' पर्यटकांच्या लाडक्या मालदीवला भारतीय सैन्याने वाचवलं होतं, कोणापासून? वाचा – InMarathi

पर्यटकांच्या लाडक्या मालदीवला भारतीय सैन्याने वाचवलं होतं, कोणापासून? वाचा

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम शेअरचॅट

व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल 

===

हनिमूनर्सचे आवडीते ठिकाण, लॉकडाऊनमध्ये  बॉलिवूडकरांचे आवडीचे ठिकाण, सुंदर बीचेस आणि निसर्गसौंदर्याची मुक्तपणे उधळण असलेले पर्यटनस्थळ म्हणजे मालदीव होय.

भारतीय उपखंडात हिंद महासागरात वसलेला हा देश श्रीलंका आणि भारताच्या आग्नेयेला आहे. मालदीव हे नाव खरं तर संस्कृत भाषेतून आले आहे. ‘माला द्वीप’चा अपभ्रंश पुढे मालदीव असा झाला.

 

soneva-jani-maldives-inmarathi

 

अशा ह्या सुंदर देशावर ताबा मिळवण्याचे प्रयत्न होणार हे तर ओघाने आलंच. असा प्रयत्नही झाला होता, पण भारतीय सैन्याने मालदीवमधील शांतता आणि सुव्यवथा कायम ठेवण्यासाठी तिथल्या शासनाला मदत करत हा विद्रोहाचा प्रयत्न हाणून पाडला होता.

३ नोव्हेंबर १९८८ रोजी सकाळी भारताच्या विदेश मंत्रालयातला फोन वाजला. फोनवरून अशी माहिती मिळाली, की मालदीवमध्ये विद्रोह झाला असून वातावरण खूप तापले आहे. परिस्थिती एकूण गंभीर आहे.

त्यावेळेला हे विद्रोही लोक ठिकठिकाणी बंदुका आणि शस्त्रे घेऊन फिरत होते. मालदीवचे तत्कालीन राष्ट्रपती मामून अब्दुल गय्युम कुठेतरी लपून बसले होते. त्याच दिवशी खरं तर गय्युम ह्यांचा भारतदौरा होण्याचे ठरले होते, पण भारताचे तत्कालीन पंतप्रधान राजीव गांधी ह्यांना काहीतरी अत्यावश्यक काम आल्याने त्यांनी भेटीचा कार्यक्रम स्थगित केला होता.

मालदीवमधील विद्रोही लोक ह्याच संधीच्या शोधात होते, की राष्ट्रपती भारताच्या दौऱ्यावर जातील आणि ते मालदीवमध्ये सत्ता उलथवून टाकतील व देशावर ताबा मिळवतील. ह्यासाठी त्यांनी सगळी तयारी देखील करून ठेवली होती.

 

operation cactus inmarathi1

 

विद्रोहींनी त्यांच्या मदतीसाठी श्रीलंकेच्या पीपल्स लिबरेशन ऑर्गनायझेशन ऑफ तमिळ एलम (PLOTE) ह्या अतिरेकी संघटनेची मदत घेतली होती. PLOTE चे अतिरेकी आधीच ह्या विद्रोहींच्या मदतीसाठी शस्त्रात्रे घेऊन मालदीवमध्ये दाखल झाले होते.

अचानक राष्ट्रपती गय्युम ह्यांचा भारतदौरा रद्द झाला, पण तरीही विद्रोहींनी त्यांची योजना रद्द न करता जसे ठरले होते त्याचप्रमाणे सत्तापालट करण्यासाठी उठाव करण्याचा निर्णय घेतला.

ह्या सगळ्या उठावाची योजना मालदीवच्या अब्दुल्लाह लथूफी ह्या व्यक्तीने केली होती. लथूफी मालदीवचे असले तरी ते श्रीलंकेत व्यापार करत होते. आणि अतिरेकी संघटनांशी त्यांचा संपर्क होता.

त्यांनी ह्या अतिरेक्यांच्या साहाय्याने मालदीवमध्ये सत्तापालट करण्याचे षडयंत्र रचले. तसेच मालदीवचे माजी राष्ट्रपती मोहम्मद नसीर हे देखील ह्या षडयंत्रात सहभागी होते असा त्यांच्यावर आरोप होता. हे सगळे षडयंत्र श्रीलंकेत रचले होते.

ठरल्याप्रमाणे ३ नोव्हेंबरच्या काही तास आधीच हे श्रीलंकेचे अतिरेकी बोटींमधून मालदीवला आले. त्यांनी पर्यटकांचा वेष घेतला होता. त्यामुळे ते आले तरी कुणाला संशय आला नाही.

हत्यारे धारण केलेल्या अतिरेक्यांनी पद्धतशीरपणे ३ नोव्हेंबरला मालदीवची राजधानी असलेल्या माले येथील सरकारी इमारतींवर कब्जा केला. प्रमुख सरकारी भवन, बंदरे , विमानतळ आणि टेलिव्हिजन स्टेशन अतिरेक्यांनी ताब्यात घेतले.

 

operation cactus inmarathi

 

अतिरेक्यांचा डाव होता, की राष्ट्रपती मामून अब्दुल गय्युम ह्यांच्यापर्यंत पोहोचून त्यांनाही ताब्यात घ्यायचे, पण असे होण्याआधीच राष्ट्रपतींनी अनेक देशांना आपत्कालीन संदेश पाठवला.

नवी दिल्ली येथे त्वरित हा संदेश पोचला. भारतात अनेक चॅनेल्सद्वारे हा संदेश मिळाला. हा संदेश तत्कालीन प्रधानमंत्री राजीव गांधी ह्यांच्यापर्यंत लगेच गेला आणि त्यामुळे त्यांनी त्वरित पावले उचलली.

मालदीवमधील परिस्थिती आटोक्यात आणण्यासाठी भारतीय सैन्याच्या आग्रा येथील छावणीतील पॅराशूट ब्रिगेडचे ३०० जवान त्वरित मालेला रवाना झाले. गय्युम ह्यांचा संदेश मिळाल्यापासून ९ तासांतच नॉन स्टॉप  उड्डाण करीत भारतीय सैन्य मालदीवच्या हूलहुले विमानतळावर पोचले.

सुदैवाने हे विमानतळ अतिरेक्यांच्या ताब्यात गेले नव्हते, तर मालदीव सैन्याच्या ताब्यात होते. हूलहुलेहुन भारतीय सैन्याची तुकडी राजधानी माले येथे पोचली.

 

operation cactus inmarathi2

 

दरम्यान भारताने कोच्चीहून अधिक सैन्यबळ मालदीवला पाठवले. मालेच्या आकाशात भारतीय वायुसेनेचे मिराज विमान घिरट्या घालू लागले. भारतीय सैन्य आलेले बघून अतिरेक्यांचे मनोबल खचले.

ह्या सगळ्या गोंधळात भारतीय सैन्याने मालदीवचे मुख्य विमानतळ परत ताब्यात मिळवले आणि राष्ट्रपती गय्युम ह्यांना सुरक्षित ठिकाणी हलवले.

भारतीय नौसेनेच्या युद्धनौका सुद्धा सैन्याच्या मदतीला मालदीवला पोचल्या. त्यांनी माले आणि श्रीलंकेच्या दरम्यान असलेली अतिरेक्यांची सप्लाय लाईनच नष्ट केली.

भारतीय सैन्याने पटापट पावले उचलत माले येथील परिस्थिती आटोक्यात आणण्यास सुरुवात केली. जिथे जिथे म्हणून हे अतिरेकी ठाण मांडून बसले होते तिथून त्यांची धरपकड करण्यास सुरुवात केली.

भारतीय सैन्याचे शौर्य बघून घाबरलेले उरलेसुरले अतिरेकी श्रीलंकेला परत पळून जाण्याच्या तयारीत होते. त्यांनी एका जहाजाचे अपहरण केले आणि ते पळून जाऊ लागले, पण अमेरिकन नौसेनेने त्या जहाजाला अडवून ठेवले आणि त्या जहाजाची माहिती भारतीय नौसेनेला दिली.

 

operation cactus inmarathi3

 

भारतीय नौसेनेच्या गोदावरी ह्या युद्धनौकेवरून एक हेलिकॉप्टर त्या जहाजाच्या दिशेने रवाना झाले. भारताचे मरिन कमांडोज त्या जहाजावर उतरले आणि कमांडोंनी अतुलनीय शौर्याचे प्रदर्शन करत १७ अतिरेक्यांना यमसदनी धाडले. दुर्दैवाने ह्या चकमकीत दोन अपहृतांचाही जीव गेला.

भारताला स्वातंत्र्य मिळाल्यापासून विदेशी भूमीवर भारताचे हे पहिले सैन्य अभियान होते. ह्या अभियानाला ऑपरेशन कॅक्टस असे नाव देण्यात आले. दोनच दिवसांत हे अभियान भारतीय सैन्यदलांनी यशस्वी करून दाखवले आणि मालदीवमधील सत्तापालट करण्याचा प्रयत्न निकामी ठरला.

कौतुकाची बाब अशी, की ह्या कारवाईत भारतीय सैन्याचे काहीही नुकसान झाले नाही. विदेशी भूमीवर केवळ एका टुरिस्ट मॅपच्या साहाय्याने भारतीय सैन्याने हे ऑपरेशन यशस्वी करून दाखवले.

ह्या ऑपरेशन नंतर बहुतांश भारतीय सैनिक भारतात परतले, पण परत असा प्रकार होऊ नये ह्यासाठी १५० भारतीय सैनिक वर्षभर मालदीवमध्ये तैनात होते.

भारतीय सैन्याचे शौर्य बघून संयुक्त राष्ट्र तसेच ब्रिटन व अमेरिका ह्यांसारख्या देशाने भारतीय सैन्यदलांचे तोंड भरून कौतुक केले, पण श्रीलंकेने मात्र ह्यावर तीव्र निषेध नोंदवला.

मालेमध्ये झालेले ऑपरेशन कॅक्टस हे आजही जगातील सर्वात यशस्वी कमांडो ऑपरेशन्स पैकी एक म्हणून गणले  जाते.

===

आमचं युट्यूब चॅनल आणि त्यावरचे व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला फॉलो करा :

व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल

इनमराठीच्या अपडेट्स शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम  | टेलिग्राम शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved. 

error: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?