' चकली, लाडू, करंजी: फराळाची रंगत वाढवणारे हे पदार्थ आपले नाहीतच

चकली, लाडू, करंजी: फराळाची रंगत वाढवणारे हे पदार्थ आपले नाहीतच

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम शेअरचॅट

व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल 

===

दिवाळी म्हटलं की आठवतात आकाशदिवा, पणत्या, रांगोळ्या, अभ्यंगस्नान, फटाके, किल्ला आणि सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे फराळ! एकवेळ फटाके, किल्ला, रांगोळ्या जमल्या नाहीत तरी दिवाळी साजरी होते. पण फराळाशिवाय दिवाळी ही आपण कल्पनाच करू शकत नाही.

महाराष्ट्रात तरी दिवाळी आणि फराळ हे समीकरण अगदी पक्के आहे. काहीही झाले तरी हे समीकरण बदलू शकत नाही. आपल्या आज्यापणज्यांच्या आधीपासून हे फराळाचे पदार्थ महाराष्ट्रातील घराघरांत तयार होत आले आहेत. चकली, विविध प्रकारचे लाडू, शेव, चिवडा,करंजी , शंकरपाळे, कडबोळी, अनारसे, चिरोटे हे पदार्थ दिवाळीत आवर्जून केलेच जातात.

जरी घरी करायला जमले नाही तरी हे पदार्थ विकत आणले जातात पण दिवाळीच्या फराळाला हे पदार्थ महाराष्ट्रात घराघरात असतातच! किंबहुना जवळजवळ सगळ्यांच्याच दिवाळीच्या आनंदाची व्याख्या म्हणजे फराळ होय.

 

faral inmarathi

 

फराळाचे प्रयोजन काय तर शेतीच्या दिवसात शेतात राबून दमलेल्या थकलेल्या शेतकऱ्यांना थोडा निवांतपणा मिळावा, थोडं गोडधोड खाऊन जीभेचे चोचले पुरवता यावे, थंडीच्या काळात आवश्यक असलेली स्निग्धता मिळावी म्हणून ही फराळाची परंपरा आपल्याकडे सुरु झालेली असावी.

फराळाला सुद्धा प्राचीन इतिहास आहे. अगदी उपनिषद काळात देखील ‘भोजनकुतूह्ल’ या ग्रंथात दिवाळीच्या फराळाचा उल्लेख केलेला आहे.

केवळ महाराष्ट्रातच नव्हे तर संपूर्ण देशातच दिवाळी आनंदात उत्साहात साजरी होते. प्रत्येक भारतीय घरात दिवाळीनिमित्त विविध रुचकर पक्वान्न केले जातात. प्रांतागणिक या पदार्थांमध्ये बदल होतो.

तुम्हाला सांगितले तर आश्चर्य वाटेल की मराठी घरात दिवाळीत आवर्जून केले जाणारे हे फराळाचे पदार्थ मूळचे महाराष्ट्रातले नाहीत. पण हे पदार्थ आपल्या मातीत इतके घट्ट रुजले आहेत की हे पदार्थ आपले नाहीत हे आपल्याला खरं वाटत नाही.

चला तर मग बघूया की हे कोणते पदार्थ आहेत जे बाहेरून महाराष्ट्रात आले पण इथल्या मातीत रुजले आणि मराठी सणांचा अविभाज्य भाग बनले.

१. लाडू

आपले मराठी लाडू म्हणजे हिंदीतल्या लड्डूचा अपभ्रंश आहेत. दिवाळीत आवर्जून केले जाणारे बेसनाचे किंवा रव्याचे लाडू हे इतर प्रांतातून महाराष्ट्रात आले आहेत.

प्राचीन काळी लाडवांना मोदक म्हणत असत. मोद म्हणजेच आनंद देणारा तो मोदक! अर्थात आपल्याकडे गणेशोत्सवात केलेला जाणारा मोदक हा संपूर्णपणे भिन्न प्रकार आहे.आज जो आपण लाडू म्हणून ओळखतो तो मूळचा हिंदीतला लड्डू आहे.

 

ladoo inmarathi

 

प्राचीन काळी भारताचे आद्य शल्यचिकित्सक सुश्रुत त्यांच्या शस्त्रक्रिया झालेल्या रुग्णांना मध आणि गुळासह तीळ शक्तिवर्धक म्हणून खायला देत असत. या मिश्रणाचे प्रमाण (डोस) ठरलेले होते म्हणून हे मिश्रण ते एका विशिष्ट मात्रेत गोलाकार वळून देत असत. आज ज्याला आपण लाडूचा आकार म्हणतो तो पूर्वी औषधाच्या डोससाठी सोयीस्कर म्हणून वळला जात असे.

त्यानंतर स्वयंपाकघरात प्रयोग होत गेले आणि बेसन, रवा यात अन्य जिन्नस घालून त्यांचे लाडू केले जाऊ लागले. आपल्यावर परकीय आक्रमणे झाली तेव्हा हाच लाडू शाही पदार्थ म्हणून ओळखला जाऊ लागला. त्यात सुकामेवा वगैरे घालण्यास सुरुवात झाली.

बुंदी खरं तर मूळ राजस्थानची! त्यामुळे बुंदीचा लाडू खरं तर राजस्थानी होय. पण आता महाराष्ट्रात सणावारी, लग्नकार्यात बुंदीचेच लाडू केले जातात.

तर असा हा लाडू महाराष्ट्रात आला, स्थिरावला. आज दिवाळीत लाडूशिवाय फराळाचा आपण विचारही करू शकत नाही.

 

diwali family inmarathi

 

दिवाळीच्या पहिल्या दिवशी लाडूचा गोड घास भरवून एकमेकांना शुभेच्छा देत या सणाचा आनंद साजरा केला जातो.

२. चकली

चकली हा पदार्थ संपूर्ण भारतात विविध नावांनी ओळखला जातो. मुरुक्कू, चक्रिका, चकरी अशी चकलीची विविध नावे आहेत. हा पदार्थ देखील मूळचा मराठी नाही. ही चकली दक्षिण भारतातून महाराष्ट्रात आली आणि इथलीच झाली.

उपनिषदकाळात चकलीला चक्रिका हे नाव होते. चक्रासारखी गोल गोल म्हणून चक्रिका! तसेच मुरुक्कू हा शब्द तामिळ भाषेतील आहे. याचे मराठी भाषांतर म्हणजे वेटोळी होय. गोल वेटोळी ती महाराष्ट्रात येऊन चकरी झाली आणि चकरीचा अपभ्रंश पुढे चकली असा झाला.

 

chakali inmarathi

 

जगात जिथे जिथे म्हणून तामिळ लोक आहेत तिथे चकली हा पदार्थ खाल्ला जातो. अगदी श्रीलंका, मलेशिया, सिंगापूर मध्येही चकली खाल्ली जाते.

===

व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल

===

३. करंजी

आपण मराठी लोक कुठल्याही शुभकार्याला शकुनाची म्हणून करंजी किंवा कानवले, पुरणाचे कडबू करतो. फराळात करंजीला मानाचे स्थान आहे. अगदी आजही घराघरांत फराळाचे पदार्थ करण्याची सुरुवात करंजीनेच होते.

उत्तर भारतात तर गुजिया त्यांच्या शुभकार्यात आणि सणांना आवर्जून केले जातातच. प्राचीन काळी करंजी शष्कुली या नावाने ओळखली जात असे.

 

karanji inmarathi

 

उत्तरप्रदेशातून ही करंजी राजस्थाननंतर गुजरात असा प्रवास करत करत महाराष्ट्रात आली आणि शकुनाची म्हणून पवित्र मानली जाऊ लागली. प्रत्येक प्रांतात तिची कृती आणि जिन्नस वेगवेगळे आहेत.

उत्तरप्रदेशात गुजिया तर बिहारमध्ये पुरुकीया, छत्तीसगडमध्ये कुसली तर गुजरातमध्ये घुघरा अशी करंजी विविध नावांनी भारतात सगळीकडे सणावारी केली जाते.

४. अनारसा

सुगरणीच्या पाककौशल्याची परीक्षा बघणारा पदार्थ म्हणजे अनारसा होय. जिला अनारसा अगदी व्यवस्थित जमला ती गृहलक्ष्मी सुगरण असे पूर्वी म्हणत असत.

 

anarsa inmarathi

 

महाराष्ट्रात लक्ष्मीपूजनाला नैवेद्याला आवर्जून केला जाणारा हा पदार्थ मूळचा बिहारचा आहे असे म्हटले तर आपल्याला खरे वाटणार नाही. पण इतिहास बघता अनारसा मूळचा मराठी पदार्थ नाही असे म्हणण्यास वाव आहे. याला कारणही तसेच आहे.

महाराष्ट्राव्यतिरिक्त अनारसा केवळ बिहारमध्ये केला जातो. आणि बिहार व महाराष्ट्र हे काही एकमेकांच्या शेजारी नाहीत. आपल्याकडे अनारसा केवळ दिवाळीत असतो आणि अधिक महिन्यात जावयाला अनारश्याचे वाण देण्याची पद्धत आहे. पण बिहारमध्ये मात्र अनारश्यांना खूप महत्वाचे स्थान आहे. म्हणूनच अनारसा हा मूळचा तिकडचाच असून आपल्याकडे स्थिरावला असावा असे आपण म्हणू शकतो.

५. कडबोळी

चकलीच्या बरोबरीने फराळाच्या ताटात स्थान मिळवून असलेली कडबोळी हा पदार्थ मराठी नाही असे आपण स्वप्नात देखील म्हणणार नाही. पण ह्या पदार्थाचे मूळ कर्नाटकात सापडते.

कर्नाटकी कडबूच्या जवळ जाणारी ही कडबोळी आहेत. अर्थात कर्नाटकी कडबूची कृती पूर्णपणे वेगळी आहे तरीही कडबूचा व कडबोळीचा एकमेकांशी काहीतरी संबंध असावा असे म्हणता येईल. कर्नाटक व महाराष्ट्र एकमेकांचे शेजारी आहेत. त्यामुळे काळाच्या ओघात एकमेकांच्या खाद्यसंस्कृतीवर एकमेकांचा परिणाम होणार हे तर गृहीत धरलेच पाहिजे.

 

kadboli inmarathi

 

तर असे हे फराळाचे पदार्थ जरी मूळचे मराठी नसले तर आता मात्र त्यांच्याशिवाय आपले फराळाचे ताट पूर्ण होत नाही. तर या दिवाळीत हे पारंपरिक पदार्थ नक्कीच खा आणि दिवाळी आनंदाने उत्साहाने साजरी करा! टीम इनमराठी कडून सर्व वाचकांना दिपावलीच्या हार्दिक शुभेच्छा!

===

व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल

इनमराठीच्या अपडेट्स शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम  | टेलिग्राम शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?