“शेतकरी प्रश्नावर शहरी लोकांनी बोलू नये” : गर्विष्ठ मूर्खपणा

आमच्या लेखांच्या अपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या फेसबुक पेजला नक्की Like करा: facebook.com/InMarathi.page

===

केंद्रात मंत्री असताना शरद पवार यांची परवड किती लोकांनी लक्षात घेतली होती हे कळायला मार्ग नाही. शरद पवारांना सगळयात त्रासदायक खातं मिळालं होतं. त्रासदायक याचं साधं कारण म्हणजे शरद पवार एकाच खात्याचे मंत्री नव्हते तर ते अनेक वर्ष दोन टोकाच्या परस्पर विरोधी खात्यांचे मंत्री होते. कृषी मंत्री आणि अन्न पुरवठा मंत्री. या खात्याला त्रासदायक म्हणायचं कारण म्हणजे एकाच वेळेला शेतकऱ्याच्या मालाला उचित भाव देण्याची जबाबदारी आणि त्याच वेळेला ग्राहकाला परवडेल इतक्या भावात माल मिळण्याचं उत्तरदायित्व. शेतकरी चांगला भाव मिळावा म्हणून आग्रह धरणार, आणि त्याच वेळेला ग्राहक माल स्वस्तात मिळायची अपेक्षा बाळगणार. शेवटी पवारांनी काही वर्षे अन्नपुरवठा मंत्रिपद सोडलं.

 

sharad-pawar-marathipizza

 

हे सगळं आठवायचं कारण म्हणजे समाज माध्यमातून शेतकऱ्याला मदत देण्याचे सूर कायमच आळवले जात असतात. बारा महिने तिन्ही त्रिकाळ शेतकरी कसा हलाखीचं जीवन जगतोय आणि शेती कशी मोडकळीला आलेली असून सरकारची (मग ते कोणत्याही पक्षाचे का असेना!) धोरणे कशी आस्थाविहीन आहेत याचीच गाऱ्हाणी गायला मिळत असतात. (आणि त्यावर रावसाहेब दानव्यांसारखे लोक, “रडतात साले” म्हणत इंधन ओतत असतात.) शेती इतकी वाईट आहे आणि शेतकरी होणं म्हणजे आत्महत्येच्या वाटेवरची पहिली पायरी आहे अशी मानसिकता भारतभर असूनही शेतीत अजूनही अर्ध्याहून अधिक लोकसंख्या का असा प्रश्न फार विचारला जात नाही. (शरद पवारांनीच शेतीमध्ये आता करियर करण्यासारखी स्थिती राहिली नाही तेंव्हा इतर क्षेत्रात कारकीर्द घडवावी असा सल्ला तरुणांना दिला होता).

शेतकऱ्यांबद्दल कळवळा असायलाच हवा. परंतु ते करताना गेली काही वर्षे सातत्याने जे शहरी भागातल्या ग्राहक वर्गाला शिव्याशाप देण्याचे धोरण अवलंबिले जात आहे ते निव्वळ घृणास्पद आहे. शेतकऱ्याचे मित्र म्हणवणारे अनेक बकवास लोक समाजमाध्यमांतून फिरत असतात. खते, बी बियाणी, माती, पाणी आणि सिंचन, कीटक आणि कीटकनाशके हे शब्द वापरले की आपल्याला शेतीतले खूप काही कळते आणि आपण शेतकरी मित्र असतो असा अनेकांचा दंभ असतो. आणि यांना तितकेच बिनडोक पाठीराखेही मिळतात. आणि त्याच दंभाच्या नादात समोरच्याला “तू शहरी आहेस तुला काय कळतं रे? तुम्हा श्रीमंतांना काय कळणार शेतीतला व्यवहार आणि शेतकऱ्याचं दुखणं?” इतका माजोरडा प्रश्न विचारायला हे लोक कमी करत नाहीत.

“आम्ही ग्रामीण” किंवा “आम्हाला ग्रामीण भागाबद्दल कळवळा आहे बुवा” अशी समजूत मिरवणं यात काहीच गैर नाही. जो पर्यंत त्या समजुतीमुळे तुम्ही दुसऱ्याचा पाणउतारा करत नाही तोपर्यंत तुम्हाला ती बाळगायचा अधिकार आहे. परंतु “तुम्ही शहरी” यामध्ये जो तुच्छतावाद आहे तो ‘ग्रामीण भाग म्हणजे परिस्थितीने गरीब आणि शहरी भाग म्हणजे परिस्थितीने सधन’ हा भंपक समजुतीवर अवलंबून आहे.

समाजमाध्यमे असोत किंवा कॉलेजेसमधला वर्ग, समाजाचा सँपल सर्व्हे उभ्याउभ्या मिळवायला दुसरी आदर्श जागा नाही. अर्थशास्त्राचे शिक्षक किंवा जाणकार एक साधा प्रश्न विचारतात की “बाबानो ग्रामीण भाग म्हणजे काय आणि शहरी भाग म्हणजे काय?” शंभरापैकी ९५ लोक “शहरी भाग म्हणजे सधन आणि ग्रामीण म्हणजे गरीब” असंच बावळट उत्तर देतात. पुढे असली बाष्कळ मतं ऐकून शिक्षकाने एकंच प्रश्न विचारायचा असतो.

“शहरी भाग म्हणजे साधन आणि ग्रामीण म्हणजे गरीब” असं जर असेल बुवा, तर मग सैराटमधल्या अर्चिचा बाप, धारावीमध्ये राहणाऱ्या एखाद्या टायर पंक्चर काढणाऱ्यापेक्षा गरीब आहे काय?

 

poverty marathipizza

 

आपापली चुकीची समजूत कळाल्यावर चुपचाप विद्यार्थीगण शाळेतल्या गोष्टींची घोकंपट्टी करायला लागतात. यात यांच्या शिक्षणाची काहीच चूक नसते. शाळा कॉलेजातली पुस्तके तर रीतसर योग्यच काय ते समजावून देत असतात. ‘उपजीविकेसाठी निसर्गावर अवलंबून असणारे ग्रामीण असतात, आणि नसणारे शहरी असतात’ इतकी साधी सरळ सोपी व्याख्या मिळते. पण ह्यात विद्यार्थ्यांचा काहीच दोष नसतो. उभी हयात शेतकरी, गरीब, हालअपेष्टा आणि शहरी, सधन, संपन्न हीच समीकरणे कानावर आदळल्यानंतर कोणाचाही ब्रेनवॉशच होणार ना. गेल्या वर्षी अनेक जण सरकारला तूरडाळ अडीचशे रुपये किलो झाली म्हणून झापत होते. तेच सरकार आज तूरडाळ शंभर रुपये झाली म्हणून शिव्या खातंय. अडीचशे रुपये असताना गरिबांचे शिव्याशाप आणि ऐंशी रुपये तूरडाळ झाली की शेतकऱ्यांची हाय (ती पण इतकी की त्यापायी फडणवीसांच्या हेलिकॉफ्टरला म्हणे शाप लागला). वरवर आरोप करणारे दोन्ही बाजूंना आहेत. परंतु तूरडाळ अडीचशे रुपये किलो असताना शेतकऱ्यांच्या खिशात त्यापैकी किती पैसा गेला यावरून बोललेच नाहीत. कारण तेवढी बऱ्याच जणांची कुवत नव्हती.

जर शेतकऱ्यांच्या खिशात तेव्हा पैसे गेले तर तेव्हापण शेतकऱ्यांच्या हालापेष्टांवर गळे का काढले गेले? आणि जर त्या भावात तूरडाळ विकली जात असताना शेतकऱ्याला विशेष लाभ झाला नसेल तर त्याला जबादार शहरी सधन वर्ग कसा काय? गंमत म्हणजे त्यावेळी महागाईवर बोलणाऱ्या अनेकांनी आज टोप्या फिरवल्या. आज तेच पडलेल्या भावांबद्दल बोलतायत. त्यावेळी सरकारने तूरडाळ आयात केली आणि आज तूरडाळ उदंड झाली ही थियरी चालवून ‘सरकारने तूरडाळ आयात करायच्या ऐवजी अडीचशे रुपये किलोने असू द्यायला हवी होती’ अशीही पार्टी बदलणारे भरपूर मिळतील.

सरकारला लोकांना कमी पैशात धान्ये उपलब्ध करून द्यावी लागतात. पण हे धोरणच चुकीचे आहे हे सांगताना अगदी महात्मा गांधींचा पंचाही धरायला अनेकांना लाज वाटत नाही. म्हणे महात्मा गांधी अन्नधान्य स्वस्त असण्याच्या विरोधात होते. पण महात्मा गांधी स्वतःला लागणारं अन्न स्वतः पिकवून खा म्हणणारे होते आणि तो विचार अत्यंत अव्यवहार्य होता हे कोणालाच लक्षात घ्यायचं नसतं.

 

city farmers marathipizza
हे सर्वांना शक्य आहे का? । स्रोत : cityfarmer.info

शहरी भाग म्हणजे सधन भाग ही समजूत किती निर्बुद्ध आहे हे एव्हाना सगळ्यांनाच कळलं असेल. मुंबईत सगळ्याच टोलेजंग इमारती आहेत काय? मुंबईत सगळेच फोर्ट, कुलाबा, मारिन लाईन्स, वरळी, हिंदू कॉलनी किंवा बांद्रा आहेत काय? मुंबईत धारावी नाही? पायधुणी, आग्रीपाडा, बेहराम पाडा नाही? अनधिकृत इमारती मुंबईत का असतात? कारण निवारा प्रत्येकाला हवाय आणि पाच पाच लाख रुपये स्क्वेयरफुट प्रत्येकालाच परवडत नसतं. आणि या अनधिकृत इमारती मुंबईत नेमक्या काय करतात? इकडूनच आपल्या घरची मोलकरीण येत असते, आपल्या शाळेचा प्युन, बिल्डिंगचा रखवालदार, महापालिकेचे गटार साफ करणारे, आपल्या बिल्डिंगचा कचरा उचलणारे, रस्ता झाडणारे, गाड्यांचे मेकॅनिक्स, रस्त्यावरचे फेरीवाले, पानाच्या टपऱ्या चालवणारे एकूणच तळहातावर पोट असणारे इकडूनच येत असतात. यांना भाजीपाला, फळे आणि धान्य महाग परवडेल? नारायण सुर्वे आणि नामदेव ढसाळांसारखे कवी मराठी साहित्याला शहरातल्या गरीबीनेच दिले. हीच गरिबी शाम बेनेगल, गोविंद निहलानींनी किंवा सिंहासनमध्ये जब्बार पटेलांनी मांडली होती. मेधा पाटकर यांच्या भाषेत सांगायचं झालं तर मुंबईत यांची संख्या दोन तृतीयांश आहे. मुंबई यांचीच तर आहे. मग आता अचानक मुंबई किंवा तत्सम शहरी भाग म्हणजे शहरी, सधन, संपन्न आणि चंगळवादी उधळ्या वगैरे कसा झाला? फुटपाथवर झोपून, ऊन पावसात किंवा एखाद्याच्या गाडीखाली जीव गमावणारे मुंबईत अनेक आहेत. हे लोक शहरी आहेत, ग्रामीण नाहीत आणि यांना अन्न स्वस्त मिळायचा अधिकार आहे. घरोघरी काम करणारी बाई आजही महिना आठ ते दहा हजारांच्यावर पगार घेऊ शकत नाही. चार किंवा पाच माणसांचं कुटुंब कोणी आणि कसं चालवायचं? दोन ते अडीच हजार रुपये वाणसामानाला कुठेच नाहीत. यांना महागाई परवडत नाही. गोलपिठा किंवा या सत्तेत जीव रमत नाही ह्यातून नामदेव ढसाळांनी काय मांडलं होतं? हे ही लोक समाजाचा भाग असतात. हे ही लोक मतदान करतात आणि यांचाही विचार प्रत्येक राजकीय पक्षाला करावाच लागतो.

त्यामुळे “तुम्ही शहरी आहात आणि तुम्हाला काय कळणार आहे गरिबी?” वगैरे विचारणाऱ्यांनी आपला अहंकार बाजूला ठेवावा. शहरातल्या प्रत्येकाचा गरीबाशी संबंध येत असतो. फक्त तो अनेकांना उमजत नसतो, इतकंच. आणि जाता जाता एकंच सांगावसं वाटतं ते म्हणजे “शेतकरी आहे म्हणून तुम्ही आहात” ही भाषा शक्यतो दूर ठेवावी. कारण उत्पादकाने गिऱ्हाईकाला असं म्हणून चालत नसतं. यात शेतकऱ्यावरच सगळं निर्भर असतं असा कोणाला समज असेल तर उद्या साधा ट्रॅक्टर बनवणाराही शेतकऱ्याला ‘आम्ही आहोत म्हणून तुम्ही आहात’ हेच ऐकवू शकतो.

 

पण कुणी सांगेल काय? ह्या शतकात चंद्र महागला होता
कलकत्याच्या रस्त्यावर घोडा होऊन माझा आत्मा बग्गी ओढत होता.
पण एवढे पुरे; आपणही आता धुरकटलेले चष्मे बदलून घ्यावेत
आपणही ह्या शतकात जन्मलो; आपलेही हिशेब चुकते करावेत.

– नारायण सुर्वे

डिस्क्लेमर: हा लेख शेतकऱ्याविरुद्ध नाही, तर त्याचा कळवळा दाखवून व्हिक्टीम कार्ड खेळणाऱ्यांवर आहे. आणि जोपर्यंत शहरात गरीब माणूस आहे तोपर्यंत त्या गरिबाला स्वस्त धान्य मिळायचाही तेवढाच संविधानिक अधिकार आहे.

===

InMarathi.com वर विविध लेखकांनी व्यक्त केलेले विचार ही त्यांची वैयक्तिक मतं असतात. InMarathi.com त्या मतांशी सहमत असेलच असं नाही. | आमच्या लेखांच्या अपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या फेसबुक पेजला नक्की Like करा: facebook.com/InMarathi.page । Copyright (c) 2017  InMarathi.com | All rights reserved.

Sourabh Ganpatye

लेखक राजकीय विश्लेषक आणि अभ्यासक आहेत.

sourabh has 37 posts and counting.See all posts by sourabh

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?