' अपक्ष आमदार ते अटकेत असलेले माजी मंत्री; अनिल देशमुखांचा वादग्रस्त राजकीय प्रवास – InMarathi

अपक्ष आमदार ते अटकेत असलेले माजी मंत्री; अनिल देशमुखांचा वादग्रस्त राजकीय प्रवास

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम शेअरचॅट

व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल 

===

काही दिवसांपासून आर्यन खान ड्रग्स प्रकरण माध्यमांमध्ये हैदोस घालत असल्याने सप्टेंबर महिन्यात चघळल्या जाणा-या अनिल देशमुख प्रकरणाचा काहीसा विसर पडला आहे.

गेल्या काही महिन्यापासून अज्ञातवासात असलेले राज्याचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख सोमवारी संध्याकाळी इडी कार्यालयात हजर झाले आणि एकच खळबळ उडाली. आर्यन जामीनावर घरी गेल्याच्या दुस-याच दिवशी मिडीयाला नवं खाद्य मिळालं आणि या प्रकरणी यंदाच्या दिवाळी महाराष्ट्राच्या राजकारणात चांगलेच फटाके वाजणार अशी चर्चा सुरु झाली.

माजी पोलिस आयुक्त परमवीर सिंग यांनी देशमुखांवर केलेले आरोप आणि त्यानंतरच्या लेटर बॉम्बचा तडाखा सहन न झाल्याने अनिल देशमुखांनी गृहमंत्रीपदाचा दिलेला राजीनामा या प्रकरणाची आग शांत होत असतानाच आता नव्या वणव्याने पेट घेतला आहे.

 

anil deshmukh inmarathi

 

एकंदरित गेल्या काही महिन्यांपासून महाराष्ट्राचं राजकारण ज्या व्यक्तीमुळे ढवळून निघालं ते नाव म्हणजे अनिल देशमुख! राष्ट्रवादीचा एक उमदा, अनुभवी चेहरा, शरद पवारांच्या अत्यंत विश्वासातील नेता अशी ओळख असणारे अनिल देशमुख यांची राजकीय कारकीर्द नेहमीच धडाडीची, अनेकदा वादग्रस्त राहिली आहे.

अपक्ष आमदार, युतीचे शिलेदार

नागपूरमधील काटोल जिल्ह्यातून १९९५ साली अनिल देशमुख अपक्ष आमदार म्हणून निवडून आले. खरंतर मात्तबर उमेदवारांचा पराभव करत त्यांनी मिळवलेला विजय हा केवळ त्यांच्या स्थानिक कार्यामुळे मिळालेला होता.

तळागाळातील नागरिकांशी जोडलेली गेलेली नाळ आणि त्यांच्या कामांना दिलेलं प्राधान्य यामुळे गावागावात देशमुख हे नाव चांगलचं परिचयाचं होतं. निवडून आल्यानंतर त्यांनी पहिल्यांदा सत्तेत असलेल्या शिवसेना-भाजप युती सरकारला पाठींबा दिला.

 

anil deshmukh 1 inmarathi

 

या पाठिंब्याचा मोबदला म्हणून त्यांच्यावर शिक्षण आणि सांस्कृतिक खात्याच्या मंत्रीपदाची धुरा सोपवण्यात आली. मात्र पुढे युतीचं राजकारण न पटल्याने त्यांनी पक्षाची साथ सोडत शरद पवारांकडे धाव घेतली. १९९९ साली राष्ट्रवादीत प्रवेश केल्यानंतर ते आपल्याच प्रभागातून विधानसभेच्या निवडणूकीत दुस-यांदा जिंकून आले.

 

sharad pawar inmarathi

 

एकंदरित देशमुखांची लोकप्रियता आणि शांत स्वभाव लक्षात घेता शरद पवारांनी त्यांना थेट राज्यमंत्री पदावरून कॅबिनेट पदाची बढती दिली.

वांद्रे सी लिंक प्रकल्प

मुंबईचा महत्वकांक्षी प्रकल्प म्हणून ओळखल्या जाणा-या वांद्रे सी लिंक प्रकल्पात अनिल देशमुख यांच्या सिंहाचा वाटा आहे. सार्वजनिक बांधकाम विभागाची सुत्र हाती असलेल्या देशमुखांनी सी लिंकसाठी प्रयत्न सुरु केले आणि ते तडीसही केले, त्यावेळी त्यांनी केलेले महाराष्ट्राचे दौरे, माध्यमांशी सातत्याने संपर्क साधत मिळवलेली विविध माहिती, त्यानुसार केलेल्या सुधारणा यांमुळे अनिल देशमुख प्रकाशझोतात आले.

सी लिंक प्रकल्पासाठी त्यांचे केवळ देशभरातूनच नव्हे तर जगभरातून कौतुक झाले. मात्र दुर्दैवाची बाब ही की सी लिंकच्या प्रत्यक्ष उद्घाटनावेळी देशमुख मंत्रीपदावर नव्हते. उद्घाटनाच्या काही दिवसांपुर्वीच मंत्रीनमंडळात झालेल्या फेरबदलात अनिल देशमुखांना स्थान नव्हते, त्याकाळी या प्रकरणावरून बराच गदारोळही झाला होता.

 

sea link inmarathi

 

त्यानंतर पुन्हा राज्यात आघाडी सरकार आल्याने अनिल देशमुखांची खुर्ची पुन्हा एकदा बळकट झाली आणि त्यांनी अन्न औषध प्रशासन पदाची जबाबदारी स्विकारली.

पुतण्याकडून पराभव

विभानसभा निवडणूकीत देशमुखांनी यापुर्वी कधीही हार पत्करली नव्हती. सलग चार निवडणूकांमध्ये विजय मिळवलेल्या देशमुखांसाठी २०१४ हे वर्ष मात्र फारसं चांगलं नव्हतं. कारण त्यांना आपल्याच प्रभागात आपलाच पुतण्या आशिष देशमुख याच्याकडून पराभव स्विकारावा लागला होता.

 

deshmukh inmarathi

 

ही हार देशमुखांना अपेक्षित नव्हती. किंबहूना पक्षासाठीही हा प्रचंड मोठा धक्का होता.

धडाकेबाज निर्णय

वरकरणी शांत दिसणारे अनिल देशमुख मंत्री असताना मात्र धडाडीने काम करत होते. सांस्कृतिक मंत्रीपद भुषवताना त्यांनी सिनेमागृहांमध्ये राष्ट्रगीताची सक्ती केली. त्यांचा हा निर्णय चांगलाच गाजला. अनेकांनी त्याचं स्वागत केलं, तर काहींनी यावर ताशेरे ओढले, अनेक स्तरांतून विरोध होत असतानाही ते आपल्या निर्णयावर ठाम राहिले.

त्यानंतर ते अन्न व औषध प्रशासन मंत्री असताना त्यांनी राज्यात गुटकाबंदी लागू केली. त्यांचा हा निर्णयही वादग्रस्त ठरला.

कोरोनाकाळात पोलिसांचं कौतुक

कडक लॉकडाऊनमध्ये जीवाची पर्वा न करणा-या पोलिसांचे मनोधैर्य वाढवण्यासाठी देशमुख सरसावले होते. गृहमंत्री पद हाती असल्याने त्यांनी वेगवेगळ्या पोलिस स्थानकांना भेट देत पोलिसांचे सत्कार, त्यांचे वाढदिवस साजरे करणे असे वेगवेगळे उपक्रम राबविले.

आरोपांचे शुक्लकाष्ट

परमबीर सिंग यांची बदली करण्यात आल्यानंतर अस्वस्थ असलेल्या सिंह यांनी थेट मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्र लिहून अनिल देशमुख यांची तक्रार केली. तब्बल आठ पानांचं हे पत्र असून त्यात त्यांनी गंभीर स्वरुपाचे आरोप करण्यात आले.

 

deshmukh and cm inmarathi

 

वाझेंना खात्यात घेतल्यानंतर त्यांच्यावर मंत्र्यांनी काय काय टार्गेट दिलं होतं आणि कोणी कोणी वाझेंना काय काय सांगितलं होतं, याची सर्व धक्कादायक माहिती या पत्रात देण्यात आली आहे. त्यात मनी लॉंड्रिंग सारख्या गंभीर आरोपांच्या चक्रव्युहात अडकलेल्या देशमुखांनी राजीनामा दिला. त्यानंतर काही काळ अज्ञातवासात असलेल्या देशमुखांची इडी चौकशी सुरु असून त्यानंतर त्यांना मंगळवारी सकाळी अटक करण्यात आली.

या प्रकरणात अनिल देशमुख खरंच दोषी आहेत की त्यामागे काही राजकीय खलबतं शिजतायत हे येणारा काळच ठरवेल.

आमचं युट्यूब चॅनल आणि त्यावरचे व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला फॉलो करा :

===

व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल

इनमराठीच्या अपडेट्स शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम  | टेलिग्राम शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.

error: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?