय शिक्षण पूर्ण केल्यानंतर विकी कौशलने राजीव गांधी इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी मधून इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकम्युनिकेशन इंजिनियरिंग या क्षेत्रात पदवी शिक्षण घेतलं आहे.

 

vicky kaushal inmarathi3

 

सामान्य मुलाप्रमाणे विकी कौशलने सुद्धा एका आयटी कंपनीत नोकरी स्वीकारली होती. नोकरी करत असतांना त्याच्या असं लक्षात आलं की, “मी या क्षेत्रासाठी बनलेलो नाहीये”.

विकी कौशल आपल्या वडिलांसोबत सिनेमाच्या सेट वर जाऊ लागला. आपणही अभिनय करू शकतो हे जाणवल्यावर विकी कौशल ने ‘किशोर नमीत कपूर’ यांच्या अभिनय शाळेतून प्रशिक्षण घेतलं. बॉलिवूड मधील करिअरची सुरुवात ही विकी कौशलने अनुराग कश्यप यांच्या ‘गॅंग्स ऑफ वासेपुर’ साठी असिस्टंट डायरेक्टर या कामाने केली होती.

नीरज घयवान हे सुद्धा त्यावेळी अनुराग कश्यप यांना असिस्ट करायचे. नीरज घयवान यांनी दिग्दर्शित केलेल्या ‘मसान’ मध्ये विकी कौशलने ‘नायक’ म्हणून सर्वप्रथम काम केलं.

 

vicky kaushal inmarathi2

 

२०१८ मधील ‘राझी’ मधील पाकिस्तानी आर्मी ऑफिसरचा रोल हा व्यवसायिक सिनेमात ओळख करून देणारा ठरला. त्यानंतर आलेला ‘संजू’ मध्ये विकीने संजय दत्त चा सर्वात चांगला मित्र ‘कमली’चा रोल केला आणि तोसुद्धा लोकांना खूप आवडला.

 

vicky kaushal inmarathi

 

२०१९ मधील ‘उरी – द सर्जिकल स्ट्राईक’ या सिनेमात विकी कौशलने केलेलं काम हे आजपर्यंतचं सर्वात चांगलं काम म्हणून मानलं जातं. ‘उरी’ मधील रोलसाठी विकी कौशलला राष्ट्रीय पुरस्काराने (आयुष्मान खुराना सोबत विभागून) सन्मानित करण्यात आलं होतं.

२०२० मध्ये विकी कौशलला करण जोहरच्या कॅम्पने ‘भूत – पार्ट वन : द हॉंटेड शिप’ या सिनेमात नायक म्हणून संधी दिली. या सिनेमाच्या शूटिंग दरम्यान विकी कौशलचा अपघात झाला होता.

१६ ऑक्टोबर २०२१ रोजी ‘उधम सिंग’ हा सिनेमा अमेझॉन प्राईमवर रिलीज झाला आणि विकी कौशलच्या अभिनयाने लोकांना पुन्हा एकदा प्रभावित केलं.

 

sardar udham 2 inmarathi

 

‘१९१९ मध्ये झालेल्या जालियनवाला हत्याकांडातील मायकेल डायर या इंग्रज अधिकाऱ्याचा लंडनमध्ये जाऊन घेतलेला बदला’ ही सत्यकथा पडद्यावर दाखवतांना नायक विकी कौशल आणि दिग्दर्शक सुजित सरकार यांनी जी मेहनत घेतली आहे ती प्रेक्षकांना प्रचंड आवडली.

विकी कौशलच्या करिअरकडे लक्ष देऊन बघितलं तर लक्षात येतं, की ‘कमी काम, पण चांगलंच काम’ ही त्याच्या कामाची पद्धत आहे. आगामी काळात सुद्धा ‘अश्वत्थामा’, ‘सॅम बहाद्दूर’ सारख्या महत्वाकांक्षी प्रकल्पावर काम करतांना आपल्याला विकी कौशल बघायला मिळणार आहे.

अभिनयासोबतच विकी कौशलने जाहिरात क्षेत्रावर सुद्धा आपली छाप सोडली आहे. रिलायन्स ट्रेंडस्, ऑप्पो मोबाईल सारख्या ब्रँड सोबत असलेल्या त्याच्या जाहिराती या विकी कौशल हा एक ‘स्टार’ म्हणून समोर येत आहे याचं द्योतक म्हणावं लागेल.

 

vicky kaushal inmarathi1

 

 

विकी कौशल हे नाव सध्या कतरिना कैफसोबत ठरलेल्या लग्नामुळे सुद्धा खूप चर्चेत आहे. प्रसिद्धीच्या वलयात असूनही विकी कौशलचे पाय अजूनही जमिनीवर आहेत हे त्याच्या प्रत्येक मुलाखतीतून आपल्याला लक्षात येतं.

 

vicky and kat inmarathi

 

 

नुकत्याच एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत विकी कौशलने आपल्या चाळीतील ‘दहा बाय दहा’ आकाराच्या खोलीची आठवण काढली आणि या गोष्टीचा परत एकदा प्रत्यय आला.

आपल्या यशात प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्षरीत्या सहभागी असलेल्या प्रत्येक व्यक्तीबद्दल विकी कौशल नेहमीच कृतज्ञता व्यक्त करून आपल्या मनाच्या मोठेपणाचा लोकांना प्रत्यय करून देत असतो. विकी कौशलचं करिअर येत्या वर्षात बहरत जावो यासाठी आमच्या टीम कडून शुभेच्छा.

===

आमचं युट्यूब चॅनल आणि त्यावरचे व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला फॉलो करा :

व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल

इनमराठीच्या अपडेट्स शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम  | टेलिग्राम शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved. 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?