' गुरुदास कामत विरोधात फक्त २६२० मतं; पराभूत उमेदवार मात्र आज गाजवतोय राजकारण...

गुरुदास कामत विरोधात फक्त २६२० मतं; पराभूत उमेदवार मात्र आज गाजवतोय राजकारण…

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम शेअरचॅट

व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल 

===

१९८२-८३ दरम्यान संजय गांधी यांच्या अपघाती निधनानंतर त्यांच्या पत्नी मनेका यांनी संजय विचार मंच नावाने वेगळा गट स्थापन केला होता. त्यावेळी झालेल्या लोकसभा निवडणुकीत  संजय विचार मंचाकडून एका २५ वर्षीय तरुणाने निवडणूक लढवली होती. मात्र फारसा राजकीय पाठिंबा न मिळाल्यामुळे या निवडणूकीत त्याचा पराभव झाला.

या निवडणूकीत त्याला फक्त २६२० मतं मिळाली. हा सर्व घटनाक्रम पाहता राजकारणात काम करायचं असेल, तर काँग्रेस पक्षाशिवाय पर्याय नाही, याची खात्री त्या तरुणाला पटली आणि त्याने काँग्रेस पक्षात प्रवेश केला.

राजकरणाचे वेड असलेल्या या तरुणाचा राजकीय प्रवास निश्चितच सोपं नव्हता. ते ही ‘अल्पसंख्यांक’ हा शिक्का असताना! कोण होता हा तरुण?

मित्रांनो, तुम्ही गेल्या दोन आठवड्यांपासून महाराष्ट्रात चालू असलेला राजकीय गोंधळ बघतच असाल. २ आक्टोबरला मुंबईतून गोव्याला जाणाऱ्या एका लक्झरी क्रुझवर एनसीबीने छापा टाकला आणि अभिनेता शाहरुख खानचा मुलगा आर्यन खानसह आणखी दहा-बारा जणांना ताब्यात घेतले. तेव्हापासून म्हणजेच गेल्या २६ दिवसांत अनेक नाट्यमय घडामोडी घडत आहेत.

याच घडामोडीत जो राजकीय नेता वारंवार नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरोला(NCB) आणि त्याचे विभागीय संचालक समीर वानखेडे यांना धारेवर धरत आहे तो तोच ‘भंगारवाला’ तरुण आहे जो कधीकाळी फक्त २६२० मते मिळवून पराभूत झाला होता.

 

nawab malik inmarathi

 

होय! तुमचा अंदाज बरोबर आहे, तो नेता आहे राष्ट्रवादी कॉंग्रेसचा मुख्य प्रवक्ता आणि राष्ट्रवादी कॉंग्रेसचे मुंबई शहराचे शहराध्यक्ष असलेले ‘पिक्चर अभी बाकी है मेरे दोस्त’ या ट्विटने सर्वांचं लक्ष पुन्हा वेधून घेणारे ‘नवाब मलिक’. 

आर्यन खान ड्रग्ज प्रकरणात नवाब मलिक यांनी खूपच आक्रमक भूमिका घेत समीर वानखेडेंना विरोध केला, पण नवाब मलिक एनसीबीवर सुडबुद्धीने कारवाई करत असल्याचा आरोप त्यांच्यावर  करण्यात आला.

९ जानेवारी २०२१ ला एनसीबीचे अधिकारी समीर वानखेडे यांनी गांजा प्रकरणात मलिकांचे जावई समीर खान यांच्यावर कारवाई करत त्यांना अटक केली. या प्रकरणात समीर खान यांच्यासह आणखी चार आरोपींना यात अटक केली गेली. समीर खान हे नवाब मलिकांची ज्येष्ठ कन्या निलोफर यांचे पती आहेत.

या प्रकरणात एनसीबीने समीर खान यांना ड्रग्जची तस्करी आणि पैसे पुरवल्याच्या आरोपाखाली जानेवारी महिन्यात अटक केली होती. त्यामुळे आर्यन खान प्रकरणाला राजकीय वळण दिले जात असल्याचा आरोप मलिक यांच्यावर होतोय.

 

nawab malik inmarathi1

 

या सगळ्या घडामोडी बघता तुम्हाला नवाब मलिक यांच्या राजकीय प्रवासाबद्दल उत्सुकता वाटणे साहजिकच आहे, तेव्हा पाहूया नवाब मलिक यांच्या राजकीय प्रवासाचे चलतचित्र या लेखातून. 

लोकसभा निवडणूक १९८४. ईशान्य मुंबई मतदारसंघात काँग्रेसचे गुरुदास कामत आणि भाजपचे प्रमोद महाजन या दोन दिग्गजांची ‘काँटे की टक्कर’ सुरू होती.

गुरुदास कामत यांना या निवडणुकीत २ लाख ७३ हजारांपेक्षा जास्त मतं मिळाली. सुमारे ९५ हजार मताधिक्क्याने ते विजयी झाले. याच निवडणुकीत एक २५ वर्षांचा एक तरुणही नशीब आजमावत होता.

कामत यांच्या विरोधात त्याला कशीबशी फक्त २६२० मतं मिळवता आली, पण तेव्हाचा हा पराभूत उमेदवार गेल्या काही दिवसांपासून राज्याचं राजकारण गाजवतोय. त्याचं नाव आहे नवाब मलिक.

 

nawab malik inmarathi5

 

नवाब मलिक यांचं कुटुंब मूळचं उत्तर प्रदेशचं. तिथं त्यांची शेती आणि इतर व्यवसाय होते. नवाब यांचे वडील मोहम्मद इस्लाम मलिक हे नवाब यांच्या जन्मापूर्वीच मुंबईत स्थायिक झाले होते.

उत्तर प्रदेशातील बलरामपूर जिल्ह्यातील उतरौला तालुक्यात ‘दुसवा’ गावात २० जून १९५९ ला नवाब यांचा जन्म झाला. मुंबईत मलिक कुटुंबांचे लहान-मोठे व्यवसाय होते. त्यांच्या मालकीचं एक हॉटेल होतं.

त्याव्यतिरिक्त भंगार व्यवसाय आणि इतर काही कामं ते करायचे. “होय मी भंगारवाला आहे. माझ्या वडिलांनी मुंबईत कपडे आणि भंगाराचा व्यवसाय केला. मीही आमदार होईपर्यंत भंगाराचा व्यवसाय केला. माझे कुटुंबीय आजही करतात. मला त्याचा अभिमान आहे,” असं एका पक्षाच्या एका टीकेला उत्तर देताना मलिक म्हणाले होते.

मुंबईत दाखल झाल्यानंतर सुरुवातीपासूनच मलिक कुटुंब डोंगरी परिसरात वास्तव्याला होतं. डोंगरी परिसरातील एका इस्लामी शाळेत त्यांनी अकरावी पर्यत शिक्षण घेतलं आणि त्यानंतर बुऱ्हाणी कॉलेजमधून बारावी पूर्ण केली. त्याच महाविद्यालयात त्यांनी बी ए साठी प्रवेश घेतला, पण कौटुंबिक कारणामुळे त्यांना बी ए च्या अंतिम वर्षांची परिक्षा देता आली नाही.

मुंबई विद्यापीठात शिकताना विद्यापीठाने फी वाढवली होती. त्याविरोधात झालेल्या आंदोलनात मलिकांनीही सहभाग घेतला होता, पण या आंदोलनात पोलीसांनी केलेल्या लाठीचार्जमध्ये ते जखमी झाले. याच काळात ते कॉंग्रेसच्या सभांना हजेरी लावू लागले.

 

nawab malik inmarathi2

 

१९९१ च्या महापालिका निवडणुकीसाठी त्यांनी कॉंग्रेसकडे तिकीट मागितलं, पण काँग्रेसने त्यांना तिकीट दिलं नाही. १९९३ च्या बाबरी मशिद प्रकरणानंतर राज्यात समाजवादी पक्षाचे वारे वाहू लागले होते. त्यात त्यांनी समाजवादी पक्षाकडून काम सुरु केलं.

विशेष म्हणजे १९९५ च्या विधानसभा निवडणुकीसाठी पक्षाने मुस्लीम बहुल नेहरूनगर मतदारसंघाचं मलिकांना तिकीट दिलं. त्यावेळीही शिवसेनेच्या सूर्यकांत महाडिक यांच्याकडून त्यांचा पराभव झाला.

मात्र धर्माच्या आधारावर मतं मागितल्याच्या आरोपाखाली महाडिकांच्या विरोधात  न्यायालयात याचिका खटला दाखल करण्यात आला. न्यायालयात महाडिक दोषी आढळल्याने निवडणूक आयोगाने ही निवडणूक रद्द केली. त्यामुळे नेहरूनगर मतदारसंघात १९९६ मध्ये झालेल्या फेरनिवडणूकीत नवाब मलिकांचा साडेसहा हजारांच्या फरकाने विजय झाला. 

१९९९ साली विधानसभा निवडणुका लागल्या. या निवडणूकांमध्येही नवाब मलिक यांनी समाजवादी पक्षाकडून विजय मिळवला. राज्यात काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षांच आघाडी सरकार सत्तेत आलं.

समाजवादी पक्षाने आघाडी सरकारला पाठिंबा दिला होता. त्यामुळे त्यावेळी  समाजवादी पक्षालाही सत्तेत वाटा देण्यात आला होता. आघाडी सरकारमध्ये नवाब मलिकांना गृहनिर्माण राज्यमंत्री पदाचा कार्यभार देण्यात आला, पण त्याच काळात मलिक यांचे समाजवादी पक्षातील नेत्यांशी असलेले मतभेद टोकाला गेले.

अखेर मलिक यांनी मंत्रिपदावर असतानाच समाजवादी पक्षाला रामराम ठोकत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश केला. राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये नवाब मलिक यांनी उच्च आणि तंत्रशिक्षण, कामगार मंत्रालय या खात्यांचा कारभार सांभाळला. 

 

nawab malik inmarathi3

 

काही राजकीय जाणकारांच्या मते, महाराष्ट्राच्या राजकारणात पुढे आलेल्या मोजक्याच मुस्लीम चेहऱ्यांपैकी नवाब मलिक हे आघाडीवर होते. त्यावेळी राज्यातील राष्ट्रवादी काँग्रेसचा मुस्लीम चेहरा म्हणूनच मलिक यांची ओळख निर्माण झाली.

२००६ मध्ये माहीमच्या जरीवाला चाळ पुनर्विकास प्रकल्प गैरव्यवहार प्रकरण उजेडात आले. या प्रकरणात सामाजिक कार्यकर्ते अण्णा हजारे यांनी केलेल्या आरोपांनतर नवाब मलिकांनी आपल्या मंत्रीपदाचा राजीनामाही दिला.

या प्रकरणात न्यायालयाने या प्रकरणात नवाब मलिकांना निर्दोष मुक्त केले (राज्यमंत्र्यांनी घेतलेला निर्णय उचित असल्याचा निर्णय घेतला.) त्यानंतर नवाब मलिक यांना पुन्हा २००८ मध्ये मंत्रिपदावर घेण्यात आलं होतं.

नवाब मलिक गेल्या काही दिवसांपासून सक्रिय होण्यामागे आणखी एक कारण असल्याचं ज्येष्ठ राजकीय विश्लेषक सांगतात. त्यांच्या मते, राष्ट्रवादी काँग्रेसची नजर सध्या मुंबई महापालिका निवडणुकीकडे आहे.

नवाब मलिक यांच्याकडे मुंबईचं शहराध्यक्षपद आहे. त्यामुळे त्यांना पुढे आणल्यास मुंबई महापालिकेत फायदा होईल, असं पक्षाला वाटतं. नवाब मलिकही आपल्या पत्रकार परिषदांमधून मुद्देसूद युक्तिवाद करत आहेत.

 

nawab malik inmarathi4

 

पूर्वी त्यांच्या पत्रकार परिषदेची फारशी चर्चा व्हायची नाही, पण महिन्याभरात योग्य मुद्दे मांडून मीडियाचं लक्ष त्यांनी आपल्याकडे खेचलं आहे. पत्रकारांनाही त्यांच्या पत्रकार परिषदांना जावेसे वाटते, हे महत्त्वाचं आहे, असेही विश्लेषकांचे मत आहे.

तर मित्रांनो हा होता ‘नवाब मलिक’ यांच्या राजकीय प्रवासाचा आढावा. तुम्हाला लेख कसा वाटला ते आम्हाला कमेन्ट बॉक्स मध्ये जरूर कळवा आणि दिवाळीच्या पार्श्वभूमीवर चालू असलेल्या राजकीय गोंधळाचा आनंद घ्या.  

===

आमचं युट्यूब चॅनल आणि त्यावरचे व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला फॉलो करा 

व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल

इनमराठीच्या अपडेट्स शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम  | टेलिग्राम शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?