' “अफगाणिस्तानकडे इतिहास घडवण्याची उत्तम संधी! भारत लाज राखणार, की…” – InMarathi

“अफगाणिस्तानकडे इतिहास घडवण्याची उत्तम संधी! भारत लाज राखणार, की…”

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम शेअरचॅट

व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल 

===

लेखक – ईशान पांडुरंग घमंडे

===

आज भारत विरुद्ध अफगाणिस्तान सामना रंगणार आहे. एका बाजूला दोन सामन्यांमध्ये दमदार विजय मिळवणारा आणि पाकिस्तानविरुद्ध थोडक्यात सामना हरलेला अफगाणी संघ, तर दुसरीकडे दोन सामन्यांमध्ये दारुण पराभव पत्करून, विश्वचषक स्पर्धेतून बाहेर पडण्याचा उंबरठ्यावर असलेला भारतीय संघ…

हा सामना अफगाणिस्तानच्या बाजूने एकतर्फी ठरला, तरीही कदाचित आश्चर्य वाटणार नाही अशी स्थिती आहे. कागदावर भारतीय संघाला उपांत्य फेरीत धडक मारण्याची संधी असली, तरी ते सत्यात उतरणं म्हणजे म्हणजे दिवास्वप्न किंवा आश्चर्य असेल, असं म्हटलं तरी वावगं  ठरणार नाही.

 

india vs afghanistan inmarathi

 

भारताला पेपर कठीण…

या सगळ्या पार्श्वभूमीवर अफगाणिस्तान मात्र बुलंद हौसले घेऊन सामना खेळणार आहे हे नक्की आहे. पाकिस्तानविरुद्धचा पराभव जिव्हारी लागल्यामुळे असगर अफगाणने वर्ल्डकपच्या मध्यावर अचानक घेतलेली निवृत्ती हा एकमेव नकारात्मक मुद्दा सोडला तर जवळपास सगळ्याच गोष्टी अफगाणिस्तानच्या बाजूने घडल्या आहेत असंच म्हणायला हवं.

भारताविरुद्धच्या त्यांच्या सामन्याचा विचार करायचा झाला, तर भारतीय संघ प्रचंड मानसिक दबावाखाली असणार आहे. स्पर्धेतील आव्हान कागदावर का होईना, टिकवून ठेवणं आणि लाज राखण्यासाठी उरलेले सामने जिंकणं या दबावाखाली भारतीय संघ असणार हे नक्की…

 

indian cricket team inmarathi

 

राशिद आणि मुजीब हे त्यांच्या गोलंदाजीची हुकुमी एक्के म्हणायला हवेत. त्यांच्याविरुद्ध भारताच्या काही मुख्य फलंदाजांची कामगिरी पाहिली तर एकूणच परिस्थिती कठीण आहे.

राशिदने राहुलला तीनवेळा आणि रोहित, हार्दिकला प्रत्येकी दोनवेळा बाद केलंय. ईशान आणि रिषभ या दोघांना मुजीबने प्रत्येकी दोनदा बाद केलंय. एकुणात काय, तर भारतीय फलंदाजी अफगाणिस्तानसमोर गारद होणं अशक्य नाहीये.

 असं घडलं तर…

एक भारतीय चाहता म्हणून हे असं घडू नये असं वाटतंय खरं, पण दुर्दैवाने अफगाणच्या संघाने भारतीय संघावर विजय मिळवलाच (वेडं मन तर स्कॉटलंड किंवा नामिबियाने न्यूझीलंडला हरवावं अशी स्वप्न पाहतंय) तर त्यांचा आत्मविश्वास गगनाला भिडणार… हा आत्मविश्वास हाताशी घेऊन न्यूझीलंडचा सामना करायला गेल्यावर त्यांना धोबीपछाड देण्याची ताकद या संघात नक्कीच आहे.

गोलंदाजी ही त्यांची ताकद आहे. फलंदाजी कागदावर काहीशी दुबळी वाटत असली, तरी अगदीच लेचीपेची नाही हे त्यांनी वारंवार दाखवून दिलंय. मानसिक खच्चीकरण झालेल्या आणि सहाव्या गोलंदाजाचा पर्याय नसणाऱ्या भारतीय गोलंदाजांवर हल्ला चढवण्याची क्षमता अफगाणी शिलेदारांकडे आहे.

 

afghanistan batters inmarathi

 

असं घडलं तर एक भारतीय चाहता म्हणून वाईट वाटणार असलं, तरी एक ‘क्रिकेट चाहता’ म्हणून अफगाणिस्तानची प्रगती बघताना आनंद वाटेल हे नक्की!

गेल्या काही वर्षांपूर्वीपासून ज्या थिअरीची फार चर्चा आहे, ती म्हणजे आशियाई संघ येत्या काळात क्रिकेट विश्वावर दबदबा निर्माण करतील. अफगाणिस्तान संघाचा उदय हा या थिअरीसाठी आशेचा किरण ठरतो. भारताचा पराभव केला, तर उपांत्य फेरीत दाखल होण्याचं त्यांचं स्वप्न सत्यात उतरणं नक्कीच शक्य आहे.

न्यूझीलंडसाठीही महत्त्वाचं…

न्यूझीलंडसाठी खरंतर गणित सोपं आहे. उरलेले सगळे सामने जिंका आणि उपांत्य सामन्यात जागा मिळवा इतकं सोप्पं! अफगाणिस्तानच्या संघाने भारताला धक्का दिला तर मात्र न्यूझीलंडचं टेन्शन वाढू शकतं. न्यूझीलंडच्या संघावर मात करण्याची क्षमता सुद्धा अफगाणी संघात आहे, हे सगळेच जण जाणून आहेत.

आजचा सामना न्यूझीलंडसाठी सोपा आहे, असं कागदावर तरी वाटतंय. तुम्ही हे वाचत असाल, तोवर कदाचित या सामन्याचा निकालही लागलेला असेल. त्यांच्यासमोरचं चित्र काहीसं स्पष्ट झालेलं असेल.

 

new zealand batters inmarathi

 

सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे भलामोठा नेट रनरेट घेऊन बसलेल्या अफगाणिस्तान संघाच्या जवळपास पोचण्यासाठी न्यूझीलंड नक्कीच प्रयत्न करेल. चुकून माकून एखादा सामना गमवावा लागला, तर नेट रनरेटचा टेकू सोबतीला असावा असं त्यांच्याही मनात असेल.

भारत बाहेर जाणार आहे म्हणून…

आवाजच सामना जिंकूनही भारतीय संघ उपांत्य फेरीत पोचण्याची शक्यता धूसर आहे. मग असंच घडणार असेल, तर एक क्रिकेट चाहता म्हूणन अफगाणिस्तान संघ उपांत्य फेरीत पोचावा अशी माझी तरी इच्छा आहे.

 

afghanistan team inmarathi

 

एका उभरत्या संघाचं हे यश क्रिकेटच्या भविष्यासाठी फार महत्त्वाचं ठरेल. याशिवाय तालिबानच्या कारवाईनंतर अफगाणी नागरिकांना आनंद साजरा करण्यासाठी, चेहऱ्यावर हास्याची लकेर उमटण्यासाठी ती फारच चांगली गोष्ट ठरेल. मग भारतीय संघ स्पर्धेबाहेर जाणारच असेल, तर पाकिस्तानच्या बरोबरीने अफगाणिस्तानच्या संघाने उपांत्य फेरीत धडक मारावी अशी इच्छा माझ्यातल्या क्रिकेट चाहत्याला आहे.

===

व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल

इनमराठीच्या अपडेट्स शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

InMarathi.com वर विविध लेखकांनी व्यक्त केलेले विचार ही त्यांची वैयक्तिक मतं असतात. InMarathi.com त्या मतांशी सहमत असेलच असं नाही. | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटरइंस्टाग्राम | टेलिग्रामशेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.

error: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?