' 20-20 WC: जिंकण्याची मोठी संधी पाकिस्तानलाच असण्याची 'खरी' कारणं!

20-20 WC: जिंकण्याची मोठी संधी पाकिस्तानलाच असण्याची ‘खरी’ कारणं!

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम शेअरचॅट

व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल 

===

लेखक – ईशान पांडुरंग घमंडे

===

काल अफगाणिस्तानचा संघ हरला आणि १३० करोडहून अधिक लोकांना दुःख झालं. “असं का?” हा प्रश्न पडत असेल, तर त्या १३० करोड लोकांमध्ये तुम्ही नाही, हे नक्की!

भारतीय संघाचं आव्हान संपुष्टात आलं आणि आज होणारा भारताचा सामना ही निव्वळ औपचारिकता उरली आहे, हे स्पष्ट झालं. विराट कोहलीचा कर्णधार म्हणून, रवी शास्त्री यांचा प्रशिक्षक म्हणून शेवटचा आंतरराष्ट्रीय टी-२० सामना यापलीकडे या सामन्याला कितपत महत्त्व दिलं जाईल हा प्रश्न आहेच.

 

virat and ravi shastri inmarathi

 

असं असलं, तरी एक क्रिकेटप्रेमी या नजरेतून पाहिलं तर पिक्चर अभी बाकी हैं मेरे दोस्त! पाकिस्तान, इंग्लंड, न्यूझीलंड ‘आणि’ ऑस्ट्रेलिया या चार संघांनी उपांत्य सामन्यांमध्ये धडक मारली आहे. थोडक्यात स्पर्धेची चुरस अद्याप टिकून आहे.

संघ अव्वल नंबरी

इंग्लंडच्या संघाचा एक पराभव सोडला, तर त्यांनी केली कामगिरी उत्तम आहे असं म्हणायला हवं. बेन स्टोक्स हा महत्त्वाचा खेळाडू संघासोबत नसूनही, त्यांनी केलेली कामगिरी वाखाणण्याजोगी आहे. उगाच नाही हा संघ टी-२० च्या क्रमवारीत अव्वल स्थान मिरवतोय.

 

england cricket team inmarathi

 

मॉर्गनच्या कप्तानीचा दर्जा दोन वर्षांपूर्वी पाहायला मिळाला. वनडे विश्वचषकात क्रिकेटच्या जन्मदात्याचा सुरु असेलला दुष्काळ अखेर २०१९ मध्ये संपला. २०१० साली पॉल कॉलिंगवूडच्या नेतृत्वाखाली टी-२० विश्वविजेतेपदाची चव इंग्लंडने चाखली आहे. मॉर्गन सुद्धा त्याची पुनरावृत्ती करण्यासाठी उत्सुक असेल.

सलामीवीर जेसन रॉय जायबंदी होणं आणि दक्षिण आफ्रिकेकडून झालेला पराभव याचा विचार करता, इंग्लंडसाठी उपांत्य सामना आणि तो जिंकल्यास अंतिम सामना कठीण ठरणार हे मात्र नक्की…

चोकर्सचा टॅग मिटवण्याची नामी संधी…

इंग्लंड विरुद्ध न्यूझीलंड हा सामना खऱ्या अर्थाने ‘कांटे की टक्कर’ ठरेल. इंग्लंडचा संघ दुसऱ्यांदा स्पर्धा जिंकण्यासाठी उत्सुक आहे, तर न्यूझीलंड चोकर्सचा टॅग मिटवून टाकण्यासाठी! यंदाच झालेल्या वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या अंतिम सामन्यात विजय मिळवत त्यांनी आयसीसीची एक स्पर्धा आपल्या नावावर केली.

ही दुसरी स्पर्धाही जिंकली, तर अनेक वर्षं त्यांच्यावर मारला गेलेला चोकर्सचा शिक्का पुसला जाण्याची शक्यता आहे. विल्यमसनसाठी ही मोठी संधी आहे, असं म्हणायला हवं.

 

kane williamson inmarathi

आमचं युट्यूब चॅनल आणि त्यावरचे व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला फॉलो करा :

 

…आणि ऑस्ट्रेलिया

१९८७ साली पहिल्यांदाच त्यांनी वनडे वर्ल्डकप जिंकला. त्यावेळी हा संघ जेमतेम अंड्यातून बाहेर आला होता, असं अनेकजण आजही म्हणतात. पण त्या विजेतेदानंतर त्यांनी कधीच मागे वळून पाहिलं नाही.

‘क्रिकेटचा दादा कोण?’ असा प्रश्न विचारला, तर ‘अर्थात ऑस्ट्रेलिया’ हे एकच उत्तर मनात येतं अशी अनेक वर्षं गेली. आमच्या पिढीने ती पाहिली, अनुभवली… म्हणूनच हा संघ जेव्हा उपांत्य फेरीपर्यंत पोचतो, तेव्हा मनात एक धाकधूक असतेच, की हे काहीही करू शकतात…

 

australia cricket team inmarathi

 

तीच गत यावेळीही झाली आहे असं म्हणायला हरकत नाही. कधी झाम्पाने उत्तम गोलंदाजी करणं, कधी वॉर्नरने फॉर्मात येणं, मॅक्सवेल नावाचा हुकुमी एक्का संघात असणं, फिंच हा नामधारी कर्णधार वाटावा इतके कर्णधार संघात मोठ्या थाटात खेळत असणं आणि त्याहूनही महत्त्वाची बाब म्हणजे, ‘आपण ऑस्ट्रेलिया आहोत आणि क्रिकेटवर राज्य करणार’ हा त्यांच्याकडे कायमच असणारा आत्मविश्वास!

ऑस्ट्रेलियाचा संघ कधीही चमत्कारिक कामगिरी करू शकतो आणि विजेतेपद सहज खिशात टाकू शकतो ही काळ्या दगडावरची पांढरी रेघ आहे.

पण जिंकणार पाकिस्तानच…

इतर तिन्ही संघ तुल्यबळ आहेत, यात काहीच शंका नाही; पण… हा पणच नेहमी महत्त्वाचा असतो वगैरे वगैरे वायफळ बडबड मी करणार नाही. कारण, पाकिस्तानचा संघ अफलातूनच खेळतोय. बाबर आणि रिझवान ही सलामी जोडी, हाफिझ आणि मलिक हे दोन अनुभवी शिलेदार, अप्रतिम गोलंदाजीचा ताफा, काय आणि किती वर्णन करावं या संघाचं?

 

pakistan team world cup inmarathi

 

यातही सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा आहे, तो म्हणजे गेली अनेक वर्षं पाकिस्तानचा संघ याच भूमीवर क्रिकेट खेळतोय. गेल्या ८-१० वर्षांत ही मंडळी मायदेशात खेळले नसतील इतके सामने आखाती देशात खेळले आहेत. मैदानाचा आणि खेळपट्ट्यांचा कोपरा न् कोपरा त्यांना माहित आहे. नुसताच माहित आहे नव्हे, तर तोंडपाठ आहे.

विश्वचषक सामन्यांमध्ये भारताचा दबदबा मोडीत काढत यंदा बाबरच्या संघाने भारतीय संघाला अक्षरशः लोळवलं. इतिहास रचला म्हणा, इतिहास बदलला म्हणा, चमत्कार केला म्हणा, जे नाव देऊ ते कमी आहे. आता अशा स्पर्धेत विजेतेपदाची चव चाखता आली तर त्यांच्यासाठी तर ‘सोने पे सुहागा’ असणार आहे. ही एक वेगळीच एनर्जी त्यांच्याकडे असणार…

ही स्पर्धा गमावण्याचं कुठलंही कारण त्यांच्याकडे नाही. उलट अनेक अशा गोष्टी आहेत, ज्यासाठी त्यांना ही स्पर्धा जिंकायचीच आहे. ही जिद्द हीच त्यांची सगळ्यात मोठी ताकद बनणार असं वाटतंय.

 

babar azam and company inmarathi

 

दोन्ही सामन्यात दिमाखात विजय मिळवत बाबर आणि कंपनी या वर्ल्डकपवर आपलं नाव कोरणार! असं घडलं नाही, तर आश्चर्य नक्कीच वाटेल…

===

आमचं युट्यूब चॅनल आणि त्यावरचे व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला फॉलो करा :

===

व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल

इनमराठीच्या अपडेट्स शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

InMarathi.com वर विविध लेखकांनी व्यक्त केलेले विचार ही त्यांची वैयक्तिक मतं असतात. InMarathi.com त्या मतांशी सहमत असेलच असं नाही. | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटरइंस्टाग्राम | टेलिग्रामशेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?