' ” तु अलिबाग विकत घेतलंयस का?” जेव्हा मराठी आमदाराने शाहरुखला खडेबोल सुनावले! – InMarathi

” तु अलिबाग विकत घेतलंयस का?” जेव्हा मराठी आमदाराने शाहरुखला खडेबोल सुनावले!

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम शेअरचॅट

व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल 

===

बॉलिवूड सेलिब्रिटी आणि त्यांचे किस्से हे समीकरण प्रेक्षकांना हमखास आवडतंं! चर्चेत असलेल्या सिलेब्रिटींचे जूने किस्से पुन्हा पुन्हा आवडीने चघळले जातात. त्याचंच एक उदाहरण म्हणजे ऑक्टोबर महिन्यापासून सुरु झालेल्या आर्यन खान ड्रग्स प्रकरणामुळे शाहरुख खानच्या अनेक जुन्या किस्स्यांना नव्याने फोडणी दिली जात आहे.

२ नोव्हेंबर हा शाहरुख खानचा वाढदिवस! दरवर्षी अलिबागच्या फार्महाऊसवर पार्टी करत वाढदिवस साजरा करणारा किंग खान यंदा मात्र महिनाभर मुलाच्या प्रतापांमुळे चांगलाच हादरला होता. सर्वतोपरी प्रयत्न करूनही आर्यन जामीन मिळत नसल्याने यंदाची दिवाळी तसेच शाहरुखचा वाढदिवस साजरा होणार का? यावर प्रश्नचिन्ह असताना दिवाळीच्या अवघ्या काही दिवसांपुर्वीच आर्यन जामीनावर सुटला आणि शाहरुखची ‘मन्नत’ पूर्ण झाली.

 

aryan khan inmarathi

 

आर्यन घरी परतल्याने दरवर्षीच्या प्रथेप्रमाणे यंदाही शाहरुख कुटुंबासह अलिबागला वाढदिवस साजरा करण्यासाठी गेला होता. मात्र नेमक्या यामुळेच ट्रोलर्सनी ४ वर्षांपुर्वी घडलेल्या एका प्रसंगाची आठवण करून देत सोशल मिडीयावर गदारोळ केला.

प्रेक्षकांच्या गळ्यातील ताईत असलेला शाहरुख एरव्ही थाटात चालतो, बोलतो, मात्र चार वर्षांपुर्वी चाहत्यासमोरच एका आमदाराकडून खडे बोल ऐकून घेणारा बॉलिवूडचा किंग नेमका मुकाट कसा बसला? हे कोड चार वर्षांनतंरही सुटलेलं नाही.

काय घडलं होतं?

गोष्ट २०१७ सालची! २ नोव्हेंबर या दिवशी वाढदिवस साजरा करण्यासाठी शाहरुख अलिबागला गेला. कुटुंबासह त्याने वाढदिवसाची धमाल पार्टीही केली आणि पुन्हा मुंबईच्या दिशेने निघाला.

 

shah rukh khan inmarathi

 

येताना तो बोटीने गेट वे ऑफ इंडिया येथे पोहोचला. लाडक्या कलाकाराला वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्यासाठी चाहत्यांनी गर्दी केली होती.

त्याचवेळी शेतकरी कामगार पक्षाचे नेते, आमदार जयंत पाटील हे अलिबाग या आपल्या मुळ गावी काही कामानिमित्त निघाले होते. त्यांचे काम महत्वाचे असल्याने ते घाईत गेेट ऑफ इंडियाजवळ आले. बोटीतून निघण्याची सगळी प्रक्रिया पुर्ण झाली मात्र तरिही पाटलांना बोटीपर्यंत पोहोचता येईना.

गेट वे वरील वाढती गर्दी ही शाहरुखसाठी ताटकळली होती. तेवढ्यात किंग खानही पोहोचला आणि आपल्या नेहमीच्या स्टाईलने बोटीवर उभे राहून तो चाहत्यांचं अभिनंदन स्विकारू लागला. त्याच्या फोटोसाठी धडपडणा-या प्रेक्षकांसाठी त्याने वेगवेगळ्या पोझेस द्यायला सुरुवात केली.

एकंदरित हा प्रकार सेलिब्रिटींसाठी नवा नसला तरी आमदार जयंत पाटील हे चांगलेच उखडले. शाहरुखमुळे आपल्या प्रवासाला दिरंगाई होत असल्याचे त्यांच्या लक्षात येताच ते शाहरुखच्या बोटीकडे धावले.

 

jayant patil 1 inmarathi

 

आणि पाटलांनी शाहरुखचा अपमान केला

बोटीसमोर येताना त्यांचा राग अनावर झाला आणि मोठ्या आवाजात ते शाहरुखला म्हणाले,” असशील तु मोठा स्टार, पण संपुर्ण अलिबाग तु काही खरेदी केलं आहेस का? अलिबागला येण्यासाठी माझी परवानगी घ्यावीच लागेल”.

 

jayant patil inmarathi

 

जयंत पाटीलांचा हा अवतार बघून सगळेच हादरले. रागाच्या भरात त्यांनी ही प्रतिक्रिया दिली असं म्हणत त्यांच्या सहका-यांनी सावरून घेण्याचा प्रयत्न केला, शिवाय वाद वाढू नये यासाठी त्यांना बोटीकडे नेले. त्यानंतर जयंत पाटील तिथून निघून गेल्याची खात्री केल्यानंतरच शाहरुख आपल्या बोटीबाहेर पडला, चाहत्यांच्या शुभेच्छा स्विकारल्या आणि आपल्या गाडीकडे निघाला.

हा सगळा प्रकार शाहरुखच्या चाहत्यांसमोर घडला. त्यातील अनेक चाहते विनाकारण शाहरुखला सुनावल्याबद्दल पाटीलांवर भडकले, मात्र राजकारण्यांशी पंगा नको म्हणत त्यांच्यापैकी कुणीही तोंडातून शब्द काढला नाही. त्यातील एका चाहत्याने हुशारीने हा प्रसंग मोबाईलमध्ये कैद केला.

मात्र आश्चर्याची बाब ही की एवढ्या मोठ्या कलाकाराने आपल्या चाहत्यांसमोर झालेला हा अरमान मुकाटपणे कसा ऐकून घेतला? किंग खान यावर काहीच बोलला नाही किंवा त्याने नंतरही त्याबाबत प्रतिक्रिया दिली नाही. उलट पाटील निघून गेल्यानंतर त्याने बाहेर येण्याचा निर्णय घेतला.

 

shah rukh inmarathi

 

यंदाही शाहरुखने अलिबागला वाढदिवस साजरा केला, त्यानिमित्ताने पुन्हा एकदा ट्रोलर्सनी जुन्याच पदार्थाला नवा रंग देत हा किस्सा पुन्हा पुन्हा उगाळला.

===

व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल

इनमराठीच्या अपडेट्स शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम  | टेलिग्राम शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.

error: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?